The historic Meenakshi Amman Temple is located in the heart of historic Madurai city, about a kilometre south of the Vaigai River.

मदुराई शहराच्या केंद्रस्थानी असलेले हे पार्वती देवीचे, देवी मिनाक्षीच्या स्वरूपातील मंदिर. या मंदिराची गणना ५१ शक्तिपीठातील एका मुख्य मंदिरात देखील होते. मीनाक्षी अम्मन सुंदरेश्वर मंदिर हे पांड्य सम्राट सदयवर्मन कुलसेकरन प्रथम (इ स ११९० ते १२०५) यांनी बांधले होते.त्यानी सुंदरेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन मजली गोपुरमचे मुख्य भाग बांधले आणि देवी मीनाक्षी तीर्थाचा मध्य भाग देखील. हेच या मंदिराचे प्राचीन भाग आहेत.

Meenakshi Amman Temple
मीनाक्षी अम्मन मंदिराचे पूर्व प्रवेशद्वार

१४व्या शतकाच्या सुरवातीला (इ. स. १३११), दिल्लीच्या मुस्लिम आक्रमणकारी मलिक काफुरच्या सैन्याने हे मंदिर लुटले. मलिक काफूरला हि संधी मिळाली ती मरवर्मन व कुलसेखरन या दोन पांड्य राजपुत्रांच्या दुहीमुळे. त्याचबरोबर त्याने दक्षिण भारतातील इतर अनेक मंदिरे व शहरे देखील लुटली. विजयनगर साम्राज्याच्या शासकांनी सुमारे ६० वर्षानंतर म्हणजे इ.स. १३७१ ला मदुराईचा ताबा मिळविला व या मंदिराची पुनर्बांधणी केली व त्याचे गर्भगृह दर्शनासाठी पुन्हा उघडले. या दरम्यान मंदिराची पुरती वाताहात झाली होती. मुस्लिम शासकांनी प्रजेवर अनन्वित अत्याचार केल्याच्या कहाण्या इतिहासात नोंदलेल्या आहेत. अरबी प्रवासी इब्न बतूता (Ibn Batuta) याने इ.स. १३४२ मध्ये या भागाला भेट दिली होती, त्यानेही या अत्याचारांची वर्णने केलेली आहेत. विजयनगरच्या साम्राज्याची मदुराईवरील पकड सैल झाल्यावर १६व्या शतकाच्या मध्यावर, नायकारानी आपले वर्चस्व मदुराईमध्ये प्रस्थापित केले. यानतंर पुढे मदुराईवर नायकारांचे राज्य १७३९-४० पर्यंत चालले. पुढे सुमारे ३ वर्षे राघोजी भोसल्यांच्या नेतृत्वाखालील मराठा फौजेने मदुराई आपल्या ताब्यात ठेवले होते. यानंतर अर्कोट चा नबाब, पुढे ब्रिटिश अशी मदुराईच्या वर्चस्वाची लढाई सुरूच होती व त्यामुळे या प्रदेशात बरीच अशांतता होती. अखेरीस १७९२ ला मदुराई ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.

Meenakshi Amman Temple

या सर्व धामधुमीच्या काळात या देवळावर देखील बऱ्याच आपत्ती ओढविल्या. मलिक काफूरने नष्ट केलेले मंदिर १३७० च्या सुमारास पुन्हा उभारायला सुरुवात झाली होती पण या मंदिराचा खरा विस्तार थिरुमलाई नायक (इ स १६२३-५५) यांच्या कारकिर्दीत झाला. या मंदिराची ४ मुख्य गोपुर प्रवेशद्वारे याच सुमारास बांधली गेली. यातील दक्षिण गोपुर सर्वात उंच आहे व मंदिरातील छायाचित्रकार त्यातील सुवर्णकमळ तलावाच्या व याच गोपुराच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे घेत असतात. (सध्या मंदिरात मोबाईल नेण्यास परवानगी नाही).

मीनाक्षी अम्मन मंदिराची आख्यायिका

मलयध्वज राजाची ३ स्तनांची कन्या मीनाक्षी (छायाचित्र इंटरनेट वरून )
मलयध्वज राजाची ३ स्तनांची कन्या मीनाक्षी (छायाचित्र इंटरनेट वरून )

भारतातील सर्व मंदिरांना जशा आख्यायिका असतात तशीच एक या मंदिराबाबत देखील आहे. मीनाक्षीची कथा पांड्य राजा मलयध्वज व त्याची राणी कांचनमाला यापासून सुरु होते. मलयध्वज राजाला मुल बाळ नव्हते म्हणून त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला व यातून त्याला ३ वर्षाच्या मुलीची प्राप्ती झाली. तिला ३ स्तन होते व ही देवी पार्वतीचाच अवतार होती. मुलगी व तीही अशा अवस्थेत, पाहून राजा व राणी चिंतित झाले. पण त्याचवेळी देवतांनी त्यांना सांगितले की काही चिंता करू नका. योग्य वेळ येताच हिला चांगला वर मिळेल. त्याला पाहताच हिचा तिसरा स्तन गळून पडेल व पुढे हे राज्य देखील तो सांभाळेल.

मलयध्वज व कांचनमालेने या “मीन – नयनी” मिनाक्षीला पुत्राप्रमाणे वाढविले. राजा मलयध्वज निधन पावल्यावर मिनाक्षीला राज्याभिषेक करण्यात आला. तिनेदेखील राज्य उत्तरेकडे वाढविण्याकरिता लढाया सुरु केल्या ते थेट हिमालयातील देवलोकापर्यंत जात. तिने देवांचा पराभव केला तेव्हा देवांनी शंकराला साकडे घातले. शंकरांनी गणांना युद्धासाठी पाठविले, तेही पराभूत झाले. तेव्हा शिवशंकर स्वतः रणात आले. त्यांना पाहताच मीनाक्षीचा तिसरा स्तन गळून पडला व आपला जीवनसाथी सापडल्याचे तिच्या लक्षात आले. तिने शंकराना आपली जन्मकहाणी सांगितली व विवाहाची विनंती केली, जी त्यानी मान्य केली. त्यानी तिला परत आपल्या राज्यात, मदुराईला, जाण्यास सांगितले व स्वतः ८ दिवसांनी तेथे पोहोचले. मिनाक्षीला वडील नसल्याने मोठ्या भावाच्या नात्याने विष्णूने तिचे कन्यादान केले. हा प्रसंग सुंदरेश्वर मंदिराच्या नंदीमंडपातील एका शिल्पामधे कोरलेला आहे व तसेच १००० खांबी मंदिरात असलेल्या एका चित्रात देखील चितारला आहे. हे मंदिर म्हणजेच मीनाक्षी – सुंदरेश्वर यांचे विवाह स्थळ असल्याची मान्यता आहे.

मंदिराचा परिसर बराच विशाल (सुमारे १४ एकर) असून याच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना उंच गोपुरे आहेत. यातील दक्षिणेकडील गोपूर सर्वात उंच आहे. ही सर्व गोपुरे असंख्य पौराणिक शिल्पकृतीनी भरलेली आहेत. याचबरोबर या मंदिरात व प्रांगणात असंख्य शिल्पे आहेत. याच्या पूर्व भागात एक १००० खांबी मंडप देखील आहे (यात प्रत्यक्षात ९८५ खांब आहेत). या मंदिराभोवतीच वैगाई नदीकाठी संपूर्ण मदुराई शहर वसलेले आहे.

मंदिरातील शिल्पे

मीनाक्षी व सुन्दरेश्वर शिव अशी दोन वेगवेगळी मंदिरे यात आहेत. हे मंदिर अनेक उत्कृष्ट शिल्पाकृतींनी नटलेले आहे. यातील काही छायाचित्रे (पूर्वी घेतलेली असल्याने) मायाजालावर उपलब्ध आहेत किंवा संबंधित पुस्तकांमध्ये पाहायला मिळू शकतात. यात सुन्दरेश्वर मंदिरासमोरील नंदीमंडपात नंदीच्या सभोवतालच्या खांबांवर मीनाक्षी-शिव विवाहाच्या वेळी विष्णू कन्यादान करीत असतानाचे सुंदर शिल्प आहेत. त्याचबरोबर येथे अंधकासूर वध, त्रिपुरान्तक शिव, पिचाण्डेश्वर शिव, गजासुर वध करणारा शिव अशी सुंदर शिल्पे आहेत.

मीनाक्षी अम्मन मंदिरातील मीनाक्षीच्या पट्टाभिषेकाचे चित्र
मीनाक्षी अम्मन मंदिरातील मीनाक्षीच्या पट्टाभिषेकाचे चित्र

या मंदिराच्या आवारात असलेल्या १००० खांबी मंडपात मीनाक्षी पट्टाभिषेक (तंजावर शैलीतील) व तिच्या सुन्दरेश्वराशी विवाहाचे अशी २ सुंदर चित्रे आहेत व याच ठिकाणच्या एका कोपऱ्यात संगीत खांब आहेत. या दगडी खांबांवर हलकासा आघात केला असता आपल्याला यातून वेगवेगळे सूर ऐकू येतात.

मीनाक्षी अम्मन मंदिरातील देवतांची पालखी
मीनाक्षी अम्मन मंदिरातील देवतांची पालखी

मंदिरातील देवतांची पालखी संध्याकाळी ७ च्या सुमारास पूर्व गोपुरातून बाहेर काढून मंदिराच्या बाहेरील भागात फिरविली जाते. हा सोहळा आपल्याला पाहता येतो व चित्रितही करता येतो.

मीनाक्षी अम्मन सुन्दरेश्वर विवाह सोहळा या मंदिराच्या व तसेच परिसरातील इतरही अनेक मंदिरांच्या गोपुरावर शिल्पित केलेला आपल्याला आढळून येतो.

टीप – या लेखासोबत असलेली मंदिराच्या आतील भागातील छायाचित्रे “Madurai Through The Ages” या पुस्तकातून घेतली आहेत.