Arjun Tirthayatra – a Tale in Stones in Pattadakal Virupaksha Temple

किरात अर्जुन युद्ध

“भारवीचे किरातार्जुनीय” ही पूर्ण कथा जाणून घेण्यासाठी या लिंक वर जा

पट्टदकलच्या विरूपाक्ष मंदिरात आपल्याला अर्जुनाची देवलोकातील तीर्थयात्रा,  त्याचे किरात रूपातील शंकरांशी युद्ध आणि नंतर इंद्राच्या मदतीसाठी त्याने केलेले समुद्राखाली राहण्याऱ्या निवातकवच राक्षस समूहाशी केलेले युद्ध, या सहसा इतरत्र न आढळणाऱ्या महाभारतातील घटना पाहायला मिळतात. याच्याच पुढे असलेल्या हिरण्यपूर नगरातील कालकेय व पौलोम या दोन राक्षसांचा पाशुपतास्त्राने केलेला  वध या घटनादेखील पाहायला मिळतात.                      

(पिवळ्या रेषेच्या वर) किरात अर्जुन धनुर्युद्ध, मुष्टियुद्ध व उजवीकडे पाशुपतास्त्र प्रदान करताना शिवशंकर
(पिवळ्या रेषेच्या वर) किरात अर्जुन धनुर्युद्ध, मुष्टियुद्ध व उजवीकडे पाशुपतास्त्र प्रदान करताना शिवशंकर. खालील बाजूस अर्जुन – निवातकवच युद्ध व अर्जुनाकडून राक्षस संहार

                                                                                                                                   पाशुपतास्त्राच्या प्राप्तीच्या इच्छेने अर्जुन शिवाची तपश्चर्या करतो.  यासाठी तो इंद्रकील पर्वतावर कठोर तप करतो तेव्हा आजूबाजूचे ऋषीगण शंकराकडे जाऊन त्याला अर्जुनाचे हे तप  थांबविण्याची विनंती करतात.  तेव्हा शंकर त्यांना अर्जुनाच्या तपाचा हेतू आपल्याला माहित आहे व तो मी आजच पूर्ण करेन असे आश्वासन देऊन मार्गी लावतात. अर्जुन ज्या ठिकाणी तप करत असतो त्या

ठिकाणी मूक नावाचा दानव वराहाचे रूप घेऊन अर्जुनावर हल्ला करायची तयारी करीत असतो.  अर्जुनाला हे दिसताच तो आपल्या गांडीवर धनुष्यावर तात्काळ बाण चढवून त्या वराहाचा वेध घेतो. 

त्याच वेळी अर्जुनाची परीक्षा पाहण्याकरिता किरात रूपात आपल्या गणांसह व अनेक स्त्रियांसह आलेले शिवशंकर देखील याच वराहाला आपणच बाण मारून त्याची शिकार केल्याचा दावा करतात.  तो दावा अर्थातच अमान्य झाल्याने अर्जुन व किरात वेशातील भगवान शंकरांचे एकमेकांशी भयंकर युद्ध होते.  प्रथम धनुर्युद्ध,  नंतर तलवार युद्ध व अखेरीस मुष्टीयुद्ध असे युद्ध सुरूच राहते.  अर्जुन त्या युद्धात थकून शेवटी आपल्या आराध्य दैवताचा,  भगवान शंकराचा धावा करतो तेव्हा तेथेच किरात रूपात असलेले भगवान शंकर आपले मूळ रूप प्रकट करतात आणि अर्जुनाला आशीर्वाद व हवे असलेले  पाशुपतास्त्र प्रदान करतात. ते मिळवल्यावर अर्जुन इंद्राला भेटण्यासाठी इंद्रलोकी येतो. 

अर्जुन निवातकवच युद्ध

कल्पवृक्ष वनातून अर्जुनाचे स्वर्गलोकी आगमन व खालील बाजूस अर्जुन शुचिर्भूत होऊन मातलीसह निवातकवचाशी युद्धाला जाताना
कल्पवृक्ष वनातून अर्जुनाचे स्वर्गलोकी आगमन व खालील बाजूस अर्जुन शुचिर्भूत होऊन मातलीसह निवातकवचाशी युद्धाला जाताना

वरील शिल्पात आपल्याला अर्जुनाच्या तीर्थयात्रेचा प्रवास दिसतो.  अर्जुन कल्पवृक्षांच्या वनातून प्रवास करीत इंद्रलोकी पोहोचतो तेव्हा अप्सरा त्याचे स्वागत करतात.  पुढे अर्जुन आपला पिता इंद्र व त्याची पत्नी शची यांना नमस्कार करताना दिसतो, तर खालील पट्टीकेवर अर्जुन आपल्याला निवातकवचाशी युद्ध करायला निघण्यापूर्वी शुचिर्भूत होताना दाखविले आहे. पुढे तो इंद्राचा सारथी मातली याच्यासह रथात बसून युद्धाला निघाला आहे.

पहिल्या शिल्पचित्रात म्हणजे किरात-अर्जुन युद्धाच्या शिल्पाच्या चौकटीतील  पिवळ्या रेषेखालच्या पट्टीकेत आपल्याला अर्जुनाचे निवातकवच या समुद्राखालील मणिमती नगरीमध्ये राहणाऱ्या राक्षस समूहाचे सुरू असलेले युद्ध दाखवले आहे ज्यात अर्जुन अनेक राक्षसांचा सहजी फडशा पाडतो. महाभारताच्या आरण्यक पर्वात ही कथा येते.