शिवाची अनुग्रह मूर्ती-चंडेश अनुग्रह मूर्ती-Chandesh Anugrah Murtiआपल्या अनेक राक्षस संहाराबरोबरच  शिवाने त्याच्या अनेक भक्तांवर अनुग्रह देखील केला आहे.  याचे रेखाटन म्हणजेच शिवाच्या अनुग्रह मूर्ती. यापैकी एक कथा मूर्तीची,  म्हणजेच चंडेश अनुग्रह मूर्तीची ओळख आपण याठिकाणी करून घेऊ.  

चंडेश हे शिवानेच त्याच्या एका परमभक्ताला दिलेले नाव. चोलांच्या राज्यात, म्हणजे दक्षिणेकडे मन्नी नदीकाठी असलेल्या एका गावात यज्ञदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला विचारशर्मा नावाचा एक अत्यंत बुद्धिमान व विचारी पुत्र होता. एके दिवशी या विचारशर्म्याने गावातील काही द्वाड मुलांना एका गाईला, मस्ती म्हणून मारताना पाहिले आणि त्याने स्वतःच या गाईंचे पालन पोषण करण्याचे ठरविले.

त्या दिवशीपासून तो सर्व गाईंना चरायला घेऊन जाऊ लागला. गाई देखील त्याच्या प्रेमळ वागणुकीमुळे वात्सल्यपूर्ण पान्हा फुटल्याने हळूहळू जास्त दूध देऊ लागल्या,जे वासरांनाही पुरून उरु लागले व वाया जाऊ लागले.

हे पाहिल्यावर विचारशर्म्याने मनाशीच विचार केला आणि आपल्या आराध्य दैवताचे, शिवाचे वाळूचे लिंग बनविले आणि हे अवांतर दूध तो या शिवलिंगावर वाहू लागला. ही घटना एके दिवशी गावातील त्या द्वाड मुलांनी पाहिली आणि गावात जाऊन बभ्रा केला की विचारशर्मा या गाईंचे दूध मातीच्या गोळ्यांवर टाकून वाया घालवीत आहे. अशा तक्रारी हळूहळू रोज येऊ लागल्या तेव्हा गावकऱ्यांनी देखील या घटनेची शहानिशा करण्याचे ठरविले व त्यातील काहींनी गुपचूप जाऊन ही घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आणि त्यांनी त्याच्या वडिलांकडे, यज्ञदत्ताकडे, तक्रार केली.

आता यज्ञदत्तानेही आपल्या या मुलाचे वागणे नक्की काय आहे ते पाहायचे ठरविले आणि तो देखील गुपचूप वनात जाऊन पोहोचला. त्यालाही तेच दृश्य पाहायला मिळाले, ज्याची तक्रार गावकरी करीत होते. त्याचा मुलगा गाईंचे दूध मातीच्या गोळ्यांवर टाकत होता. त्याचा हेतू काय? किंवा हे दूध जास्तीचे आहे की कसे? याचा विचार न करता यज्ञदत्त या कृत्याचा जाब विचारण्यासाठी विचारशर्म्या जवळ गेला, पण आपल्या ध्यानात मग्न असणाऱ्या विचारशर्माचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. हा आपल्या पुत्राचा उद्धटपणा आहे असे वाटून यज्ञदत्ताचा संताप अनावर झाला आणि त्याने त्या मातीच्या शिवलिंगाला लाथ मारून ते मोडून टाकले.

या घटनेने विचारशर्माची समाधी भंग पावली. आपल्या आराध्य दैवताचा असा अपमान झाल्याचे पाहून त्याने मागचा पुढचा विचार न करता, हे कृत्य कोणी केले हे न पाहता, ज्या पायाने ते शिवलिंग लाथाडले होते तो यज्ञदत्ताचा पायच आपल्या परशुने तोडून टाकला व यज्ञदत्त रक्तबंबाळ होऊन खाली पडला.

ही घटना पाहून शिव तेथे पार्वतीसह तात्काळ प्रकट झाले. आपल्या भक्ताचे आपल्यावरील प्रेम व त्या प्रेमापोटी त्याने प्रत्यक्ष आपल्या पित्याचा पाय देखील तोडला, हे पाहून शिव त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्याचे पालकत्व स्वीकारत त्यांनी त्याचे चंडेश असे नामकरण केले. त्यांनी त्याला आपल्या एका गणसमूहाचे अधिपत्य देखील दिले. यापुढे आपल्याला देण्यात येणारा प्रसाद चंडेशासाठी असेल व त्याची वस्त्रे देखील राखीव असतील असे जाहीर करीत, शिवाने आपल्या गळ्यातील फुलांची माळा स्वहस्ते चंडेशाच्या म्हणजे विचारशर्माच्या जटासंभाराभोवती गुंडाळली.

एकदा का ही कथा आपल्याला समजली व मूर्तीचे आगमांमध्ये केलेले वर्णन समजले कि आपल्याला चंडेशानुग्रह मूर्ती ओळखणे देखील सोपे जाऊ शकते .

चंडेशानुग्रह मूर्ती कशी असावी ?

याचे वर्णन आपल्याला अंशुमदभेदागम, उत्तरकामिकागम अशा काही आगमन मध्ये आढळते. या आगमांच्या वर्णनाप्रमाणे या मूर्तीतील शिव हा पार्वतीसह असून त्याचा उजवा हात वरद मुद्रेत तर डावा हात चंडेशाच्या मस्तकावर असावा. चंडेश आपले हात अंजली मुद्रेत जोडून शिवाच्या समोर बसलेला अथवा उभा असावा असे अंशुमदभेदागम सांगते.

उत्तरकामिकागमाप्रमाणे चंडेश बसलेला हवा. त्याचे हात अंजलीमुद्रेत असून शिवाचा उजवा हात हार धरून, तर डावा हात तो हार जटेवर बांधण्याच्या प्रक्रियेत असावा. शिल्परत्न हा ग्रंथ देखील अशाच प्रकारचे वर्णन करतो.

मंदिरांमधील चंडेशानुग्रह मूर्ती

कांचीपुरम येथील कैलासनाथार मंदिरातील चंडेशानुग्रह मूर्ती
कांचीपुरम येथील कैलासनाथार मंदिरातील चंडेशानुग्रह मूर्ती

चंडेशानुग्रहाच्या दोन सुंदर मूर्ती आपल्याला आढळून येतात. यापैकी एक कांचीपुरम येथील कैलासनाथार मंदिरातील आहे, ज्यात शिव उजव्या पायावर उभा असून त्याचा डावा पाय एका उंचवट्यावर आहे. या प्रतिमेत त्याला चार हस्त असून एक उजवा हस्त वरद मुद्रेत आहे. या शिल्पात चंडेश परशुसह शिवाच्या उजवीकडे उभा असून त्याच्याही उजवीकडे त्याने पाय तोडलेला त्याचा पिता यज्ञदत्त खालच्या बाजूस दाखविला आहे. हे शिल्प आठव्या शतकाच्या सुरुवातीचे आहे.

गंगाईकोंडाचोलापुरम येथील राजेंद्र चोला यांनी बांधलेल्या बृहदेश्वर मंदिरातील चंडेशानुग्रह मूर्ती
गंगाईकोंडाचोलापुरम येथील राजेंद्र चोला यांनी बांधलेल्या बृहदेश्वर मंदिरातील चंडेशानुग्रह मूर्ती

दुसरे सुंदर शिल्प आहे ते गंगाईकोंडाचोलापुरम येथील राजेंद्र चोला यांनी बांधलेल्या बृहदेश्वर मंदिरातील. या शिल्पात शिव आणि पार्वती आसनावर बसलेले असून शिवाच्या मागील हातात परशु व मृग असून त्याचे पुढील दोन हात त्याच्याच समोर बसलेल्या चंडेशाच्या जटाभारावर आपला फुलांचा हार गुंडाळत आहेत. भक्त आणि परमेश्वर यांच्या प्रेमळ नात्याचे हे उत्तम शिल्प आहे.

SHIVA ICONOGRAPHY – शिवाच्या इतर मूर्तींबद्दल जाणून घ्या