सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर-Gondeshwar Temple of Sinnar-नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या शहरात ११ व्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आहे. पंचायतन प्रकारातील सुस्थितीत असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. भूमिज शैलीत बांधलेले हे मंदिर अतिशय उत्तमोत्तम शिल्पाकृतींनी नटलेले आहे. या मंदिराचा इतिहास, याच्या बांधकामाची शैली, मंदिरावर असलेला विविध धर्म पंथांचा प्रभाव, आणि या मंदिराच्या बाह्यांगावरील मूर्तींचा वेध घेण्याचा एक प्रयत्न.

हे मंदिर जरी पुरातन असले आणि महाराष्ट्रातील पंचायतन मंदिरांपैकी सुस्थितीत असलेले एकमेव मंदिर असले तरी या मंदिराचा म्हणावा तसा अभ्यास झालेला दिसत नाही अथवा ऑनलाईन माहितीदेखील फारशी आढळत नाही. अशा परिस्थितीत हि माहिती मिळविले हे एक आव्हानच होते पण डॉ. गोपाळ जोगे यांच्या मदतीने याबद्दलचा थोडाबहुत अभ्यास करणे मला शक्य झाले. या मंदिराचा सांगोपांग अभ्यास करून त्यावर एखादे पुस्तक प्रसिद्ध करणे एखाद्या मंदिर अभ्य्साकाला सहज शक्य आहे.

Download Marathi EBook-Gondeshwar Temple (गोंदेश्वर मंदिर)

सिन्नर परिसर

नाशिक या ऐतिहासिक शहरापासून सिन्नर हे नाशिक जिल्ह्यातील स्वतः नाशिक आणि मालेगाव नंतर तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. प्रवरा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या परिसरात सिन्नर शहर वसलेले आहे, तर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले नाशिक पंचवटी या रामायणकालीन स्थानामुळे तसेच अनेक मंदिरांच्या अस्तित्वामुळे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर मानले जाते. दर १२ वर्षांनी येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे देखील नाशिक शहराला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.

गोंदेश्वर मंदिर हे ठिकाण पुण्यापासून सुमारे १८५ किमी (३.५ तास) आणि नाशिकपासून सुमारे २६ किमी अंतरावर असलेल्या सिन्नर शहरात आहे. गोंदेश्वर मंदिर हे मध्ययुगीन भारताच्या वास्तुशिल्पीय प्रगतीचा आणि आध्यात्मिक प्रेरणेचा पुरावा आहे. त्याची उत्पत्ती १२ व्या शतकात, यादव घराण्याच्या कारकिर्दीत, असल्याचे आपल्याला या प्रदेशाच्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात येते. यादव घराण्याच्या आश्रयाखाली, गोंदेश्वर धार्मिक उपासनेचे आणि सांस्कृतिक संरक्षणाचे केंद्र म्हणून भरभराटीला आले, जेणेकरून संपन्न यादवांच्या संरक्षणाखाली येथे भक्त आणि कारागीरांना आकर्षित होत गेले.

गारगोटी संग्रहालय (Gargoti Museum)

गारगोटी म्युझियम हे सिन्नरमधील आणखी एक महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे, जे सिन्नर बस स्थानकापासून 6 किमी अंतरावर आहे. हे जगातील सर्वोत्कृष्ट संग्रहालयांपैकी एक आहे ज्यामध्ये जिओलाइट्सचा मोठा संग्रह आहे मौल्यवान असून सु-परिभाषित समृद्ध रचना असलेले सूक्ष्म स्फटिकासारखे घन पदार्थ आहेत. माजी व्यापारी नौदल अधिकारी श्री कृष्ण चंद्र पांडे यांनी स्थापन केलेल्या या संग्रहालयाला प्राइड ऑफ इंडिया, सरस्वती पुरस्कार आणि सिन्नर गौरव असे काही पुरस्कार देखील मिळाले आहेत. गारगोटी म्युझियम हे भारतातील एकमेव असे संग्रहालय आहे जे पृथ्वीवरील खडक, खनिजे आणि स्फटिक यांसारखे निसर्ग, आकार, रंग आणि उपयोगात भिन्न असलेले खनिजांचा खजिना प्रदर्शित करते.

या संग्रहालयात आसपासच्या प्रदेशातील मूळ खनिजांच्या नमुन्यांचा संग्रह आहे. नाशिक, सिन्नर, पुणे या ठिकाणांहून मिळालेले दगड, तसेच भारतातील इतर ठिकाणांहुनच नाही तर परदेशातही मिळालेल्या उत्तमोत्तम आणि आकर्षक खनिजांचा आणि कापलेल्या दगडाचा संग्रह येथे आहे. संग्रहालयातील प्रदर्शनांमध्ये हिरे, कापलेले दगड, हलका हिरवा ऍपोफिलाइट, पिवळ्या कॅल्साइटचे स्फटिक, निळा-हिरवा एक्वामेरीन, कॅव्हनसाइट आणि दुर्मिळ विदेशी खनिजांचा समावेश आहे. पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘दख्खनच्या पठारावरील खनिजे’ आणि तळमजल्यावर ‘द प्रेस्टीज गॅलरी’ या दोन गॅलरींमध्ये ते प्रदर्शित केले आहेत.

या संग्रहालयाचे शुल्क माणशी रु. 100/- इतके असून आपल्याला येथे योग्य ते मार्गदर्शन देखील मिळते. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

गोंदेश्वराच्या परिसरात

सिन्नर शहराच्या बस स्थानकाच्या २ किमीच्या परिसरातच हे गोंदेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिर परिसराच्या जवळच गोंदेश्वर तलावदेखील आहे. शक्यता अशी आहे कि या मंदिराच्या निर्माणासाठी लागणारा दगड याच ठिकाणाहून काढला गेल्यामुळे हा तलाव निर्माण झाला असावा.

वस्तुतः दाट लोकवस्ती असलेला हा परिसर. पण मंदिराचा परिसर मात्र अजूनही मोकळा आहे. सध्या या मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने या परिसरात सोयी सुविधा निर्माण करण्याचे कार्य सुरु आहे. मंदिराकडे जायचे असेल तर स्वतःचे वाहन हवे अथवा सिन्नरच्या बस स्थानकापासून रिक्षा करून तेथे पोहोचावे लागते. पण त्याचबरोबर जर आपल्याला स्थानकाकडे अथवा हॉटेल वर परत जायचे असेल तर एखाद्या रिक्षा चालकाचा क्रमांक बरोबर असला तर उत्तम अथवा बाजारापर्यंत सुमारे ५०० मीटर चालत यावे लागेल व तेथे एखादे वाहन मिळण्याची शक्यता आहे.

गोंदेश्वर मंदिराच्या निर्मितीचा इतिहासकालीन संदर्भ

इसवी सन १०२५ च्या सुमारास येथे यादव राज्य असल्याचे संदर्भ मिळतात. यावेळी येथे यादवकुळातील महासामन्त भिल्लम्म (तृतीय) हा राज्य करत होता (Cousens, 1931, ३६). सुरवातीला राष्ट्रकूट राजांच्या मांडलिकत्त्वाखाली असलेले यादव राजे पुढे बदामीच्या चालुक्यांच्या मांडलिकत्वाखाली गेले. त्यामुळेच या परिसरात मराठीबरोबर कानडी शिलालेख देखील आढळून येतात. त्यांची राजधानी सिंदीनगर/ सिंधनगर येथे असल्याचे दाखले मिळतात. पुढे याच जागी सेऊनचंद्र (प्रथम) याने त्याची राजधानी सेऊनपुर अथवा स्कुनपूर या नावाने प्रस्थापित केली. त्याचा मुलगा धाडियप्पा याचा पुढे याच परिसरात जन्म झाल्याचीही माहिती मिळते.

या यादव राजवंशाचे योग्य नाव मात्र सेउना किंवा सेवुना आहे. या राजवंशाचे शिलालेख, तसेच समकालीन राज्ये आणि साम्राज्ये, होयसळ, काकतीय आणि पाश्चात्य चालुक्य त्यांना सेउना म्हणतात.हे नाव त्यांच्या याच सेऊनचंद्र याच्या नावावरून पडले असावे.

गोंदेश्वराचे मंदिर यादव (गवळी) घराण्यातील एक राजा राव गोविंद याने दोन लक्ष रुपये खर्चून उभारल्याचे नोंद मिळते. १२ व्या शतकाच्या सुरवातीस असलेल्या गोविंदराजाच्या नावावरून या मंदिराचे नाव गोंदेश्वर पडले असावे अशी शक्यता या मंदिराच्या नावाबाबत वर्तविली जाते. पुढे १२व्या शतकाच्या मध्यावर, चालुक्यांची शक्ती कमी होत असताना, यादव राजा भिल्लमा (पाचवा) याने स्वातंत्र्य घोषित केले. याचवेळी यादवांनी त्यांची राजधानी देखील देवगिरीला हलविली.

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांनी ज्यावेळी सिन्नर येथे भेट देऊन वास्तव्य केले तेव्हा येथे यादवांची राजवट होती. यादव भिल्लम राजांच्या नावाने येथील मठाचे नाव भिल्लम मठ असे पडले. हा मठ आजही ऐंणार येथे कार्यरत आहे. येथे चक्रधर स्वामींनी दहा महिने वास्तव्य केल्याची नोंद महानुभाव साहित्यात आहे. महदम्बा महदाईसा यांनी लिळा चरित्राचे लिखाण केले त्याचा आरंभ याच मठात केल्याचे सांगितले जाते.

पुढे सिंहण (द्वितीय) याच्या कारकिर्दीत यादव साम्राज्य त्यांच्या शिखरावर पोहोचले, आणि १३ व्या शतकाच्या अखेरपर्यंत त्यांची भरभराट झाली, पण १२९६ पासून अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणांना सुरुवात झाली, सुरुवातीच्या काळात यादवांनी त्याचा प्रतिकार केला पण १४ व्या शतकाच्या सुरवातीलाच म्हणजे १३०८ मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर यादवांचा पाडाव व्हायला सुरुवात झाली.

रामचंद्राचा उत्तराधिकारी सिंहण तिसरा याने खिलजीच्या वर्चस्वाला आव्हान दिले, ज्याने १३१३ मध्ये मलिक काफूरला देवगिरीवर कब्जा करण्यासाठी पाठवले. त्यानंतरच्या युद्धात सिंहण तिसरा मारला गेला आणि खिलजीच्या सैन्याने देवगिरीचा ताबा घेतला. हे राज्य १३१७ मध्ये खिलजी सल्तनतीने ताब्यात घेतले. पुढे दिल्ली सल्तनतच्या तुघलक राजघराण्यातील मुहम्मद तुघलक याने या शहराचे देवगिरी हे नाव बदलून दौलताबाद केले.

देवगिरीचा आणि यादव साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतरदेखील यादवांच्या वंशाचे जे उरलेसुरले अस्तित्त्व होते ते आपल्याला याच सिन्नर प्रदेशात आढळून येते. यादवांचे त्यानंतरचे ताम्रपट, शिलालेख याच परिसरात आढळून येतात. याचबरोबर यादवांची नाणी देखील याच परिसरात आढळून येतात.

गोंदेश्वर मंदिराची रचना

आदि  शंकराचार्यांना अभिप्रेत असणाऱ्या पंचायतन प्रकारात वर्गीकृत असणारे हे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव सुस्थितीतील पंचायतन मंदिर आहे. भूमिज – नागर अशा मिश्र शैलीत हे मंदिर बांधलेले आहे. मुख्य मंदिर भूमिज शैलीत असून पंचायतनाच्या ४ मंदिरे नागर शैलीतील आहेत. “गोंदेश्वर शिव” केंद्रस्थानी असणाऱ्या या मंदिरात बाजूला ही छोट्या आकाराची नागर शैलीतील विष्णू, गणपती, सूर्य आणि शक्ती मंदिरे आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याच्या अगदी समोर परंपरेनुसार शिवलिंगांकडे पाहात असलेल्या नंदीचा मंडप आहे. आणि ही पंचमंदिरे आणि नंदी मंडप एक मोठ्या उंच जोत्यावर (जगती) आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला पूर्व आणि दक्षिण दिशांनी प्रवेशावर असून त्यापैकी पूर्वेकडचे प्रवेशद्वार सध्या बंदच ठेवण्यात आलेले आहे पण या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर असलेल्या मंडपाला संपूर्ण वर्तुळाकार उघडे छत असलेला स्वर्गमंडप आहे. आणि त्यासमोर मग हा नंदीमंडप आणि पंचायतन मंदिर असलेला चौथरा (जगती) येतो.

गोंदेश्वर मंदिर हे एका आयताकृती तटबंदीमधे एका चौथऱ्यावर बांधलेले आहे. या तटबंदीची उत्तर-दक्षिण अशी रुंदी २८४ फूट असून पूर्व पश्चिम लांबी ३१४ फूट आहे. (Burges, 1910, 144). याचे जोते (जे जगती या नावाने ओळखले जाते) १२४ फूट लांब व ९४ फूट रुंद आहे. मंदिराचा मुख्य मंडप सुमारे २१ फूट ९ इंच लांबी रुंदी असलेला चौरस असून मधल्या ४ खांबांवर तोलून धरलेला आहे (Burges, 1910, १४५) व बाह्य खांबांच्या आधारासह हा सुमारे १९ फूट उंच तोलून धरलेला आहे.

मंदिर शैली

सिन्नरच्या या गोंदेश्वर पंचायतन मंदिरापैकी मुख्य शिवमंदिराची रचना अंबरनाथ येथील भूमिज शैलीतील शिव मंदिराशी मिळतीजुळती आहे पण या मंदिरावरील कोरलेल्या मूर्ती अंबरनाथ मंदिराएवढ्या आकर्षक नाहीत (Cousens, 1931, ३६,३७). गोंदेश्वर मंदिराच्या विविध भागात ज्या कथा कोरलेल्या आहेत त्यांची पॅनेल्स देखील लहान लहान आहेत. मंदिर मंडपाच्या मुख्य खांबावर थोड्या मोठ्या मुर्त्या आढळतात, पण बाह्यभागावर मात्र त्या फारशा आढळत नाहीत.

भारतीय मंदिर स्थापत्यकलेचे तीन प्रमुख प्रकार ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतात, हे आहेत नागर, वेसर, आणि द्रविड. यात थोड्याफार सुधारणा होत पुढे भूमिज, कलिंग अशाही शैली अस्तित्वात आल्या. उत्तरेकडील भागात आपल्याला नागर शैलीची मंदिरे आढळतात, विंध्याच्या दक्षिणेकडील आणि गुजरात, माळवा (मध्य प्रदेश), राजस्थान व महाराष्ट्र या प्रदेशात भूमिज शैली आढळून येत. कर्नाटकच्या भागात वेसर शैलीची मंदिरे आढळतात.

भूमिज शैली

भूमिज हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ “भूमी अथवा जमिनीपासून” असा होतो. स्थापत्यशास्त्राच्या संदर्भात, भूमिज शैलीची चर्चा समरांगण सूत्रधार या ग्रंथाच्या अध्याय ६५ मध्ये केली गेली आहे.

भूमीज ही उत्तर-पश्चिम भारतीय मंदिर वास्तुशिल्पाची एक शैली आहे. यात गर्भगृहाच्या शिखरावर शिखर बांधण्यासाठी चौरस-वर्तुळ तत्त्व लागू केले जाते. परमार राजवंशाच्या काळात मध्य भारतातील माळवा प्रदेशात (पश्चिम मध्य प्रदेश आणि आग्नेय राजस्थान) १० व्या शतकात या शैलीचा उगम झाला असावा असे मानण्यात येते. हि शैली १०व्या शतकानंतरच्या हिंदू आणि जैन मंदिरांमध्ये आढळते. सर्वात सुरुवातीची आणि मोहक उदाहरणे मालवा प्रदेशात आणि आसपास आढळतात, परंतु ही रचना गुजरात, राजस्थान, दख्खन (महाराष्ट्र) आणि दक्षिण आणि पूर्व भारतातील काही प्रमुख हिंदू मंदिर संकुलांमध्ये आढळतात.

मंदिर प्राकाराचे पूर्व प्रवेशद्वार

सध्या मंदिराचे दक्षिणेकडील एकाच प्रवेशद्वार वापरात असले तरी या मंदिराचे आधीचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडूनच होते असे दिसते कारण या द्वारापाशी आता शिरल्यावर एक उत्कृष्ट वर्तुळाकार स्वर्गमंडप आहे. याची तुलना आपल्याला खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाशी करता येईल, पण ती त्याच्या वर्तुळाकार छताच्या आकाराशीच मर्यादित असेल. हे प्रवेशद्वार आणि हा स्वर्गमंडप आता भंगलेल्या अवस्थेत असल्याने हे द्वार बंदच ठेवण्यात येते.

मंदिर प्राकाराचे पूर्व प्रवेशद्वार
मंदिर प्राकाराचे पूर्व प्रवेशद्वार
मंदिर प्राकाराचे पूर्व प्रवेशद्वार-वर्तुळाकार स्वर्गमंडप
मंदिर प्राकाराचे पूर्व प्रवेशद्वार-वर्तुळाकार स्वर्गमंडप

नंदी मंडप

नंदी मंडप - गोंदेश्वर मंदिर
नंदी मंडप – गोंदेश्वर मंदिर

शंकराच्या मंदिरासमोर नंदी तर असायलाच हवा. या ठिकाणी नंदीला वेगळाच मंडप आहे ज्यावर वैशिष्टपूर्ण नक्षीकामही केलेले आहे.मंदिराच्या आयताकृती जोत्यावर ४ कोपऱ्यांवर ४ देवांची मंदिरे असून पूर्वेकडच्या मंदिर प्रवेशद्वारापाशी नंदी मंडप आहे. याच्या बाह्यभागावर आणि अंतर्भागावर विविध मनुष्यकृती , विष्णूचे वराह आणि नृसिंह हे दोन अवतार व सुरसुंदरी कोरलेल्या आहेत तर आता बाजू आणि छतावरही नक्षीकाम केलेले आढळते. या असलेला नंदी मंदिराच्या मूळ मुर्त्यांपैकी नसावा तर नंतरच्या काळात, मूळ नंदीची तोडफोड झाल्यानंतर बसविला गेला असावा. (Cousens, 1931, ३८,३९). याच्या शेजारीच आपल्याला २-३ नंदी तोडफोड झालेल्या अवस्थेत दिसतात.

मंडपापाशी यायला पायऱ्या चढाव्या लागतात तसेच याचीही उंची जास्त असल्यामुळे नंदीपाशी पोहोचण्यासाठी अजून काही पायऱ्या चालून जावे लागते. पण याचमुळे या नंदीमंडपाला बाह्यभाग देखील मिळाला आहे आणि त्याच मुळे या बाह्यभागावर अनेक मूर्तींचे अंकन केलेले आपल्याला आढळते. यात सुरसुंदरी आहेत, दर्पणसुंदरी, मर्कटसुंदरी या दोन्ही बाजूंवर असून नंदीच्या पाठीमागील (पूर्व) भागाकडे भिंतीवर वराह अवतार कोरलेला आपल्याला आढळून येतो. एक छोटा त्रिविक्रम अवतार येथे आहे आणि याच्या सोबतच काही मैथुन शिल्पे आपल्याला या नंदीमंडपावर आढळून येतात.

नंदी

नंदी व त्यावरील सुबक कोरीव काम

नंदीमंडपातील नंदी नंतरच्या काळातील असला तरीदेखील उत्कृष्ट शिल्पाकृतीने नटलेला आहे. त्याच्या गळ्यातील घंटांची माळा, त्या माळेला त्याच्या पाठीवर वशिंडापाशी मारलेली गाठ, शिल्पकाराने अत्यंत उत्कृष्टरित्या दर्शविली आहे. त्याच्या खुरातील बारकावेदेखील आपल्याला सहज न्याहाळता येतात.

 

 

 

पंचायतन मंदिरे

पंचायतन मंदिरासंबंधी आपल्याला एक श्लोक पाहायला मिळतो तो असा

शंभो: सूर्यो गणेशश्च चण्डी विष्णु प्रदक्षिणे: |
स्थाप्या: सर्वे शिवस्थाने दृष्टिवेधववार्जिता ||

या श्लोकाप्रमाणे शिवमंदिराच्या सभोवताली सूर्य, गणेश, चण्डी (देवी) व विष्णु अशा क्रमाने मंदिरे असायला हवीत. अशाच प्रकारच्या नोंदी आपल्याला कझिन्स च्या निरीक्षणात पहिला मिळतात म्हणजेच त्याने आग्नेयेला (दक्षिण-पूर्व) सूर्य मंदिर, नैऋत्येला गणेश मंदिर, वायव्येला देवी मंदिर व ईशान्येला विष्णू मंदिर आहे असे लिहिले आहे (Cousens, 1931,३९). परंतु आज मात्र आपल्याला सूर्य आणि विष्णू यांच्या स्थानांची अदलाबदल झालेली पाहायला मिळते. त्यामुळे याच सध्याच्या मुर्त्याच तिथे आधीपासून असाव्यात हे सांगणे अवघड आहे.

मंदिरातल्या मूर्तींची जरी जागा बदलता येत असली तरी त्याच्या बाह्यभागावरील मूर्ती, शिखरावरील मूर्ती तशाच राहतात. मंदिर अभ्यासक या मूर्तींच्या संकेताने कदाचित मंदिर ओळखूही शकत असावेत. नैऋत्येकडील मंदिरात गणपतीची मूर्ती आहे मात्र याच्या शुकनासिकेवर आपल्याला सूर्यमूर्ती आढळून येते. तर आग्नेयेकडील मंदिराच्या शुकनासिकेवर नरसिंहाची मूर्ती आढळते.

शिखरांचे प्रकार

या मंदिराच्या शिखरांची विभागणी आपल्याला प्रामुख्याने ३  प्रकारात करता येते. त्यातले (१ ) नंदीमंडपाचे शिखर फमसाना प्रकारातील आहे. (२) उपमंदिरांची शिखरे लतिन नागर शिखर शैलीची आहेत तर (३) मुख्य मंडपाचे शिखर संवरण प्रकारातील आहे.

मंदिराचे मुख्य भाग

प्रवेशद्वाराजवळचा माहितीफलक

मंदिराच्या प्राकारात आपण प्रवेश करतो तेव्हा हे भव्य मंदिर आपल्याला अशा प्रकारे दृष्टीस पडते कि एखादा मोठा गजराजच अंबारीसह आपल्या पुढल्या उभा आहे. मंदिराच्या प्राकाराच्या  बाजू  आता सुस्थितीत आहे. प्रवेश केल्यावर आत डावीकडेच पुरातत्व विभागाने लावलेला एक माहितीफलक आपल्या दृष्टीस पडतो व या मंदिराची जुजबी माहिती आपल्याला मिळते.

जगती

जगती म्हणजे उंच अधिष्ठान सिन्नरच्या या गोंदेश्वर मंदिराला १२५ x ९५ फूट आकाराची जगती आहे त्यावर हे पंचायतन मंदिर रचलेले आहे. हि जगती सर्व पाचही मंदिरांचा भार सांभाळत उभी आहे असे म्हणता येईल . इंग्रजी मध्ये याला पाश्चात्य ग्रीको-रोमन शास्त्रीय वास्तुकलेतील आधार, प्लिंथ आणि सोकल या शब्दांनी संबोधले जाऊ शकते.

अधिष्ठान व उपपीठ

मंदिराच्या सगळ्यात पायाशी असलेल्या थरशिळेपासून कपोतपाली पर्यंतचा भाग अधिष्ठान म्हणून ओळखला जातो. यात वेगवेगळ्या रचनांचे थर असतात. गोंदेश्वर मंदिरात आपल्याला मोठे हत्ती असलेला गजथर आढळून येतो. मात्र या सर्व हत्तींची तोडफोड झालेली असल्याने त्यांचे मूळ सौन्दर्य नष्ट झालेले आहे. हे संपूर्ण मंदिर हत्तींनी आपल्या पाठीवर तोलून धरले आहे असे दाखविणारी हि संकल्पना. अंबरनाथ येथील शिवमंदिरात आपल्याला गजथर आणि नरथर असे दोन थर देखील यात आढळतात. या नरथरांमध्ये तत्कालीन लोकजीवनाचे काही अंश दर्शविलेले असतात. तर काही मंदिरांमध्ये आपल्याला या दोन थरांसोबत अश्वथर देखील आढळतात.

अधिष्ठानाचा हा गजथरापर्यंतचा भाग म्हणजे उप पीठ. या मंदिरात आपल्याला जाड्यकुंभ, कणिका , आंतरपट्टीका आणि कपोतपाली आणि गजथर असे जे भाग आढळतात ते सोबतच्या चित्रामध्ये दाखविले आहेत. त्यावर अधिष्ठानाचा जो उर्वरित भाग आहे त्याच्या प्रगतीनुसार आपल्याला मंदिर शैली, आणि मंदिर कालावधी ठरविण्यास मदत होते. या मंदिराचा हा भाग माळवा आणि गुजरातेत विकसित झालेल्या मरू जर्जर शैलीचा प्रभाव आढळतो आणि त्यावरून आपल्याला या साम्राज्याचे एकमेकांशी असलेले संबंध, कलाकारांची देवाणघेवाण या गोष्टी लक्षात येतात.

कुंभ हा त्यापैकी एक महत्त्वाचा भाग. या मंदिरातील कुंभाची शैली विकसित आहे. हा कुंभ दोन भागात असून कुंभाच्या वरील भागात नक्षीदार रक्तपट्टिका आहे तर खालील भागाचा वापर विविध मूर्तींच्या अंकनासाठी केलेला आहे. यांना रथिका असे म्हणतात. अंबरनाथच्या मंदिरात जशी मोठी शिल्पे मंदिराच्या बाह्यभागात आहेत, तशी येथे नसली तरी शिल्पकाराने या रथिकांचा वापर शिल्पांसाठीं केलेला आहे.

मंडोवर आणि जंघा

कुंभाच्या वरच्या भागात कलशाचे आयोजन आहे व त्यावर अधिष्ठानाच्या वरच्या बाजूची कपोतपाली येते. त्यानंतर मंदिराचे मंडोवर सुरु होते. याचा सर्वात मोठा भाग जंघा या नावाने ओळखला जातो. इतर मंदिरांमध्ये जंघा या भागावर मोठ्या मुर्त्यांची अंकन असते. येथे या जंघेतील भद्र असलेल्या ठिकाणी देवकोष्ठे आहेत पण दुर्दैवाने या देवकोष्ठांमधील मूर्ती अस्तित्वात नाहीत.

गवाक्ष

गवाक्ष या शब्दाचा अर्थ होतो “बैल किंवा गाईचा डोळा” असा होतो. पण वापरातील अर्थ म्हणजे खिडकी. हिंदू मंदिरांमध्ये, त्यांची भूमिका प्रतिकात्मकपणे (Kanitkar, 2014) गर्भगृहातील मध्यवर्ती चिन्हाचा प्रकाश आणि वैभव पसरवणारी आहे. वैकल्पिकरित्या, त्यांचे वर्णन, देवतेला जगाकडे टक लावून पाहण्यासाठी असलेली एक खिडकी असा असतो. अशा बऱ्याच गवाक्षांचे अंकन मंदिराच्या बाह्य आणि अंतर्भागात आढळते आणि त्यात विविध देवतांची प्रतिष्ठापना देखील केली असते.

भद्र

गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूने पाहिले असता पाठीमागे (पश्चिम दिशेकडील), दक्षिणेकडे व उत्तरेकडे दिसणारा सरळ भाग म्हणजे भद्र. हा मंदिराचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण यातच देवकोष्ठे येतात ज्यात मुख्य देवतांच्या प्रतिमा येतात. याच्या शेजारीच दोन्ही बाजूला उपभद्र आहेत आणि या दोहोंच्या मधल्या भागात सलीलांतर हा पोकळीवजा भाग असतो ज्या द्वारे मंदिराच्या वरच्या बाजूने कोसळणारे पावसाचे पाणी येते एकत्र येत खाली उतरते व वाहात जाते. याच्या शेजारीच या मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेरील बाजूचे ५ कर्ण येतात.
समरांगण सूत्रधार ग्रंथात वर्णन केलेल्या भूमिज मंदिरांच्या चतुरस्त्र प्रकारातील “मलयाद्री” या उपप्रकाराला जुळणारे हे मंदिर आहे. मंदिराचा कालावधी ठरविण्यालाही यामुळे मदत होते.

मंदिराच्या पाठीमागील भागातून (पश्चिम बाजू) आपण जर खालून वर जर मंदिराकडे पाहिले आपल्याला अधिष्ठानाच्या वरील भागावर देवकोष्ठ आढळते व त्याच्याही वर या भूमिज मंदिराच्या शिखराचा भाग सुरु होतो. त्याच्या सुरवातीलाच म्हणजे खालच्या भागावर वर्तुळाकार पदकाच्या आकाराचे शूरसेनक आढळते, ज्यात आपल्याला नृत्यशिव आढळून येतो. हे शूरसेनक म्हणजे गवाक्ष या मंदिराच्या प्रतीकातूनच निर्मित भाग आहे. याच्या वरील भागात लतेचे नक्षीकाम आहे. हि आहे शिखरावरील मध्यलता.

शुकनास

शुकनास किंवा सुकनासी हे गर्भगृहाच्या किंवा आतील मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील बाह्य सुशोभित वैशिष्ट्य असते. या मंदिराच्या शिखरावर देखील शुकनास आहे आणि त्यावरील गवाक्षावर आपल्याला शिवाच्या रूपांचे अंकन केलेले आढळते. शुकनास हा भाग नागर शैलीतून भूमिज शैलीत आला असे मानले जाते.
शुकनास या नावाचा अर्थ “पोपटाची चोच” असा आहे आणि मंदिराच्या विविध भागांमध्ये देवतेची शरीररचना दर्शविणारी समजून घेण्याचा भाग म्हणून, मंदिराच्या अधिरचनेचे “नाक” म्हणून याला संबोधले जाते. सुरुवातीच्या विविध ग्रंथांनी शुकासनाच्या आकाराचे प्रमाण, गोलाकार गवाक्षावर केंद्रीत केले आहे आणि त्याचा आकार मंदिराच्या बाकीच्या, विशेषतः शिखराच्या उंचीच्या प्रमाणात आहे.

कापिली आणि अंतराळ

मंदिराचा मुख्य मंडप आणि गर्भगृह याना जोडणारा भाग म्हणजे अंतराळ. बाहेरच्या बाजूने याच भागाला कापिली असे नाव आहे. म्हणजेच बाहेरच्या बाजूने पाहिले असता भद्र आणि मुख्य मंडप यांना जोडणारा भाग म्हणजे कापिली. मंदिराची भव्य शुकनास याच भागावर येते. यात समोरील भागात वर्तुळाकार गवाक्ष तर उत्तर दक्षिण भागावर दोन पातळ्यांवर देवकोष्ठे आहेत आणि त्यावरही एक शुकनास आहे.

शिखर

या मंदिराला ५ कर्ण आहेत हे आपण या आधीच पाहिले. याच कर्णाच्या वर आपल्याला छोट्या छोट्या शिखरांसारखी रचना कोरलेली असतात याना भूम असे म्हणतात. या मंदिरावर अशी सात शिखरे असल्याने याला सप्तभूम शिखर असे म्हणतात. काही लहान मंदिरे त्रिभुम, पंचभूम अशी देखील असतात तर उंच शिखरांना ९ किंवा ११ देखील असतात. शिखर भद्रावर (पश्चिम, दक्षिण व उत्तर बाजूकडील शिखराच्या भागांवर) खालच्या बाजूला वर्तुळाकार शूरसेनक असते हे आपण आधीच पाहिले आहे.मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने जेव्हा हा गवाक्षासारखा भाग असतो तेव्हा तो आकाराने मोठा असते व शुकनास म्हणून ओळखले जातो.

आमलक व कलश

आमलक – हा मंदिराच्या शिखरावर असलेला कमल पुष्पासारखा भाग. यावर मंदिराचा कलश बसविलेला असतो व त्यावर मंदिराचा ध्वज असतो. आमलक हे प्रातिनिधिक स्वरूपातील कमळ आहे. गोंदेश्वर मंदिराच्या शिखरावरील आमलक व कलश असलेला भाग तडिताघातामध्ये पडला. हा भाग आता आपल्याला खाली प्रवेशद्वारापाशी पाहायला मिळतो.

मंदिराची अंतर्गत रचना

गोंदेश्वराचे मुख्य मंदिर अंबरनाथ मंदिराच्या धर्तीवरच बांधले गेलेले आहे हे आपण या आधीच पाहिले आहे. या प्रकारच्या मंदिरात आतील बाजूने गर्भगृह, अंतराळ (गर्भगृह व मुख्य मंडप यांना जोडणारा भाग) आणि मुख्य मंडप असे प्रमुख भाग पडतात. यातील मुख्य मंडपाला ३ प्रवेशद्वारे असून या प्रत्येक प्रवेशद्वारापाशी अर्धमंडपांची रचना केलेली आहे. पूर्वेकडचे प्रवेशद्वार जरी मुख्य प्रवेशद्वार मानले गेलेले असले तरी मंदिराच्या मुख्य आवाराचे पूर्व प्रवेशद्वार बंद केले गेले असल्याने मंदिरमंडपाचे पूर्व प्रवेशद्वार देखील दुय्यम स्थानी गेले आहे आणि आपला प्रवेशदेखील बरेचदा दक्षिण प्रवेशद्वारातून होतो.

go
गोंदेश्वर मंदिराची रचना

गर्भगृह

गर्भगृह हे मंदिराच्या मुख्य देवतेच्या मूर्तीचे स्थान आहे. शिवमंदिरातील गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली असते. शक्यतो गर्भगृहात इतर प्रेक्षणीय मूर्ती नसतात तसेच याही मंदिरात नाहीत. या गर्भगृहातील शिवलिंगाची भाविकांकडून नेमाने पूजा होत असते.

अंतराळ

मंदिराचे गर्भगृह आणि मुख्य मंडप यांना जोडणारा भाग म्हणजे अंतराळ. यालाच बाहेरील बाजूने कापिली असे म्हणतात. याच्याच अखेरीस गर्भगृहाचे मुख्य द्वार असते जे सुंदर द्वारशाखांनी अलंकृत केलेले असते. या मंदिरातील अंतराळात दोन्ही बाजूला देवकोष्ठ असून वरच्या बाजूला अतिशय सुंदर अलंकरण असलेले वर्तुळाकार नाभी वितान (छतावरील नक्षीकाम) आहे

मुख्य द्वारशाखा

गर्भगृहाच्या द्वारशाखा

या मंदिराची द्वारशाखा सुंदर कोरीव कामाने अलंकृत केली असून याच्या पंचशाखा आपल्याला वेगळ्या दाखविता येतात. मंदिरावरील द्वारशाखांच्या एकेका शाखेकडे जर आपण बारकाईने निरखून पाहिले तर थक्क व्हायला होते इतके सुंदर बारीक काम यावर आढळते. सोबतच्या छायाचित्रात अशा एका शाखेचे जवळचे चित्र आहे. यात आपल्याला प्राणी, घोडेस्वार स्पष्टपणे पाहता येतात आणि त्याचबरोबर शेजारील घंटीच्या कड्यादेखील.

मंदिराचा बाह्यभाग

गोंदेश्वर मंदिर जरी सुस्थितीत असलेले मंदिर असले तरी या मंदिराच्या बाह्य भागावर खूप मोठी व सुंदर कथाशिल्पे आढळत नाहीत भद्र आणि देवकोष्ठातील मूर्ती देखील तोडफोड झालेल्या अवस्थेत आहेत. शूरसेनकातील मूर्तींचे अंदाज बांधावे लागतात. मात्र अर्धमंडपातील भिंतींवर आपल्याला रामायणातील काही प्रसंग कोरलेले आढळतात.

दक्षिण भद्र – मंदिराच्या दक्षिण भद्रावरील अधिष्ठानात आपल्याला ३ मुखांची ब्रह्माणीची मूर्ती आढळून येते. त्यावर असलेले देवकोष्ठ मात्र मोकळेच आहे. शिखरावरील शूरसेनकात असलेली मूर्ती भग्नावस्थेत आहे. या मूर्तीचा वीरासनात बसल्याचा भाग आपल्याला दिसतो त्यावरून ती गरुडाची असण्याची शक्यता आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. या बाजूने पाहताना आपल्याला मंदिराचे इतर भाग, जसे कापिली, मुख्यमंडपात प्रवेशासाठी असणारा दक्षिण अर्धमंडप, समोरचा प्रवेशमंडप, नंदीमंडप आणि पूर्व प्रवेशद्वार हे सारेच पाहायला मिळते.

उत्तर भद्र – अशाच प्रकार उत्तरेकडील भद्राच्या सर्वात खालच्या अधिष्ठानात जे मकरप्रणाल आहे त्यावर असलेली मूर्ती वैष्णवी देवीची (अथवा लक्ष्मीची) (चित्र क्रमांक 26: उत्तर भद्र व मकरप्रणाल) असावी असे दिसते व त्यामुळेच सर्वात पाठीमागे म्हणजे पश्चिम भद्राच्या मोकळ्या असलेल्या जागेत कधीकाळी माहेश्वरी देवी असण्याची शक्यता वर्तविता येऊ शकते.

दक्षिण अर्धमंडप

या अर्धमंडपाचा रेखांकित पट्टिकेचा सर्वात खालचा भाग म्हणजे राजसेनक, त्यावर वेदिका आहे. वेदिकेवरील कठड्यासारखा भाग जो आहे तो कक्ष. याच्या आतील बाजूस आसने असतात. या दक्षिण अर्धमंडपाच्या राजसेनकावर नक्षीकाम कोरलेले आहे तर वेदिकेवर सुरसुंदऱ्या आहेत त्यांच्या डावीकडे हनुमंत आणि कामदेव यांच्या मुर्त्या सहजच ओळखू येतात. म्हणजेच एकाच पट्टिकेवर हनुमंत, कामदेव आणि विविध सुरसुंदऱ्या दर्शविण्यात शिल्पकाराचा नेमका काहीतरी उद्देश असला पाहिजे.

आणि कक्षाच्या भागावर (सर्वात वरची पट्टीका) रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. यात डावीकडे रावणानुग्रहाचे लहानसेच पण सुंदर शिल्प आहे. यातून आपल्याला रावणाचे सामर्थ्य दृष्टीस पडते. पुढची शिल्पे हनुमंताशी संबंधित प्रसंगांची आहेत. या मंदिरात विविध ठिकाणी एकंदरीतच हनुमंताची बरीच शिल्पे कोरलेली आढळून येतात. रावणानुग्रह शिल्पानंतर रावण व मंदोदरी एकत्र बसून चर्चा करतानाचे शिल्प आहे. अशोकवाटिकेत वृक्षांची नासधूस करणारा हनुमंत, पुढे त्याला राक्षसांनी पकडल्याचे शिल्प, आणि मध्ये त्याला पकडून रावणासमोर उभे केल्याचे शिल्प आहे.

याच्याच छतावर आपल्याला सामाजिक जीवनाचे अनेक पैलू पाहायला मिळतात. यात हत्तीच्या द्वंद्व युद्धाचे दृश्य आहे व बरेच लोक ते मनोरंजनाचे साधन म्हणून पाहत आहेत. एका कोपऱ्यात समुद्रमंथनाच्या दृश्य आहे, याचे वैशिष्ट्य म्हणजे या दृश्यात आपल्याला पहिल्यांदाच गणपती कोरलेला पाहायला मिळतो. याच छतावर आपल्याला दशावतार देखील दिसतात आणि रामायणातील अजून एक प्रसंग म्हणजे वाली सुग्रीवाचे द्वंद्व युद्ध देखील दिसते. मागे उभ्या असलेल्या धनुर्धारी रामामुळे आपल्याला ते शिल्प ओळखता येते.

मंडपातील शिल्पे

हनुमंत जंबुमाळी युद्ध

रामायणातील युद्ध कांडाच्या ४३ व्या सर्गात राम रावण यांच्यातील युद्धाच्या वेळी राक्षस सेना आणि वानरसेना एकमेकाला भिडत असताना जी द्वंद्वयुद्धे येतात त्यात हनुमंत व जंबुमाळीचे युद्ध आहे. हे युद्ध आग्नेय खांबावरील एका छोट्या पॅनल मध्ये कोरलेले आहे. यात दोघे एकमेकांवर त्वेषाने धावून जाताना दाखविले असून या दोघांच्या मध्ये एक किर्तीमुखही कोरलेला आहे.

नरसिंहाचे सुंदर शिल्पांकन

नरसिंहाची अनेक शिल्पे आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळून येतात. यादव राजांचे हे दैवतच. त्यामुळेच काही यादव राजांच्या वंशावळीतील नावे देखील नरसिंह या नावावरून घेतलेली आहेत. मंदिराच्या खांबावरील नरसिंहाची ही छोटी शिल्पपट्टीका पण अतिशय सुबकपणे कोरलेली असून यात नरसिंहाच्या गळ्यातील माळा, त्याच्या हातातील गदा व चक्र, ही शस्त्रे एवढ्या छोट्याशा शिल्पात सुंदर कोरली आहेत. डावीकडे बाळ प्रल्हाद नमस्कार करत बसलेला आहे. याही शिल्पाच्या खाली एक छोटा कीर्तिमुख कोरलेला आहे.

भिक्षाटन शिव व कामदेव

लिंगोद्भव शिवाच्या स्वरूपाने कालभैरवाला जन्म देत ब्रम्हाचे ५वे शीर कापले. या ब्रह्महत्येच्या पापामुळे ते शीर त्याचा हाताला चिकटले. म्हणून पापाचे परीक्षालन करण्या करिता शिवाने भैरवाचे रुप टाकून कापालिकाचे (ब्रम्हाच्या कपालातून भिक्षा मागणारा) रुप धारण केले. हाच कापालिक म्हणजे देशोदेशी भिक्षाटन करत फिरणारा शिव. गोंदेश्वराच्या या मंदिरात वायव्य स्तंभावर भिक्षाटन शिव तर ईशान्य स्तंभावर मदन शिल्पित केलेला आहे. या भिक्षाटन शिवाच्या खांद्यावर दंड आहे, भिक्षापात्र आहे आणि डाव्या हातात डमरूदेखील आहे. भैरवाची विविध रूपे देखील आपल्याला या स्तंभांवर आढळून येतात.
शिवाची रूपे जशी आपल्याला आढळतात तशीच शक्तीचीही. चामुंडा, महिषासुरमर्दिनी अशा स्वरूपात देवीचे अंकन आढळते.

लोकजीवन

लोकजीवनातील मनोरंजन हे ज्या विविध शिल्पांद्वारे दाखविले आहे त्यात हत्तीची झुंज , मेंढ्यांची झुंज, सारीपाटादि खेळ याचबरोबर, नर्तन, वादन या कला, मिरवणूका देखील येतात. अशीही अनेक शिल्पे मंदिरातील शिल्पपट्टिकांवर आहेत. बरेच ठिकाणी आपल्याला लोकजीवनाचे, गृहस्थ जीवनाचे चित्रण आढळते. अशाच एका पट्टीकेवर आपल्याला गृहकलह देखील आढळतो ज्यात एक पुरुष एका स्त्रीचे केश धरून तिला खेचतो आहे आणि एका पायाने तिच्यावर लत्ताप्रहार देखील करत आहे.

यासोबत आढळतात ती श्रीविष्णूची रूपे. अष्टभुज विष्णू येथे लक्ष्मीसह आहे तसंच नृत्य विष्णू देखील आहे.
हि शिल्पे पाहताना त्यावरील कोरीव काम न्याहाळून पाहायला हवे तेव्हा त्यातली रंगत समजते. असेच एक पट्टीका शिल्प आहे ते मकराचे. त्याच्याकडे पाहिले असता त्याच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या मोत्यांच्या माला, आजूबाजूला फुलांच्या नक्षीचा केलेला वापर, हे सारेच पाहण्यासारखे आहे.

मैथुन शिल्पातील संदेश

मंदिरात अनेक मैथुन शिल्पे आहेत. त्यातील एका विशेष शिल्पाबद्दल येथे उल्लेख करायला हवा. या शिल्पात मैथुन करणारे युगुल दाखविले आहे. या युगुलाच्या डावीकडे एक व्यक्ती पाठ फिरवून उभी आहे तर दुसऱ्या बाजूची व्यक्ती एक डोळा झाकून उभी आहेत तर दुसऱ्या डोळ्याने चोरून हा प्रणय पाहते आहे. मैथुन या विषयाला समाजात (तत्कालीन) कसे पाहिले जात असे. त्यातून काय शिकायला हवे अशा अर्थाने हे शिल्प कोरलेले असावे. म्हणजे त्याकडे पाठ न फिरवता, चोरट्या नजरेने न पाहता, आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग म्हणून पाहिले पाहिजे असा उद्देश कदाचित शिल्पकर्त्याचा असावा.

मंदिरातील शिल्पांची छायाचित्रे

मंदिरातील काही महत्त्वाच्या शिल्पांची छायाचित्रे इथे पाहू शकता .

1-Gondeshwar-South-West-Corner-View
गोंदेश्वर मंदिर
« of 32 »

संदर्भ

  1. Burges, James. 1910. History of Indian and Eastern Architecture. London: John Murray.
  2. Cousens, Henry. 1931. Mediaeval Temples Of The Dakhan. Calcutta: Government of India.
  3. JAGATI. https://en.wikipedia.org/wiki/Jagati_(temple).
  4. Kanitkar, Dr Mrs Kumud. 2014. Ambarnath Shivalay. Mumbai: Dilip Kanitkar.
  5. Parul University. 2016. “Evolution of Bhumija Shikhara and Distribution of Bhumija Shrines in India.” Chitrolekha International Magazine on Art and Design, 6 (3): 10.
  6. Suri, Jayasimha, SG Kolarkar, and Mangesh Prakashan. n.d. “Seuna (Yadava) dynasty.”
  7. Wikipedia. Accessed May 8, 2024. https://en.wikipedia.org/wiki/Seuna_(Yadava)_dynasty.
  8. जोगे, डॉक्टर गोपाल, यांच्या सोबत गोंदेश्वर मंदिर भेट,  एप्रिल २०२४ .  आयोजक – सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था .
  9. शिरसाठ, महेश, ऑनलाईन  interview by वाई भटकंती सह्याद्रीची परिवार. २०२४ . पंचायतन मंदिर गोंदेश्वर (११ जून २०२४ ).