काश्मिरी दुर्गेची घरवापसी-Return of Stolen Durga of Kashmir
ही कथा आहे काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तेंगपूरा नावाच्या गावातील मंदिरातून १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला चोरीला गेलेल्या एका विलक्षण दुर्गा मूर्तीची. याला काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय पुरातत्व मूर्तींची तस्करी, ती विकत घेणारी जागतिक संग्रहालये, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, संयुक्त राष्ट्र, भारत आणि जर्मनीची सरकारे, असे विविध कंगोरे आहेत त्याचबरोबर या मूर्तीला (आणि अशा अनेक मूर्तीना) परत आणण्यासाठी झटणाऱ्या भारतीय पुरातत्व विभागाचेही अथक प्रयत्न जसे कारणीभूत आहेत तसेच श्री राकेश कौल या काश्मिरी पंडिताचेदेखील. .

तेंगपोरा दुर्गा ही ८व्या शतकातील काश्मिरी शिल्पकलेतील उत्कृष्ट कलाकृती मानली जाते. काश्मिरी मूर्तीकलेच्या अत्त्युच्च काळात या मूर्तीची निर्मिती झाली असावी इतकी ती देखणी आहे. काश्मिर हे हिंदू अध्ययनाचे व मंदिर निर्मितीचेही केंद्र बनले होते अशा काळातील ही मूर्ती आहे. त्यातही दुर्गेची ही विशिष्ट मूर्ती आहे कारण त्यात सामान्यतः त्या काळात प्रचलित असलेल्या दहा हातांच्या दुर्गेऐवजी अठरा हातांच्या दुर्गेचे चित्रण केले आहे. ही मूर्ती पुलवामा येथील काश्मीरमधील तेंगपोरा येथील मंदिरात स्थापिलेली होती. १९८० च्या सुमारास पुरातत्व विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी वैकुंठ विष्णूच्या सोबत ASI च्या १९८० च्या बुलेटिन मध्ये (पृष्ठ ९१), या दुर्गा मूर्तीची देखील नोंद केली होती पण त्याची छायाचित्रे उपलब्ध नव्हती व ती मिळायला आणि मूर्तीचा सखोल अभ्यास व्हायला १९९० साल उजाडले.
पण याच दरम्यान काश्मीरमध्ये दहशतवाद बोकाळला आणि हिंदू मंदिरांवर संक्रांत आली. येथील दहशतवादामुळे मंदिरे ओस पडू लागली आणि याचाच फायदा अशा पुरातन आणि उत्कृष्ट मूर्तिशिल्पांच्या तस्करांनी घेतला नसता तरच नवल. १९९० च्या दशकात जेव्हा दहशतवादी काश्मिरात धुमाकूळ घालत होते त्याच वेळी अनेक मंदिरातून अशा मौल्यवान मूर्ती चोरल्या जात होती. १९९१ च्या सुमारास कधीतरी ही मूर्ती या तस्करी टोळ्यांकडून या मंदिरातून काढून चोरून अज्ञात ठिकाणी पाठविली गेली ती जास्त पैसे उकळण्याचा उद्देशाने. जशा इतर अनेक पुरातन वस्तू काश्मीरमधून नाहीशा झाल्या आणि इतरत्र दिसू लागल्या. त्याचप्रमाणे तेंगपोरा दुर्गादेखील दृष्टीआड झाली.
जवळपास दोन दशके तिचा थांगपत्ता नव्हता. इ.स. २००९ च्या सुमारास श्री प्रतापदित्य पाल यांनी प्रसिद्ध केलेल्या “Goddess Durga: The Power and the Glory” या पुस्तकाच्या पण क्रमांक १५ वर छायाचित्र क्रमांक ७, मध्ये या दुर्गेचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि त्याचबरोबर तिचा ठावठिकाणा अज्ञात असल्याची माहीतीदेखील. २०१३ मध्ये अजून एका लेखकाने, John Sidaumuk यांनी त्यांच्या “The Hindu-Buddhist Sculpture of Ancient Kashmir and Its Influences” या पुस्तकात पृष्ठ ४१३ वर या मूर्तीचे छायाचित्र आणि, त्याचे तेंगपोरा येथील स्थान इत्यादींची माहीती छापली होती.
१९९७ साली श्री. राकेश कौल, नावाच्या एक काश्मिरी पंडित असणाऱ्या व बड्या अमेरिकन कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या व्यक्तीने ही दुर्गामूर्ती श्री. सुभाष कपूर यांच्या यांच्या मॅडिसन एव्हेन्यू गॅलरीमध्ये प्रथम पाहिली. सुभाष कपूर यांचे हे मूर्तीप्रदर्शन म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रे व मूर्तीच्या तस्करीचाच एक भाग होता. श्री राकेश कौल यांना या प्रदर्शनातील इतर अनेक देवी देवतांच्या मूर्तीबद्दल देखील खटकले होतेच.
पुढे २००७ मध्ये श्री राकेश कौल यांची भेट श्री प्रतापदित्य पाल यांच्याशी झाली. राकेश कौल तेव्हा “काश्मीरच्या कलेबद्दलच्या एका प्रदर्शनाचे अध्यक्षपद भूषवित होते. बहुधा याच दरम्यान कधीतरी २००९ च्या नंतर श्री प्रतापदित्य पाल यांनी हि मूर्ती श्री सुभाष कपूर यांच्या प्रदर्शनात पाहिली असावी व ही चोरीची असल्याचे त्यांच्या निर्दशनास आणून दिले पण श्री सुभाष कपूर यांनी काहीतरी उत्तर देऊन वेळ मारून नेली.
पण ही मूर्ती आता लक्ष वेधत आहे याचा अंदाज श्री सुभाष कपूर याना आला आणि त्यांनी हा मूर्ती जर्मनीच्या स्टुटगार्ड येथील लिन्डेन संग्रहालयाला २,२४,००० युरो इतक्या अल्प किमतीला विकली.
इ.स. २०१० मध्ये श्री प्रतापदित्य पाल या लिन्डेन संग्रहालयात व्याख्यानाकरिता गेले तेव्हा त्यांना ही मूर्ती संग्रहालयात पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. त्याबद्दल थोडी चौकशी केल्यावर त्यांना सांगण्यात आले की संग्रहालयाने सुभाष कपूर यांच्याकडूनही उत्कृष्ट काश्मिरी कलाकृती विकत घेतली आहे. श्री प्रतापदित्य पाल यांनी तात्काळ श्री राकेश कौल याना कळविले आणि ही मूर्ती भारतात कशी परत नेता येईल याविषयी चर्चा केली. याकरिता या मूर्तीचे काश्मिरातील मूळ व तिचा अमेरिकेमार्गे लिन्डेन संग्रहालयात पोहोचण्यापर्यंतचा प्रवास निश्चित करणे आवश्यक होते. याकरिता त्यांनी ASI ची मदत घेण्याचे ठरविले.
ए. एस. आय.ने त्यांना सर्व मदत देऊ केली. त्यांच्याकडे अनेक देशांमधून आपण दावा करत असलेल्या वस्तूंची अशा तस्करीत मूर्तींची आणि कलाकृतींची एक लांब यादी होती आणि ही दुर्गा देखील प्रतीक्षा यादीत कुठेतरी खाली होती. ए. एस. आय.ने पुरावे गोळा करायचे काम सुरु केले. त्यासाठी त्यांनी १९९० मध्ये जागेवर जाऊन मूर्तीची छायाचित्रे घेणाऱ्या आपल्या लोकांशी संपर्क केला. इतर कागदपत्रे, प्रत्यक्षदर्शी इत्यादींच्या मदतीने बरीच माहिती आणि पुरावे जमा करून २०१३ मध्ये अखेर या मूर्तीच्या चोरीचा FIR दाखल करण्यात आला. आपल्या बर्लिन दूतावासात काम करणाऱ्या अधिकारी श्रीमती सुजाता सिंग याना या तपासकामाची आणि लिन्डेन संग्रहालयातील या मूर्तीची कल्पना देण्यात आली. पुढे भारतीय अभ्यासक आणि जर्मन अधिकारी यांची या संदर्भात बोलणीदेखील घडवून आणली गेली.
या दरम्यान अमेरिकेतील पोलिसांनी सुभाष कपूरला प्राचीन वस्तूंच्या तस्करीसाठी अटक केली व या तपासात मोठी प्रगती झाली. तो भारतातून “संगमरवरी फर्निचर” असे नामकरण करीत प्रत्यक्षात प्राचीन वस्तूंची तस्करी करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. याव्यतिरिक्त त्याने तामिळनाडूमधून विविध कांस्य नटराजमूर्तींची चोरी केल्याचे देखील निष्पन्न झाले. यामुळे सुभाष कपूरचे भारतात प्रत्यार्पण करण्यास अमेरिकी सरकारने देखील सहमती दर्शवली.
आता हळूहळू सर्वच पातळ्यांवर ही मूर्ती वादग्रस्त होत असल्याचे सिद्ध होऊ लागल्यावर लिंडेन संग्रहालयाने या तेंगपोरा दुर्गामूर्तीला आपल्या प्रदर्शनातून गुपचूप नजरेआड केले. श्री राकेश कौल हे मात्र संग्रहालयाला ही दुर्गामूर्ती भारतात परत करण्याची विनंती सतत करीत होते. हे प्रकरण जर्मन संस्कृती आणि कला मंत्रालयाकडे नेण्यात आले.
श्री राकेश कौल यांनी त्या वेळी जर्मनीतील भारतीय राजदूताला पत्र लिहिले. राजदूतानेही मदत करण्याची तयारी दर्शवली. योगायोगाने याच सुमारास अनेक दशकांपासून काश्मीरच्या पुरातन शिल्पांवर भाष्य करणाऱ्या John Sidaumuk यांचे पुस्तक प्रकाशित झाले, ज्यात या दुर्गेचे १९९० च्याही आधीचे छायाचित्र होते. त्यांनी स्वतः ही दुर्गा प्रत्यक्ष पाहिली होती पण स्थानिकांनी त्याला चोरीच्या भीतीने छायाचित्र काढण्याची परवानगी दिली नव्हती. आता या अजून एका मार्गाने दुर्गेच्या अलीकडच्या काळातील काश्मीरमधील अस्तित्वाचे शिक्कामोर्तब झाले होते. राकेश कौल यांच्या संपर्कानंतर लिंडेन संग्रहालयाने त्यांच्यासमोर एक अनौपचारिक प्रस्ताव ठेवला की संग्रहालय या मूर्तीची भारतीय मालकी मान्य करेल पण भारत सरकारने ही मूर्ती लिंडेन संग्रहालयाला कायमस्वरूपी कर्जावर द्यावी. पण ASI मात्र या प्रस्तावाला नकार दिला आणि दुर्गा परत करणे हाच एकमेव उपाय असल्याचे ठणकावले.
लिंडेन संग्रहालय आणि जर्मन सरकार आता एका नाजूक परिस्थितीत सापडले. हे असे शिल्प होते कि जे त्यांनी गुन्हेगारांकडून, तस्करांकडून विकत घेतले होते. त्याच्यावर आधीच अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये गुन्हे दाखल होते व तो पकडलाही गेला होता. त्यामुळे जर्मन सरकारची बाजू देखील कमकुवत झाली होती. आणि शेवटी मे २०१४ मध्ये भारतात नवीन सरकारने शपथ घेतल्यानंतर अशा प्रकरणांना जोरदार चालना देण्यात आली. शेवटी जर्मन सरकारने तडजोड करण्याचे ठरविले व २०१५ च्या जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या भारत भेटीदरम्यान सद्भावना भेट म्हणून ही दुर्गा भारतीय राजदूत श्री एस इ विजय यांच्याकडे २३ सप्टेंबर २०१५ रोजी कागदोपत्री सुपूर्द करण्यात आली आणि ५ ऑक्टोबर २०१५ रोजी अँजेला मर्केल यांनी आपल्या भारतभेटीदरम्यान तो पंतप्रधान मोदींना प्रत्यक्ष हस्तांतरित केली आणि अखेरीस राकेश कौल यांच्या अथक प्रयत्नांना यश आले.


सद्यस्थिती
आता ही मूर्ती काश्मीरच्या श्रीनगर येथील श्री प्रताप सिंह (SPS) संग्रहालयात आहे. मी २०२३ च्या एप्रिल मध्ये ही मूर्ती पाहिली होती व तिचे छायाचित्रदेखील घेतले होते, पण त्यावेळी मला या दुर्गेच्या घरवापसीमागच्या अथक परिश्रमांची कथा माहीत नव्हती.
श्री. राकेश कौल यांच्या स्वतःच्या शब्दांमध्ये या दुर्गेचे वर्णन – “ती आठव्या शतकात तिच्या मूर्तीरूपात हिरव्या क्लोराईट दगडातून अवतरली. तिची उंची ६८.६ सेमी आणि रुंदी ४३.२ सेमी आहे. ती पूर्वस्थितीत आहे. काश्मीरच्या आगळ्यावेगळ्या शैलीशी सुसंगत अशी ही मूर्ती ती दोन सिंहांनी ओढलेल्या, बाजूला चाके (समोरून दिसणाऱ्या) असलेल्या रथात स्वार झालेली आहे.सूर्याच्या अरुण या सारथ्याप्रमाणेच तिचा एक सारथी दिसून येतो. ती आलीढ (एखाद्या योद्ध्याप्रमाणे) स्थितीत उभी आहे. तिचे दोन रथवाहक सिंह महिषाला आपल्या जबड्यात घट्ट पकडून आहेत तर अजून एक तिसरा सिंह त्याच्या शक्तिशाली जबड्यांमध्ये अज्ञानरुपी गदाधारी राक्षसाला चिरडून टाकताना दिसतो. ही दुर्गा आपल्याला सजग आणि ज्ञानी राहून, निर्भयपणे सत्याचा शोध घेण्याची प्रेरणा देते.
तेंगपोरा, पुलवामा येथील या दुर्गामूर्तीचे प्रतिमाशास्त्र

साधारणपणे ७ व्या शतकापूर्वीच्या सर्व शिल्पांमध्ये दहा हात दाखविले जात. दुर्गेच्या अठरा भुजांचे वर्णन प्रथम नीलमतपुराण या ग्रंथात येते. या प्रतिमेत तिच्या डाव्या हाताच्या दोन बाहूंमध्ये तिने शुंभ आणि निशुंभ हे राक्षस धरले आहेत. तिच्या उजव्या हातात भाला, बाणाचा भाता, मण्यांची माळ, काठी, परशु, तलवार, वज्र आणि गदा आहे तर डाव्या हातात धनुष्य, खेटक (गोल ढाल), घंटा, कमंडलू, त्रिशूळ, शिंग आणि तिच्या डाव्या मांडीवर असलेल्या हातात अक्षमाला आहे. तिने एक घट्ट चोळी आणि पायघोळ पोशाख परिधान केला आहे, ज्याचा काचा बांधलेला दिसतो. नक्षीदार मुकुटासह, मोठी कर्णकुंडले, आणि बांगड्या तिचे सौंदर्य मोहक बनवितात. ती आपल्याला सांगते की निर्भीक साधक मुक्त होतो आणि अंधारावर मात करण्यासाठी स्वातंत्र्य ही पूर्वअट असते. केवळ स्वातंत्र्य हेच वास्तविकतेच्या अंतिम सत्याच्या सौंदर्याचा अनुभव देते!
संदर्भ
(१ ) https://plone.unige.ch/art-adr/cases-affaires/durga-idol-2013-india-and-germany
(२) https://indianculture.gov.in/retrieved-artefacts-of-india/artefact-chronicles/durga-mahishamardini
आभार : श्री जयेन मिस्त्री यांचा फेसबुक वरील लेख
