Hindu/Buddhist Spiritual Kashmir – सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीची आयुष्यात एकदा तरी काश्मीरला जायची इच्छा असते ती तेथील निसर्गसौन्दर्याचं वर्णन ऐकून. तिथली हिमाने आच्छादलेली गिरिशिखरे, सुंदर बागातील रंगबिरंगी ट्युलिपची फुलं, हिंदी सिनेमात वर्षानुवर्षे पाहिलेल्या सफरचंद, अक्रोड, केशर वगैरेंच्या बागा, तेथील बर्फात खेळण्याची वर्णनं या सर्वानी आपली उत्सुकता चाळवली नाही तर नवलच. त्याबरोबरच तेथील पश्मीना मेंढीच्या हातमागावर विणलेल्या शाली, विणकाम केलेले काश्मिरी ड्रेस मटेरियल, क्रिकेटच्या बॅट, कार्पेट्स या सर्व गोष्टी जेथे बनतात त्या जागी जाऊन खरेदी करणं ओघानेच येतं. काश्मीर पर्यटनावर असलेले दहशतवादाचे सावट आता ३७० कलम हटवले गेल्यावर बऱ्याच अंशी कमी झाल्याने व गेली २ वर्षे असलेले कोरोनाचे सावट देखील दूर झाल्याने काश्मिरात होणारी पर्यटकांची वर्दळ देखील आता वाढली आहे.

काश्मीरला जाणारा पर्यटक असतो आनंदात रमणारा. शिकाऱ्यात बसून दल सरोवरात फेरफटका मारायचा, एखादी रात्र याच सरोवरातील हाऊस बोट मधील ऐषोरामी खोल्यांमध्ये घालवायची, येथील अरु व बेताब व्हॅली यांसारख्या सुप्रसिद्ध दऱ्यांमध्ये फेरफटका मारायचा, येथील उद्यानांमध्ये काश्मिरी वेशभूषा करून छायाचित्र काढायची हेच पर्यटकांचे उद्दिष्ट असते.
यात सर्वच वयोगटातील पर्यटक असतात. यात लग्नानंतर मधुचंद्राला येणारी जोडपी जशी असतात तशीच मध्यमवयीन व आपापल्या लहानग्यांबरोबर येणारी जोडपी देखील असतात. यांच्या बरोबरीने पन्नाशी-पार व वृद्धत्वाकडे झुकलेले उतारवयीन पर्यटक देखील असतात. त्यामुळे आपल्याला अनेक नामवंत सहलसंस्थांचे सहल व्यवस्थापक आणि त्यांच्यासोबत जाणारा एक घोळका असेही दृश्य बरेचदा दिसते. यातही बरेच महाराष्ट्रातील पर्यटक असल्याने जागोजागी बरेचदा मराठी ऐकायला मिळते.
श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम ही आपल्या सर्वाना, ऐकून का होईना, परिचित असलेली पर्यटन स्थळे. आपल्या ५ ते ८ दिवसांच्या पर्यटनात हे पर्यटक जमेल त्या ठिकाणी प्रवास करतात व आनंदाच्या आठवणी सोबत घेऊन परततात.
पण या सर्वांपलीकडे देखील एक काश्मीर आहे. ते आहे ऐतिहासिक हिंदू व बौद्ध काश्मीर(Hindu/Buddhist Spiritual Kashmir) पण या वैभवशाली इतिहासाची आठवण अथवा माहिती फार थोड्या पर्यटकांना असते व ती देखील बरेचदा काश्मीरचे शेवटचे महाराज हरिसिंह यांची माहिती अथवा श्रीनगर मधीलच शंकराचार्य मंदिर, एवढीच मर्यादित असते. याचे महत्वाचे कारण म्हणजे बहुसंख्य पर्यटकांचा कल लक्षात घेऊनच पर्यटन संस्था त्यांच्या सहलीचे आयोजन बागा, खरेदी बाजार, दुकानं, बर्फाळ ठिकाणं या ठिकाणांसाठी करतात. पण या पलीकडेदेखील काश्मिरात तेथील देदीप्यमान इतिहासाची आठवण करून देतील असे स्तूप, पुरातन मंदिरांचे अवशेष व काही सुस्थितीतील मंदिरे आहेत. आपल्याला काश्मीरचे मूळ स्वरूप समजावून घ्यायचे असेल तर या जागा आवर्जून पाहायला हव्यात. काही वेळा लांबच्या अंतरांमुळे हे शक्य होत नसेल तर श्रीनगरातील मुख्य ठिकाणी असलेले श्री. प्रताप सिंह (SPS) हे संग्रहालय तर किमान ३-४ तासांचा अवधी काढून पाहायलाच हवे.
यासाठी थोडी पूर्वतयारी केली तर ते फायद्याचे ठरू शकेल. हा अभ्यास करण्यासाठी काश्मीरचा सुप्रसिद्ध कवी व इतिहासकार कल्हण याचे “राजतरंगिणी” हे पुस्तक नजरेखालून घालायला हवे. हे पुस्तक PDF स्वरूपात मराठीत देखील उपलब्ध आहे.
हा सर्व अभ्यास करून काश्मिरातील मोजकी सुंदर ठिकाणं, मंदिरं, स्तूप, अवशेष पाहता येऊ शकतात. यात हारवन येथील स्तूपाचे अवशेष, परिहासपूर येथील सम्राट ललितादित्याच्या राजधानीचे अवशेष, अवंतिपुर येथील अवंतीश्वर व अवंतीस्वामी मंदिरांचे अवशेष , सम्राट ललितादित्याने मट्टन (मार्तंडचे अपभ्रंशित रूप) या ठिकाणी बांधलेले सुप्रसिद्ध मार्तंड (सूर्य) मंदिर, जेष्ठागौरी व जेष्ठेश्वर (शंकराचार्य) मंदिर यांसारख्या असंख्य मंदिरांचा समावेश होतो. या काश्मिरात आपल्याला काय पाहायला मिळेल याची थोडक्यात माहिती आपण घेऊ.
हारवन येथील बौद्ध स्तूपाचे अवशेष

हारवन या श्रीनगरच्या बाहेरील बाजूस असलेल्या गावात, जुन्या बौद्ध मठाचे अवशेष आहेत. त्याच्या अवशेषांवरून या जागेचे महत्त्व समजणे फार कठीण आहे. परंतु या प्राचीन मठाने बौद्ध धर्माच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे. कुंडलवनच्या ज्या परिसरात कुशाण सम्राट कनिष्क याच्या आदेशा वरुन इसवी सनाच्या पहिल्या शतकात बौद्ध धर्माची चौथी परिषद भरली होती, तोच हा परिसर असावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. याच परिषदेत बौद्ध धर्माच्या महायान व हीनयान पंथांचा देखील उदय झाला असे मानण्यात येते.
Harwan is a historic Buddist place in Srinagar, (Jammu and Kashmir, India). It is nearly is 21 kilometers from the centre of Srinagar city and features remnants of Buddhist monuments.
इ.स.च्या पहिल्या शतकात काश्मीरमध्ये बौद्ध धर्माची भरभराट झाली त्यावेळी काश्मीर कुशाण साम्राज्याचा एक भाग होता. त्याचा महान सम्राट, कनिष्क (पहिला) हा बौद्ध धर्माचा समर्थक होता. त्याने पश्चिम अफगाणिस्तानपासून दक्षिणेकडील पाटलीपुत्र आणि मध्य आशिया आणि चीनमधील तारिम खोऱ्यापासून मध्य भारतापर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्यावर राज्य केले. काश्मीर हा देखील साम्राज्याचा एक भाग होता आणि गांधार प्रदेशाच्या पूर्वेकडील टोकाला वसला होता. या सम्राटाने व काश्मीर या स्थानाने, पुढे बौद्ध धर्माच्या वाढीसाठी आणि प्रसारासाठी महत्त्वाची भूमिका बजाविली, ती या चौथ्या बौद्ध धर्मीय परिषदेच्या स्वरूपात.
कनिष्काच्या काळापासून पुढे ८ व्या शतकापर्यंत बौद्ध धर्म हा काश्मीरमधील मुख्य धर्म राहिला, त्यानंतर त्याची जागा हळूहळू हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनाने घेतली. त्यानंतरच्या काळात, काही शतके, काश्मीरमध्ये इस्लामच्या आगमनाने बौद्ध धर्म नाहीसा होईपर्यंत दोघेही(हिंदू व बौद्ध धर्म) एकत्रित स्वरूपात अस्तित्वात होते.
हारवन मठ नेमका कधी बांधला गेला हे निश्चित सांगता येणे कठीण असले तरी उत्खननात सापडलेले पुरातत्वीय अवशेष १ल्या ते ६व्या शतकातील आहेत. या काळात, काश्मीरमध्ये असंख्य बौद्ध मठ होते, ज्यामध्ये हारवन आणि बारामुल्ला जिल्ह्यातील उष्कूर हे सर्वात प्रमुख होते. दुर्दैवाने, आज फारच थोडे पर्यटक, हारवन येथील बौद्ध स्थळाच्या अवशेषांना भेट देतात. हारवन हे गाव श्रीनगरच्या ईशान्येस सुमारे १८ किमी वर आहे. मुख्य रस्त्याच्या अगदी बाजूला एक छोटासा फलक आपल्याला मार्ग दर्शक ठरतो. येथून सुमारे १ किमी अंतर चढत वर गेल्यावर आपल्याला अत्यंत उत्कृष्ट अवस्थेत जतन केले जात असलेले हे स्थळ दृष्टीपथात येते.

या ठिकाणी खालच्या भागात विहार सदृश्य बांधकामाचे अवशेष दिसतात तर वरच्या भागात मंदिराच्या प्रकारची गोलाकार रचना (अथवा स्तूप) आणि एक अंगण होते असे दिसते. या वरच्या भागाच्या मागे, अजून उत्खनन बाकी असलेल्या आणखी संरचनांचे अवशेष असावेत. एकेकाळी संपूर्ण संकुल संपूर्ण टेकडीवर पसरलेले असावे असे वाटते.
या ठिकाणचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथे जतन केलेले तत्कालीन दगड, गोटे व मातीने लिंपलेल्या भिंतींचे अवशेष. या विहारातील भिंतींच्या तत्कालीन अवशेषांचे काही ठिकाणी पुनर्निर्माण करीत त्यांची योग्य ती निगाही राखली जात आहे.
बौद्ध धर्माच्या प्रसाराच्या गाथेमध्ये हारवन मठाचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. कारण ते या धर्माच्या स्थापनेपासून त्याचा सर्व दिशांना प्रसार होण्याचे एक मध्यवर्ती ठिकाण होते. दुर्दैवाने, आधुनिक काळात या जागेचे महत्त्व कुठेतरी हरवलेले दिसते. त्याच बरोबर बौद्ध धर्माच्या इतिहासातील काश्मीरचे महत्त्व देखील हरवले.
परिहासपूर येथील सम्राट ललितादित्याच्या साम्राज्याचे अवशेष

परिहासपूर अथवा पारसपूर हे काश्मीर खोर्यातील श्रीनगरच्या वायव्येस २२ किलोमीटर अंतरावर असलेले एक छोटेसे शहर. हे तत्कालीन झेलम नदीच्या प्रवाहाच्या वरच्या पठारावर बांधले गेले होते. हि नदी तेव्हा वितस्ता या नावाने ओळखली जाई. काश्मीरवर कर्कोटक घराण्याचा ललितादित्य मुक्तपीड राजा राज्य करत असताना (६९५-७३१) त्याने हे शहर वसवले होते आणि त्यांच्या कारकिर्दीत काश्मीरची राजधानी त्याने श्रीनगरहून परिहासपूर इथे हलविली. याविषयीची माहिती आपल्याला राजतरंगिणी या ऐतिहासिक दस्तावेजातून मिळते.

राजतरंगिणी हा कल्हण या कवीचा काश्मीरविषयक इतिहासाचा सुप्रसिद्ध ग्रंथ. कल्हण हा हर्ष राजाच्या कारकिर्दीत (१०८९-११०१) इ स ११०० च्या सुमारास जन्मला. त्याचे वडील चंपक हे हर्ष राजाच्या दरबारात प्रतिष्ठित मंत्री होते. या कल्हणानेच पुढे ११४८-४९ च्या सुमारास ८ तरंग (भाग) असलेला हा ग्रंथ सिद्ध केला. आपल्याला त्याकाळी ज्ञात असलेल्या राजांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास कल्हणाने या ग्रंथात शब्दबद्ध केल्याने याचे ऐतिहासिक मोल आहे. कल्हणाच्या या ग्रंथानुसार सम्राट ललितादित्याने परिहासपूर या भागात आपले निवासस्थान आणि चार मंदिरे बांधली. मंदिरांमध्ये विष्णूची मुक्तकेशव, परिहासकेशव, गोवर्धनधर व महावराह अशी चार मंदिरे होती. सम्राट ललितादित्याने यातील मुक्तकेशव मंदिरातील विष्णूची प्रतिमा तयार करण्यासाठी ८४००० तोळे सोने वापरले होते. याच्याशिवाय येथे एक तांब्याची बुद्धप्रतिमा देखील होती.
ललितादित्यच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने, वज्रदित्याने आपली राजधानी परत श्रीनगरला हलविली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या राजा अवंतीवर्मन याने ती पुन्हा तेथे आणली खरी परंतू वितस्ता (म्हणजेच आताची झेलम) नदीच्या प्रवाहातील अनैसर्गिक बदलांमुळे ती येथे फार काळ ठेवता आली नाही. अवंती वर्मनचा मुलगा शंकर वर्मन याने (इ स ८८३ ते ९०१) मग त्याची राजधानी शंकरपूर या नवीन शहरात हलवली. त्याने परिहासपूर येथील दगड त्याचे नवीन शहर वसविण्यासाठी वापरले व परिहासपूरचा ह्रास सुरु झाला. पुढे आणखी दोन शतकानंतर राजा हर्ष आणि उक्कला यांच्यातील युद्धादरम्यान (१०८९-११०१) उक्कलाने परिहासपूरमध्ये आश्रय घेतला. राजा हर्षाने उक्काला यापैकी एका इमारतीत असल्याचा विश्वास ठेवून ती जागा पेटवली. त्याने परिहासपूरच्या मूर्ती तोडल्या आणि वितळविल्या. पुढे चौदाव्या शतकात सुलतान सिकंदर बुतशिकन (इ स १३९४-१४१६) ने या मंदिरांचा संपूर्ण नाश केला.
पण लुटमार तिथेच संपली नाही. कल्हणाच्या राजतरंगिणी ग्रंथाचा ठावठिकाणा शोधून अतीव परिश्रम घेऊन इंग्रजी भाषांतर करणारे महान ब्रिटीश इंडोलॉजिस्ट ऑरिएल स्टीन यांनी राजतरंगिणी ग्रंथाच्या वर्णनाचा माग काढत १८९२ मध्ये या स्थळाला भेट दिली व या मंदिरांच्या अवशेषांचा धांडोळा घेतला. त्यानंतर पुन्हा मे १८९६ मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणाला भेट दिली व त्यांना तेथील परिस्थिती पाहून धक्काच बसला. त्यांच्या दोन भेटींमध्ये अनेक शिल्पे आणि दगड गहाळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जम्मू-काश्मीरचे महाराज झेलमचा बग्गी रस्ता बांधत होते आणि परिहासपुर येथील दगड या रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ऑरिएल स्टीनने महाराजांच्या दरबारात असलेल्या Sir Adelbert Talbot या ब्रिटिश अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि जे काही उरलेले अवशेष होते त्याचा उरला सुरला विनाश थांबविला.
आज आपल्याला या ठिकाणी ललितादित्याच्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. भव्य जोती असलेल्या या इमारतींचे अवशेष आपल्याला या वाड्यांची , मंदिराची भव्यता दर्शवितात. यात आपल्याला तत्कालीन वाड्यातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी असणारी सोय देखील दृष्टीस पडते.
मंदिराच्या जोत्याचे अवशेष असणाऱ्या इमारतीला चारही दिशांना पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूला मांडी घालून बसलेले भारवाहक यक्ष दिसतात. मात्र त्यानंतर केवळ वरच्या चौथऱ्यावर एक चबुतरा आहे या सर्व दगड इतरत्र विखुरलेले आढळतात. याही मंदिराच्या व येथील राजवाड्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. येथे अनेक भग्न मुर्त्या व दगड विखुरलेले आहेत.
श्री प्रतापसिंग (SPS) संग्रहालय
काश्मीरच्या अनेक पाहण्यासारख्या गोष्टींपैकी एक म्हणजे श्रीनगरमधील अप्रतिम श्री प्रतापसिंग संग्रहालय. मात्र काश्मीर पहायला येणाऱ्या पर्यटकांपैकी बरेचसे पर्यटक काश्मीरच्या या महत्त्वाच्या ठेव्याकडे दुर्लक्षच करतात.

भारताच्या इतिहासात काश्मीरला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. काश्मीरचा इतिहास जाणून घेतला तर हे स्थान महात्म्य आपल्या लक्षात येते व ते कळले तर आपला काश्मीर दर्शनाचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.
इ स १८९८ मधे स्थापन झालेले हे संग्रहालय म्हणजे एक खजिनाच. हा खजिना आपल्याला ६ दालनांत दृष्टीपथात येतो. यात पुरातत्त्वशास्त्र (Archeology), नाणकशास्त्र (Numismatic), Decorative Art, Jewelry, Arms and Artillery, चित्रकला (Painting), विविध भाषांमधील विविध प्रकारची हस्तलिखिते (Manuscripts in various forms and Scripts), संस्कृती व समाज (Culture and Society), Textile इत्यादीच्या ८०,००० हून अधिक वस्तूंचा समावेश होतो आणि अभ्यासकांसाठी तर दिवसही अपुरा पडेल इतका हा ठेवा आहे.


या संग्रहालयाबद्दल मायाजालावर इतर बरीच माहीती उपलब्ध आहे, तरीदेखिल प्रत्यक्ष बघण्याला पर्यायच नाही तेव्हा पुढच्या वेळी तुम्ही काश्मीरला याल तेव्हा श्रीनगरातील हा ठेवा पाहण्यासाठी १० ते ४ मधील किमान २ तासाचावेळ बाजुला काढून ठेवा.
काश्मीरमधील पर्यटक (अ)सुविधा
काश्मीर हे एवढे सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असूनदेखील येथे पर्यटकांसाठी असणाऱ्या सुविधांची मात्र वानवाच आहे. जे पर्यटक चांगल्या दर्जाच्या हॉटेल्स मध्ये (तीन ताराकिंत किंवा जास्त) राहतात त्यात त्यांना चांगल्या दर्जाची सेवा, स्वच्छतागृहे व न्याहारी उपलब्ध असते. थंडीपासून संरक्षणाकरिता उबदार खोल्या, बिछाने उपलब्ध असतात. पण सर्वसाधारण मध्यमवर्गीय पर्यटकांना मात्र या सोयी अभावानेच मिळतात. एकत्रितपणे बोलायचं झालं तर प्रवासादरम्यान, उद्यानांमध्ये अथवा इतर प्रेक्षणीय स्थळांपाशी तर स्वच्छतागृहांची परिस्थिती तर फारच वाईट आहे. म्हणूनच स्त्रियांची तर फारच कुचंबणा होते. सर्वसाधारणपणे काश्मीरचे अनुभव सांगताना तिथला निसर्ग, तिथली थंडी, खरेदी यांच्या वर्णनात स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, भोजनगृहे यांच्याबद्दल आपल्याला फारसे (वाईट) वाचायला अथवा ऐकायला मिळत नाही पण ते देखील एक भयानक वास्तव आहे. हे काही वेळा हाऊस बोटला देखील लागू पडल्याचे आम्ही ऐकले आहे. आपण “हे काय, आठवडाभरासाठीच आहे! सहन करू” या मानसिकतेत जातो व त्याची वाच्यता करीत नाही.
पर्यटन हेच काश्मीरमधील मुख्य उत्पन्नाचे साधन आहे, पण हे करतानाही पर्यटकांना लुबाडण्याचा प्रकार देखील घडतात. अतीव थंड व बर्फाच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना जॅकेट्स, गमबूट्स , हातमौजे वगैरे पुरविण्याच्या व्यवसायाखाली बरेच लुबाडले जाते, अरेरावी केली जाते. प्रत्येक ठिकाणी कोणतीही सेवा पुरविली किंवा पुरवायला मदत केली तरी घसघशीत बक्षिसाची अपेक्षा ठेवली जाते, नव्हे त्यावर अडवणूक देखील केली जाते व एखाद्या ठिकाणी थोडेसे कमी झाले तर पुढे निकृष्ट दर्जाची सेवा पुरविली जाते. येथील सेवादरांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने सामान्य पर्यटक लुबाडला जातो, पण याची वाच्यता मात्र टाळली जाते व त्यामुळे याबद्दल पुढच्या पर्यटकांना काहीच समजत नाही. हाच प्रकार हाऊसबोट वर मिळणाऱ्या सुविधा, तेथील स्वच्छता याबाबतीतही घडतो.
काश्मीर सुंदर आहेच पण त्याचे सौन्दर्य राखुन पर्यटन वाढवायचे असेल तर पुरविल्या जाणाऱ्या सेवा सुविधा यांमध्ये व्यवसायिकपणा यायला हवा.
काश्मीरमध्ये काही सुंदर पुरातन मंदिरदेखील आहेत. यातील काही प्रसिद्ध मंदिरांबद्दल म्हणजे अवंतिस्वामी, अवंतीश्वर व मार्तंड मंदिर याविषयी एका वेगळ्या लेखातून पाहू.
