कर्ण खरा कोण होता ? Karn Khara Kon Hota?
मृत्युन्जय , राधेय यासारख्या पुस्तकांतून कर्णाची थोरवी वाचत ज्या पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलाच मी देखील एक. या दोन्ही पुस्तकांची मी एकेकाळी अक्षरशः पारायणे केली होती व कित्येकदा कर्णाच्या दुर्दैवावर अश्रू देखील ढाळले होते. एवढेच नव्हे तर कर्णाच्या या उदात्त चारित्र्यावर आधारित अशी “मृत्युंजय” व “तो राजहंस एक” अशी दोन नाटके देखील वडिलांनी मला दाखविली होती व त्यामुळेच अनेकांप्रमाणे कर्ण हा माझा हिरो होता.
पुस्तकाच्या आत काय असावं याची कल्पना श्री धोंडो विठ्ठल देशपांडे यांनी लिहिलेल्या १४ पानी प्रस्तावनेवरूनच येते. हे पुस्तक म्हणजे , पणशीकरांनी मराठा या वृत्तपत्रातून दर रविवारी लिहिलेल्या, तत्कालीन कर्ण विषयक लेखांचा संग्रह आहे. सुमारे १८ लेखातून पणशीकरांनी कर्णाचे विविध पैलू समोर आणले आहेत. व्यासांच्या महाभारतात सर्व व्यक्तिरेखा येतात त्या प्रसंगवर्णनातून. कर्ण जन्मही असाच, त्यात त्याचा तीळभरही दोष नाही. पण नंतर त्याच्या प्रसंग-प्रवेशात त्याचे स्वभावदोषही उलगडू लागतात. पणशीकर, यावेळी द्रोणांच्या स्पर्धेच्या रंगमंचावर प्रवेश करणारा विशीचा तरुण कर्ण, आपल्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान असणाऱ्या युवा अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देताना दाखवतात व आपल्याला देखील त्यांची वयं ध्यानात घेता, हा फरक स्पष्ट होऊ लागतो. सूतपुत्र म्हणून हिणविला गेलेल्या कर्णाला लगेचच राजा करून दुर्योधनाने त्याला राज्याभिषेक करताच, तात्कालीन जातीयतेच्या भिंती किती तकलादू होत्या ते दाखवून दिले.
यानंतरच्या दुर्योधनाच्या कारस्थानांमध्ये मात्र कर्णाचा सहभागच नव्हे, तर पुढाकार देखील होता असे काही वेळा दिसून येते. पांडवांचा द्वेष करण्यासाठी दुर्योधनाला कारण तरी होते, पण कर्णाला मात्र असे कोणतेही सबळ कारण नव्हते. असे असताना पण त्याने घोष-यात्रेसाठी दुर्योधनाला प्रवृत्त केले. तेथेही त्याला चित्रसेन गंधर्व कडून पराभूत होऊन पळावे लागले. त्यानंतर विराटाच्या युद्धप्रसंगी देखील अर्जुनाने ज्या कौरवांचा पराभव केला त्यात कर्ण देखील होता, हे पणशीकर नमूद करतात. कृष्ण-कर्ण नात्याबद्दल जा गोष्टी मृत्युंजयातून फुलविल्या गेल्या त्याचा समाचार घेताना, “कृष्णाने कर्णाचे आर्जव का केले?” या प्रकरणात पणशीकरांनी कृष्ण-कर्ण युद्ध पूर्व संवादाची फोड करत, त्याचे सर्व पैलू उघड केले आहेत व त्यातील कृष्णाचा धुरंधरपणा कौरवांची बाजू कशी दुबळी करतो, तेच समजाविले आहे.
कर्णाला द्रोणांनी ब्रह्मास्त्र का नाकारले? हे देखील पणशीकर सप्रमाण स्पष्ट करतात आणि हेच प्रमाण मग परशुरामांकडून कर्ण ब्रह्मास्त्र मिळवितो तेव्हा कसे अधोरेखित होते हे दाखवून देतात.
द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग
द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचा बराचसा दोष कर्णाच्या माथी तसा पण जातोच. “द्रौपदीच्या विटंबनेचा सूत्रधार” या लेखातून पणशीकरांनी ते अधिक स्पष्ट केले आहे. मृत्युंजय कार त्यावर पश्चातापाचे पांघरुण घालत असताना पणशीकर मात्र कर्णाचे हे वैगुण्य उघडे पाडतात.
महायुद्धातील कर्ण
प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी कर्ण पहिले दहा दिवस युद्धा पासून दूर राहिला. असे असले तरी या ताज्या दमाच्या कर्णाचा पुढच्या ७ दिवसात अनेकांनी पराभव देखील केला आहे. युद्धपूर्व बैठकीत जेव्हा भीष्म, द्रोण, कृप, व अश्वत्थामा, पांडवांचा पराजय करण्यासाठी किमान दहा दिवस किंवा जास्त कालावधी लागेल असे सांगत होते तेव्हा कर्ण मात्र “कर्णस्तु पंचरात्रेण प्रतिजज्ञे ने महास्त्रवित” म्हणजेच आपण केवळ पाच दिवसात त्यांचा निःपात करू अशी वल्गना करीत होता. आणि सेनापती बनल्यावर मात्र तो केवळ २ दिवसातच संपला.
एवढं सगळं असून देखील कर्ण वीर होता व म्हणूनच कृष्णाला, त्याला अर्ध-निशस्त्र अवस्थेत का होईना, मारण्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त करावे लागले, हेदेखील पणशीकर नमूद करतात. अन्यायाचा सल मनात ठेवून का होईना, पण कर्णाच्या वर्तनाने आणि त्याच्या अति पांडव द्वेषाने, त्याचा नेहमीच घात केला.
कर्णाची दुसरी व वास्तव बाजू दर्शविणारे हे पुस्तक कदाचित कर्णप्रेमींना तितकेसे रुचणारे नाही मात्र कर्णाची हि बाजूदेखील विचारात घेण्यासाठी वाचणे आवश्यक आहे
More info →हस्तिनापूर – मनोहर रं. शिरवाडकर
सत्तरीच्या दशकातील महाभारतावरील विविध अंगांचे विवेचन करणारी जी पुस्तके आली त्याच परंपरेतील म.रं. शिरवाडकर यांचे हे आणखी एक पुस्तक. यातदेखील महाभारताच्या काही अंगाचं नव्याने दर्शन घडते. विशेषतः चमत्कार , वर, शाप या संकल्पना व त्यांचा विशेषतः पांडवांवरील प्रभाव याचं उत्कृष्ट विवेचन या पुस्तकात आहे. महाभारतातील कोणकोणत्या घटनांना वर शापांनी प्रभावी किंवा अतिरंजित केले आहे हे देखील शिरवाडकरांनी सप्रमाण स्पष्ट केले आहे. उदाहरण द्यायचं झालंच तर द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग. हा प्रसंग प्रत्यक्षात कसा घडलेला नसावा व श्रीकृष्णाचा वस्त्र पुरविण्यात कोणताही सहभाग कसा नव्हता यावरील शिरवाडकरांचा युक्तिवाद मुद्देसूद व बिनतोड वाटतो.
कृष्णानं अर्जुनाच सारथ्य का स्वीकारलं याची देखील छान उकल शिरवाडकर करतात व ते आपल्याला पटल्यावाचून राहात नाही. हे करताना अर्जुनाचा हळवा , भावुक स्वभाव आणि श्रीकृष्णची कर्तव्य कठोरता आपल्या मनावर बिंबत जाते.
शिरवाडकरांनी कर्ण , अर्जुन, धृतराष्ट्र , युधिष्ठिर , भीम आणि द्रौपदी या पात्रांचीदेखील व्यक्तिचित्रे सुंदर रेखाटली आहेत आणि याचबरोबर महारथी सात्यकी आणि कौरव सेनापती झालेल्या पांडवांच्या मामाचं , शल्याचं देखील.
शतपुत्रा या प्रकरणात त्यांनी १०० कौरवांतील गांधारीपुत्र किती व कृतकपुत्र किती व का? याचं केलेलं स्पष्टीकरण देखील मुद्देसूद आहे.
पुस्तक छोटेसेच असले तरी महाभारताविषयी कुतूहल असणाऱ्यांना वाचायला अतिशय सुंदर पूरक पुस्तक आहे. काहीसा वेगळा विचार ते नक्कीच देतं पण युगांत , व्यासपर्व सारखा आपला वेगळा ठसा ते उमटवत नाही.
More info →महाभारताचा मूल्यवेध – डॉक्टर रवींद्र शोभणे
डॉक्टर शोभणे यांनी याआधी महाभारतावर आधारित उत्तरायण ही कादंबरी लिहिली आहे (मी ती वाचलेली नाही) आणि या कादंबरी स्वरूपात ज्या गोष्टी बऱ्याच गोष्टींची उकल त्यांना मांडता आली नाही त्याचा अंतर्भाव त्यांनी मूल्यवेध या पुस्तकात केल्याचे त्यांनी या पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हटले आहे.
मूल्यवेध हे पुस्तक त्यांनी आठ प्रकरणांत विभागले आहे यात पहिल्या प्रकरणात महाभारत संहितेचं माहितीपूर्ण विवेचन आहे ज्यावर इरावती कर्वेंच्या युगांत चा प्रभाव जाणवतो. तसाच तो पुस्तकातील इतर प्रकरणावर प्रकरणांवर ही जाणवतो. दुसऱ्या प्रकरणात आर्य संस्कृती चे वर्णन आहे यात मुख्यत्वेकरून वैदिक काळ, संस्कृती ,धर्मशास्त्रे, यज्ञसंस्था, वर्णव्यवस्था, कुटुंब पद्धती, विवाह संस्था, कृषी संस्कृती, व्यापार, देव आणि स्वर्ग संकल्पना, इत्यादीं बद्दल बरीच माहिती आहे
महाभारताच्या वाचकांसाठी यानंतरची प्रकरणे वाचावीशी वाटणारी आहेत. पुस्तक हळूहळू पकड घेते ते महाभारतातील पुरुष, स्त्रिया व महाभारतीय युद्ध या प्रकरणांमध्ये. तर शेवटच्या तीन प्रकरणांमध्ये म्हणजेच वर-शाप, युद्धानंतर व पाऊलखुणा यात ही पकड हळू पुन्हा सुटत जाते.
महाभारतातील पुरुष, महाभारतातील स्त्रिया व महाभारतीय युद्ध या प्रकरणांमध्ये बरीचशी वर्णने व निष्कर्ष इतर पुस्तकांतून येऊन गेलेले आहे. डॉक्टर शोभणे देखील इरावती बाईंची युगांत मधली मते मान्य करताना आढळतात. मात्र शिखंडीनी चे शिखंडी बनणे आणि द्रौपदीच्या जन्माचे कोडे हे कोडेच राहते. इतर काही कोड्यांची जसे द्रोण, कृप , कृपी यांचा जन्म,अश्वत्थाम्याचे नामकरण, परीक्षिताची जन्मकथा, द्रौपदी वस्त्रहरण कथा, सत्यवतीची जन्मकथा यांची उकल त्यांनी व्यवस्थितपणे केली आहे त्यामुळेच डॉक्टर शोभणेंच हे पुस्तक आपल्या ज्ञानात भर घालत असले तरी विचारांना फार वेगळी दिशा मात्र ते देत नाही.
More info →युगान्त – इरावती कर्वे
हा वरचा क्रम त्याच्या दर्जा वरून जसा आहे, तसाच तो विचार मंथनाच्या काळा वरून देखील आहे. महाभारताची भांडारकर संस्थेची संशोधित प्रत त्याच्या प्रसिद्धीच्या शेवटच्या टप्प्यात असताना, उपलब्ध पर्वाचा संदर्भ घेत इरावतीबाईनी आपलं वेगळं विचारमंथन सुरू केलं आणि १९६२ पासून यातील पात्र व प्रसंगावर वृत्तपत्रीय लिखाण सुरू केलं या आगळ्यावेगळ्या विचारमंथनाची परिणती म्हणजे १९६७ साली, म्हणजे सुमारे ५०-५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं युगांत हे पुस्तक.
More info →पर्व – डॉ एस एल भैरप्पा / मराठी भावानुवाद – डॉ सौ उमा कुलकर्णी
लहानपणापासून मी महाभारत अनेकदा वाचलंय , कधी गोष्टीरूपात तर कधी कादंबरी स्वरूपात. या प्रत्येक वाचनात महाभारता बद्दलचं गूढ वाढतच गेलं व नंतर हळूहळू ते वाढलं कि महाभारत हे वास्तववादी न वाटता एक रचित काल्पनिक कथानक वाटू लागलं व याला कारणीभूत होत्या उदात्तीकरण केलेल्या काही घटना. मृत्युंजय वाचताना कर्ण आवडला तर युगंधर वाचताना कृष्ण मोहवून गेला. अर्जुनादी पांडवांनी पण मनात चांगलंच घर केलं.इतक्या पिढ्यांचं इतकं सुसंगत वर्णन एखादा कथाकार कसं रचू हेही कळत नव्हतं पण बऱ्याचश्या अवास्तव वाटणाऱ्या घटना सत्यतेची ग्वाही देऊ शकत नव्हत्या. पण डॉ एस एल भैरप्पा यांचं डॉ सौ उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेलं पर्व हे पुस्तक हातात पडलं व अनेक गोष्टींचा सहज उलगडा झाला आणि महाभारत खरं असावं कि खोटं? हे द्वंद्व देखील संपलं.
More info →





