काकतीय राजवट आणि राजा गणपतिदेव (Kakatiya Dynasty and King Ganapatideva)

काकतीय राजांनी वारंगल आणि परिसरात इसवी सन १००० ते इसवी सन १३२३ पर्यंत राज्य केले. यात राजा गणपती देवा (११९९-१२६२), रुद्रमादेवी (१२६२-१२८९) व प्रताप रुद्र (१२८९-१३२३) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. काकतीय राजांनी आपल्या राजवटीत या प्रदेशाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याकरता प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी आसपासच्या प्रदेशांमध्ये पाण्याचे साठे, तळी उभारली आणि मोठ्या प्रमाणावर शेतीला प्रोत्साहन दिले. यातील काही मोठी तळी आज देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि याच तळ्यामुळे आजच्या वारंगलचा देखील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवला जातो. मार्कोपोलो सारख्या परदेशी प्रवाशांनी देखील काकतीय राज्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आपल्याला वाचायला मिळतात.
याचबरोबर काकतीयांनी विविध कलांना देखील प्रोत्साहन दिले. संगीत, नृत्य, शिल्प अधिक काकतीयांच्या काळात या प्रदेशात बहराला आल्या. संस्कृत तसेच तेलगू भाषेत साहित्य निर्मिती करण्यात आली. अनेक मंदिरे तसेच किल्ले यांचे निर्माण देखील करण्यात आले. वारंगलचा किल्ला हा देखील अशा उत्कृष्ट निर्माण कलेचे उदाहरण आहे. याव्यतिरिक्त पालमपेठ येथील रुद्रेश्वर रामप्पा मंदिर, हनुमनकोंडा येथील १००० स्तंभ मंदिर, घनपूर येथील मंदिरे, जाकाराम, नागलापाडू, कुसुमांची या ठिकाणी आढळणारी शिल्पे सर्व त्यावेळचे जनजीवन, वेशभूषा, व्यवसाय, खेळ, संस्कृती व कला यावर देखील प्रकाश टाकतात. (Dr Palnati, 2024). या परिसरात आढळणारे वन्य जीवन जसे सिंह, हत्ती, रानडुक्कर, गाय बछडे, हंस, कमलपुष्पे, लता वेली, सर्प, पक्षी या साऱ्यांचे अंकन आपल्याला रुद्रेश्वर रामप्पा मंदिरावर देखील आढळते.
भारताच्या दक्षिणपथावरील राज्ये व काकतीय
पूर्वापारपासून भारताची विभागणी उत्तर भारत व दक्षिण भारत अशा दोन विस्तृत भागांमध्ये झाली आहे. यात भारताचा दक्षिणेकडील भाग दख्खन अथवा दक्षिणपथ म्हणून ओळखला जातो. यापैकी आंध्र प्रदेशचा काही भाग आणि तामिळनाडूचा व कर्नाटकाचा काही भाग मिळून काकतीयांच्या प्रभावाचा प्रदेश तयार होतो. काकतीयांनी मुख्यत्वे करून तेलगू प्रदेशावर राज्य केले आणि त्यांचे हे राज्य सुमारे तीन शतके टिकून राहिले.
इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात सातवाहनांचे राज्य लयाला गेल्यावर दक्षिणेकडे अनेक छोटी छोटी राज्य निर्माण झाली. दुसऱ्या पुलकेशीने यातील काही राज्यांचे एकत्रीकरण केले आणि या प्रदेशाला थोडेफार स्थैर्य प्राप्त करून दिले. यानंतरच्या काळात दहाव्या शतकाच्या सुमारास आपल्याला चालुक्य, चोल, राष्ट्रकूट अशा अनेक राजवटींनी राज्य केलेले दिसते.
राष्ट्रकूटांच्या काळात उदयास आलेले काकतीय नंतरच्या काळात चालुक्यांच्या अधिपत्याखाली गेले आणि चालुक्य व चोल यांच्या शत्रुत्वात त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व स्थापन केले. असे करताना त्यांनी आपले अस्तित्व माळव्यापासून कांचीपर्यंत आणि कल्याणी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत वाढवले.
या सुमारास महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचे राज्य होते. कर्नाटक मध्ये होयसळांचा उदय झाला होता तर दक्षिणेकडे मदुराई मध्ये पांड्य राजांचे राज्य होते.
सुपीक जमीन मुबलक पाणी, राज्यात चालणारे विविध कलाकारांचे उद्योगधंदे, यामुळे काकतीयांच्या काळामध्ये या प्रदेशाला थोडे स्थैर्य लाभले आणि त्यामुळे हे राज्य देखील बहरले. पूर्वेकडे समुद्र मार्गाने होणारा व्यापार देखील सुरू झाला आणि त्यामुळेच त्यांना आर्थिक स्थैर्य देखील मिळाले. बंदरांचा विकास झाल्यामुळे इतर प्रदेशांची होणारा व्यापार उदीम देखील वाढला आणि याचमुळे काकतीय कालावधीमध्ये चांगली मंदिरे निर्माण करू शकले. मिळणाऱ्या सुबत्तेचा वापर त्यांनी जलसाठे निर्माण करणे, शेतीला प्रोत्साहन देणे याकरिता केला. उपजावू जमीन असल्याने शेती आणि जंगले यांचा देखील चांगला विकास झाला.
काकतीयामध्ये नाव घेण्यासारखे राजे म्हणजे रुद्र देवा, गणपती देवा, रुद्रम्मा देवी आणि प्रताप रुद्र. त्यांच्या उगमाचा संबंध राष्ट्रकूटांशी लावला जातो. राष्ट्रकूट राजे जैन धर्मीय होते त्यामुळे सुरुवातीच्या काकतीय राजांनी जैन धर्मातून सुरुवात केली असावे असे दिसते. त्यांचे काकतीय हे वंश नाम का पडले असावे याची पण विविध कारणे सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते दुर्गा देवीचे उपासक होते व तिचे काकती हे नाव त्यांनी पुढे वंश नाम म्हणून घेतले. तीच त्यांची कुलदेवता होती. पण हे राजे नंतर शिवाचे उपासक असल्याचे देखील दिसते. काकती हे नाव एखाद्या जैन देवतेचे देखील असण्याची शक्यता आहे असा देखील एक मतप्रवाह आहे, असे असले तरी या वंशाच्या नाम उत्पत्तीची कोणतीही उगम कथा आपल्याला ठोसपणे सांगता येत नाही. एका शिलालेखामध्ये आपल्याला काकती नावाच्या जागेचा देखील उल्लेख मिळतो आणि हे काकती यांचे कुलपूर असावे असे वाटते. हे गाव सध्याच्या महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील असावे. काकतीय राजे स्वतःला सूर्यवंशीय क्षत्रिय म्हणून घेत असत.
बय्याराम तळे या ठिकाणी सापडलेल्या एका शिलालेखानुसार ते राष्ट्रकूट कुटुंबीयापैकी असावेत आणि त्याचमुळे ते स्वतःला वृष्णी कुलिन देखील समजत व त्यांनी स्वतःच्या ध्वजावर गरुडाची स्थापना केली होती. त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पुढे सौर आणि चंद्रवंशीय राजवटींची सोयरीक झालेली दिसते त्यामुळे आपल्याला त्यांचे नक्की कुळ सांगणे कठीण होऊन बसते.
सुरुवातीच्या काळात प्रथम राष्ट्रकूटांचे आणि नंतर चालुक्यांचे मांडलिक असणारे काकतीय बाराव्या शतकाच्या अखेरीस स्वतंत्र राजे म्हणून उदयाला आले. वेण्णा हा या राजवटीचा प्रथम पुरुष. त्यानंतर गुंडा-१, गुंडा-२ व गुंडा-३ हे राष्ट्रकूटांच्या अधिपत्याखालचे मांडलिक होते. पुढे बेटा-१ (१०००-१०३०) च्या कारकिर्दीत त्यांनी चालुक्यांचे अधिपत्य स्वीकारले. बेटा-१ चा पुत्र प्रोला-१ (१०३०-१०७५) हा हनुमानकोंडा येथील भूभागाचा नायक बनला. त्याच्यानंतर त्याचा पुत्र बेटा-२ (१०७६-१११०) हा त्या गादीवर आला. तर त्याचा पुत्र प्रोला-२ (१११६-११५७) हा गादीवर आला. याने आपल्या प्रदेशाचा विस्तार केला. याच्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला हनुमानकोंडा येथील १००० स्तंभी मंदिरातील शिलालेखात पाहायला मिळते. त्याने कल्याणी चालुक्यांच्या मंडलिक राजांवर विजय मिळवले व तसेच बिज्जल या कलचुरी नायकाला मदत करून वेगळ्या कलचुरी साम्राज्याची स्थापनेचा पाय घालण्यास मदत केली. पण ११५८ च्या राजेंद्र चोला बरोबर झालेल्या वेंगीं येथील युद्धात त्याला वीरमरण आले.
रुद्रदेव (राजवट ११५८-११९५)
प्रोला -२ च्या मृत्यूनंतर रुद्रदेव गादीवर आला आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र काकतीय राज्याला सुरुवात झाली असे म्हणावे लागते. त्याने आपले राज्य गोदावरीच्या किनाऱ्यापर्यंत वाढवले. दक्षिणेकडे त्याने भीमा चोडा (चोला) या नायकाला पराभूत केले. तो उदय चोडा (चोला) याच्या किल्ल्यात पळाल्यानंतर रुद्रदेवाने त्याचा तेथेही पाठलाग केला व पुढे तो किल्ला हस्तगत करून त्या ठिकाणी चक्क उदयसमुद्रम नावाच्या एका तलावाचीच निर्मिती केली. अशा रीतीने चोडा (चोला) नायकांचा पराभव करून त्याने तेलंगणाच्या संपूर्ण प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
असे केल्यानंतर त्याने आपले लक्ष तटीय आंध्र प्रदेशाकडे वळवले. त्यावेळी राजा राजेंद्र चोला याचा मृत्यू झाला होता व “पालनाती” येथील युद्धामुळे रुद्रदेवाला तटीय आंध्रापर्यंतचा सर्व प्रदेश जिंकता आला. जैतुगी बरोबरच्या युद्धात रुद्रदेवाचा मृत्यू (११९५) झाल्याची माहिती आपल्याला सिंघमाच्या एका शिलालेखामुळे समजते.
हेमाद्री पंडितांच्या चातुर्वर्ग चिंतामणी या सुप्रसिद्ध ग्रंथात देखील रुद्रदेवाच्या मृत्यूचे वर्णन येते. याच रुद्रदेवाने ओरुगाल्लूच्या किल्ल्याचा पाया घातला. हनुमान कोंडा येथील एक हजार स्तंभी मंदिराची सुरुवात देखील याच्याच कारकिर्दीत झाली. याचा मृत्यू झाल्यानंतर महादेव (११९५-११९८) गादीवर आला पण जैतुगी येथेच यादवांबरोबर झालेल्या युद्धात केवळ तीन वर्षानंतरच त्याचा मृत्यू झाला व त्याचा पुत्र गणपतिदेव या यद्वत बंदी बनविण्यात आला.
गणपतिदेव यादवांच्या बंदिवासात असताना काकतीय सेनापती रेचेर्ला रुद्र याने या काळात गणपतीच्या नावाने राज्य चालवले, आक्रमणकर्ते आणि बंडखोरांपासून राज्याचे संरक्षण केले. ११९९ च्या अखेरीस गणपतिदेवाची यादवांच्या कैदेतून सुटका झाली आणि तो राज्यावर विराजमान झाला.
गणपतीदेव (राजवट ११९९-१२६२)
महादेवाच्या मृत्यूनंतर यादवांच्या कैदेत असलेला व १९९९ च्या सुमारास कैदेतून सुटलेला गणपती देव काकतीयांच्या गादीवर आला व त्याने दीर्घकाळ राज्य केले. सर्व काकतीय राजांमध्ये हा महान मानला जातो. आपल्या अधिपत्याखाली त्याने आजूबाजूच्या प्रदेशातील नायकांची बंडे मोडून काढली व त्याचबरोबर कुसुमादित्य या चालुक्य घराण्यातील राजाचा देखील पराभव केला. रेचेर्ला रुद्र, हा काकतीय सैन्याचा सेनापती. राजा गणपतीदेवा बंदिवासात असताना तो गणपतीच्या नावाने प्रशासन हाताळत असल्याचे आपल्याला दिसते. त्याने स्वतःला काकतीय-राज्य-भरा-धौरेय आणि काकती-राज्य-समर्थ या उपाधींनी गौरवित केल्याचे दिसते. या रुद्राने नायकांची बंडखोरी दडपली आणि नागती नावाच्या छोट्या राजाने केलेले आक्रमण परतवून लावले.
यादवांचे त्यांच्या दक्षिणेकडील होयसळ राजवटीशी खटके उडत असल्याने पूर्वेकडील बाजूला तरी शांतता असावी या विचाराने बहुधा यादवांनी गणपतिदेवाची सुटका केली असावी असे दिसते. याचबरोबर यादव कुळातील सोमलादेवी या कन्येशी गणपतिदेवाचा विवाह देखील करून देण्यात आला असावा असे जैतुगी शिलालेखांतून कळते.
या रेचर्ला रुद्र याने १२१३ मध्ये पालम पेठ याच ठिकाणी घडवलेला एक चांगला शिलालेख उपलब्ध आहे यावरून राजा गणपती देवाची माहिती मिळते. याच्या कारकीर्दीत काकतीयांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये आपला चांगला जम बसवला. त्यांनी येथील नायकांवर विजय मिळवले पण त्यांची राज्य त्यांच्या ताब्यात ठेवली.
वेलानाती येथील राजा पृथ्वीश्वर याचा त्याने पराभव केला. या युद्धात पृथ्वीश्वर धारातीर्थी पडला तेव्हा त्याचे राज्य मात्र गणपती देवाने आपल्या राज्याला जोडले. याचमुळे काही शिलालेखात गणपतीदेवाचे वर्णन पृथ्वीश्वर-शिरा:-कंदुका-क्रीडा-विनोदा (“अशा चेंडुचा खेळाडू जो पृथ्वीश्वराचे मस्तक होते”) असे केले आहे. बहुधा या काकतीय युद्धात अनेक अधीनस्थ किंवा सहयोगी प्रमुखांनीही अशी पदवी स्वतःला जोडल्याचे दिसते. यामध्ये नेल्लोर चोडा प्रमुख टिक्का-भूपाला, सेउना यादव प्रमुख विश्वनाथ आणि चोल कुटुंबातील महा-मंडलेश्वर बल्लाय (कदाचित कम्मा-नाडूचा) यांचा समावेश आहे. हे सर्व सरदार बहुधा त्या युद्धात सहभागी झाले असावेत.
पृथ्वीश्वराच्या मृत्यूनंतर, पृथ्विश्वरच्या पूर्वीच्या प्रदेशांवर आपले नियंत्रण मजबूत करण्यासाठी गणपतीने सोम आणि राजा-नायकाच्या नेतृत्वाखाली आपले सैन्य कलिंग प्रदेशात पाठवले. कलिंगमधील यशानंतर, राजा-नायकाने द्राक्षराममकडे कूच केले आणि इ. स. १२१२ मध्ये देव भीमेश्वराला शाश्वत दिवे लावण्यासाठी इनाम दिले. राजा-नायकाने आपल्या प्रभुत्वाखाली आणलेले राज्यकर्ते बहुधा पूर्वेकडील गंगाराजा राजराजा-३ च्या अधिपत्याखाली होते. त्यांच्या प्रदेशावरील काकतीयांचे नियंत्रण फार काळ टिकले नाही आणि त्यांनी लवकरच स्वातंत्र्य घोषित केले किंवा पुन्हा गंगा राजवटीचे अधिराज्य स्वीकारले. इ.स १२१७ च्या काही काळ आधी, पूर्वेकडील गंगा राजा राजराजा-३ याचा उत्तराधिकारी अनंग भीमा-३ याने काकतीय सैन्याला कलिंगातून हद्दपार केले.
१२३८ मध्ये सिंहासनावर आरूढ झालेल्या अनंग भीमा-३ चा मुलगा आणि उत्तराधिकारी नरसिंह पहिला याने गोदावरी प्रदेशावर आक्रमण केले. तथापि, राजवंशाच्या शेवटपर्यंत काकतीयानी या प्रदेशावर नियंत्रण ठेवले.
यानंतर दक्षिणेकडे त्याने चोला (याचा उच्चार “चोडा” असा देखील केला जातो) वर स्वारी केली व कांचीपर्यंतचा भूभाग जिंकून घेतला याचे पुरावे आपल्याला कांचीपुरम येथील एकांबरनाथ या देवळातील शिलालेखात मिळतात. गणपती देवाने विवाहसंबंधांनी देखील राज्य प्रस्थापित केले आणि वाढवले. आपली मुलगी रुद्रांबा हिचा विवाह त्याने गोदावरीच्या पश्चिमेकडील चालुक्य घराण्यातील निदवावोलू संस्थानच्या वीरभद्रशी लावून दिला, तर आपली भगिनी नातावाडी येथील रुद्र नावाच्या संस्थानिकाला दिली.
मल्याळ प्रमुख चौंडा यांच्या नेतृत्वाखाली काकतीय सैन्याने कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशातील दिवी बेटावर कूच केले. याची माहिती आपल्याला चौंडा याच्या इ स १२०३ मधील कोंडापार्टी शिलालेख आणि दुसरा इ. स. १२४१ मधला त्याचा मुलगा काता यांने केलेल्या शिलालेखा वरून कळते. या शिलालेखांनुसार, पिता-पुत्र जोडीने बेटावरून लुटलेल्या संपत्तीने गणपतीदेवाचा खजिना समृद्ध केला. गणपतीने चौंडा याला द्विपी-लुंटक (“बेट लुटणारा”) आणि काता याला द्विपी-चुरकरा ही पदवी दिली. येथील प्रमुखांनी गणपतीचे अधिपत्य मान्य केले आणि गणपतीने त्यांना बेटावर ताबा ठेवण्याची परवानगी दिली. पिन्नी-चोडीच्या दोन मुली “नरंबा” आणि “पेरांबा” यांनी गणपतीशी विवाह केला. त्यांचा भाऊ जयापा (किंवा जया) याने गणपतीदेवाच्या सेवेत सेनापती म्हणून प्रवेश केला होता, असे त्याच्या इ. स. १२३१ च्या गणपेश्वरम शिलालेखाने आपल्याला समजते.
आपल्या ६३ वर्षांच्या कारकिर्दीत, गणपतीदेवाने युद्ध किंवा मुत्सद्देगिरीने जवळजवळ संपूर्ण तेलगू भाषिक प्रदेश आपल्या प्रभावाखाली आणला. त्याचा पूर्वसूरीने रुद्र-देवाने राजधानी हनुमानकोंडाहून ओरुगल्लू येथे हलवण्याचा घेतलेला निर्णय त्याने अंमलात आणत, ७५ बुरुजांसह एक नवीन तटबंदी बांधली. त्याच्या अधिपत्याखालील प्रत्येक नायकाला त्याने मजबुती देऊन राज्याला स्थैर्य आणले.
व्यापार आणि शेती सुधारण्यासाठी गणपतीदेवाने अनेक उपाय केले. मोटूपल्ली बंदरात परकीय व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या छोट्या मोठ्या सरदारांना त्याने वश केले. व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी उपाययोजना केल्या आणि व्यापाराला चालना देण्यासाठी त्यांना विशेष सवलती दिल्या.
गणपती देवाच्या राज्यात त्याने अनेक तळी बांधली. बय्याराम हे तळे देखील त्याच्या भगिनीने, म्हणजे कुंदांबा हिने १२१९ मध्ये बांधले व त्याच्या शिलालेखावर तशी नोंद केली. या शिलालेखाने इतिहासात मोलाची भर घातली. त्याच्याच काळात पालमपेट येथील सुप्रसिद्ध रामप्पा मंदिर त्याचा सेनापति रेचेर्ला रुद्र याने बांधून पूर्ण केले. देश-विदेशांची व्यापार याच्याच काळात सुरू झाला. शेतीचे महत्व जाणून त्याने शेती व ऊस निर्मिती यावर भर दिला आणि त्याचबरोबर अनेक उद्यानांची निर्मिती केली.
गणपतीने आपली मोठी मुलगी रुद्रमा हीला आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. तिने १२५९ पासून रुद्र-देव महाराजा या नावाने सह-प्रभारी म्हणून राज्य करण्यास सुरुवात केली. १७ व्या शतकातील प्रताप-चरित्र या ग्रंथात असे म्हटले आहे की गणपतीला त्याच्या कनिष्ठ राण्यांपासून दोन पुत्र होते; या पुत्रांनी, हरिहरा आणि मुरारीदेव यांनी, पुढे रुद्रमाविरुद्ध बंड केले, पण तिने ते यशस्वीपणे मोडून काढले. इ.ए. १२६९ पर्यंत गणपतिदेव हयात असल्याची नोंद मिळते.
यादवांशी संबंध
गणपतीचे सामान्यतः सेउनांशी (यादव) मैत्रीपूर्ण संबंध होते. यादवप्रमुख विश्वनाथाने पृथ्वीश्वराविरुद्धच्या काकतीय मोहिमेत भाग घेतल्याचे दिसते व हे त्याच्या पृथ्वीश्वर-शिरा:-कंडुका-क्रिडा-विनोदा या घेतलेल्या पदवीने दिसून येते. यादव राजपुत्र पेरमाडी-देव, सिंहनाचा मुलगा, गणपतीचा अंकित होता असे इ.स. १२५९ च्या पेरुरू शिलालेखाद्वारे आपल्याला समजते. या शिलालेखात त्याने ब्राह्मणांना जमिनी दिल्याची नोंद आहे. काही यादव सरदारांनीही गणपतीला पांड्यांविरुद्धच्या दक्षिणेतील मोहिमेत मदत केली असल्याचे दिसून येते.
काही काकतीय शिलालेखात गणपतीने यादवांचा पराभव केल्याचा दावा केला आहे. एका शिलालेखात असे म्हटले आहे की यादव राजा सिंहना याला गणपतीने जिंकले. दुसऱ्या शिलालेखात गणपतीला सिंहनाचा जेता असे वर्णन केले आहे आणि तेलुगु चोडा प्रमुखाच्या पाठिंब्याने कुरुमलूरजवळील लढाईत त्याने सिंहनाचा पराभव केला असे नमूद केले आहे. इ.स. १२५० मधील काकतिया आणि सेउना हे दोन्ही शिलालेख एलेश्वरम (देवरकोंडा जवळ) येथे सापडले आहेत, ज्यातून आपल्याला असे दिसून येते की या भागावर काही लढाया झाल्या आहेत.
रुद्रमादेवी (राजवट १२६२-१२८९)
गणपती देवाने आपल्या हयातीतच आपली थोरली कन्या रुद्रमादेवी ( वीरभद्र याची पत्नी) हिला आपल्या राज्याचा वारस ठरविले व तिला आपल्या सोबत १२५९ पासून राज्यकारभाराचे प्रशिक्षण दिले. एका स्त्रीने राज्य चालवणे पुरुषप्रधान संस्कृतीला मान्य होण्यासारखे नव्हते. तिथे सावत्र बंधू हरिहर देव आणि मुरारी देव यांनीच तिच्याविरुद्ध बंड उभारले, परंतु आपल्या प्रामाणिक सहकाऱ्यांच्या जोरावर रुद्रमादेवी ने हे बंड शमवले इतकेच नाही तर बाह्य शत्रू देखील चालून आल्यावर तिने त्यांचा प्रतिकार करून समाचार घेतला. बलाढ्य यादवांनी त्यांचा राजा महादेव याच्या काळामध्ये रुद्रमादेवीवर चाल केली पण रुद्रमादेवीने यादवांना देखील पळवून लावले. गणपती देवाने मिरविलेले राया गजकेसरी हे बिरुद तिने स्वतःला देखील यानंतर लावून घेतले. जवळपास ३४ वर्षांच्या राज्यकारभारानंतर १२८९ मध्ये एका युद्धात तिला वीरमरण आले.
राजा गणपती देवाने त्याच्या कारकिर्दीत सुरू केलेले जलसंवर्धन, शेती संवर्धन हे कार्य तिने आपल्या कारकिर्दीत देखील सुरूच ठेवले होते. उत्कृष्ट मंत्रिमंडळ आणि उत्तम हेरखाते यांच्या जोरावर तिने उत्तम राज्यकारभार केला. तिला स्वतःला तीन मुली होत्या, त्यापैकी थोरली कन्या मुंमादम्मा हीच मुलगा प्रतापरुद्र हिला तिने दत्तक घेतले होते व तिच्यानंतर तोच काकतीयांच्या गादीवर आला.
प्रतापरुद्र (राजवट १२८९-१३२३)
प्रताप रुद्र गादीवर आला तेव्हा आसपासच्या राज्यांशी, नायकांशी, बंडखोरांची सतत कुरबुरी सुरूच होत्या. त्रिपुरांतकम येथील युद्धात रुद्रमाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर प्रतापरुद्र जरी गादीवर आला तरी त्याला आपले राज्यारोहण साजरे करता आले नाही. तो खऱ्या अर्थाने राज्यकारभार हातात घेऊन महाराज बनला तो इ.स. १२९५ मध्ये.
१२८९ मध्ये राज्यावर येताच त्याने रुद्रमाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या बंडखोर अंबादेवाचा बंदोबस्त केला. पुढील काही वर्षात त्याने अंबादेवाला मदत करणाऱ्या नेल्लोरच्या राजाचा बंदोबस्त केला, अंबादेवाच्या साथीने लढणाऱ्या सेउनांचा पराभव केला. पण १२९५ पर्यंत हे संपेपर्यंत एक नवीन आक्रमण सुरू झाले होते ते म्हणजे मुस्लिमांचे. देवगिरीच्या यादवांना त्यांनी घेरा घातला होता. त्यांचा पराभव करून त्यांच्याकडून बरीच खंडणी वसूल केली होती. आपल्यावरचा संभाव्य धोका ओळखून प्रताप रुद्राने आपल्या किल्ल्याची डागडुजी करून सेनेलादेखील योग्य ती बळकटी आणली.
त्याच्या अपेक्षेनुसार १३०३ मध्येच काकतीयांवर मुस्लिम आक्रमण झाले पण प्रतापरुद्राची तयारी असल्यामुळे त्याने ते यशस्वीरीत्या परतावून लावले. या आक्रमणाचा बदला घेण्याकरता अल्लाउद्दीन खिलजीने १३०९ मध्ये आपला सेनापती मलिक कापूर आणि खाजा हाजी यांना पाठवले. प्रताप रुद्राने चांगला प्रतिकार केला पण अखेरीस फेब्रुवारी १३१० मध्ये त्याला पराभव पत्करावा लागला आणि खंडणी म्हणून प्रचंड संपत्ती द्यावी लागली.
त्यांच्या या पराभवामुळे त्यांना पाण्यात पाहणारे नेल्लोर आणि वैदुबा येथील नायकांनी त्यांचे वर्चस्व जुगारून लावले. या सुमारास अल्लाउद्दीन खिलजीने त्याच्याकडे वीरापांड्या या पांड्यराजाला दूर करून सुंदरपांड्या याला त्याच्या जागी गादीवर बसविण्याची मोहीम सोपवली. या मोहिमेचा फायदा घेत प्रतापरुद्राने आपल्या मांडलिकांचा देखील बिमोड केला आणि सुंदरपांड्याला कांचीच्या राज्यावर बसवले.
अल्लाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर प्रतापरुद्राने दिल्लीच्या तख्ताला खंडणी देण्याचे नाकारले. त्यामुळे १३१८ मध्ये सुलतान बनलेल्या मुबारक शाह याने आपले सैन्य खंडणी गोळा करण्याकरता प्रताप रुद्रावर पाठवले त्यामुळे नाईलाजाने त्याला ही खंडणी द्यावीच लागली. त्यानंतर पुढे १३२० मध्ये पुन्हा उलुघ खान याच्या नेतृत्वाखाली दिल्लीचे सैन्य चालून आले. यावेळी मात्र प्रताप रुद्राने कडवा प्रतिकार केला, पण अखेरीस त्याचा पराभव झाला आणि तो मुस्लिम सैन्याच्या तावडी सापडला. ते त्याला दिल्लीला घेऊन जात असताना (१३२३) नर्मदेत उडी मारून त्याने आत्महत्या केली आणि काकतीय राज्याचा अंत झाला
१३२३ हे घडल्यानंतर काही कालावधीने म्हणजेच इ स १३३६ मध्ये हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेचा पाया घातला आणि या प्रदेशावर त्यांचे अधिपथ्य प्रस्थापित केले. पुढे १३४७ मध्ये हसन गंगू बहामनी याने बहमनी साम्राज्याचा पाया घातला व त्यांचे आणि विजयनगर साम्राज्य यांची या प्रदेशावरील अधिपत्यासाठी खेचाखेच सुरू झाली, पूर्वेकडील गजपती राजे देखील यात उतरले व पुढे अस्थैर्याचा काळ सुरू झाला.
संदर्भ – References
• Dr Palnati, N. (2024). Bio-Diversity as Reflected on The Ramappa Temple Complex in Warangal District. Apna Book Publisher.
• Ganapati (Kakatiya dynasty). (n.d.). Wikipedia. Retrieved January 2, 2025, from https://en.wikipedia.org/wiki/Ganapati_(Kakatiya_dynasty)
• Ranga, N. G. (1971). Kakatiya-Nayaks-1300-1370 (1984th ed.). The Indian Peasants Institute, NIDOBROLU (A.P.).
