काकतीयांनी ठेवलेला जागतिक वारसा

काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर-Rudreshwar Ramappa Temple – सातवाहन, राष्ट्रकूट, गुप्त, चालुक्य, होयसळ, कलचूरी, यादव आदी प्रमुख राजघराण्यांविषयी आपल्याला थोडीफार ऐकीव माहिती असते. असेच एक म्हणजे काकतीय राजघराणे आंध्र – तेलंगणाच्या, वारंगल प्रदेशावर १२-१३ व्या शतकात सुमारे २०० वर्षे राज्य करीत होते. इतर राजघराण्यांप्रमाणे यांनीदेखील शिल्पकलेला आसरा देत उत्तम मंदिरांची निर्मिती या परिसरात केली, त्यातील आज आपल्याला बऱ्यापैकी सुस्थितीत आढळणारे मंदिर म्हणजे पालमपेट येथील रामाप्पा मंदिर. महाराज गणपतीदेवा (यांनी ६३ वर्षे राज्य केले) यांचा सेनाधिपती रुचेरला रुद्र याने हे मुख्य मंदिर रामप्पा नावाच्या मुख्य स्थपतिद्वारे इ स १२१३ च्या सुमारास बांधले. स्थपतीच्या नावाने ओळखले जाणारे बहुधा भारतातील हे एकमेव मंदिर आहे.
हैदराबाद पासून सुमारे २५० किमी अंतरावर वारंगल नावाचा जिल्हा आहे. ११ व्या – १२व्या शतकात या ठिकाणी काकतीय घराण्याची राजवट होती. या राजवटीच्या काळात या परिसरात अनेक वास्तूंची निर्मिती केली गेली. यात वारंगलचा किल्ला, या किल्ल्याच्या विविध प्रवेशद्वारांवर असलेली काकतीयांची विशेष द्वारतोरणे, अनेक मंदिरे ज्यावर काकतीयांच्या विशेष स्थापत्याची छाप होती. यात हनमकोंडा या ठिकाणी असलेले १००० स्तंभी मंदिर, पालमपेट येथील रामप्पा रुद्रेश्वर मंदिर, घनपूर, रामानुजपुर येथील मंदिरे ही काकतीय मंदिरशैलीची मंदिरे आहेत.
वारंगलपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेले रुद्रेश्वर रामप्पा मंदिर हे काकतीय शैलीचे उत्कृष्ट उदाहरण असलेले मंदिर आहे. या मंदिरावरील मदनिका, गजकेसरी व्याल, मंदिराच्या आतील भागात असलेली शिवपुराण व अन्य पुराणकथांमधील शिल्पे, हि प्रत्येक शिल्पे आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. ग्रॅनाईट वर केलेले कोरीव काम, अतिशय तुळतुळीत पणे कोरलेल्या मूर्ती, अतिशय बारकाईने कोरीव काम केलेले खांब, मंदिरात दिसणाऱ्या भूकंपाच्या खाणाखुणा व तरीदेखील भक्कम पणे उभे असलेले हे मंदिर म्हणजेच या मंदिराच्या उत्कृष्ट बांधकामशैलीचे प्रशस्तीपत्र आहे.
काकतीय घराण्याचा इतिहास या लिंक वर
नंदी मंडप

मुख्य मंदिराच्या अगदी समोर म्हणजे पूर्व दिशेला नंदी मंडप असून यात एक मोठा, काळ्या डोलेराइट दगडातील नंदी आढळून येतो. हा नंदी एकाच दगडात कोरलेला आहे. या नंदीचे वेगळेपण असे कि हा नदी शांत आणि स्वस्थ बसलेला नसून आपल्या मालकाची आज्ञा होताच कधीही उठून निघता येईल अशा तत्परतेने बसलेला आहे. त्याचवेळी हा नंदी कोणत्याही दिशेने पाहिले असता आपल्याकडेच पाहत आहे असे वाटते.
मंदिर शिलालेख

या मंदिराची माहिती देणारा एक शिलालेख आपल्याला मंदिर परिसरातील एका मंडपाखाली आढळून येतो. मुख्य मंडपाच्या उत्तरेला आणि काटेश्वर मंदिराच्या समोर हा शिलालेख उभारलेला असून तो डोलेराईट प्रकारच्या दगडात कोरलेला आहे. २०१ ओळींच्या या शिलालेखावर मंदिर उभारणाऱ्या काकतीय राजांचा सेनानी रेचर्ला रुद्र याने या मंदिरासोबत केलेल्या इतर कामगिरीचेही वर्णन आहे.
मुख्य मंदिराच्या प्रांगणातील मंडपातील चार बाजूंच्या शिलालेखानुसार, रेचरला रुद्रने तलाव बांधावर आणि शहरातील रुद्रेश्वराच्या मंदिरावर एक मोठी टाकी आणि अकुनुरू नावाचे शहर बांधले. त्याने या देवाच्या आनंदासाठी उप्पारपल्ली आणि बोरलापल्ली नावाची दोन गावे भेट दिली. रामप्पा मंदिर या नावाने लोकप्रिय असलेल्या रुद्रेश्वर मंदिराच्या दोन्ही बाजूंना त्यांनी काटेश्वर आणि कामेश्वर मंदिरेही बांधली.
मंदिर स्थापत्य
१) मंदिरासाठी वापरलेले साहित्य / दगड
काकतीयानी हे मंदिर बांधताना त्यांचे भूगर्भशास्त्रीय ज्ञान पुरेपूर वापल्याचे दिसते. या मंदिरा बांधकाम वालुकाश्म (sandstone), ग्रॅनाईट दगड, डोलेराईट दगड वापरून केलेलं आहे. याच्या पायामधे वाळू वापरली असून मंदिराचा पाया वालुकाश्म दगडांचा आहे. मात्र मंदिरातील मुख्य स्तंभ, आडवे खांब, यांच्यासाठी ग्रॅनाईट वापरला आहे. बहुतांश मंदिर, त्याबाहेरील प्रदक्षिणापथ, मंदिराच्या बाह्यभागावरील मूर्ती या लालसर रंगाच्या वालुकाश्म दगडातील आहेत
मंदिराच्या आता असलेले काही खांब डोलेराइट प्रकारच्या काळया चकचकीत असणाऱ्या दगडांनी बनले आहेत. हा दगड काम करण्यासाठी अवघड असतो पण दीर्घकाळ टिकतो. या मंदिरातील खांबावरील चकचकीतपणा आपल्याला आजही पाहता येतो व यात प्रकाश परावर्तित होऊन याला तजेला येतो.
या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या विमानासाठी (गर्भगृहावरील शिखर) वेगळ्या प्रकारच्या, वजनाने अतिशय हलक्या, मानवनिर्मित विटा बनविल्या गेल्या त्यामुळे मंदिराच्या गर्भगृहावरचा भार अतिशय हलका झाला आहे. लालसर सफेद रंगाच्या या विटा अगदी पाण्यावर तरंगतील एवढ्या हलक्या असल्यामुळे या प्रकारचे तंत्रज्ञान काकतीयानी विकसित केले असावे असे दिसते. या विटा बनविण्यासाठी लागणारी माती जवळील तलावातून काढून वनातील वनस्पतीच्या गोंदात मिश्रित करून या विटा भाजून जाळीदार आणि वजनाने हलक्या बनविण्यात आल्या असाव्यात असे दिसते.
मंदिराचे वजन पेलणारे भाग अतिशय मजबूत अशा ग्रॅनाईट प्रकारातील खडकांनी बनविलेले आहेत. विशेषतः सभामंडपातील काही खांब, मंदिराचे छत पेलणारे आडवे खांब, छताचा व वितानाचा भाग हे या ग्रॅनाईट दगडांचे आहेत. असे असून देखील यावरील कोरीव काम थक्क करणारे आहे.
२) मंदिराचा पाया
रामप्पा या स्थपतीच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या काकतीय अभियंत्यांनी या मंदिराचा पाया अगदी वेगळ्या प्रकारे रचून या मंदिराला भूकंपामुळे होऊ शकणाऱ्या स्खलनापासून प्रतिबंधित बनविले आहे. हे वेगळ्याच प्रकाच्या पायाभरणीचे तंत्रज्ञान आपल्याला या मंदिरात पाहायला मिळते. यात एका मोठया चौरसाकृती दगडांनी बांधून काढलेल्या खड्ड्यात वाळू भरली जाते. यामुळे मंदिराचा पाया त्यावरील सर्व बांधकामाचा भार वाहण्यास सक्षम तर होतोच पण त्याचप्रमाणे लहानग्या वालुकणांमुळे जर भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी आवश्यक असणारी हालचाल करायला मोकळीक देतो आणि याचबरोबर त्यावरील ढाचा देखील न कोसळता शाबूत राहातो.
काकतीयांनी बांधकामांच्या पायामध्ये वाळूचौकटीचा (Sandbox Technology) वापर केला आहे. बांधकामाचा आकार, वास्तुकला आणि क्षेत्रानुसार ते पायाभरणीसाठी किमान २.५ ते 3 मीटर खोल खोदत असत. ते वाळूने भरले जाई आणि वाळूचे मिश्रण मजबूत होण्यासाठी ते ग्रॅनाइट, गूळ व टर्मिनलिया चेबुला किंवा हिरडा या पावडरच्या मिश्रणात मिसळले जाई. अशा प्रकारच्या केवळ या वाळूच्या विशिष्ट मिश्रणाच्या आधारावर त्यांनी प्रचंड आणि अवजड बांधकामे बांधली आहेत. हे बांधकाम केवळ एका दगडाच्या खाचेत दुसरा दगड अडकवून केले जाते. व हे बांधकाम जगतीच्या उंचीपर्यंत येते.
भूकंपाच्या वेळी, जर भूकंपाचे कंपन इतके जास्त असेल, की ते या वाळूच्या पेटीतून गेले आणि बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले, तर भिंतींच्या बांधकामात वापरलेले दगड, खांब, मंदिरांच्या छप्परांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी लोखंडी डोवेल्सचा वापर केला. यासाठी, त्यांनी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व खडकांमध्ये छिद्रांसारखे लहान बोगदे तयार केले आणि त्यामध्ये वितळलेले लोह ओतले. परिणामी हे डोवेल खडकांना घट्ट धरून ठेवतात ज्यामुळे संपूर्ण बांधकाम एका चौकटीसारखे आणि मजबूत बनते.
३) कोनीय आकृत्या (Bracket Figures)

मंदिराच्या बाहेरील भागावर वैशिष्ट्यपूर्ण अशा कोनीय आकृत्या आहेत. यात आपल्याला जवळपास पूर्णाकृती १२ मदनिका आणि २६ गज व्याघ्र व्याल (एक काल्पनिक प्राणी) आपल्याला आढतात. लालसर रंगाच्या वालुकाश्म दगडावर डोलेराइट दगडामध्ये कोरलेल्या या अतिशय सुबक आकृत्या हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. या कोनीय मूर्ती हा एक महत्त्वाचा वास्तुशिल्प घटक आहे आणि त्याचे कार्य केवळ स्थापत्यशास्त्रीयच नाही तर तंत्रज्ञानात्मक देखील होते. मंदिराच्या छताचा बाहेर आलेला भाग या आकृत्यांनी तोलून धरला आहे. यात पूर्वेकडे असलेल्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूला २-२ अशा एकूण ४ आणि उत्तर व दक्षिण द्वाराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या २-२ अशा प्रत्येकी ४ अशा एकूण १२ मदनिका आहेत. यासंबंधीची माहिती आपण शिल्पांची ओळख करून घेताना पुढे पाहूच.
मंदिर शिल्पकलेमध्ये कोनीय शिल्पे वापरण्याची संकल्पना होयसळ वास्तुकलेकडून घेतली असण्याची शक्यता आहे. पण काकतीयानी त्याची रचना मात्र बदलली. काकतीय कोनीय शिल्पे संपूर्णपणे वेगळी असून रचनेने श्रेष्ठ आहेत. ही शिल्पे यातील छताच्या सांध्याला अतिरिक्त ताकद आणि स्थिरता देण्यासाठी वापरली जातात. होयसळांच्या खूप आधी, काही चालुक्य संरचनांमध्ये अशी शिल्पकला दिसून येत होती. होयसळ शिल्पकारांनी ही संकल्पना स्वीकारली आणि पुढे तर ती एका शिल्पकलेच्या चमत्कारात विकसित झाली आहे. त्यांनी बेलूर येथील चेन्नकेशव मंदिराच्या खांबांवर आणि हळेबिडू येथेही सुमारे चाळीस सुंदर मुली कोरल्या आणि बसवल्या. नंतरच्या काळात प्रकारच्या शिल्पकलेने छतावरील भार सहन करत असल्याचा आभास निर्माण करणारी सिंह, घोडे आणि हत्तींचे यांसारख्या शिल्पांचे रूप धारण केले.
मुख्य मंदिराचे घटक
प्रदक्षिणापथ

या मंदिराच्या जगतीवर सुमारे ८ फूट रुंद असा प्रदक्षिणापथ आहे. या प्रदक्षिणापथावरून संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालत या मंदिराच्या बाह्यांगावरील सर्व मूर्ती न्याहाळता येतात. इतर हिंदू देवतांच्या मूर्ती आणि संपूर्ण प्रदक्षिणेच्या आढळणाऱ्या इतर शिल्पांसाठीचे वैदिक (देवकोष्ठ) भक्ताला विविध आयामांच्या दृश्य अनुभवातून घेऊन जाते.
दक्षिण मुखमंडपा पासून सुरू होणारी प्रदक्षिणा घड्याळाच्या दिशेने होते. प्रदक्षिणाच्या मार्गावर भक्ताला मंदिराच्या बाहेरील भिंतीवरील शिल्पे आणि देवकोस्तांचा अनुभव येतो. संपूर्ण प्रदक्षिणे दरम्यान, भिंतीच्या अधिष्ठान आणि वेदिकेवर कोरीव शिल्पांच्या पट्ट्या आढळतात. शिल्पांच्या या पट्टिकांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतोः
१. पट्टिका, २. अल्प-पद्म, ३. त्रिपट्टा, ४. त्यावर कोरीव केलेल्या गजथर आणि नरथर – यात गजथरावर एकूण ५२६ विविध मुद्रांमधील हत्ती कोरलेले आहेत. ५. अर्ध-गोलाकार दगडांसह पट्टिका. या पट्ट्या मंदिराच्या बाहेरील संपूर्ण रचनेला एकत्र आणतात.
देवकोष्ठे

देवकोष्ठ हे तीन बाजूंच्या बाहेरील भिंतीच्या मध्यभागी तयार केलेले तीन स्तरीय छोटी मंदिरेच आहेत. या ठिकाणांच्या वेदिका प्राण्यांच्या शिल्पानी सजवल्या आहेत. यांचे छत सपाट असून खाली फुलांच्या आकृत्या आहेत. या मंदिराची त्रिस्तरीय देवकोष्ठे एखाद्या तीन मजली देवालयाप्रमाणेच भासतात.
उपपीठ
उपपीठामुळे मंदिराच्या पायाला एक प्रकारची भव्यता प्राप्त होते. या मंदिराचे उपपीठ सुमारे ५ फूट ७ इंच एवढे उंच आहे. याचमुळे मंदिराला एक उंची देखील प्राप्त होते. उपपिठाचा पद्म आणि अधोपद्म थर नियमित आणि उलट स्थितीत असलेल्या विविध आकृत्यांनी सुशोभित केला आहे.
अधिष्ठान
काकतीय शिल्पकारांनी अधिष्ठानाच्या बाबतीत वास्तुकला आणि कला यांच्यात विवेकपूर्ण संतुलन राखले असल्याचे आपल्याला दिसून येते. काकतीय मंदिरांच्या अधिष्ठानामध्ये असे दिसून येते कारण हा घटक अगदी साधासुधा देखील नाही व सजावटीच्या रचना आणि आकृती शिल्पांनी भरलेला नाही.
कपोत
प्रस्तराचा भाग असलेल्या कपोत आणि व्यालांना नक्षीकामाने सजविलेले आहे. रुद्रेश्वर मंदिराच्या कपोतच्या खालच्या भागात अतिशय गुंतागुंतीचे कोरीवकाम आढळते. हे काकतीय कपोतांचे सर्वोत्तम उदाहरण आहे. प्रदक्षिणापथावर मंदिराची प्रदक्षिणा करणाऱ्या यात्रेकरूंचे लक्ष हा भाग आकर्षित करतो व म्हणून कपोताच्या खालच्या भागाला सजवण्यात खूप महत्त्व दिले गेले. आडव्या पट्ट्या आणि अर्ध-गोलाकार खांब असलेल्या संरचनेच्या लाकडी छताप्रमाणे त्याची रचना करण्यात आली आहे. याची खालची बाजू अतिशय सुंदर नक्षीकामाने सुशोभित केली आहे, तर त्याच्या खालच्या बाजूला कमळाच्या पेंडंटच्या मालिकांनी सजवलेले आहे. कपोटा तिरकस असल्याने, आडव्या पट्ट्यांनी वक्र पट्ट्यांसह जोडलेल्या प्रत्येक पट्टीसह प्रक्षेप आणि अंतर श्रेणीबद्ध केले आहेत.
विमान

या मंदिराच्या विमानाचा अथवा गर्भगृहावरील शिखराचा भाग अतिशय वैशिष्ट्यपूर्ण प्रकारच्या वजनाने अतिशय हलक्या असलेल्या विटांनी घडविलेला आहे. या विटा ०.८५ ग्रॅम/सीसी ते ०.९० ग्रॅम/सीसी पर्यंतच्या कमी घनतेमुळे पाण्यावर तरंगतात. या विटांचे खास वैशिष्ट्य म्हणजे या अत्यंत सच्छिद्र असतात आणि सामान्य विटांच्या तुलनेत ३० किलो/सेमी२ पेक्षा जास्त शक्ती घेतात. सर्वसाधारण विटा सुमारे २.२ ग्रॅम/सीसीच्या घनतेच्या असतात व केवळ २० किलो/सेमी२ भार घेतात.
त्या काळातील वास्तुविशारदांना अशा विटांची गरज जाणवली आणि त्यांनी रचना तयार केली असेल. बहुधा तलावाच्या खाड्यांमधून (काओलिनाइट चिकणमाती) स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या चिकणमातीचा वापर करून ज्यूट आणि भाताच्या सालांसह, झाडांचा गम (जंगलात सहजगत्या उपलब्ध असलेला) सारख्या सेंद्रिय अवशेषांसह मिसळले आणि विशेषतः तयार केलेल्या भट्ट्यांमध्ये इष्टतम तापमानात जाळले. यातून छिद्रमय विटा तयार होतात ज्यांचा वापर मंदिराच्या शिखराच्या म्हणजेच विमानाच्या बांधणीसाठी केला गेला, ज्यामुळे हे संपूर्ण शिखर वजनाने खूप हलके झाले.
मंदिराची तीन प्रवेशद्वारे
या मंदिराला एकूण ३ प्रवेशद्वारे आहे. नंदीमंडपाच्या समोर म्हणजे पूर्वेच्या बाजूला मुख्य प्रवेशद्वार असून उत्तर व दक्षिण बाजूनी प्रत्येकी एक प्रवेशद्वार आहे. या तीनही प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूना प्रत्येकी २ अशा एकूण १२ सुरसुंदरी (मदनिका) कोनीय स्तंभांवर विराजमान असलेले आपल्याला दिसून येते. ग्रॅनाईटच्या काम करायला अतिशय अवघड अशा दगडात या सुरसुंदरी (मदनिका) कोरलेल्या आहेत हे यांचे वैशिष्ट्य.
लटकलेल्या कपोताला आधार देण्यासाठी सभा मंडपाच्या बाहेरील बाजूस कोनीय आकृत्या बसविल्या जातात. मंदिराच्या पूर्व, उत्तर आणि दक्षिणेला असलेले या डोलेराइट दगडातील कोनीय आकृत्या मंदिराच्या बाहेरील रचनेत ठळकपणे दिसतात. गज-व्याल आणि बारा मदनीकांचा समावेश असलेला हा अत्यंत अलंकृत घटक आहे.
मदनिका मूर्तींमधील या नर्तकी, मानवी हृदयाच्या शक्तिशाली भावना, म्हणजेच आनंद आणि दुःख, शौर्य, कोमल मनःस्थिती असे विविध पैलू दाखविण्यात काकतीय शिल्पकार यशस्वी झाले आहेत. या १२ मदनिकांचा परिचय आपण आता करून घेऊ.
पूर्व प्रवेशद्वार
या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ज्या दोन मदनिका आहेत त्या आपण क्रमाने पाहू.डावीकडील २ मदनिका – नागिनी व डालमालिका
१) चार सापांसह नागिनी- नागिनी अथवा विषकन्या

– या मदनिकेच्या दोन दंडातून प्रत्येकी एक असे २ साप ओघळत आहेत तर वर उचलेल्या दोन्ही हातात मिळून एक सर्प धरला आहे. पूर्ण वस्त्रविहीन असणाऱ्या या मदनिकेच्या पायाखाली चौथा साप कोरलेला आपल्याला दिसतो.
हीला तांत्रिक आकृती म्हणूनही मानले जाते व विषकन्या म्हणूनदेखील. या नागिनीच्या पायाजवळ गुंडाळलेला सर्प हा कुंडलिनी शक्तीचे प्रतीक आहे. नागिनी ही एक योगिनी आहे, जिने सर्पशक्तीवर विजय मिळवला आहे, ज्याचे प्रतीक म्हणून तिने सर्पाला आपल्या बाहूंमध्ये धरले आहे. चेहऱ्यावरील शांत अभिव्यक्ती सूचित करते की, तिला सिद्धी प्राप्त झाली आहे आणि अशा व्यक्तींना त्यांच्या भौतिक शरीराबद्दल कोणतीही जाणीव नसते, असे तिच्या नग्नतेतून सूचित करायचे असू शकते. तारुण्याच्या उत्साहाची कल्पना या नागिनी शिल्पकलेतून स्पष्ट होते.
२) डालमलिका

ही मदनिका तिला त्रास देणाऱ्या मर्कटाला फांदीने हाकलण्याचा प्रयत्न देखील करते आहे. . या मदनिकेची वस्त्र प्रावरणे अतिशय उच्च दर्जाची असून त्यावर आकर्षक नक्षीकाम केलेले आहे. ती एका आकर्षक नृत्याच्या स्थितीत सहज उभी राहिलेली दर्शविली आहे. तिच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लतावेलींकडे बारकाईने पाहिले असता त्यावरही आपल्या मर्कट, पोपट आदी प्राणी, पक्षी कोरलेले दिसून येतात. तिने पायात कडी, पैन्जण घातले असून तिच्या उंच टाचांच्या पादुका या अलीकडील काळातील आधुनिक पादत्राणांशी स्पर्धा करतील इतक्या आकर्षक आहेत
उजवीकडील २ मदनिका
३) नर्तकी

ही नर्तकी त्रिभंग स्थितिमधे डाव्या पायावर घट्टपणे उभी असून तिच्या पाया शेजारी २ वादक आहेत. तिने आपले वजन डाव्या पायावर पेललेले असून उजव्या पाय गुडघ्यापर्यन्त उंचवलेला आहे. . तिचा डावा हात तिच्या स्तनांच्या जवळ आहे आणि उजवा हात तिच्या डोक्यावरुन वर उचलला आहे. ही सर्व आभूषणानी युक्त असून हीच्या गळ्यातील हार देखील आकर्षक आहे. तिच्या कानात आकाराने अतिशय मोठी कर्णभूषणे आहेत व तिची वस्त्र प्रावरणे आकर्षक आहेत. तिच्यासोबत ढोलकी वाजवणाऱ्यांची जोडी आहे.
४) शिकारी

नक्षीदार लता वेलीनी ही मदनिका सुशोभित असून तिच्या डाव्या हातात शिकरीसाठी धनुष्य आहे. जंगलात तिच्या पायात काटा घुसला असावा जो काढण्याचा प्रयत्न तिच्या पायाशी असलेली तिची मदतनीस करीत आहे. त्यासाठी तिने आपल्या डाव्या पायाचा तळवा उंचवलेला आहे. तिची उभे राहण्याची पद्धत मोहक असून तिची केशरचना, कर्णभूषणे, इतर आभूषणे देखील खूपच सुंदर पद्धतीने कोरलेली आहेत.
दक्षिण प्रवेशद्वार
डावीकडील २ मदनिका
५) नर्तकी

डावीकडील नर्तकी उजव्या एक पायावर उभी असून तिचा डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ त्याचा तळवा आलेला आहे. हिच्या डाव्या बाजूची साथीदार वादक भग्न झाली असून उजवीकडील मृदंग वादक आपल्याला दिसून येते. हीचे दोन्ही हात वर असून तिच्या हातात, पायात व कमरेवर अनेक आभूषणे आहेत. तिच्या गळ्यातील रुळणाऱ्या माळांची सावली आपल्याला तिच्या पोटावर पडलेली दिसून येते.
६) मर्दला

मर्दला म्हणून परिचित असलेली ही मदनिका मृदंगवादीका आहे. हिच्या गळ्यातील सुंदर हार स्तनांवरून रुळणारा होता परंतु हा हार आता भंगलेल्या स्थितीत आहे. असे असले तरी तिच्या द्विभंगा या पद्धतीने उभ्या राहण्याने तिच्या सौंदर्याला बाधा येत नाही. तिचा डावा हात मृदंगाची वादी ताणण्यासाठी मृदंगाच्या दोऱ्यांच्या आता घातलेला असून उजवा हात वाजविण्यासाठी वापरला असावा पण आता तो भग्नावस्थेत आहे. मर्दलेच्या हातात व पायात तोडे असून तिच्या गळ्यात व कमरेला देखील आभूषणे आहेत.
याव्यतिरिक्त या मदनिकेच्या पायाजवळ एक वादक व एक नर्तक दाखविला असून पायाखाली आणखी ५ कलाकार दर्शविले आहेत.
उजवीकडील २ मदनिका
७) गायनी.

दोन्ही बाजूंना दोन लहान आकाराचे ढोलवादक असलेल्या आणि त्रिभंग मुद्रेत उभ्या असलेल्या एका गायिका सुरसुंदरीचे हे शिल्प आहे. ही मदनिका तिचे संपूर्ण वजन उजव्या पायावर ठेवून उभी आहे व असे करताना तिचा दावा पाय गुडघ्यात वाकलेला आहे. तिचा उजवा हात तिच्या डोक्याच्या वर असून तळवा हंस मुद्रेत आहे. तिची लवचिक कंबर आणि नाजूक मान मोहकपणे उजव्या बाजूला वाकलेली आहे. तिच्या पूर्णपणे उघडलेल्या डोळ्यांमधील आकृतीची अभिव्यक्ती आकर्षक आहे. तिच्या सोबतीला असलेल्या दोन वादकांपैकी तिच्या उजवीकडील मूर्ती पूर्ण भंगलेली आहे तर तिच्या डावीकडील ढोलवादक आपल्याला शिरविरहित अवस्थेत पाहायला मिळतो.
८) रति

डाव्या हात ऊस धरलेली देवी रति प्रेम, कोमलता आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. तिच्या गळ्यात रुळणारा हार हा तिच्या स्तनांवरून ओघळत आलेला शिल्पकाराने दाखविला आहे आणि या लटकणाऱ्या माळेचे अखंड शिल्प आजही आपल्याला पाहायला मिळते. तिचे पाय व्यत्यस्थपद मुद्रेत आहेत. तिच्या पायात असलेले पैंजण तसेच तिच्या पायाच्या बोटातील जोडवी देखील आपल्याला स्पष्ट दिसू शकतात. हे दाखविण्याकरिता शिल्पकाराने अजून एक वैशिष्ट्य दाखविले आहे ते म्हणजे तिच्या पायाचा अंगठा व तिच्या पायाचे दुसरे बोट यामधील फट आपल्याला व्यवस्थित दिसून येते.
उत्तर प्रवेशद्वार
डावीकडील २ मदनिका
९) मर्कट सुंदरी

ही मदनिका आपल्याला दिसते ती आपले वस्त्र खेचू पाहणाऱ्या मर्कटाला हाकलताना. तरीदेखील त्या मर्कटाने तिचे वस्त्र तिच्या कमरेवरून खाली खेचले आहेच. तिची कर्ण आभूषणे आकाराने मोठी आहेत. उजवा हात मर्कटावर उगारलेला तर डावा हात कमरेजवळ आहे. तिच्या गळ्यातील हार मात्र भंगलेला आहे व तो तिच्या स्तनापर्यन्त शिल्लक उरला आहे. तिच्या पायाशी असणारी चवरीधारी देखील आपल्या चवरीने माकडाला हाकलून लावण्याचाच प्रयत्न करते आहे असे दिसते. तिच्या पायातील पैंजणे देखील उत्कृष्टपणे शिल्पित केली आहेत.
१०) नर्तकी

ही नर्तकी आपल्या दोन वादक साथीदारांसह नृत्य करीत असून त्रिभंग स्थितीत आहे. तिचे दोन्ही हात उंचवलेले असून बोटे नर्तन मुद्रा दर्शवीत आहेत. हातात, पायात सुंदर आभूषणे असून गळ्यातील हार मात्र भंगलेला आहे. वस्त्रे व पदभूषणे सुंदर आहेत. उघडे डोळे व काहीतरी गाण्याच्या आविर्भावात असलेले तोंड पाहून ती आपल्या नृत्याबरोबर गायनदेखील करीत असावी असे वाटते.
उजवीकडील २ मदनिका
११) अभिनय नर्तकी

हि अजून एक नर्तकी असून फारशी आकर्षक नाही. या नर्तकीचे भग्नावस्थेतील हात आकाशाकडे वर केले आहेत. ती त्रिभंग स्थितीत असावी असे दिसते. तिच्या डावीकडील पायाजवळील मृदंग वादक उपलब्ध असून उजव्या पायाकंदील मूर्ती मात्र भंगलेली आहे.
१२) गायनी नर्तकी

ही देखील गायनी नर्तकी असून व्यतस्थपद मुद्रेत उभी आहे. तिने आपला भार डाव्या पायावर पेलला असून उजवा पाय गुडघ्यात वाकविलेला आहे. या उजव्या पायाची बोटे वळवलेली दिसतात. तिच्या उजवा हात तिच्या मस्तकावर असून त्याचा डावा हात गळ्यातील आभूषणांपर्यंत आहे. तिचे मुख काहीसे उघडे असून डोळे मोठे व पूर्ण उघडे दाखविलेले आहेत. यावरून ती गात असताना नर्तन करत असावी असा तर्क करून तिला गायणि नर्तकी असे नाव देण्यात आले आहे.
गज व्याघ्र व्याल

गजाच्या मस्तकावर पाय रोवून उभा असणारा व्याल हा एक काल्पनिक प्राणी आहे. असा काल्पनिक प्राणी दोन अथवा अधिक प्राण्यांच्या संयोगाचा स्वरूपात दाखविले जातात. यात देह एक प्राण्याचा आणि मुख वेगळ्या पुराव्याचे अशी मांडणी केलेली असते. त्या प्प्राण्याचे मुख वापरलेले असते त्याच्या नावावरून तो व्याल प्रकार ओळखला जातो. उद. गजाचे (हत्तीचे) मुख असेल तर तो गज व्याल, वाघाचे मुख असेल तर तो व्याघ्र व्याल इत्यादी. आपल्याला या मंदिराच्या कपोताच्या खाली सुमारे २८ व्याल कोनीय आकृत्यांच्या स्वरूपात उभारलेले आढळतात. यापैकी २६ व्याल आज अस्तित्त्वात असून २ गहाळ झाले आहेत.
या मंदिरात व्याघ्र व्याल त्यांचे मागचे पाय हत्तीच्या डोक्यावर ठेऊन उभा आहे, तर हत्तीची सोंड उंचावलेली आहे असे दाखविले आहे. या व्यालांची बाहेर पडलेली जीभ आणि रौद्र सुळे भीषणता दर्शवितात तर त्याची नाजूक कंबर आणि वळलेले शरीर आपल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांची चपळता दर्शविते. त्यांचे तुलनेने लहान पण कोणताही आवाज टिपतील असे कान आणि मोट्ठे डोळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील उग्र आणि भयानक हावभाव तत्कालीन कुशल कारागिरांनी उत्कृष्टपणे रेखाटले आहेत.
गजाच्या मस्तकावर पाय रोवून उभे असणारे हे गजकेसरी आहेत व ते जणू मंदिराचा डोलारा आपल्या मस्तकावर घेऊन उभे आहेत असाच भास होतो. काकतीयांचे शत्रू म्हणजे गज आणि काकतीय म्हणजे ते व्याघ्र व्याल असेच यातून शिल्पकाराला सूचित करायचे आहे.
मंदिराचा आतला भाग
नाट्यमंडप

मंदिराचा नाट्यमंडप हा त्याचा मुख्य मंडप आहे. ४ भव्य अशा ग्रॅनाइटच्या खांबांवर हा तोलून धरला आहे व याच्या वरच्या बाजूस ४ आडवे ग्रॅनाइटचे खांब असून त्याच्या तीनही दर्शनी भागांवर अनेक पौराणिक दृश्ये कोरलेली आहेत. हे खांब खालील बाजूनी पायाच्या वालुकापेटीत रचलेल्या आडव्या खांबांवर तोलून धरले होते. त्यामुळे मध्ये कधीतरी झालेल्या जोरदार भूकंपामुळे याच्या पायाचे खांब विस्कळीत होऊन, वरखाली झाल्याचे आपल्याला दिसते तर त्यामुळे नाट्यमंडप तोलून धरणारे हे ४ मुख्य खांब मात्र विचलित झालेले नाहीत.
स्तंभ

काकतीयन खांबांकडे आपल्याला एक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहता येते. त्यात विविध रचना आणि संकल्पनांचा शक्य तितका वापर दिसून येतो. त्यावर पौराणिक कथा, महिलांच्या आकृत्या, साखळ्या आणि मणी यांनी हे स्तंभ सुशोभित केले आहेत.
मध्यवर्ती मंडपाचे खांब तळाशी चौकोनी, मध्यभागी असलेल्या अष्टकोनी आणि गोलाकार पट्ट्यांवर संगीतकार आणि नर्तकांच्या मिरवणुकांची दृश्ये कोरलेली आहेत. याच्या मध्यभागी एक चौरस विभाग आहे ज्यामध्ये भागवतातील दृश्ये दर्शविली आहेत.
गोपिकावस्त्रहरण, चार पायांचे तीन नर्तक असलेला शिल्पश्लेष , संगीतकार, वादक मंडळी, अमृतमंथन इत्यादी स्तंभांवर चित्रित केलेली सुंदर शिल्पे लक्ष वेधून घेणारी आहेत.

नाटयमंडपाचे वितान
या नाट्यमंडपाचे वितान म्हणजेच त्याचा छताचा भाग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रचला असून त्यावर दिशांचे स्वामी असलेल्या अष्टदिक्पालांचे अंकन आहे. यातील मुख्य दिशांचे स्वामी असलेले इंद्र, वरुण, यम व कुबेर हे सहज ओळखता येत असले तरी उपदिशांचे स्वामी असलेले दिक्पाल मात्र चुकीच्या जागी बसविले गेले आहेत (अदलाबदल) असे दिसून येते.
टीप : वरील बाजूस पश्चिम दिशा आहे तर खालील बाजूस पूर्व आहे .

१. यात पूर्व दिशेचा स्वामी इंद्र असून त्याचे वाहन ऐरावत आपल्याला पाहता येतो
२. आग्नेय दिशेचा स्वामी अग्नी आहे.
३. दक्षिण दिशेचा स्वामी यम असून त्याचे वाहन रेडा आपल्याला या शिल्पात आढळून येतो
४. नैऋत्येचा स्वामी असलेला निरुक्ती आहे.
५. पश्चिमेचा स्वामी मकरावर आरूढ असलेला वरूण आहे.
६. वायव्येचा स्वामी वायू आहे.
७. उत्तरेचा स्वामी कुबेर आहे.
८. ईशान्येचा स्वामी ईशान (शिवाचेच रूप) असून त्याचेही वाहन नंदी आहे.
या वितानाच्या चारी बाजूला असणाऱ्या आडव्या स्तंभावर तीन बाजूला जी कथानके आहेत त्यापैकी खालच्या बाजूने जी कथानके आपल्याला दिसतात त्याची माहिती पुढे दिली आहे.
वितानावरील कथापट्टीका
१) पूर्व दिशेकडील पट्टीका
या पट्टीके वर आपल्याला शिवतांडवाचे दृश्य पाहायला मिळते. याच्या दोनही बाजूला आपल्याला शिवाची बरीच रुपे व त्यांच्या बाजूलाच त्याचे वाहन असलेला नंदी पाहायला मिळतो.

वरील चित्रात खालच्या बाजूला आपल्याला त्रिकोणी शिलखंडात पूर्व दिशेचा स्वामी असलेला इन्द्र व त्याचे वाहन असलेला ऐरावत हत्ती दिसून येतो.
२) पश्चिम दिशेकडील पट्टीका
वितानाची ही पट्टीका अंतराळाच्या अगदी जवळ आहे. या पट्टीकेवर शिवाच्या पायाखाली असलेला दक्ष दाखविलेला आहे. शेजारी त्याचे वाहन असलेला नंदी आहे. व आजूबाजूला इतर देवदेवता त्यांच्या वाहनासह आपल्याला दिसून येतात.

मंदिराची ही पश्चिम बाजू असल्याने यात आपल्याला खालच्या वितानाच्या त्रिकोणात पश्चिमेचा स्वामी वरुण व त्याच्या शेजारी त्याचे वाहन मकर (मगर सदृश्य काल्पनिक प्राणी).
३) उत्तर दिशेकडील पट्टीका
उत्तरेकडील वितां पट्टिकेवर आपल्याला त्रिपुरासुर संहारक शिव पाहायला मिळतो .

४) दक्षिण दिशेकडील पट्टीका
दक्षिण दिशेकडील पट्टीकेवर गजासुर संहाराचे दृश्य दिसते. यात गजासुराच्या आत शिरून त्याची कातडी फाडून त्याच्या मस्तकावर नाच करताना आपल्याला दिसतो. याच पट्टीकेच्या उजव्या कोपऱ्यात आपल्याला तारकासुराचा वध करणारा षडानन कार्तिकेय आपल्याला दिसतो.

दक्षिण दिशेचा स्वामी असलेला यम आपल्याला खालच्या वितानाच्या त्रिकोणात आपल्याला दिसतो. त्याच्या सोबत त्याचे वाहन असलेला रेडा देखील समजून येतो.
अंतराळ व त्याची द्वारशाखा

रामाप्पा मंदिराला एक स्वतंत्र अंतराळ आहे. अंतराळ म्हणजे रंगमंडप आणि गर्भगृह यामधील भाग. या भागात देखील आपल्याला अनेक सुंदर शिल्पे आढळतात. अंतराळाच्या प्रवेशद्वारावर देखील आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आढळतात यापैकीच एक म्हणजे द्वारावरील सांगीतिक खांब. या खांबातून आपल्या बोटानी देखील विविध आवाज काढता येतात.
अंतराळाच्या बाहेर असलेल्या गवाक्षावर दोन्ही बाजूला प्रत्येकी १० नर्तक आणि २० ढोलवादक कोरलेले आहेत. या व्यतिरिक्त अजून काही नर्तकी द्वारशाखेवर आहेत. या नृत्य प्रकाराला “पेराणी” असे म्हणतात. ही प्रत्येकी ३० -३० शिल्पे आपल्याला पुढील छायाचित्रात पाहायला मिळतात.
गर्भगृहाची द्वारशाखा
गर्भगृहाला पंचमुखी द्वारशाखा असून याच्या पायाशी अनेक सुरसुंदरींच्या मूर्ती आढळतात. सर्वसाधारणपणे द्वारशाखांवर गंगा यमुना या नदी देवतांच्या मूर्ती असतात पण या द्वारशाखांवर मात्र सुरसुंदरी आहेत. यात दर्पणसुंदरी तसेच शिकारी सुंदरी देखील आहे, धनुष्याला प्रत्यंचा लावताना आपल्याला दिसून येते
सप्तमातृका पट

मंदिराच्या संभागृहमध्येच त्याच मंदिर परिसरात सापडलेले २ सप्तमातृका पट ठेवलेले आहेत. यातील एक पट वरील छायाचित्रात दाखविलेला आहे. कोणत्याही पटात दिसणाऱ्या क्रमाने ते याही पटात दिसतात. यात सर्वात डावीकडे शिवाचा मुख्य गण वीरभद्र आहे, त्यानंतर ब्रह्माणि, महेश्वरी, कौमारी,वैष्णवी, वाराही, इंद्राणी व चामुंडा या सप्तमातृका आहेत व त्यानंतर सर्वात उजवीकडे गणेशमूर्ती येते. त्यांच्या वाहनांवरून व चेहऱ्यावरून त्या आपल्याला सहज ओळखता येतात.
(“वेरूळच्या लेणींमधील सप्त मातृका” यावर डॉ . राहुल देशपांडे यांचा माहितीपूर्ण विडिओ या लिंकवर पहा )
मंदिराचे महत्त्व – जागतिक स्थळांमध्ये समावेश, संरक्षण आणि व्यवस्थापन
रुद्रेश्वर मंदिर संकुलात आपल्याला मंदिराची अनेक वैशिष्ट्ये एकत्रित केलेली आढळतात ती म्हणजे मंदिराची आकर्षक मांडणी, कारागिरी, वापरलेले साहित्य, त्याची एकमेकांसापेक्ष रचना, कार्य आणि वापर, पारंपारिक नृत्याशी संबंधित अमूर्त सांस्कृतिक वारसा. या सर्व वैविद्ध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळेच या मंदिराचा समावेश २०२१ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला.
काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर प्रथम १९१४ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ओळखले गेले, आणि तेव्हापासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ए. एस. आय.) द्वारे त्याची देखभाल आणि संवर्धन केले जाते. प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, १९५८(ए. एम. ए. एस. आर.), २०१० मध्ये सुधारित आणि प्रमाणित; प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियम, १९५९; प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियम, २०११ आणि पुरातन वस्तू आणि कला खजिना कायदा, १९७२ आणि नियम, १९७३ द्वारे ही मालमत्ता राष्ट्रीय स्तरावर संरक्षित आहे. त्याचे संवर्धन, देखभाल आणि व्यवस्थापनाशी संबंधित निर्णय स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेषांसाठीचे राष्ट्रीय संवर्धन धोरण, २०१४ द्वारे नियंत्रित केले जातात.
राष्ट्रीय महत्त्वाचे ‘प्राचीन स्मारक’ म्हणून घोषित केले असल्याने,या मंदिराच्या मर्यादेपासून सर्व दिशांनी १०० मीटर अंतर निषिद्ध क्षेत्र ठरविण्यात आला आहे आणि त्यापलीकडे, अधिकृत परिसर संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राच्या मर्यादेपासून तसेच त्यापलीकडे सर्व दिशांनी २०० मीटरचे नियंत्रित क्षेत्र असलेले व ३०० मीटरचे सु-परिभाषित राखीव क्षेत्राद्वारे हे प्राचीन स्थळ संरक्षित आहे. जुलै २०२१ मध्ये या मंदिराला युनेस्को च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. (UNESCO World Heritage Convention, 2021)
रामप्पा मंदिराच्या अभ्यासाचा आणि संवर्धनाचा इतिहास १९१४ पासूनचा आहे. सुरुवातीच्या काळात संवर्धनाची कामे छोट्या मोठ्या दुरुस्तीची होती, त्यानंतर १९३३ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने यात हस्तक्षेप केला व अनेक संवर्धन उपक्रम हाती घेतले. यात प्राकाराच्या भिंतीची डागडुगी करण्यात आली. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काकतीयन मंदिरांच्या बांधकाम तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संशोधन केले गेले, ज्यामध्ये इतर अनेक मंदिरांबरोबर रुद्रेश्वर परिसर देखील समाविष्ट होता. संकुलातील मंदिर संरचनांचे दस्तऐवजीकरण केले गेले, ज्यात कामेश्वर मंदिराचे पूर्ण पृथक्करण करण्याआधी, तसेच वर्षानुवर्षे केलेल्या विविध संवर्धनाच्या कामांचे दस्तऐवजीकरण केले गेले. हे काम पूर्ण केल्यानंतर अलीकडच्या काळात कामेश्वर मंदिर पूर्णपणे उलगडून त्याचे सर्व दगड व्यवस्थित रित्या पुन्हा बसविण्याचे काम सुरु करण्यात आले.(Archeological Survey of India (ASI), 2021, ४८)
काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिराचे व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ए. एस. आय.) म्हणजेच त्याचे हैदराबाद मंडळ आणि वारंगल उप-मंडळाद्वारे केले जाते. स्थानिक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून त्याचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन केले जाते. दैनंदिन व्यवस्थापन उपक्रमांना तेलंगणा राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कर्मचारी, या ठिकाणी कायमस्वरूपी तैनात असलेल्या मार्गदर्शक, तसेच मंदिर संकुलाच्या आसपास राहणारे स्थानिक समुदाय आणि मंदिरात समारंभ करणारे पुजारी यांचे पाठबळ आहे. मालमत्तेच्या जवळ असलेल्या कोणत्याही प्रकल्पांसाठी, विशेषतः रामप्पा तलावाजवळील विकास प्रकल्पांच्या संदर्भात वारसा प्रभाव मूल्यांकन सुनिश्चित करून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
पुरातत्त्व विभागाचे कार्य

या मंदिराच्या परिसरात पुरातत्त्व विभागाचे पुनर्निर्माण कार्य सुरु आहे. यात प्रामुख्याने मुख्य मंदिराच्या दक्षिण भागात एके काळी उभ्या असणाऱ्या कामेश्वर महादेव मंदिराचे पुनर्निर्माण हे कार्य सध्या सुरु आहे. काढलेल्या शिल्पांचे, स्तंभांचे साफसफाई करून वर्गीकरण करणे हे कार्य सध्या सुरु आहे.
उपसंहार
भारतभर विविध राजवटींनी बांधलेली असंख्य मंदिरे आहेत. हि मंदिरे आपापल्या विशिष्ट शैलींमुळे स्वतःचे वेगळे स्थान राखून आहेत. बदामीच्या चालुक्यांची वेगळी शैली आहे, कांचीपुरम येथील पल्लवांची वेगळी शैली आहे, महाराष्ट्रात यादवांची वेगळी शैली आहे तर कर्नाटकातील होयसळांची वेगळी. या असंख्य शैलीमध्ये देखील काकतीयानी बांधलेली मोजकीच मंदिरे स्वतःचे वेगळेपण त्यांच्या विशिष्ट शैलीमुळे राखून आहेत. यातही काकतीयांचे वेगळेपण त्यांच्या बांधकामाच्या पाद्धतीत व त्याने वापरलेल्या साहित्यात देखील आहे. काकतीय स्थपतींनी बांधलेला वालुकापेटी पद्धतीचा पाया हे त्यांच्या बांधकामाचे जसे वैशिष्ट्य आहे तसेच त्यांनी बनविलेल्या हलक्या वजनाच्या विटा. प्रदेशातील भूकंप प्रवणता लक्षात घेऊन दीर्घकाळ टिकणारे बांधकाम करण्यासाठी त्यांनी बांधकामाची हि दोन वैशिष्ट्ये शोधली आणि त्याचा उपयोगदेखील झाल्याचे आपल्याला दिसून येते.
म्हणूनच रामप्पा नामक मुख्य स्थपतीच्या नावे असणारे व रेचरला रुद्र या राजा गणपतिदेवाच्या सेनापतीने बांधून घेतलेले हे मंदिर यथोचितपणे “रुद्रेश्वर रामप्पा मंदिर” या नावाने ओळखले जाते. सद्य स्थितीत येथील प्राकारातील एका मंदिराचे पुनर्निर्माण कार्य सुरू असल्याने मंदिराचा, रचनाशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी देखील ही एक पर्वणी आहे कारण त्याच प्रकारच्या पायाचे तंत्रज्ञान वापरुन या कामेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात येणार आहे.
सुमारे सहा फूट उंच तारकाकृती जगती (पाया) वर हे मंदिर उभारलेले असून मंदिराला याच उंचीचा ८ फूट रुंदीचा प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराच्या बाह्यांगावर जवळपास पूर्णाकृती १२ मदनिका (शिलाबालिका अथवा सुरसुंदऱ्या) आढळतात व २६ गज-केसरी (गजावर अधिपत्य गाजवणारे सिंह- याव्यतिरिक्त २ तुटले आहेत). या सर्व मूर्ती मंदिर छत तोलून धरीत आहेत. ही सर्व कोनीय शिल्पे अथवा Bracket Figures या प्रकारात येतात. या सडपातळ मदनिकांचे अलंकरण, हावभाव, मुद्रा या पाहणाऱ्याला वेड लावतील अशाच आहेत. नागिणी, मानिनी, मरीचिका, मर्दला, रागिणी अशा विविध प्रकारात मोडणाऱ्या या सुरसुंदऱ्यांपैकी एक तर उंच टाचांच्या चपलांसह आढळते. काहींच्या पायातील जोडवी देखील वेगळी ओळखता येतात.
या व्यतिरिक्त मुख्य मंडपावरील खांब व आडव्या तुळया या देखील अप्रतिम कथानके आणि नक्षीकामे नटलेल्या आहेत. शिवलिंग असलेले गर्भगृह व रंगशीला असलेला मुख्य मंडप यांच्या मधला भाग म्हणजे अंतराळ. याला देखील वेगळे द्वार (द्वारशाखा) आहे व यातील एक वृक्षरुपी कोरीव दगड संगीत शिळा आहे. यात बोटाने वाजवल्यावर संगीताचे स्वर ऐकू येतात. मुख्यमंडपाच्या तुळयांवर गजासूर संहार, दक्ष संहार, शिव पार्वती विवाह, अमृत मंथन, अमृत कलश पूजन अशी असंख्य शिल्पे आहे. या मंडपाचे खांब तर नुकतेच पॉलिश केल्यासारखे चकाकतात. त्यावरही अनेक कथानके, नृत्ये आहेत.
या व्यतिरिक्त असंख्य गणेशमूर्ती, सुरसुंदऱ्या, कालभैरव, गजलक्ष्मी, कामशिल्पे यांनी या मंदिराचे बाह्यांग सजले आहे. खालच्या अंगाला मंदिरासभोवती फिरणारा ५२६ हत्ती असलेला गजथर आहे.
© महेश नाईक
