कुमारसंभव (Kumarsambhav)-एका महाकाव्याची ओळख
संस्कृत साहित्य आणि कालिदासाचे अतूट नाते आहे. कालिदासाचा काळ नेमका कोणता असावा याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. काही विद्वान त्याला इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकातील मानतात तर काही इसवी सनानंतरच्या चौथ्या शतकातील.पण असे असले तरी कालिदासाच्या काव्यप्रतिभेबाबत कुणाच्याही मनात दुमत नाही.
कुमार संभव (Kumarsambhav) आणि रघुवंश ही कालिदासाची दोन महाकाव्य आहेत तर ऋतुसंहार आणि मेघदूत ही त्याची लघु काव्य अथवा खंड काव्य आहेत. याचबरोबर कालिदासाने अभिज्ञान शाकुंतल, विक्रमोवर्शीय आणि मालविकाग्निमित्र मित्र सारखी नाटके देखील लिहिलेली आहेत. यातील कुमारसंभव या महाकाव्याची ओळख आपण आज करून घेऊया.
महाकाव्य म्हणजे नेमके काय?
महाकाव्ये म्हणजे काय ? संस्कृतातील पंचमहाकाव्ये कोणती ? हे खोलात जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
संस्कृतातील एखादे काव्य, महाकाव्य म्हणून ओळखले जाण्यासाठी त्याला काही निकष लावलेले आहेत. ते म्हणजे, एक महाकाव्य हे विविध भागात, ज्याला सर्ग किंवा अध्याय म्हणून ओळखले जाते, असे विभागलेले असते. कोणत्याही महाकाव्यामध्ये सुमारे वीस सारंग असतात. या सर्गांमधे अनेक श्लोक असतात. या काव्याचा एक मुख्य रस असतो तो “शृंगाररस” किंवा “वीररस” असावा असा संकेत आहे.
महाकाव्याचा नायक शक्यतो एखादा देवता अथवा राजा किंवा एकाच वंशातील अनेक राजे असू शकतात. याची कथा ऐतिहासिक अथवा काल्पनिक देखील असू शकते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष यातील कशाची तरी प्राप्ती हे या महाकाव्याचे फळ असते. नाटक असेल तर सुरुवातीला नमस्कार, नांदी, आशीर्वाद किंवा कथा वस्तूचा उल्लेख त्यात असतो. दुर्जनांची निंदा असते, सज्जनांची प्रशस्ती असते.
महाकाव्याचा संपूर्ण सर्ग एकाच छंदात असावा असा प्रघात आहे. सर्गाच्या शेवटी,त्यात पुढे येणाऱ्या कथेचा संकेत त्या दडलेला असतो. महाकाव्यामध्ये सूर्य, चंद्र, ब्राह्म मुहूर्त, अंधकार, दिवस, शिकार, पहाड, ऋतू, वन, सागर अशा अनेक गोष्टींचे वर्णन असतं संयोग-शृंगार किंवा वियोग-श्रृंगार असतो. मुनी, स्वर्ग, नरक, यज्ञ याचं वर्णन असतं. युद्धासाठी प्रस्थान करणारे राजे, त्यांचे मोठे मोठे विवाह, पुत्र जन्म या घटनांचे सांगोपांग वर्णन असतं.
कालिदासाची शैली
कालिदासाच्या काव्यांमध्ये तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब सापडते उदाहरणार्थ अभिज्ञान शाकुंतल मधली शकुंतला ही महाभारतातील कणखर शकुंतले सारखी नसून कालिदासाच्या काळातील अपेक्षित पतिव्रतेसारखी आहे. सरळता व माधुर्ययुक्त शैलीला संस्कृतात वैदर्भी शैली म्हणून ओळखले जाते आणि कालिदास या वैदर्भी शैलीतील सर्वोत्तम कवी मानला जातो. कालिदासाने आपल्या काव्यांमध्ये वर्णनात्मक शैलींचा प्रयोग केलेला आहे यात उपमा उत्प्रेक्षा रूपक याद्वारा त्याने त्या त्या घटनांचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रघुवंशातील इंदुमती स्वयंवराचा प्रसंग. यात त्याने इंदुमतीचे वर्णन दीपशिखेसारखे केलेले आहे. स्वतःच्या स्वयंवराच्या प्रसंगी इंदूमती जेव्हा तेथे बसलेल्या राजकुमारांच्या मधून हळूहळू पुढे सरकत होती, आणि तिची दासी त्या प्रत्येक राजकुमाराचा परिचय तिला करून देत होती, तेव्हा पुढे पुढे जाणारी इंदुमती एका चालणाऱ्या दीपशिखेसारखी पुढे सरकत राजमार्गावर अनेक राजकुमारांना मागे टाकत जाते आहे, अशा प्रकारचे वर्णन कालीदासाने केले आहे. तो म्हणतो
संचारिनी दीपशिखेव रात्रौ, यं यं व्यतीयाय पतिम्बरा सा |
नरेन्द्रमार्गातत् इव प्रपेदे विवर्ण भावं स स भूमिपाल : ||
अशाच प्रकारचे वर्णन आपल्याला कुमारसंभवाच्या तिसऱ्या सर्गामध्ये पाहायला मिळते. यात शिवाच्या भेटीला येणाऱ्या पार्वतीचे वर्णन करताना कालिदास म्हणतो की, “तिच्या स्तनांच्या भाराने तिचे खांदे झुकले आहेत आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करून येणारी पार्वती, बऱ्याच फुलांच्या गुच्छांच्या भाराने वाकलेल्या लतेसारखी दिसते आहे”. अशावेळी कालिदास आणखी काही उपमांचा वापर करताना आपल्याला आढळतात. लज्जेने रोमांचित झालेल्या पार्वतीच्या अंगावरील रोमांच कदंब पुष्पांसारखे होते असे कालिदास लिहितात. म्हणजेच ज्या प्रकारे कदंब पुष्पावर छोटे छोटे अंकुर तरारून उठतात त्याच प्रकारे पार्वतीच्या शरीरावर रोमांच उभे राहिले अशाप्रकारे ची कल्पना कालिदासाने आपल्या शब्दातून उतरवली आहे.
पार्वतीच्या पदरवाची तुलना कालिदास एके ठिकाणी हरणाच्या चालीशी करताना म्हणतात की हे समजू शकत नाही की ही चाल तिने हरणांकडून घेतली की हरणींनी तिच्याकडून?
समाधीस्थ बसलेल्या महादेवांचे वर्णन करताना कालिदास लिहितात “ते अशा मेघासारखे आहेत की ज्यात आता काहीच बदल होणार नाही, ते अशा तरंगहीन समुद्रासारखे किंवा वायुहिन स्थानावर जळणाऱ्या दिपशिखेसारखे शांत आहेत“.
कालिदासांचे सामाजिक ज्ञान आणि भान
कालिदासाचे काव्य आपल्याला एका सुसंस्कृत समाजाचे प्रतिनिधित्व करताना दिसते. कालिदासाला आपल्या सभोवतालच्या समाजाचे परिपूर्ण ज्ञान होते आणि ते ज्ञान त्यांनी आपल्या काव्यात उतरवलेले आपल्याला दिसते. कुमार संभव मधील सातव्या सर्गात शिव आणि पार्वतीच्या विवाहाचे वर्णन येते. या विवाहाचे वर्णन कालिदासाने तत्कालीन प्रचलित विवाह पद्धती विचारात घेऊन विस्तृतपणे केले आहे. या आणि अशा अनेक घटनांच्या वर्णनात कालिदासाने सामाजिक औचित्य पूर्णपणे पाळल्याचे आपल्याला दिसते.
कुमारसंभव (Kumarsambhav) – अल्प परिचय
आपण या आधी पाहिल्याप्रमाणे कुमारसंभव (Kumarsambhav) हे कालिदासाचे महाकाव्य आहे. या काव्याचे एकूण १७ सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. पण हे काव्य बावीस सर्गांचे असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. पण त्यातील पहिले आठ सर्गच कालिदासाने लिहिले असावेत असे मानले जाते. याचे कारण म्हणजे प्रसिद्ध टीकाकार मल्लिनाथ यांनी यातील पहिल्या आठच सर्गांवरती त्यांची टीका किंवा मल्लिनाथी केली आहे. ९ ते १७ या सर्गांची भाषा पहिल्या आठ सर्गांपेक्षा कमी प्रतीची वाटते. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या कवीने कालिदासाच्या पहिल्या आठ सर्गांचा अभ्यास करून हे काव्य त्याच्याच शैलीत नंतर पूर्ण केले असावे असे काही विद्वान मानतात.
प्रथम सर्ग – उमा उत्पत्ती
उमा उत्पत्ती नावाच्या या पहिल्या सर्गामध्ये मध्ये हिमालयपुत्री पार्वती किंवा उमेचा जन्म आणि तिच्या बालपणाचे आणि कुमारावस्थेचे वर्णन येते. हा सर्ग सुरू होतो तोच मुळी नगाधिराज हिमालयाच्या वर्णनाने. त्याचे वर्णन पृथ्वीचा मानदंड असे केलेले आहे. हा नगाधिराज हिमालय अनेक रत्नांची खाण आहे, अनेक अप्सरांच्या नटण्याचे साधन, म्हणजे कुंकूमादी अनेक रंग सहज मिळण्याचे ठिकाण आहे.
हा पर्वतराज हत्तीच्या विहरण्याचे स्थान असले तरी, या हत्तींना मारून फिरणारे सिंह कोणत्या मार्गाने जातात हे त्यांनी मारलेल्या हत्तींच्या गंडस्थळावरील झुलींवरील मणी, या सिंहांच्या पंजात अडकून पडतात व त्यामुळेच या सिंहांचा पदपथ दृष्टिमान होतो. या पर्वतावरील वृक्षांच्या सालींनी बनवलेल्या भूर्जपत्रांवर येथील तरुणी गेरू कुंकुम आदींनी प्रेम पत्रे लिहितात. रात्रीच्या वेळी हा पर्वत चमकणाऱ्या वनस्पतींनी प्रकाशमान होतो आणि गुहारूपी घरांमध्ये दिव्यासारखे काम करतो.
शरण आलेल्या अंधाराला, दिवाकरापासून आश्रय देत नगाधिराज हिमालयाने आपल्या राजधर्माचे देखील पालन केले आहे. आपल्या पुष्ट पुच्छांनी चवरी घालणाऱ्या गाई हिमालयाचे गिरीराज हे नाव सार्थ करीत आहेत. प्रणयाच्या वेळी रमणींची वस्त्रे त्यांच्या प्रियकरांनी त्यांच्या शरीरापासून विलग केल्यानंतर गुहेच्याद्वारावर अडकलेले ढग पडदा बनवून त्यांचे लज्जा रक्षण करत आहेत.
असा हा हिमालय ऋषीमुनींसाठी यज्ञ सामग्री मिळण्याचे उत्पत्ती स्थान आहे आणि याला सर्व पृथ्वी धारण करण्याची देखील शक्ती आहे.
अशा या नगाधिराजाने आपल्या वंशवृद्धीचा विचार करून, सर्व मुनीवरांचा, आदरणीय व्यक्तींचा विचार करून आत्मानुरूपा मेना या कन्येशी विधीपूर्वक विवाह केला आणि तिच्यापासून त्याला मैनाक नावाचा पुत्र आणि एका देदीप्यमान कन्येची प्राप्ती झाली. ही कन्या कोणी साधारण कन्या नसून पूर्वजन्मीची दक्षकन्या आणि आपल्या पित्याकडून अपमानित होऊन त्याच्याच यज्ञकुंडात प्राणत्याग करणारी महादेव पत्नी सती होती. हीच पुढे पार्वती अथवा उमा या नावाने ओळखली जाऊ लागली.
यानंतरच्या काही श्लोकातून पार्वतीच्या बाललीला आणि नवयौवनात पदार्पण या घटनांचे वर्णन येते. तिचे ते सौंदर्य पाहून देवतांनीच निश्चय केला की हिमालयाच्या या कन्येचा विवाह महादेवांशीच घडवून आणला पाहिजे कारण तिच्या व्यतिरिक्त इतर कोणीही स्त्री शिवाची पत्नी बनण्यास लायक नाही. आणि मग त्रैलोख्यात भ्रमण करणाऱ्या नारदांनी हीच गोष्ट तिच्या पित्याच्या, हिमालयाच्या कानावर घातली .
पण हे घडावे कसे? महादेवांची स्वतःची इच्छा नसेल तर आपली कन्या तिला देता तरी कशी येईल? कितीही झाले तरी हिमालय एक स्वाभिमानी नगाधिराज होता आणि शिव तर त्याच हिमालयावर एकांतात तपस्या करणारा एक तपस्वी.
द्वितीय सर्ग – ब्रह्मसाक्षात्कार
द्वितीय सर्गामध्ये सर्व देव तारकासुराच्या त्रासाने भयभीत होऊन ब्रह्मदेवाची याचना करतात याचे वर्णन कालिदासांनी अत्यंत उत्कृष्ट शब्दांमध्ये केलेले आहे. कालिदास जरी शिवभक्त असला तरी त्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनाही एकच स्वरूप मानून त्याने त्यांच्या महिमेचं वर्णन केलं आहे. ब्रह्मदेवाची स्तुती करताना कालिदास लिहितो की ओम पासून प्रारंभ होणाऱ्या देववाणीचा जन्म तुमच्याच पासून झालेला आहे तुम्हीच सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कारण आहात आणि त्यामुळे तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात.
देवांच्या तोंडून आपली स्तुती ऐकून ब्रह्मदेव त्यांना विचारते झाले की, हे देव हो! तुम्ही स्वतः इतके महापराक्रमी असून आता तुमचे पूर्वीचे तेज काल लोप पावले? , रुद्राला मारणाऱ्या इंद्राचे वज्र का निस्तेज झाले? वरुणाच्या हातातील पाश का नीचेष्ट पडले? कुबेराचे हात का गदाशून्य झाले? यम, आदित्य, मारुत, रुद्र, तुम्ही सर्व का निस्तेज झालात? तेव्हा इंद्राने देवगुरु बृहस्पतींना बोलण्याची विनंती केली आणि त्यांनी आपले गाऱ्हाणे ब्रह्मदेवासमोर मांडले.
हे ब्रह्मदेव, तुम्ही तारकासुर नामक असुराला अमरत्वाचा वर देऊन महाशक्तिशाली बनवले आहे. त्यामुळेच तो तिन्ही लोकांना ताडीत करत आहे. त्याच्या भयाने आम्ही सर्व देवगण भयभीत झालो आहोत. सूर्य, चंद्र, ऋतू हे सारेच तारकासुराच्या सेवेत मग्न असतात. कोणत्याही देवाला त्याच्या मनाप्रमाणे वागता येत नाही. आम्हाला यज्ञात मिळणारा हवी देखील तो अग्नी कडून हिरावून घेतो. इंद्राचा श्रेष्ठ अश्व उच्च:श्रवा त्याने हिरावून घेतला आहे. विष्णूच्या पराक्रमी सुदर्शन चक्रावर आमच्या विजयाच्या आशा होत्या, पण ते देखील निष्प्रभ होऊन तारकासुराचे कंठ आभूषण बनले आहे. देवांची सेना देखील त्याने आपल्या बंदीवासात ठेवली आहे त्यामुळे आम्ही सर्व हतबल होऊन तुमच्याकडे आलो आहोत.
देवांची ती चिंता ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, मीच त्याला वरदान दिले असल्याने मीच त्याचा नाश करणे उचित नाही. पण जर तुम्ही सर्व महादेवाला प्रसन्न करून हिमालय कन्या उमेकडे आकृष्ट कराल तर महादेव व उभेचा पुत्र तुमचा सेनापती बनवून तुम्हाला तारकासुराच्या त्रासातून मुक्त करू शकेल.
ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकून देवांनी मनोमन काही ठरविले आणि इंद्राने लगेचच कामदेवाला पाचारण केले. त्याच्यासोबत त्याची पत्नी रती आणि त्याचा परममित्र वसंत हे देखीलउपस्थित झाले.
तृतीय सर्ग – मदन दहन
कुमार संभवाच्या तिसऱ्या सर्गामध्ये इंद्र आणि कामदेव मदन यांच्यातील संवाद आहे. इंद्र कामदेवाचा स्वामी आहे त्यामुळे आपल्या स्वामींनी आपल्याला आपल्या कुवतीचे काम असल्याने बोलावले म्हणून तो आनंदला आहे.
कामदेव मदनाला स्वतःवर अत्यंतिक विश्वास आहे त्यामुळे इंद्राने सांगितलेले कोणतेही काम आपण सहज करू शकू याबद्दल तो केवळ निश्चितच नाही, तर अतीव आत्मविश्वासू आहे. स्वतःची प्रौढी मिरवताना कामदेव इंद्राला म्हणतो की “कुणाचा तपोभंग करायचा आहे तो मला सांगा, मग भले त्याने शुक्राचार्यांकडून नीतिशास्त्र शिकले असले, तरीदेखील नदीला आलेला पूर जसा नदीच्या दोन्ही बांधांना फोडून टाकतो, तसाच मी त्याचा तपोभंग करेन. तुमचे वज्र विश्रांती घेत राहो पण मी माझ्या बाणांनी एखाद्या दैत्याचे बाहुबल देखील नष्ट करून टाकेन. मी तर पिनाक पाणी महादेवाचे देखील धैर्य तोडू शकतो तर इतरांची काय कथा?”
त्याचे ते दर्पोक्तीपूर्ण वक्तव्य ऐकून इंद्रदेखील सुखावला. तो मदनाला म्हणाला की माझ्याकडे दोन अस्त्रे आहेत एक माझे वज्र आणि दुसरे म्हणजे तू. महादेवावर तुझा मदनबाण सोडण्याची भाषा करून तू माझे कार्य स्वीकारल्यासारखेच केले आहेस. हिमालयाची कन्या पार्वती महादेवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप करणाऱ्या शिवाची सेवा करीत आहे. आपला मित्र वसंत याला सोबत घेऊन तू असे काहीतरी कर ज्याने जितेंद्रिय महादेव, हिमालय कन्या पार्वतीवर अनुरक्त होतील. ते ऐकून कामदेव आपला प्रिय मित्र वसंत आणि प्रियतम पत्नी रती यांच्यासह, महादेव ज्या ठिकाणी तप करीत होते त्या आश्रमाकडे निघाला.

महादेवाचे वास्तव्य असणारा आश्रम आणि तेथील परिसर कालिदासाने आपल्या प्रतिभेने जिवंत केला आहे. त्या परिसरातील भुंगे, हरीणे , हत्ती यांच्या वागणुकीतील स्नेहभाव दर्शवत कालिदासाने वसंताचे तेथील आगमन स्पष्ट केले आहे. आपल्या प्रियतमे सोबत एकाच कुसुम-पात्रातून मधु प्राशन करणारा भुंगा, आपल्या शिंगाने आपल्या प्रियतमेचे नाजूक शरीर खाजवणारा हरीण आणि ते स्पर्शसुख अनुभवत डोळे मिटून उभी असणारी हरीणी, आपल्या सोंडेत पाणी भरून आपल्या जोडीदाराला भरवणारी हत्तीणी, कमळांच्या देठातील रस आपल्या चोचीत घेऊन आपल्या जोडीदारणीला देणारा चक्रवाक पक्षी, अशा अनेक छोट्या वर्णनातून कालिदासाने आश्रम परिसरातील वातावरण, वसंतागमनाने कसे धुंदावले याचे वर्णन केले आहे.
पण याचबरोबर तो शांत धीर गंभीर आसन मांडून बसलेल्या महादेवांचे वर्णन करताना साधक धर्म, यतीधर्म कसा असतो हे बारकाव्यांनी आपल्या लक्षात आणून देतो. आपले दोन्ही हस्त आपल्या मांड्यांवर ठेवून पर्यांकासनात बसलेले शिव, आपल्या जटा-समूहाला नागांनी बांधून, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा व कमरेत मृगाजिनाची गाठ बांधून शिव आपली दृष्टी आपल्या नासाग्रांवर स्थिर करून बसले आहेत. प्राणायामाद्वारे त्यांनी आपल्या श्वासांना अवगुंठीत केले आहे. एखाद्या तरंगहीन जलाप्रमाणे किंवा वातहीन ठिकाणी असणाऱ्या शांत दिव्याप्रमाणे कालिदासाने तापसी शिवाचे वर्णन केले आहे.
शिवाची अशी ही शांत तापसी मुद्रा पाहून स्वतःच्या पराक्रमाची प्रौढ़ी मिळवणारा कामदेव देखील भयभीत झाला व त्याच्या हातातील धनुष्य कधी गळून पडले हे त्याला देखील समजले नाही. त्याचवेळी रतीलाही मागे टाकेल असे सौंदर्य असणारी सर्वांगसुंदरी पार्वती समोरून येत असल्याचे पाहून मदनाच्या आशा पल्लवीत झाल्या. महादेव आपली समाधी अवस्था सोडून, पर्यंकबंध आसन सोडत होते आणि नंदीने त्यांना शैलसूता पार्वती च्या आगमनाचे संकेत दिले. हा प्रसंग प

हात कामदेवाने धनुष्यावर आपला बाण सज्ज केला, त्या क्षणी पार्वतीच्या अंगावर देखील रोमांच उभे राहिले. हा क्षण चंचलतेचा आहे आणि तो असा का बनला हे जाणण्यासाठी महादेवांनी आपली दृष्टी सभोवताली फिरवली तेव्हा त्यांना प्रत्यांच्या खेचून लक्ष साधण्याच्या तयारीत असलेला कामदेव दिसला आणि ते प्रचंड क्रोधित झाले. त्याच क्षणी त्यांच्या तृतीय नेत्रातून प्रचंड ज्वाला बाहेर निघाली आणि त्या अग्नीत कामदेव जळून खाक झाला.
एक क्षण काय झाले हे त्याची पत्नी रतीला देखील समजले नाही. पण आपला पती मृत्यू पावला हे लक्षात येतात तिच्यावर आभाळ कोसळले.
पार्वतीसाठी देखील हा कसोटीचा क्षण होता. आणि ती देखील आपल्या पित्याची इच्छा आणि आपले सौंदर्य हे दोन्ही असफल ठरले हे पाहून लज्जित झाली. हिमालय त्याच क्षणी तेथे पोहोचला व कोसळणाऱ्या पार्वतीला, म्हणजेच आपल्या कन्येला सावरत त्वरेने तेथून निघाला. त्याने त्यावेळी आपला पित्याचा धर्म निभावला होता.
चतुर्थसर्ग – रतिविलाप
कुमार संभवातील रतिविलाप हा चतुर्थसर्ग संस्कृत वाङ्मयातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या विलापसर्गांपैकी एक आहे. आपल्या डोळ्यांसमोर आपला प्रिय पती मदन नष्ट झालेला पाहून, आपण पुढचे काही क्षण देखील का जिवंत आहोत असा प्रश्न रतीलाच पडलाय, तिच्या या विलापाचे अतिशय करुण वर्णन कालिदासाने या सर्गात केले आहे.
मदनाला भस्मिभुत झाल्याचे पाहून रती भूमीवर गडबडा लोळून विलाप करू लागली. तू ज्या मार्गाने परलोकात गेला आहेस त्याच मार्गावर मी देखील येणार आहे. हे प्राणनाथ तू पुन्हा उठून तुझे मनोहर शरीर धारण कर आणि कोकिळांना पण रतीदुतांचे कार्य करण्याचा आदेश दे. तुझ्या हाताने या वसंत पुष्पांनी माझा शृंगार केला आहे ते हात मला का दिसत नाहीत? स्वर्गातील अप्सरा तुला मोहित करण्याआधी मीच अग्नि मार्गाने येऊन तुझ्या अंकावर विराजमान होईल. पण असे झाले तरी आता जग म्हणेलच की ही रती तुझ्याविना काही क्षण का होईना जिवंत कशी राहिली?
अशाप्रकारे विलाप करत तिने मदनाचा मित्र वसंत याला आपली चिता तयार करण्यासाठी विनंती केली. चांदणी जशी चंद्रमा बरोबरच लुप्त होते, वीज जशी मेघांबरोबरच विलीन होते तसेच स्त्रीने देखील आपल्या पतीसोबत जाणेच श्रेयस्कर आहे. म्हणून हे मित्र, आतापर्यंत तू माझी व माझ्या पतीची शय्या आपल्या फुलांनी सजवित होतास, त्याचप्रमाणे आता माझी चिता तयार कर आणि तुझ्या मित्राला प्रिय असणाऱ्या आम्रमंजिऱ्या त्यासोबत तयार ठेव. आम्हाला दोघांनाही एकत्रच जलांजली दे. असे म्हणत ती सती जाण्यासाठी तयार झाली पण त्याचबरोबर एक आकाशवाणी झाली, जिने तिला तिचा पती मदन तिला परत मिळेल याची ग्वाही दिली आणि रतीचा विलाप थांबला.
पंचम सर्ग – तप: फलोदय
पाचव्या सर्गामध्ये महादेवाच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीचे वर्णन येते तिने आपल्या मात्यापित्यांकडून या तपश्चर्येची घेतलेली परवानगी, या तपश्चर्ये करता तिने केलेली तयारी, त्या तपश्चर्येदरम्यान तिने केलेले कठोर आचरण, शिवाने बटुरूपात येऊन पार्वतीची तिच्या तपश्चर्येची, आणि तिच्या शिवनिष्ठेची घेतलेली परीक्षा आणि महादेव तदनंतर तिला कसे प्रसन्न झाले या सर्व घटनांचे वर्णन या सर्गामध्ये येते.
महादेवांचा क्रोध पाहून हिमालयाने आपल्या कन्येला, पार्वतीला परत स्वग्रही आणले खरे, पण मनोमन तिला आपल्या रूपाचा धिक्कार करावासा वाटला. असे सौंदर्य काय कामाचे जे आपल्या प्रियकरालाच मोहित करू शकत नाही? असे वाटून तिने आता महादेवाच्या प्राप्तीसाठी कठोर तपस्या करण्याचे ठरविले. आपल्या कन्येची ही इच्छा पाहून तिची आई मेना हिने तिला उमा, उमा म्हणत परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण ती आपल्या संकल्पावर ठाम होती. आपल्या पित्याची परवानगी मिळविण्याकरता, आपली इच्छा तिने आपल्या सखी द्वारा पित्याला कळवली आणि हिमालयाची परवानगी घेतली. ही परवानगी मिळाल्यावर ती ज्या शिखरावर गेली त्या शिखराचे नाव तिच्यामुळेच गौरी शिखर असे पडले.
कठोर तपाचरणाला प्रारंभ करण्यापूर्वी तिने आपल्या अंगावरील भूषणे उतरवली आणि वल्कले धारण केली. केसांच्या बोटांना आवरण्यासाठी त्यांच्या जटा बांधल्या याचे वर्णन करताना कालिदास म्हणतात की कमळ केवळ भुंग्यांनी शोभून दिसत नाही, तर शैवाल असताना देखील तितकेच सुंदर भासते. या तपा दरम्यान तिने आपली नाजूक शय्या त्यागत भूमीवर झोपणे पसंत केले. रोज स्नान करून, हवन करून, अध्ययन करणे असा दिनक्रम तिने सुरू केला. तिचा अशा प्रकारचा तपस्वी धर्म पाहून तिच्या दर्शनासाठी इतर ऋषी येऊ लागले.
इथे कालिदासाने पार्वतीला धर्मवृद्धाची उपमा दिली आहे. काही व्यक्ती वय वाढल्याने वयोवृद्ध होतात, ज्ञान वाढवून ज्ञानवृद्ध होतात, तपाचरण वाढवून तपोवृद्ध होतात तसे पार्वतीने धर्माचरण वाढवल्याने ती धर्मवृद्ध झाली अशा शब्दात कालिदासांनी तिचा गौरव केला आहे.
या प्रारंभिक तपस्येचे फळ मिळत नाही असे पाहिल्यावर पार्वतीने आपल्या सुकुमार शरीराची पर्वा न करता प्रचंड तप करणे सुरू केले. एकेकाळी कंदुक क्रीडेने दमणाऱ्या पार्वतीने आता मोठमोठ्या तपस्व्यांप्रमाणे कठोर तप सुरू केले. ग्रीष्मामध्ये चोहोबाजूंनी अग्नी लावून मध्ये तप करत उभे राहणे व सूर्याकडे एकटक पाहत तप करणे (असे पंचाग्नीतप), केवळ वर्षाजल आणि चंद्रकिरण यांनाच भक्षण करून पोट भरणे, ग्रीष्म संपल्यावर वर्षाऋतू सुरु झाला आणि रात्रीच्या थंड हवेत, घनघोर पावसात, विजा कडाडताना, त्यानंतर आलेल्या कडाक्याच्या थंडीत बर्फ उडताना, तर कधी सरोवराच्या जलात उभे राहून, अशा विविध कठीण परिस्थितींमध्ये पार्वतीने कठोर तप केले. बरेचदा ती केवळ झाडांची पडलेली पाने देखील भक्षण करीत नसे व म्हणून तिथे नाव अपर्णा पडले.

अशाप्रकारे कमलीनीसारख्या कोमल शरीराच्या पार्वतीने दिवस-रात्र कठोर शरीराच्या तपस्व्यांपेक्षाही कठोर तप केले.
अशाप्रकारे तिचे हे कठोर तप सुरू असतानाच त्या तपोवनात एक जटाधारी तरुण तपस्वी आला. त्याने मृगचर्म धारण केले होते हातात दंड होता, ब्रह्मचर्याच्या तेजाने त्याचे शरीर तळपत होते. अतिथी सत्कारात कुशल असलेल्या पार्वतीने यजमान धर्माप्रमाणे त्याचे स्वागत केले. सत्कार ग्रहण करून झाल्यावर त्याने पार्वतीशी संवाद साधायला सुरुवात केली.
त्या वनात पार्वतीला तिच्या तपस्येकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत ना? समिधा, पाणी इत्यादी सहजतेने मिळते ना? तुम्ही तुमच्या शक्तीनुसार तप करीत आहात ना? त्याहून जास्त तर करत नाही ना? हे विचारताना त्याने हे देखील सुचित केले की शरीर हेच धर्माचे सर्वात मोठे साधन आहे. (शरीरमाद्यम खलु धर्म साधनम).
तो बटू पुढे बोलत जातो की हा हिमालय या सप्तर्षींच्या पूजेच्या पुष्पांनी अथवा स्वर्गातून उतरणाऱ्या गंगाजलाने पवित्र झालेला नसून तुझ्या निष्कलंक हा चरणाने पवित्र झालेला आहे. तुझे हे वागणे बघून मलाही आता धर्म हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटू लागली आहे. तू माझा जो सत्कार केलास आणि आपण आता जे सात शब्द आदान प्रदान केले त्यावरून आपली जी मित्रता झाली त्या मित्रतेला स्मरून, ब्राह्मण सुलभ चौकसतेने मी तुला काही प्रश्न विचारू इच्छितो. त्याची उत्तरे जर रहस्यमय नसतील तर नक्की दे.
इथे कालिदासाचा बटू पार्वतीला प्रश्न विचारतो की, तुझा जन्म तर उच्च कुलात झालाय, सर्व सुख तुझ्यासमोर हात जोडून उभी असताना, अनुपम सौंदर्य तुला प्राप्त झालं असताना, अशा कोणत्या फळाच्या अपेक्षेने तू हे कठोर तप करत आहेस ?
अशा कोणत्या कारणाने तू यौवनातच आभूषणे त्यागून वल्कलांचा स्वीकार केला आहेस? स्वर्गात जाण्याची तुझी इच्छा असेल तर तुझ्या पित्याचे निवासस्थानच स्वर्ग आहे आणि जर तू उत्तम पतीची कामना धरून तप करत असेल तर तुझ्यासारख्या रत्नाला कुणीतरी स्वतः शोधून काढेल? आणि मला तर माझ्या नजरेसमोर अशी कोणतीच व्यक्ती दिसत नाही ज्याची कामना तू करावीस आणि तो तुला प्राप्त होणार नाही. कारण जर असे घडणार असेल तर ती व्यक्ती पाषाण हृदयीच म्हणायला हवी. हे पार्वती! तुला हवे असल्यास मी आतापर्यंत माझ्या तपश्चर्येने प्राप्त केलेल्या संचिताच्या अर्धा भाग मी तुला देतो आणि त्याने तू तुझा अभिष्ट वर प्राप्त कर. पण मी जाणून घेऊ इच्छितो की हा वर आहे तरी कोण?
त्या ब्राह्मणाने विचारलेल्या प्रश्नांना स्वतः उत्तर देणे पार्वतीला योग्य वाटले नाही, म्हणून तिने उत्तरादाखल आपल्या सखी कडे पाहिले. त्यावर ती सखी उत्तरली, की या सुकोमल शरीराला तपस्येचा त्रास देण्याचे कारण महादेवाला पती म्हणून प्राप्त करणे आहे. आणि आता कामदेव नष्ट झाल्यानंतर त्यांना सौंदर्याने मुग्ध करणे शक्य नाही.
त्या सखीचे हे शब्द ऐकून त्या ब्रह्मचर्याने आश्चर्य व्यक्त केले आणि विचारले, ही खरं सांगते की थट्टा करतेय ? तेव्हा पार्वती उत्तरली, होय त्याच शिवाच्या अभिलाषेने मी हे तप करते आहे. मनुष्याचे मनोरथ जिथे पोहोचू शकतील असे स्थानच नाही. शिवाची प्राप्ती हेच माझे मनोरथ आहे.
त्यानंतरचे संवाद त्या ब्रह्मचारी बटूचे आहेत. खरे तर हा ब्रह्मचारी म्हणजे बटू वेशात आलेला महादेवच आहे. म्हणून तो शिवाची यथेच्छ निंदा पार्वती समोर करतो. तो तिला म्हणतो, महादेवा विषयी तर सर्वजण जाणतात असे असूनही तू त्याच्या प्राप्तीची इच्छा का धरते आहेस? जरा विचार कर, जेव्हा तू मंगळसूत्र धारण करशील, तेव्हा तो सर्प धारण करून असेल. जेव्हा तू तुझी रक्तवर्णी विवाह वस्त्रे नेसली असशील, तेव्हा तो रक्ताळलेले गजचर्म पांघरून असेल. फुलांच्या मार्गावर चालणारी तू, उद्या तुला स्मशानभूमीत चालावे लागेल. तुझ्या स्तनांना चंदन लावलेले असेल तर त्याच्या शरीराला चिता भस्म. आतापर्यंत हत्तीवर बसून जाणारी तू, तुझ्या विवाह नंतर तुला एका वृद्ध वृषभावर, नंदीवर, बसून जावे लागेल तेव्हा प्रतिष्ठित लोकात तुझे हसे होईल.
महादेवाच्या प्राप्तीची आस असणाऱ्या दोनच कमनशिबी व्यक्ती या जगात आहेत, त्यापैकी एक म्हणजे त्याच्या शिरावर विराजमान असलेली चंद्रकला आणि दुसरी तू. आणि त्याच्या शारीरिक सौंदर्याबद्दल तर काय बोलावे. मस्तकावरील तिसऱ्या डोळ्यामुळे तो विरूपाक्ष या नावाने ओळखला जातो, आणि धन संपत्ती नसल्यामुळे दिगंबर अवस्थेत राहतो. त्यामुळे तू अशा वराशी लग्न करण्याची तुझी इच्छा सोडून दे.
त्या यतीचे ते बोलणे ऐकून पार्वती हळूहळू क्रुद्ध होत होती. तिचे डोळे रागाने लाल होत गेले. आणि संतापून ती बोलू लागली, तू हे असे बोलतो आहेस कारण तुला महादेवाचे वास्तविक रूप ज्ञात नाही, आणि तुझ्यासारख्या मंदबुद्धीला ते समजणार देखील नाही. महादेव म्हणजे संपूर्ण विश्वाला शरण देणारा, सारी संपत्ती उत्पन्न करणारा आणि स्मशानवासी असून देखील त्रिलोकनाथ असलेला आहे. हा संपूर्ण संसार महादेवाची मूर्ती आहे मग तो त्यांना लपेटणारा सर्प असो की गजचार्म, मुंडमाला असो की चंद्रकला. त्यांच्या शरीराला स्पर्श करणारे चितेचे भस्म देखील पावन होते, व म्हणून देवता ते आपल्या मस्तकावर विभूती म्हणून लावण्यात धन्यता मानतात.
असे संपत्तीहीन महादेव जेव्हा आपल्या बैलावर चढून बसतात तेव्हा इंद्रदेखील स्वतःचे शीर त्यांच्या चरणाशी ठेवतो आणि तू तुझ्या नीच स्वभावामुळे त्यांची निंदा करत सुटला आहेस. पण तुझ्या या बोलण्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही त्यामुळे तू तरी येथून निघून जा नाहीतर मीच येथून निघते, असे बोलून पार्वती तेथून निघाली.
हे पाहतात शिवाने प्रसन्न होत आपले खरे रूप प्रकट केले आणि हसूनच तिचा हात धरला. ते पाहून पार्वती रोमांचित होऊन उठली, आणि तेथेच थबकली. महादेव तिला म्हणाले, तुझ्या या कठोर तपश्चर्येने मी तुझा दास झालो आहे. ते ऐकून पार्वतीचे सर्व कष्ट दूर झाले.
षष्ठ सर्ग – उमा प्रदान
सहाव्या सर्गामध्ये महादेवाच्या वतीने पार्वतीला विवाह ची मागणी घालण्यासाठी सप्तर्षी आणि वशिष्ठ पत्नी अरुंधती हिमालयाकडे जातात. हिमालय त्यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या येण्याचे प्रयोजन विचारतो. तेव्हा सप्तर्षी शिवस्तुती करून आपल्या येण्याचे प्रयोजन सांगतात. ते नगाधिराज हिमालयाकडे महादेवासाठी पार्वतीचा हात मागतात. ते ऐकून हिमालयाला आनंद होतो आणि आपल्या पत्नीच्या संमतीने तो या विवाहाला परवानगी देतो.
पार्वतीचे म्हणणे स्वीकारत तिच्या पित्याजवळ तिला मागणी घालण्याकरता महादेवाने सप्तर्षींना साकडे घातले. त्यावेळी सप्तर्षी वशिष्ठ पत्नी अरुंधती समवेत महादेवाच्या समोर प्रकटले आणि शिवस्तुती करत त्यांनी या कार्याचा आनंदाने स्वीकार केला. शिवाने त्यांना सांगितले की ज्याप्रमाणे अग्नीच्या उत्पत्ती करिता यजमान अरणी आपल्या घरी घेऊन येतो त्याचप्रमाणे संतान उत्पत्ती करता मी पार्वतीला आपल्या घरी आणू इच्छितो. त्यामुळेच तुम्ही माझ्या वतीने नगाधिराज हिमालयाकडे जाऊन पार्वतीला मागणी घाला. या कार्यासाठी देवी अरुंधती जर पुढाकार घेईल तर ते कार्य अधिक चांगल्या प्रकारे संपन्न होईल कारण अशा कार्यांमध्ये पुरंध्री कुशल असतात.
शिवाचे हे बोलणे ऐकून अरुंधती सह सप्तर्षी हिमालयाच्या औषधीप्रस्थ नगराकडे निघाले. यानंतरच्या काही श्लोकात औषधीप्रस्थ नगराचे वर्णन कालिदासाने केले आहे. आकाश मार्गाने ते सप्तर्षी तेथे पोहोचल्यावर जेव्हा या नगरी उतरू लागले तेव्हा ते पाण्याच्या लाटांवर पडणाऱ्या सूर्याच्या प्रतिबिंबासारखे दिसत होते. त्यांना पाहून हिमालय त्यांच्या स्वागताकरिता सामोरा आला. त्यांना आपल्या अंतपुरात घेऊन जात वेत्रासनावर बसवून त्याने त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या आगमनाचे कारण विचारले. मी, माझ्या पत्नी आणि माझी प्राणप्रिय कन्या आपली काय सेवा करू?
असे विचारताच सप्तऋषींनी हिमालयाचे गुणगाण केले आणि त्याला सांगितले की आम्ही खरे तर तुझ्याच कामासाठी आलो आहोत. या कामाला जर तू संमती दिलीस तर त्यातील थोड्याशा यशाचा लाभ आम्हाला देखील होऊ शकतो. समस्त संसाराचा स्वामी असलेल्या महादेवाला तर तुम्ही जाणताच. याच महादेवाने तुझ्या कन्येशी त्याच्या विवाहाची बोलणी करण्याकरता आम्हाला पाठवले आहे.
जर तू पार्वतीचा हात महादेवाच्या हातात दिलास तर तिलाही एक उत्तम पती लाभेल आणि तुला देखील काहीच चिंता उरणार नाही. पार्वती सारखी वधू, तुझ्यासारखा कन्यादान करणारा पिता, विवाह तील मध्यस्थ आम्ही आणि साक्षात महादेवासारखा वर असेल तर तुझ्या कुळासाठी याहून अधिक गौरवाची गोष्ट कोणती? महादेवाची आपल्या कन्येचा विवाह करून तू देखील महादेवांना पूजनीय बनशील.
देवर्षी अंगीरस अशाप्रकारे बोलत असताना लज्जित पार्वती अधोवदनाने तिच्या हातात असलेली कमळाची पाने मोजत बसली होती. ऋषींचे हे बोलणे ऐकून हिमालयाने आपले मुख पत्नी मेना कडे वळविले आणि तिला नेत्र संकेत केला. येथे कालिदास म्हणतो “ अशा कन्येसंबंधीच्या कामांमध्ये गृहस्थ गृहिणींची परवानगी घेतात”. मेनाने पण आपल्या पतीची इच्छा जाणून नेत्रांनी होकार दिला. यावर कालिदास म्हणतो “ पतीव्रता स्त्रिया देखील आपल्याच पतीच्या इच्छेनुसार कार्य करतात”.
यानंतर हिमालय उद्गारला, “मुली, महादेवाने तुझी भिक्षा माझ्याकडे मागितली आहे आणि ती घेण्यासाठी दिव्य मुनी माझ्या घरी चालत आले आहेत. आज माझे गृहस्थ जीवन सफल झाले”. असे म्हणत तो पुढे सप्तर्षींना उद्देशून म्हणाला, “महादेवाची ही पत्नी तुम्हाला नमस्कार करते आहे”. त्याची ही होकार सूचक वाणी ऐकून सप्तर्षी प्रसन्न झाले. त्यांनी पार्वतीला अनेक आशीर्वाद दिले. पार्वतीने अरुंधतीला देखील नमस्कार केला. अरुंधतीने तिला आपल्या शेजारी बसवले. हे दृश्य पाहून तिची आई मेना हीच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. यानंतर येणाऱ्या तीन दिवसानंतर विवाहाची तिथी ठरवून सप्तर्षी तेथून निघाले आणि त्यांनी सर्व हकीकत महादेवाला कथन केली.
सप्तम सर्ग – उमा परिणय
सातव्या सर्गामध्ये कालिदासाने शिवपार्वती विवाहाचे चित्रण केले आहे. यात प्रथम पार्वतीचा लग्न शृंगार वर्णन केला आहे. तर त्यानंतर महादेवांचा शृंगार वर्णिला आहे. नंदीवर बसून निघालेल्या महादेवांच्या वरयात्रेचे वर्णन देखील कालिदासाने विस्तृतपणे केले आहे. ही वरयात्रा हिमालयाच्या औषधीप्रस्थ नगरात पोहोचल्यावर, तेथील प्रजाजनांची होणारी गडबड, धावपळ, चोरट्या नजरेने इतर तरुणींचे महादेवाकडे पहाणे, त्यांच्या महादेवाच्या रूपावरील भाष्य, या साऱ्याच गोष्टींचे अतिशय बारकाईने वर्णन कालिदासाने केले आहे. वरयात्रा औषधीप्रस्थ नगरात पोहोचल्यावर, हिमालयाने महादेवांचे आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व मंडळींचे केलेले स्वागत आणि विवाह विधी, यातून कालिदासाने आपल्याला तत्कालीन समाजातील विवाह विधींचे दर्शन घडविले आहे. या सर्गाच्या अखेरीस शिवपार्वतीचा विवाह संपन्न होतो आणि ते आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करतात.
पार्वतीच्या सौंदर्याचे आणि शृंगार असे वर्णन करताना कालिदासाची प्रतिभा फुलून येते. इतर स्त्रिया आणि पार्वतीच्या सख्या यांनी मिळून पार्वतीचा केलेला केश शृंगार, वस्त्र शृंगार, तिच्या शरीरावर लावलेले विविध लेप, तिला घातलेले स्नान, आणि तिला नेसवलेली विवाहाची शुभ वस्त्रे या बारकाव्यांचे वर्णन कालिदासाने केले आहे. तिचा शृंगार झाल्यावर तिच्या मातेने आपल्या बोटांनी तिच्या माथ्यावर विवाह तिलक लावला. यावेळी तिच्या मातेचे, मेनाचे, डोळे भरून आले. तशाच स्थितीत तिने मंगलसूत्र बाहू वर बांधले. पार्वतीने सर्व कुलदेवतांना नमस्कार केला आणि त्याचबरोबर सर्व जेष्ठ स्त्रियांना देखील.
याचवेळी कुबेराच्या कैलास पर्वतावर सप्तमातृका महादेवाचा शृंगार करत होत्या. पण चिता भस्म हेच महादेवाचे अंगभूषण होते तर गज चर्म त्याचे वस्त्र. मस्तकावर चंद्रकला विराजमान होती आणि त्यांच्या अंगावरील सापांच्या फण्यातील रत्ने चमकत होती. अशाप्रकारे सजलेले महादेव नंदीवर विराजमान झाले तेव्हा कैलासानेच आपले शरीर संक्षिप्त करून बैलाचे रूप धारण केले आहे असे वाटत होते. त्यांच्या पाठोपाठ सप्तमातृका देखील रथांवर बसून निघाल्या. सहस्त्ररश्मी सूर्य आता मात्र त्यांच्यावर आपले छत्र धरून होता. गंगा यमुना शरीर धारण करून चवरी ढाळत होत्या. सृष्टी विधाता ब्रह्मा आणि लक्ष्मीपती विष्णू यांनी देखील महादेवांच्या निकट पोहोचत त्यांचा जयजयकार केला. इंद्र आणि इतर लोकपाल आपले राजसवेश त्यागून इतर वस्त्रे धारण करून महादेवाकडे पोहोचून, हात जोडून उभे राहिले. सप्तर्षींनी जेव्हा महादेवाला आशीर्वाद दिला, तेव्हा महादेवाने त्यांना विवाह यज्ञाचे पौरोहित्य करण्याची विनंती केली. अशी सर्व तयारी झाल्यानंतर ही वरयात्रा “औषधीप्रस्थ” नगराकडे निघाली आणि काही काळातच हिमालयावर या नगराकडे जाऊन पोहोचली.
त्यांना पाहून हिमालयाचे मुख आनंदाने फुलले. सर्व नगर जन देखील आनंदीत झाले. नगरातल्या सुंदर तरुणी महादेवांचे दर्शन घेण्यासाठी धडपडू लागल्या. एक तरुणी अशीच आपल्या खिडकीकडे पळाली. या गडबडीत तिची वेणी सुटली तरी तिने त्याकडे लक्ष दिले नाही. कोणी एक तरुणी आपल्या डोळ्यात अंजन घालत होती. उजव्या डोळ्यात अंजन घालून झाले तोच तिला गलबला ऐकू आला आणि ती तशीच महादेवांचा एक कटाक्ष मिळतो का हे पाहण्यासाठी खिडकीजवळ धावली. एका तरुणीचा तर कटीबंधच सुटला, आणि तो न बांधताच आपल्या हातांनीच आपली वस्त्रे सावरत ती खिडकीकडे पोहोचली.
अशा प्रकारच्या अनेक वर्णनातून कालिदासाने नगरातल्या तरुणींची उडालेली तारांबळ अचूकपणे टिपली आहे. शिवाला पाहिल्यावर एक तरुणी म्हणू लागली, “जर कोणी नारी यांची दासी बनेल तरी तिचे जीवन सफल होईल. मग यांच्या पत्नीचे भाग्य ते केवढे थोर”. तर दुसरी तरुणी म्हणाली “हे दोघेही एकमेकाला अनुकूल आहेत. जर विधात्याने त्यांना एकत्र आणले नसते तर या दोघांना इतके सौंदर्य प्रदान करणे व्यर्थ होते”.
अजून एकीने तर असेही म्हटले की, “महादेवांनी क्रुद्ध होऊन कामदेवाला भस्म केले नाही, तर त्यांच्याच सौंदर्याने लज्जित होऊन कामदेव स्वतःच जळून भस्म झाला”
अशा चर्चा होत असतानाच महादेव हिमालयाच्या महालात पोहोचले तेथे विष्णू ने आपल्या हातांनी महादेवाला नंदीवरून उतरवले. तेथे ब्रह्म इंद्र आदी देव आधीच उपस्थित झाले होते. या सर्वांच्या उपस्थितीत पूजासामुग्री आणि मधुपर्काने मंत्र पठण करत महादेवांचे स्वागत केले गेले. मग महादेव आणि पार्वती दोघांना एकमेकांच्या समीप आणले गेले आणि हिमालयाने पार्वतीचा हात महादेवांच्या हातात दिला. यावेळी असा भास होऊ लागला की पार्वतीच्या शरीरात दडून बसलेला कामदेव हळूहळू आपले अंकुर बाहेर काढत आहे.
हे दोघे पती-पत्नी एक दुसऱ्याच्या स्पर्शाचा आनंद घेत असताना पुरोहितांनी त्यांना तीन अग्निप्रदक्षिणा करविल्या. पुरोहितांनी पार्वतीला सांगितले की हा अग्नी तुमच्या विवाहाचा साक्षीदार आहे. यापुढे आपला पती महादेव याच्यासोबत धर्माचरण करत आयुष्य व्यतीत करणे. यानंतर स्थिरचित्त महादेवांनी पार्वतीला ध्रुवदर्शन करविले, आणि तिने देखील ते झाले असल्याचे सांगितले. यावर विवाह विधी संपूर्ण झाले आणि वधू-वरांनी माता-पिता, कमलासनावर बसलेले ब्रह्मा आणि सर्वांना नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. ब्रह्मदेवांनी पार्वतीला “वीरप्रसवा हो” असा आशीर्वाद दिला, पण वाचस्पती असणाऱ्या ब्रह्मदेवांना शिवाला काय आशीर्वाद द्यावा हे सुचलेच नाही आणि ते विचार मग्न झाले.
या उपरांत दोघांनी अप्सरांद्वारे केले गेलेल्या नाटकाचा आस्वाद घेतला ज्यात संस्कृत भाषेच्या विविध शैली आणि रसांचा उपयोग केला होता आणि ज्याच सुंदर नृत्य देखील होते.
यावेळी देवांनी विनंती केल्यावरून महादेवाने कामदेवाला पुन्हा जीवित केले आणि एवढेच नाही तर त्याला आपल्यावर त्याचा काम बाण चालवण्याची अनुमती देखील दिली.
अष्टमसर्ग – उमा सुरत वर्णन
आठव्या वर्गामध्ये कालिदासाने शिवपार्वतीच्या प्रणय लीलांचे वर्णन केले आहे. असे म्हटले जाते की या प्रणयवर्णनाने क्रुद्ध होऊन, पार्वतीने कालिदासाला शाप दिला आणि त्यामुळेच त्याचे हे काव्य आठव्या वर्गावरच थांबले. त्यानंतर पुढचे काव्य दुसऱ्या कोणत्यातरी कवीने कालिदासाच्या काव्यांचा अभ्यास करून पूर्ण केले. या वर्णनांमध्ये कालिदासाने शंकर-पार्वती एकमेकांवर कसे लुब्ध झाले होते, आणि या काळात एकमेकांचा परिणय कसा करत होते याचे बारकावे सांगितले आहेत.
महादेव एकांतात पार्वतीच्या सौंदर्याचे पान करत. दुसऱ्या दिवशी सखींनी गेल्या रात्रीचे वर्णन विचारले असता पार्वती लज्जेने त्यांचे कुतुहल शांत करू शकत नसे. कधी कधी दर्पणासमोर उभी राहून ती शिवजींच्या द्वारे बनलेल्या नखचिन्हांचे निरीक्षण करीत असे. आपली कन्या महादेवांबरोबर अतिशय सुखी आहे हे पाहून तिच्या मातेचे मन निश्चिंत होत होते. काही दिवसांतच पती-पत्नींमध्ये इतका घट्ट बंध तयार झाला की एक दुसऱ्याच्या थोड्याशा वियोगाने देखील ते बेचैन होऊ लागले. असे करत त्यांनी सुमारे एक महिन्याचा कालावधी हिमालयावरच व्यतीत केला आणि त्यानंतर त्यांनी हिमालयाकडे प्रस्थानाची अनुमती मागितली.

यानंतर नंदीवर स्वार होऊन त्यांचे विविध पर्वतावरील भ्रमण सुरू झाले. हिमालया वरून निघून ते प्रथम मेरू पर्वतावर गेले, पुढे तेथून मंदार पर्वतावर पोहोचले. त्यानंतर कुबेराच्या कैलास पर्वतावर गेले. तिथून पुढे चंदनाचे वृक्ष असलेल्या मलय पर्वतावर पोहोचले. या सर्व कालावधीत त्यांचा एकत्रित जलविहार सुरूच राहिला. तेथून पुढे ते नंदनवनात गेले. नंदन वनात असताना महादेव पार्वतीचा शृंगार पारिजाताच्या फुलांनी करीत असत. काही दिवस तेथे राहिल्यानंतर ते पुढे गंधमादन पर्वतावर गेले. या प्रत्येक ठिकाणी महादेव तिला फुलासारखे जपत होते, वेगवेगळ्या दिशेने दिसणारी निसर्गाची दृश्य, विविध वृक्षवल्ली, विविध ठिकाणाच्या आश्रमांची चित्रविचित्र शोभा, प्रातः आणि संध्यासमयाची कमळे, सूर्याची विविध रूपे दाखवीत असत.
मध्येच कधीतरी त्यांना संध्यावंदना करण्याची आठवण होईल आणि मग ते पार्वतीकडे त्या वेळेची अनुमती मागत. हे त्यांचे गृहस्थ कर्तव्य होते आणि त्यामुळे आपल्या प्रणयाराधनेमध्ये आपल्या कर्तव्याचा विसर पडू नये याची काळजी घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला.
अशाप्रकारे महादेवाने पार्वती बरोबर बराच काळ व्यतीत केला पण त्यांच्या आनंद भोगाची इच्छा शांत झाली नाही. पण एकीकडे देव मात्र चिंतीत होत होते.
नवंम सर्ग – कैलासगमन
आतापर्यंत शिवपार्वतीला पुत्र होत नाही हे पाहून सर्व देव चिंतित झालेले आहेत. यासाठी त्यांना विचारणा कशी करायची याबद्दल त्यांचे विचार मंथन सुरू होते. शेवटी अग्नीने कपोतरूपात शंकराकडे जाऊन देवांचा निरोप द्यावा असे ठरते. त्याप्रमाणे अग्नी कैलास पर्वतावर शिवपार्वती एकांतात असताना तिथे प्रकट होतो. पार्वती त्याला पाहून लज्जित होते पण त्याचबरोबर संतप्तही होते आणि अग्नीला कोड होण्याचा शाप देते. अग्नी आपण इंद्राच्या आज्ञेवरून येथे आल्याचे सांगतो आणि देवांचा निरोप ही शंकरांना देतो. महादेव आपल्या वाक्चातुर्याने पार्वतीचा राग शांत करतात आणि त्याचबरोबर शिव अग्नीचे सांत्वन करण्यासाठी आणि त्याचबरोबर देवांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपले बीज अग्नीमध्ये टाकतात.
जया आणि विजया या पार्वतीच्या सख्या तिचा शृंगार करत असताना नंदी इंद्रादी देव शंकरांच्या भेटीला आल्याची माहिती देतो. महादेव काही वेळासाठी देवांना भेटतात आणि त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतात. देवांची भेट घेऊन झाल्यानंतर महादेव नंदीवर बसून पार्वतीसह कैलासाकडे प्रस्थान करतात.
दशमसर्ग – कुमार उत्पत्ती
अग्नि स्वर्गलोकात परत येतो खरा पण शंकराच्या तेजस्वी बीजाने आणि पार्वतीच्या शापाने त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. झालेली संपूर्ण घटना अग्नी देवांना विदित करतो. तेव्हा देव अग्नीच्या महानकार्याची स्तुती करतात. काही श्लोकांमध्ये या स्तुतीचे वर्णन येते.
शिवाचे बीज धारण करून अग्नी कासावीस झाला आहे. त्या विजयाचे तेज त्याला सहन होत नाही. शिवाचे बीज धारण करू शकतील अशा दोनच व्यक्ती आहेत एक म्हणजे स्वतः पार्वती आणि दुसरी गंगा. यातील पुढील श्लोकांमध्ये गंगेची स्तुती आहे. यानंतर अग्नी हे बीज गंगेकडे हस्तांतरित करतो. पण या तेजाचा तिलादेखील त्रास होतो. तिथे

जल तप्त होऊ लागते. त्यातील जलचर आणि पान वनस्पती सुकू लागतात. अशा वेळीच सहा कृतिका गंगा नदीमध्ये स्नानाला येतात आणि ते बीज त्यांच्यामध्ये स्थलांतरित होते.
आपल्याला बीज धारणा झाली आहे ही गोष्ट कृतिकांच्या लक्षात येताच त्यांना भय देखील वाटते आणि आश्चर्य देखील. या बीजधारणेचे कारण न समजल्याने त्या आश्चर्यचकित होतात. पण त्याचबरोबर त्यांना वाटणाऱ्या त्यांच्या पतीच्या भीतीमुळे त्या हा गर्भ धारण करू शकत नाहीत. त्यामुळे त्या आपापला गर्भ कळकाच्या बेटावरील जंगलात सोडतात. सहामातांपासून झालेले हे मूल पुढे याचमुळे षण्मातुर म्हणून ओळखले जाते. सहामातांपासून झालेले हे बालक अनेक सूर्याच्या तेजा सारखे तेजस्वी असते.
एकादश सर्ग
सहा कृतिकांनी कळकाच्या बेटावर सोडलेला हा गर्भ अतिशय तेजस्वी असल्यामुळे त्याचे पालन पोषण करण्यासाठी इंद्राने पुन्हा गंगेला विनंती केली. . गंगेने स्त्री रूप धारण करून त्या बालकाला दूध पाजणे आरंभ केले. अशा या दिव्यरूपी तेजस्वी बालकाला बघून अग्नी, गंगा आणि कृतिका या तिघांनाही आनंद होऊ लागला आणि प्रत्येकाला हा पुत्र आपलाच वाटू लागला. (याचमुळे या बालकाला आग्नेय, गांगेय व कार्तिकेय अशी इतर नावे पडली).
याचवेळी महादेव आणि पार्वती आपल्या विमानातून आकाशात विहार करत असताना त्यांची दृष्टी या सहा मुखाच्या बालकावर पडली आणि त्यांचेही पुत्र वात्सल्य जागृत झाले. . पार्वतीने महादेवांना हा बालक कुणाचा याची विचारणा केली आणि त्याचबरोबर अग्नी, गंगा, कृतिका या प्रत्येकाला हा बालक आपला का वाटतो आहे? हा नक्की कुणाचा पुत्र आहे पुन्हा देवाचा, दैत्याचा, गंधर्वाचा का राक्षसाचा? अशी ही विचारणा केली.
त्यावेळी महादेवांनी पार्वतीला कुमाराच्या जन्माचा संपूर्ण वृत्तांत कथन केला आणि त्यांनी हा पुत्र आपलाच असल्याचे देखील तिला सांगितले. पुत्र स्नेहाने अधीर झालेल्या पार्वतीने लगेचच त्या पुत्राला आपल्याकडे घेतले आणि ती देखील त्याला स्तनपान करवू लागली. ते पाहून गंगा आणि कृतिका यांना देखील ईर्षा उत्पन्न झाली आणि त्याचबरोबर आनंदही झाला. पार्वती त्या बालकाला घेऊन महादेवांसोबत कैलासावर परतली. या पुत्राच्या जन्माचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या बालकाच्या मनोहर आणि विचित्र लीलांनी शिवपार्वती प्रसन्न होऊ लागले. काही लीलांचे वर्णन कवीने यात केले आहे ते असे की हे बालक कधी शिवाच्या वाहनाची, नंदीचे शिंगे पकडून खेळायचा तर कधी पार्वतीच्या सिंहाच्या केसांची. कधी तो शिवाच्या कंठातील नागांची मुख्य उघडून त्यातील दात एक, नऊ, दोन, पाच, सात अशा कोणत्याही उलट सुलट क्रमाने मोजत असे. कधी कधी शिवाच्या मस्तकावरून वाहणाऱ्या गंगेच्या धारांमध्ये आपला हात टाकून त्याची बोटे थंड पडली की शिवाच्या तृतीय नेत्रातील उबेने ती परत गरम करून घेत असे. कधी शिवाच्या जटातील चंद्रमा जर त्याच्या कलांसह लटकू लागला तर कुतुहलाने तो त्याचे पापे घेत असे. अशा प्रकारे लीला करत केवळ सहा दिवसातच हे बालक पूर्ण बुद्धिमान आणि शस्त्र तसेच शास्त्र पारंगत झाले.
कुमाराच्या बाललीलांच्या वर्णनामध्ये कवीने अनेक उपमांचा वापर करून कालिदासाशी असलेले आपले साम्य दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.
द्वादश सर्ग – कुमार सेनापत्य वर्णन
तहानेने व्याकुळ झालेला चातकपक्षी जसा पावसाच्या थेंबांनी भरलेल्या मेघाकडे धावत जातो, त्याचप्रमाणे तारकासुराच्या उपद्रवाने व्याकुळ झालेल्या देवतांसह देवराज इंद्र पुन्हा एकदा महादेवांकडे पोहोचला. तारकासुराचे भय इतके होते की देवतांना लपछपतच फिरावे लागेल. इंद्राला द्वारावर पाहून नंदिनी त्याचे स्वागत केले आणि महादेवांना इंद्राच्या आगमनाची सूचना दिली.
या पुढील काही श्लोकांमध्ये आपल्या सभामंडपामध्ये बसलेल्या महादेवांचे वर्णन येते. पुन्हा एकदा त्यांच्या मस्तकावरील सुशोभित चंद्रमा आणि वाहणारी गंगा, कपाळावरील तृतीय नेत्र, त्यांच्या कानातील कुंडले, त्यांच्या अंगावरील भस्म, गळ्यातील मुंडमाळा हातातील त्रिशूल आदी अनेक गोष्टींचे वर्णन करून कवीने महादेवांचे महात्म्य वर्णन देखील केले आहे.
पुन्हा एकदा महादेवांनी इंद्राला त्याच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा इंद्राने तारकासुरचे भय कथन करत ब्रह्माच्या वरदानाची आणि त्यांनी सांगितलेल्या भविष्य कथनाची महादेवांना आठवण करून दिली. महादेवांचा पुत्र कार्तिकेय देवांचे सेनापत्य स्वीकारून तारकासुराचा संहार करू शकेल याची जाणीव झाल्याने महादेवांनीच कार्तिकेयाला देवांचे अधिपत्य स्वीकारून देवतांचा शत्रू तारकासुराचा संहार करण्याची आज्ञा केली. आपल्या पित्याची आज्ञा मानणे हे पितृभक्त पुत्राचा धर्म आहे व म्हणूनच कुमाराने देखील ती आज्ञा शिरसावंद्य मानत या आव्हानाचा स्वीकार केला आणि इंद्रादी देव हर्षभरीत झाले.
त्रयोदश सर्ग
तेराव्या सर्गात कुमार कार्तिकेय युद्धाचा वेश परिधान करून युद्धावर जाण्यापूर्वी आपल्या पित्याचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला. तेव्हा महादेवांनी त्याला “शत्रूला मारून इंद्राला पुन्हा त्याच्या आसनावर प्रतिष्ठित कर” असा आशीर्वाद दिला. त्यानंतर त्याने आपल्या मातेचा चरण स्पर्श केला. तेव्हा पार्वतीच्या नयनातून हर्षाने निघालेले अश्रू त्याच्या मस्तकावर पडून त्याला जणूसेनापतीपदाचा अभिषेक करत होते. पार्वतीने त्याला आपल्या उराशी कवटाळले आणि आशीर्वाद देत म्हणाली, “जा, शत्रूला युद्धात जिंकून मला वीर मातेचा दर्जा दे”
आपल्या मात्या-पित्यांची आज्ञा घेऊन कुमार देवसेनेसह तारकासुरासी युद्ध करण्यास निघाला. एक एक नक्षत्रपथ पार करत सर्वजण स्वर्गाच्या जवळ जाऊन पोहोचले. पण त्यांना स्वर्गात प्रवेश करण्याचे धैर्य होत नव्हते. प्रत्येक देवता एक दुसऱ्याला तू पुढे हो, असे म्हणत होता. कुमार मात्र निश्चिंत होता. देवांना आश्वस्त करत तो म्हणाला, न घाबरता तुम्ही सर्वजण स्वर्गात प्रवेश करा. मी निश्चितच त्याचा वध करेन. देवतातील सर्वात वृद्ध ब्रह्मदेवाने कुमारच्या सहाही मुखांचे चुंबन घेतले. गंधर्व आणि विद्याधरांनी कुमाराचा जयजयकार केला. नारद इंद्र आधी देवतांनी कुमाराशी आपल्या उत्तरी यांची अदलाबदल करीत मित्रतेच्या दृढतेची ग्वाही दिली.
हळूहळू एक एक करून सर्व देव स्वर्गलोकात प्रविष्ट झाले. बऱ्याच दिवसांनी आपली नगरी पाहून त्यांचे मन आनंदित झाले पण त्याचबरोबर त्या नगरीची दुर्दशा पाहून ते दुखी झाले. तारका सुराच्या दुष्कर्मानी कुमार क्रोधित झाला. पुढे ते देव आणि दानवांचे आदी पुरुष महर्षी कश्यप यांना भेटले. कुमाराने त्यांना आणि कश्यप पत्नी देवमाता आदितीला प्रणाम केला. त्यांचे आशीर्वाद मिळाल्यावर देवांनी प्रसन्न होत कुमाराला आपल्या सेनापतीपदाचा अभिषेक केला.
चतुर्दश सर्ग – देवसेना प्रयाण
कुमार आता तारकासुराशी युद्ध करून त्याला मारण्यासाठी उत्सुक झाला होता. त्याने देवतांना पण तयार होण्याचा आदेश दिला आणि तो स्वतः आपल्या विजित्वर नावाच्या रथावर आरुढ झाला. या रथाची गती मनाप्रमाणे तीव्र होती. या स्वर्गातील श्लोकांमध्ये पुढे देव सेनेच्या प्रयाणाचे वर्णन येते कोणकोणते देव कोण कोणती शस्त्रे घेऊन, कोणकोणत्या वाहनावर आरुळ होऊन कशाप्रकारे असुर सेनेवर चालून जाण्यासाठी उत्सुक आहेत याचे काव्यात्मक वर्णन कालिदासाने या सर्गांमधे केले आहे.
पंचदश सर्ग
देवांची सेना महादेवाचा पुत्र कुमार याच्या सेनापत्याखाली असुरांच्या नगरीकडे येत आहे ही बातमी तारकासुराला कळली. ती ऐकून तो उद्गारला, “आतापर्यंत तरी इंद्र कोणत्याही युद्धात मला जिंकू शकलेला नाही, तर आता महादेवाच्या पुत्राचे सहाय्य घेऊन तो जिंकणार आहे का?”. असे म्हणत त्याने आपल्या सेनेला सज्ज होण्याचा आदेश दिला.
या पुढील काही श्लोकांमध्ये तारकासुराला कोणकोणते अपशकुन घडले याचे वर्णन कालीदासाने केले आहे. दैत्य सेनेला सूर्यकिरणांचा मिळणारा साठा बंद झाला, त्यांचे ध्वज आणि छत्र तुटून पडू लागले, सूर्याच्या चारी बाजूंनी काळ्या रंगाची मंडले तयार होऊ लागली, तारकाचे रक्त पान करण्याच्या अपेक्षेने गिधाडे कर्कश स्वरात ओरडू लागली, निखारे, रक्त, हाडे यांची वर्षा होऊ लागली. हत्ती, घोडे गडबडून पडू लागले, कुत्रे कर्णकटू स्वरात रडू लागले.
पण अशा या भयंकर अपशकुनांना तारकासुर घाबरणारा नव्हता. तो वीर योद्धा होता. काही लोकांनी त्याला समजावण्याचा देखील प्रयत्न केला, पण तो तसाच पुढे युद्धावर निघाला. त्याच वेळी जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांनी त्याचे राजछत्र उडून भूमीवर पडले. त्याच्या मुकुटातील काही मोती गळून पडले, पण तारकासुर निरुत्साही झाला नाही.
याचवेळी आकाशवाणी झाली, “हे मदांध तारका, तू मोठ्या घमेंडीत युद्ध करण्यासाठी चालला आहेस, पण आता तू या सहा दिवसाच्या कुमाराचा सामना करू शकणार नाहीस. त्यामुळे तू त्याला शरण जा जेणेकरून तू चिरकालपर्यंत जीवित राहशील”.
ही आकाशवाणी ऐकून तारका सुराला अत्यंत क्रोध आला. तो म्हणाला की तो कुमार तर मारला जाईलच, आणि सोबत तुम्हाला देखील याचा दंड भोगावा लागेल. असे म्हणत त्याने आपली तलवार बाहेर काढली आणि युद्धाला सुरुवात केली. कुमार मात्र बिलकुल डगमगला नाही आणि त्याने आपली प्रसन्न नजर देवसेनेवर फिरवली आणि त्यांचा उत्साह वाढवला. यानंतर दोन सेना एकमेकांना भिडल्या.
षोडश सर्ग – सुरासुर सैन्य संग्राम
सोळावा सर्ग वीर रसपूर्ण आहे. या सर्गात इंद्र आणि तारकासुराच्या सेना एकमेकात भिडल्या. येथे पदाती पदातिशी, रथी रथीशी, घोडे स्वार दुसऱ्या घोडे स्वाराशी, आणि हत्तीवरील योद्धा दुसऱ्या हत्तीवरील योद्ध्याशी युद्ध करीत होता. युद्धभूमीवर लढणाऱ्या युद्धांचे चमकणारे भाले रक्त पिण्यासाठी आसुसलेल्या यमाच्या जिभेसारखे दिसत होते. हळूहळू योग्य यांची मोडलेली शस्त्रे, प्राण्यांचे आणि सुरासुरांचे तुटलेले अवयव, रक्ताचे पाठ युद्धभूमीवर दिसू लागले. कधी कधी हत्ती देखील एखाद्या पदातीला आपल्या सोंडेत उचलून फेकू लागले तर कधी एखादा पदाती आपल्या तलवारीने हत्तीची सोंड उडवू लागला . मृत्युमुखी पडणाऱ्या वीरांचे अश्व त्यांच्या मृत शरीरापासून घुटमळत दुःख करू लागले.
या सर्व धामधुमीत मूर्च्छित पडणाऱ्या वीरांवर मात्र शत्रु पक्षातील कोणीही वार करत नव्हते. तो सचेत होईपर्यंत प्रतीक्षा केली जात होती. आपापसात लढणारे दोन रथी एक दुसऱ्याला मारून त्वरितच जवळ असणाऱ्या स्वर्गात पोहोचत होते. युद्धाची भीषणता वाढू लागल्यावर रक्ताच्या नद्या वाहू लागल्या आणि त्यात हत्तींचे समूह डुबू लागले, अशा प्रकारचे रौद्र रसाचे वर्णन कालिदासाने या सर्गात केले आहे.
सप्तदश सर्ग
या सतराव्या आणि शेवटच्या सर्गामध्ये तारकासुर आणि कुमार कार्तिके याचा अंतिम संग्राम येतो. तारकासुराने आपल्या बाणांच्या मार यांनी देवतांना त्राही भगवान करून सोडले होते. सर्पात्स्त्र सोडून त्याने सर्व देवतांना नागपाशात बंदीवान केले तेव्हा देव धावत कुमाराकडे आले. कुमाराने त्यांच्यावर दृष्टीस टाकतात त्यांचे नागपाश गळून पडले. ते पाहून तारकासुर क्रोधित झाला व त्याने सर्वप्रथम कुमाराचाच समाचार घेण्याचे ठरविले.
दोन्ही योद्धे समोरासमोर आल्यावर वेगवेगळ्या अस्त्रास्त्रांचे युद्ध सुरू झाले. तारकासुराच्या वायव्यस्त्राला कुमाराने आपल्या दिव्य अस्त्राने निष्प्रभ केले. त्याच्या आग्नेयस्त्राला कुमाराने वरुणास्त्र सोडून त्याचे निवारण केले. तो जे जे अस्त्र वापरत होता, कुमार त्याला प्रत्युत्तर देऊन निष्प्रभ करत होता. शेवटी तारकासुर संतापून तलवार उपसून कुमारावर धावून आला, त्यावेळी कुमाराने कालानला सारखी दिव्यशक्ती सोडून त्याचे प्राण हरण केले आणि ते पाहून देवतांना आणि इंद्राला मोठा आनंद झाला. महादेव पुत्र कुमारावर त्यावेळी कल्पवृक्षावरून पुष्पवृष्टी झाली. सर्व देवांनी कुमाराची आणि त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली.
अशाप्रकारे महादेवाचा आणि पार्वतीचा पुत्र कुमार याने देवांचा शत्रू तारक याला नष्ट करून इंद्राला पुन्हा स्वर्गाचे राज्य मिळवून दिले.
सतरा सर्गांपर्यंत उपलब्ध असलेले कालिदासाचे कुमारसंभव हे महाकाव्य, महादेव आणि पार्वती यांच्या पुत्राच्या निर्मितीमागे असणाऱ्या नाट्यमय घटनांचे वर्णन करते, त्यांचा विवाह, त्यांचा प्रणय आणि कार्तिकेचा जन्म, यानंतर त्याचे देवसेनेचे अधिपत्य स्वीकारणे आणि तारकासुराचा वध हे सर्व कथानक या महाकाव्यात येते. आपण याआधी पाहिल्याप्रमाणे पहिले आठ सर्ग कालिदासाने लिहिले अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला या आठ सर्गांवर विस्तृत विवेचन सर्व ठिकाणी पाहायला मिळते. सर्ग क्रमांक नऊ ते सतरा, यामधून कार्तिकेयाचा जन्म आणि त्यापुढील कथानक काहीशा त्रोटक स्वरूपात पाहायला मिळते.
या महाकाव्याचा अभ्यास करताना कालिदासाच्या कालात अस्तित्वात असणाऱ्या विविध धर्म संकल्पनांचा परिचय आपल्याला घडतो. याची सुरुवात नगाधिराज हिमालयाच्या राजधर्मापासून होते. त्याची पत्नी मेना, कन्या पार्वती यांच्या वागणुकीतून कालिदास आपल्याला स्त्री धर्माचे दर्शन घडवितो. हिमालयाच्या कौटुंबिक संवादातून पिता धर्माचे दर्शन घडते तर पार्वतीची तपश्चर्या, तिचे बटुशी होणारे संभाषण यातून आपल्याला यतीधर्म किंवा तापस धर्म याबद्दल समजते. शेवटच्या युद्धप्रसंगातून आपल्याला योद्धा धर्माचे दर्शन घडते.
कथानकात वेळोवेळी अतिथी सत्कार आपल्या दृष्टीस पडतो. हिमालय सप्तर्षींचे स्वागत करतो, पार्वती बटू चे स्वागत करते, हिमालय वरयात्रेचे स्वागत करतो, यातील विविध प्रसंगातून आपल्याला यजमानाचा धर्म आणि अतिथी सत्कार पद्धती याविषयी उमजत जाते.
कालिदासाच्या काव्यात अशा प्रकारे लोकजीवनाबरोबरच धर्म संकल्पनांचे दर्शन आपल्याला घडत राहते.
आभार : डॉ . मृणालिनी नेवाळकर, प्राध्यापिका , मुंबई विद्यापीठ.
