करेली ते नर्मदापुरम – Kareli to Narmadapuram नर्मदा परिक्रमा

मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या निवडणुकांची झळ आम्हाला काल प्रथमच बसली. करेलीच्या हॉटेल वर पोहोचताच आम्हाला समजले की आमच्या खोल्यांपैकी ५ खोल्या काही राजकीय नेत्यांनी अडविल्या आहेत व अर्ध्या लोकांची सोय दुसऱ्या हॉटेल मधे करावी लागेल अथवा काहींना इतरांसोबत आहेत त्या खोल्यांमध्ये सामावून घ्यावे लागेल. आतापर्यंत बऱ्याच ओळखी झाल्याने लोकांनी एकमेकांसोबत एकत्र राहणेच पसंत केले.

Narmada Parikrama - Kareli to Narmadapuram
बर्मन घाटावरील आरती

सकाळी नेहमीच्या वेळेवर म्हणजे ६ वाजताच बर्मान (की ब्रम्हांड?) घाटावर नर्मदा पूजनाला निघालो. येथे नर्मदेचा प्रवाह मात्र खळाळणारा होता. बाहेर थंडी असून पाणी मात्र उबदार होते. ही पूजा आटोपून पुढे नर्मदापूरम (आधीचे होशंगाबाद) साठी मार्गस्थ झालो.

बर्मन घाटावर आम्ही सर्व आरती/नर्मदाष्टक म्हणत होतो. त्याचवेळी एक स्थानिक मध्यमवयीन स्त्री तेथे स्नानाला आली. आम्हा सर्व स्त्री-पुरुषांचा समूह तेथेच उभा असताना तिने त्या ठिकाणी नदीत डुबकी मारत स्नान केले, कपडे बदलले व कपडे धुण्याच्या कामाला लागली. सुसंस्कृत अशा भारतीय संस्कृतीचे दर्शन आम्हाला तेथे घडले. इतक्या अनोळखी समूहासोर एक स्त्री विनासंकोच आपली स्नानादी  कामे उरकते. यात न तिला काही वावगे वाटले न तेथे उभ्या असणाऱ्यांना.

खर्राघाट येथील एकमुखी दत्त मंदिरासमोरील वृक्ष
खर्राघाट येथील एकमुखी दत्त मंदिरासमोरील वृक्ष

यापुढचा नर्मदापूरमचा प्रवास सुमारे १८० किमी चा होता. संध्याकाळच्या वेळी येथे खर्राघाट या ठिकाणी असलेल्या एकमुखी दत्ताच्या मंदिराला भेट दिली.  याच ठिकाणी आमची भेट श्री रोहित प्रधान या बडोद्याच्या परिक्रमावासियांशी झाली. तेथे ३६ वर्षे ते आपले कोचिंग क्लास चालवत होते. ते नोव्हेंबर २१ पासून परिक्रमा करताहेत व चातुर्मासामुळे (त्यांच्या परिक्रमा काळातील दुसरा) ते येथील आश्रमातच रहात होते. आता पुढे मार्च २०२४ पर्यंत ओंकारेश्वरला पोहोचून आपली परिक्रमा पूर्ण करतील. येथे असलेल्या दत्तमंदिरासमोरील वडाच्या झाडाच्या ढोलीत टेंबे स्वामींनी तपश्चर्या केल्याची माहिती त्यांच्याकडूनच आम्हाला मिळाली.

माझ्या मनातला प्रश्न मग मी त्यांना विचारला की सर्वसाधारणपणे परिक्रमा करणाऱ्यांच्या अपेक्षा / श्रद्धा / ईच्छा काय असतात? यावर त्यानी दिलेल्या उत्तराने आम्ही भारावून गेलो. ते म्हणाले “माझा संकल्प असा आहे की, जर मला या नर्मदा परिक्रमेचे काही पुण्य मिळणार असेल तर ते माझ्या देशाच्या प्रगती व उन्नती साठी वापरले जावे व तसेच ते माझ्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी व उत्थानासाठी कामी यावे”.

पुढे सेठाणी घाटावर जाऊन आम्ही समूहाने नर्मदाष्टक म्हटले.

नर्मदाष्टक ९

इदन्तु नर्मदाष्टकम त्रिकलामेव ये सदा
पठन्ति ते निरंतरम न यान्ति दुर्गतिम कदा
सुलभ्य देव दुर्लभं महेशधाम गौरवम
पुनर्भवा नरा न वै त्रिलोकयंती रौरवम ॥९॥

त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे
नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

भावार्थ – जे लोक या नर्मदाष्टकांचे तिन्ही त्रिकाळ पठण करतील ते कधीही दुर्गतीला जाणार नाहीत. देवानाही दुर्लभ असलेले शिवाचे धाम(शिवलोक) त्या प्राप्त होईल आणि ते नरकात कधीही न जाता जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून देखील मुक्त होतील.

नर्मदा आरती

यानंतरचा सोहळा होता तो नर्मदा मैयाच्या आरतीचा. त्याची तयारी घाटावर सुरु झाली होती. ते पाहून तेथील पुरोहितांना आम्हालाही आरती घेऊ देण्याची विनंती केली, जी त्यानी सहज मान्य केली व आम्ही एक आनंदसोहळा अनुभवला. घाटावरील सर्वच लहानथोर या आरतीत सहभागी झाले होते.

आजच्या प्रवासाचा नकाशा
आजच्या प्रवासाचा नकाशा