शंकराचार्य आणि स्तोत्रे-Shankaracharya and Stotra

शंकराचार्यांच्या स्तोत्रातील अद्वैत वेदांताचे प्रतिबिंब
शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांमध्ये अद्वैत वेदांताचे प्रतिबिंब आपल्याला जागोजाग आढळून येते. त्यांनी जरी भक्ती स्तोत्रे लिहिली असली तरी त्यात देखील त्यांच्या पूजनीय दैवताला परब्रम्हाचे स्थान दिलेले आहे. याचे उदाहरण आपल्याला शिवप्रात:स्मरण स्तोत्रामध्ये देखील आढळून येते. संसाररोगहरम औषधंद्वितीयम, असा असणारा शिव गंगाधर आहे, अंबिकेश आहे, वृषभ हा त्याचे वाहन असलेला आहे, गिरीजे बरोबर आपला अर्धा देह धारण करणार आहे. पण तोच सर्ग , स्थिती आणि लयाचे कारण देखील आहे म्हणजेच तो आदि देव आहे, ज्याला न उगम आहे ना अंत. हा शिव एकच आहे त्याचबरोबर अनंत देखील. तो षडभाव शून्य म्हणजेच जीवनाच्या कोणत्याही भावात अंतर्भूत नसलेला, ज्याला जन्म मृत्यू किंवा त्यामधील कोणत्याही अवस्था नाहीत असा आहे. याचाच एक अर्थ त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षडरिपू नाहीत असा देखील आहे.
एवढे सगळे वर्णन करताना काही ठिकाणी शंकराचार्य सगुण-साकाराचे वर्णन करतात तर त्यालाच ते काही ठिकाणी निर्गुण निराकार मानतात. हीच गोष्ट आपल्याला वेदसार शिवस्तोत्रामध्ये देखील आढळून येते. यात तो पशुंचा पती, गजासुर वध करून गजासुराचे चर्म धारण करणारा आहे. तो स्मरारीम अर्थात मदनाला भस्म करणारा आहे, तो भास्वर म्हणजे लकाकणारा आहे, तो विरुपाक्ष आहे. तो पाच शिरे अथवा स्वरूप असलेला आहे, तो गणांचा ईश गणेश आहे आणि तो नीलवर्णकंठ असलेला देखील आहे.
पण याचबरोबर याच ठिकाणी पुढे त्याचे वर्णन परात्मा असे देखील येते. तो निराकार असून त्याचे स्वरूप केवळ आपल्याला ओंकारानेच समजू शकते. तो भूमी नाही तो अग्नी नाही तो वायू नाही की तो आकाश देखील नाही. त्याला कोणतेही रूप नाही असा तो निर्गुण निराकार आहे. असा शिव, तुरीय म्हणजेच आत्म्याची चौथी अवस्था या स्वरूपात आपल्याला आढळतो आणि अशा या परमपवित्र अद्वैताला आपण वेदसारशिव स्तोत्रातून अभिवादन करतो.
एकीकडे त्याचे वर्णन आदी शंकराचार्य “शिवाकांत शांत स्मरारे पुरारे”, म्हणजे मदनाचा शत्रू आणि त्याचबरोबर त्रिपुरासुराचा अंत करणारा त्रिपुरारी असा देखील करतात पण त्याचबरोबर ते त्याला विश्व धारण करणारा देखील मानतात. अशा रूपात तो लिंगरूपात चराचरात भरून राहिला आहे असे वर्णन त्यांनी वेदसर शिवस्तोत्रात केलेले आहे.
शंकराचार्यांचे प्रातःस्मरण स्तोत्र
शंकराचार्यांचे प्रातःस्मरण स्तोत्र म्हणजे संपूर्णपणे ब्रह्माची महती समजून देण्यासाठी रचलेले स्तोत्र आहे. यात शंकराचार्य ते कोणत्या परम ब्रम्हाचे स्मरण करतात, कोणत्या परम ब्रम्हाला भजतात, कोणत्या परम ब्रम्हाला नमन करतात याचे थोडक्यात वर्णन केले आहे.
याला चतुर्थ अवस्था ( तुरीय) म्हणून ओळखले जाते कारण हे प्रथम तीन अवस्थांच्या म्हणजे जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि गाढ झोपेची अवस्था अथवा सुषुप्ती अवस्था यांच्या पलीकडील आहे. हे ब्रह्म निष्कलं म्हणजे कलांप्रमाणे न बदलणारे, याचा अर्थ अचल असणारे आहे.
त्याचे वर्णन शब्दात करता येत नाही पण शब्द त्याच्यामुळेच तयार होतात. त्याचे वर्णन पंचमहाभूतांनी करता येत नाही पण पंचमहाभूते त्याच्या मुळे तयार होतात. जे स्वतःच्या सद-चिद-आनंद अशा गुणांनी चमकते ते आत्मतत्त्व आहे.
उपनिषदांनी सांगितलेले नेति नेति म्हणजेच हे असे नाही ते असेही नाही. अशा प्रकारे ज्या ब्रह्माचे नकारात्मक वर्णन केले जाते, ते केवळ भासमान आहे, म्हणजेच एखाद्या रज्जूला जसे सर्प समजले जाते तेवढ्याच प्रमाणात आपल्याला ते ब्रम्ह कळते.
ते तमाच्या पलीकडील अर्काप्रमाणे तेजस्वी आहे, पुरुषोत्तम आहे. ते पूर्ण असून सर्व जगात भरलेले आहे, व ते आपल्याला अविद्येमुळे रज्जूमध्ये आढळणाऱ्या सर्पाप्रमाणे आहे.
शंकराचार्यांची इतर प्रातःस्मरण स्तोत्रे जरी देवतांचे वर्णन करत असली तरी हे प्रातःस्मरण स्तोत्र मात्र ब्रह्म तत्व किंवा आत्मतत्त्व या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अद्वैताचे स्मरण नमन आणि भजन करते.
शंकराचार्यांच्या स्तोत्रातील भक्तीचे प्रतिबिंब
अद्वैत वेदांताचे पुरस्कार ते असणाऱ्या आदी शंकराचार्यांनी विविध देवतांची भक्ती आणि स्तुती करण्यासाठी विविध स्तोत्रे रचली. सगुण साकार देवतांची भक्ती करणारी ही स्तोत्रे जरी असली तरी यातून अंतिम संदेश मिळतो तो मात्र अद्वैताचा. शंकराचार्य आपल्या स्तोत्रांद्वारे विविध देवतांचे गुणगान करतात आणि भक्तीचे स्वरूप सोपे करून टाकतात. यासाठी त्यांनी शंकराची स्तुती करणारी, विष्णूची स्तुती करणारी, पांडुरंगाची स्तुती करणारे देवी भवानीची स्तुती करणारी अनेक स्तोत्रे सोप्या सोप्या आणि गेय शब्दांमध्ये म्हणजेच पंचके, अष्टके अशा स्वरूपात लिहिली.
शिवस्तोत्र वाचताना आपल्याला शिवाच्या विविध पुराणीक रूपांचा परिचय होतो. यात प्रातःस्मरण स्तोत्र किंवा वेदसार स्तोत्र यातून आपल्याला शिवाचे विविध पराक्रम, त्यामुळे त्याला मिळालेली नावे, त्याच्याशी जोडल्या गेलेल्या पुराणकथा यातील संदर्भ लागत राहतात.
रामप्रात:स्मरण स्तोत्र देखील असेच रामाचे गुणगान करणारे आहे. यात रामाने केलेल्या पराक्रमांचे तसेच त्याच्या अनुकरणीय गुणांचे वर्णन आहे. यातील राम जानकी साठी महेश चाप तोडणार आहे, त्याचबरोबर तो अहिल्येचे पाप हरण करून तिला मुक्ती देणार आहे. तो राम, भक्ताच्या वाणीचे दोषहरण करणारा असून अशा देवाचे जो श्रद्धेने स्मरण करेल त्याला शेवटी पुण्य मिळेल यासाठी या स्तोत्राचे पठण करावे असे शंकराचार्य सुचवितात.
भवानी अष्टकम या स्तोत्राद्वारे आपल्याला देवी भवानी या संसाररूपी भवसागरातून कशी तारून देऊ शकेल आणि हे करू शकणारी तीच कशी एकमेव आहे हे समजते. या अष्टकातील भक्त अज्ञान आहे. त्याला ध्यान, योग, स्तोत्र, मंत्र, तीर्थस्थळे, भक्तिमार्ग याची काहीच कल्पना नाही. त्यामुळे तो कुकर्मी, कुसंगी, कुबुद्धी, कुलाचारहीन , कुदृष्टि असा आहे. तो ब्रह्म, इश, सूर्य, चंद्र, विष्णू, महेश यापैकी कोणाबद्दल काहीही जाणत नाही. तो अनाथ आणि हीन दिन असा आहे त्यामुळे अशा भक्ताचा केवळ भवानी आणि तिची भक्ती हा एकमेव तरुन जाण्याचा मार्ग आहे असेच शंकराचार्य या भवानी स्तुती करणाऱ्या अष्टका मध्ये आपल्याला सुचवितात.
कटीवर कर ठेवून उभ्या असणाऱ्या पांडुरंगासाठी देखील शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकम रचले आहे. येथेही भक्तीचा राग आळवताना त्यांनी पांडुरंगाची अनेक प्रकारे स्तुती केली असून त्यालाच सर्वांचा त्राता म्हटले आहे. विष्णू आणि कृष्णाचे रूप म्हणजे पांडुरंग. तो जसा गोपालक आहे तसेच भक्तांच्या हाकेला धावून येणारा देव देखील आहे. यातील प्रत्येक स्तोत्राच्या अखेरीस हे स्तोत्रपठण करणाऱ्याला कसे पुण्य मिळेल आणि देवाच्या सानिध्याचा लाभ मिळेल याचे वर्णन शंकराचार्य करतात.
अशा प्रकारे वेगवेगळ्या देवांचे भक्ती वर्णन आपल्याला शंकराचार्यांच्या काव्यांमधून पाहायला मिळते. असे असले तरी शंकराचार्य आपल्याला हे विविध देव म्हणजे एकच अद्वैत परब्रम्ह असल्याचेच शेवटी सुचित करतात. तुमचे भक्तीचे मार्ग आणि भक्तीचे देव वेगळे असू शकतात पण जे अंतिम ध्येय आहे ते मात्र एकच असते हे देखील शंकराचार्यांना यातून सुचवायचे आहे.
शंकराचार्यांच्या स्तोत्रातील देवता विशेषण व पुराणातील कथा यांचा संबंध
शंकराचार्यांच्या अनेक स्तोत्रांमध्ये ज्या देवतांची स्तुती केली जाते त्या देवतेची अनेक विशेषणे वापरली आहे. काय या विशेषणांमधून आपल्याला अनेक कथांचा संबंध जोडलेला आढळून येतो. यातील काही कथांचा आपण आढावा घेऊ.
शिवप्रात:स्मरण स्तोत्र : या स्तोत्रात शिवाला गंगाधर हे विशेषण लावण्यात आलेले आहे. या त्याच्या नावावरून त्याच्याशी जोडलेली गंगावतरणाची कथा आपल्या लक्षात येते. सगरपुत्रांच्या मुक्तीसाठी अखेरीस भगीरथाने अविरत प्रयत्न करून गंगेला पृथ्वीवर येण्यास प्रवृत्त केले. तिचा वेग प्रचंड होता आणि तिला आपल्या वेगाचा अभिमान देखील होता. तिचा हा प्रचंड वेग थोपवून धरण्यासाठी आणि पृथ्वीतलावरील जीवांना गंगेच्या वेगाचा त्रास होऊ नये याकरिता हिमालयातून पडणाऱ्या गंगेला शंकराने आपल्या जटांमध्ये बद्ध केले. अडकून गेलेली गंगा त्या जटेमध्ये अस्वस्थ होऊ लागली आणि तिने भगवान शंकरांना आपली सोडवणूक करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी आपल्या जटेची एक बट मोकळी करत गंगेला मर्यादित स्वरूपात पृथ्वीवर वाहण्यास प्रवृत्त केले. शंकरांनी आपल्या जटेत गंगेला सामावून घेतले म्हणून त्यांचे नाव गंगाधर शिव असे पडले.
वेदसार शिव स्तोत्रा मध्ये शिवाचा उल्लेख स्मरारिम असा येतो. याचा संदर्भ आपल्याला मदनाच्या भस्मिकरणाच्या कथेत मिळतो. स्मर म्हणजे मदन आणि अरी म्हणजे शत्रू. मदनाचा जो शत्रू म्हणजे मदनाला भस्मिभुत करणारा असा शिव असा त्यांचा उल्लेख येतो. मदनाच्या भस्मिकरणाची ही कथा आपण कुमारसंभव या कालिदासाच्या महाकाव्यात पाहिली आहेत.
याच वेदसार स्तोत्रामध्ये शिवाचा उल्लेख विरूपाक्षमिंद्वर्क वन्हीत्रिनेत्र म्हणजेच इंद्र, अर्क, आणि वन्ही किंवा चंद्र, सूर्य आणि अग्नी हे तीन नेत्र असलेला असा येतो. त्याला गवेंद्राधिरुढम म्हणजेच गोवंशातील इंद्रावर अथवा नंदीवर आरुढ होणारा असे देखील म्हटले आहे. शंकरांचा उल्लेख नीलवर्ण कंठ असलेला असा देखील येतो ज्यात आपल्याला समुद्रमंथनाच्या कथेचा संदर्भ मिळतो. यात समुद्रमंथनातून प्राप्त झालेले हलाहल नावाचे विष शंकराने प्राशन केले म्हणून ते नीलकंठ झाले. तसेच या विषयाची तीव्रता कमी करण्यासाठी, किंवा त्यांचे अंग शितल करण्यासाठी जे उपाय योजले त्यात एक चंद्रकोर देखील त्यांच्या माथ्यावर विराजमान करण्यात आली, ज्यामुळे त्यांचे नाव शशांक असे पडले, हे नाव देखील या स्तोत्रामध्ये येते.
शिवपंचाक्षर स्तोत्र : नमः शिवाय या पाच अक्षरांची महती सांगणारे शंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र. यातील प्रत्येक कडवे किंवा चरण नमः शिवाय यातील एकेका अक्षराने सुरू होतो, आणि त्या त्या अक्षराची महती सांगतो. यात शिवाला गौरीवदनाब्ज वृंद सूर्य , असे म्हटले आहे. यातील अब्ज म्हणजे दिवसा फुलणारे कमळ. देवी पार्वतीचे वदन या दिवसा उमलणाऱ्या सूर्याप्रमाणे आहे असे यातून सुचविले आहे. आणि त्याचबरोबर दक्षाध्वरनाशकाय म्हणजे सतीच्या पित्याच्या यज्ञात आपल्या आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून सतीने त्या यज्ञकुंडात उडी मारून स्वतःला संपविले. हे पाहून शंकराने त्या यज्ञाचा आणि यज्ञकर्त्या दक्षाचा नाश केला म्हणून त्यांना हे नाव पडले, ही पुराणकथा आपल्याला सहज जोडता येते.
राम प्रात:स्मरण स्तोत्रा मध्ये देखील दोन कथांचा आणि त्यावरून पडलेल्या विशेषणांचा उल्लेख येतो. या शिवधनुष्य श्रीरामांनी तोडले, ती कथा येते आणि अहिल्या श्रीरामांच्या पदस्पर्शाने मुक्ती मिळाली या कथेचा उल्लेख आपल्याला दिसून येतो.
शिवप्रातःस्मरणस्तोत्रम्
प्रातः स्मरामि भवभीतिहरं सुरेशं गङ्गाधरं वृषभवाहनमम्बिकेशम् । खट्वाङ्गशूलवरदाभयहस्तमीशं संसाररोगहरमौषधमद्वितीयम् ॥१॥
प्रातर्नमामि गिरिशं गिरिजार्धदेहं सर्गस्थितिप्रलयकारणमादिदेवम् । विश्वेश्वरं विजितविश्वमनोभिरामं संसाररोगहरमौषधमद्वितीयम् ॥२॥
प्रातर्भजामि शिवमेकमनन्तमाद्यं वेदान्तवेद्यमनघं पुरुषं महान्तम् । नामादिभेदरहितं षड्भावशून्यं संसाररोगहरमौषधमद्वितीयम् ॥३॥
भवान्यष्टकम्
न तातो न माता न बन्धुर्न दाता
न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता ।
न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥१॥
ना पिता, ना आई; ना नातं आणि मित्र, ना दाता, ना पुत्र, ना कन्या; ना सेवक, ना पती, ना पत्नी, ना (सांसारिक) ज्ञान; ना माझा व्यवसाय, तू माझा आश्रय आहेस, तू एकटाच माझा आश्रय आहेस, हे आई भवानी.
भवाब्धावपारे महादुःखभीरु
पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्तः ।
कुसंसारपाशप्रबद्धः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥२॥
या जगात जो अंतहीन भवसागर आहे, त्यामुळे मी दु:खाने भरलेला आहे आणि खूप घाबरलो आहे, मी अत्याधिक इच्छा आणि लोभ यांनी भरलेला, लोभी आणि उन्मत्त आहे, या दु:खी संसाराच्या बंधनात सदैव जखडलेला आहे आणि आता तू एकटी माझा आश्रय आहेस, हे आई भवानी.
न जानामि दानं न च ध्यानयोगं
न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रम् ।
न जानामि पूजां न च न्यासयोगं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥३॥
ना मला दानकर्म माहीत आहे, ना ध्यान आणि योग, मला ना तंत्राचा अभ्यास माहित आहे, ना स्तोत्र आणि प्रार्थना. मला ना उपासना माहीत आहे, ना न्यास योग, म्हणूनच तूच माझा आश्रय आहेस, हे भवानी माते.
न जानामि पुण्यं न जानामि तीर्थ
न जानामि मुक्तिं लयं वा कदाचित् ।
न जानामि भक्तिं व्रतं वापि मातर्गतिस्त्वं
गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥४॥
(४) ना मला पुण्य कर्म माहीत आहे, ना तीर्थयात्रा, मला मुक्तीचा मार्ग माहित नाही कि (प्र)लय, मला भक्ती किंवा धार्मिक व्रत माहित नाही; तरीसुद्धा आई, तूच माझा आश्रय आहेस, तूच माझा आश्रय आहेस, हे भवानी माते.
कुकर्मी कुसङ्गी कुबुद्धिः कुदासः
कुलाचारहीनः कदाचारलीनः ।
कुदृष्टिः कुवाक्यप्रबन्धः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥५॥
(५) मी वाईट कृत्ये केली, वाईट संगतीत राहिलो, वाईट विचारांचे पालनपोषण केले, वाईट दास होतो, मी माझी कुल कर्तव्ये पार पाडली नाहीत, वाईट आचरणात गुंतून राहिलो, माझ्या डोळ्यांनी वाईट पाहिले, जीभ नेहमी वाईट शब्द बोलते, पण तूच माझा आश्रय, हे भवानी माते.
प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं
दिनेशं निशीथेश्वरं वा कदाचित् ।
न जानामि चान्यत् सदाहं शरण्ये
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥६॥
(६) मला सृष्टीचा स्वामी (ब्रह्मा), रमेचा ईश (विष्णू), महाईश (शिव), देवांचा देव (इंद्र) बद्दल फारसे माहिती नाही. दिवसाचा स्वामी (सूर्य) किंवा रात्रीचा स्वामी (चंद्र), या इतर देवांबद्दल माहिती नाही, परंतु नेहमी तुझा आश्रय घेतो. तूच माझा आश्रय आहेस, हे भवानी माते.
विवादे विषादे प्रमादे प्रवासे
जले चानले पर्वते शत्रुमध्ये ।
अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥७॥
(७) वाद आणि भांडणाच्या वेळी, निराशेच्या वेळी, (प्रमाद) चुका घडण्याच्या क्षणी, प्रवास करत असताना, पाण्यात आणि अग्नीमध्ये, पर्वत आणि टेकड्यांमध्ये, शत्रूंमध्ये, जंगलात, कृपया माझे रक्षण करा, तूच माझा आश्रय आहेस, हे भवानी माते.
अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो
महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः ।
विपत्तौ प्रविष्टः प्रनष्टः सदाहं
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानि ॥८॥
(८) मी असहाय्य, गरीब, म्हातारपण आणि रोगाने त्रस्त आहे. खूप कमकुवत आणि दयनीय, वाणीने जाड अथवा मंद म्हणजे बोलू न शकणारा (जाड्यवक्त्रः), नेहमी संकटांनी वेढलेला आणि दुःखात हरवलेला, असा आहे. तूच माझा आश्रय आहेस, तूच माझा आश्रय आहेस, हे भवानी माते.
शिवपंचाक्षर स्तोत्र :
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय,
भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय,
तस्मै ‘न’काराय नमः शिवाय।।1।।
मन्दाकिनी सलिलचन्दन चर्चिताय,
नन्दीश्वर प्रमथनाथ महेश्वराय ।
मन्दारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय,
तस्मै ‘म’काराय नमः शिवाय।।2।।
शिवाय गौरीवदनाब्जवृन्द,
सूर्याय दक्षाध्वरनाशकाय ।
श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय,
तस्मै ‘शि’काराय नमः शिवाय।।3।।
वसिष्ठकुम्भोद्भवगौतमार्य,
मुनीन्द्रदेवार्चितशेखराय।
चन्द्रार्क वैश्वानरलोचनाय,
तस्मै ‘व’काराय नमः शिवाय।।4।।
यज्ञस्वरूपाय जटाधराय
पिनाकहस्ताय सनातनाय।
दिव्याय देवाय दिगंबराय
तस्मै ‘य’काराय नमः शिवाय।।5।।
श्रीराम प्रातःस्मरणम्
प्रातःस्मरामि रघुनाथमुखारविन्दं
मन्दस्मितं मधुरभाषि विशालभालम्।
कर्णावलम्बिचलकुण्डलशोभिगण्डं
कर्णान्तदीर्घनयनं नयनाभिरामम्॥१॥
प्रातर्भजामि रघुनाथकरारविन्दं
रक्षोगणाय भयदं वरदं निजेभ्यः।
यद्राजसंसदि विभज्य महेशचापं
सीताकरग्रहणमङ्गलमाप सद्यः ॥२॥
प्रातर्नमामि रघुनाथकरारविन्दं
वज्राङ्कुशादिशुभरेखि सुखावहं मे।
योगीन्द्रमानसमधुव्रतसेव्यमानं
शापापहं सपदि गौतमधर्मपत्न्याः ॥३॥
प्रातर्वदामि वचसा रघुनाथनाम
वाग्दोषहारि सकलं शमलं निहन्ति।
यत्पार्वती स्वपतिना सह भोक्तुकामा
प्रीत्या सहस्रहरिनामसमं जजाप ॥४॥
प्रातः श्रये श्रुतिनुतां रघुनाथमूर्तिं
नीलाम्बुजोत्पलसितेतररत्ननीलाम्।
आमुक्तमौक्तिकविशेषविभूषणाढ्यां
ध्येयां समस्तमुनिभिर्जनमुक्तिहेतुम् ॥५॥
यः श्लोकपञ्चकमिदं प्रयतः पठेद्धि
नित्यं प्रभातसमये पुरुषः प्रबुद्धः ।
श्रीरामकिङ्करजनेषु स एव मुख्यो
भूत्वा प्रयाति हरिलोकमनन्यलभ्यम् ॥६॥
॥ इति श्रीरामस्य प्रात:स्मरणम् ॥
कौपीनपञ्चकं अथवा यतिपञ्चकम् सार्थम्
वेदान्तवाक्येषु सदा रमन्तो
भिक्षान्नमात्रेण च तुष्टिमन्त:।
अशोकवन्त: करुणैकवन्त:
कौपीनवन्त: खलु भाग्यवन्त:॥ १॥
वेदांताच्या वाक्यांमध्ये सदा रमणारा , भिक्षान्नावर सदैव प्रसन्न राहणारा, दु:खापासून मुक्त असणारा, असा हा कौपिन परिधान करणारा खरोखरच भाग्यवंत आहे.
मूलं तरो: केवलमाश्रयन्त:
पाणिद्वये भोक्तुममत्रयन्त:।
कन्थामपि स्त्रीमिव कुत्सयन्त:
कौपीनवन्त: खलु भाग्यवन्त:॥ २॥
आश्रयासाठी झाडाच्या पायथ्याशी बसणारा , त्याच्या ओंजळीत मावेल एवढाच तुटपुंजे खाणारा, गुंडाळलेल्या कपड्यांचाही त्याग करून केवळ कोठ्यावर निजणारा, असा हा कौपिन परिधान करणारा खरोखरच भाग्यवंत आहे.
स्वानन्दभावे परितुष्टिमन्त:
स्वशान्तसर्वेन्द्रियवृत्तिमन्त:।
नान्तं न मध्यं न बहि: स्मरन्त:
कौपीनवन्त: खलु भाग्यवन्त:॥ ३॥
त्याच्या आतल्या आनंदाने पूर्ण तृप्त असलेला, त्याच्या इंद्रियांच्या लालसेवर पूर्ण अंकुश ठेवून, ब्रह्माच्या आनंदात रात्रंदिवस आनंदित राहणारा, असा हा कौपिन परिधान करणारा खरोखरच भाग्यवंत आहे.
देहाभिमानं परिह्रत्य दूरात्
आत्मानमात्मन्यवलोकयन्त:।
अहर्निशं ब्रम्हाणि ये रमन्त:
कौपीनवन्त: खलु भाग्यवन्त:॥ ४॥
मन आणि शरीरातील बदलांचे साक्षीदार, त्याच्या आत असलेल्या आत्म्याशिवाय काहीही नाही, बाहेरील, आतील, मध्यभागी दुर्लक्षित, असा हा कौपिन परिधान करणारा खरोखरच भाग्यवंत आहे.
पञ्चाक्षरं पावनमुच्चरन्त:
पतिं पशूनां हृदि भावयन्त:।
भिक्षाशना दिक्षु परिभ्रमन्त:
कौपीनवन्त: खलु भाग्यवन्त:॥ ५॥
ब्रह्म जप, मुक्तीचे वचन, फक्त ‘मी ब्रह्म’ चे ध्यान करणे, परमार्थावर जगणे आणि मुक्तपणे भटकणे, हेच जो करतो, असा हा कौपिन परिधान करणारा खरोखरच भाग्यवंत आहे.
इति श्रीमद् शङ्कराचार्यविरचितं कौपीनपञ्चकं स्तोत्रं सम्पूर्णम्॥
