अभिज्ञान शाकुंतलम (Abhigyan Shakuntalam) ही कालिदासाची उत्कृष्ट नाट्यकृती आहे. यातील मूळ कथानक महाभारतातील दुष्यंत आणि शकुंतलेच्या कथानकावर बेतलेले आहे. मात्र यात एक मूलभूत फरक आहे तो म्हणजे, महाभारतातील कथानक साधे सरळ असून त्यातील शकुंतला बाणेदार आहे. कण्व मुलींच्या आश्रमात आलेल्या राजा दुष्यंतचा जेव्हा शकुंतलेशी संबंध येतो, तेव्हा ती राजाला अट घालते की जर मला मुलगा झाला तर तो तुझ्या राज्याचा अधिपती असेल. मात्र मुलगी झाली तर मी तुझ्याकडे येणार नाही. राजा त्यावेळी ती अट मान्य करतो. शकुंतलेला मुलगा होतो, पुढे ती त्याचे पालनपोषण सुमारे सात ते आठ वर्षे करते. त्याच्यावर सर्व संस्कार केल्यानंतर ती त्याला घेऊन राजाकडे जाते. त्यावेळी राजा त्या मुलाचा आणि तिचा स्वीकार करण्यास नकार देतो. त्यावेळी स्वाभिमानी शकुंतला राजालाच सुनावते आणि त्याच्या आश्रयाची आपल्याला गरज नसल्याचे सांगते व परत आश्रमात जायला निघते. त्याचवेळी एक आकाशवाणी होते आणि ती आकाशवाणी हा मुलगा राजाचाच असल्याचे सांगते. त्याबरोबर दुष्यंत त्या मुलाचा आणि शकुंतलेचा स्वीकार करायला तयार होतो. त्याचबरोबर तो असेही म्हणतो की मला हे आधीच माहीत होते, पण लोकअपवादास्तव मला हे कबूल करता येणे शक्य नव्हते. कारण लोक म्हणतील की अपत्य नसलेला राजा कोणालाही अपत्य म्हणून स्वीकारतो आहे.
कालिदासाची शाकुंतलची कथा मात्र एक वेगळे वळण घेते. या नाटकातली शकुंतला वेगळी आहे. कालिदास स्वतःच्या स्वभाव धर्मानुसार तत्कालीन समाजाचे चित्र आपल्यासमोर मांडतो. यात तो लोकांच्या भावनांना महत्त्व देतो. त्याची प्रत्येक कृती जशी समाजातील चांगल्या गुणांचे चित्रण करणारी असते त्याचप्रमाणे हे शाकुंतल आणि त्यातील शकुंतला आहे. त्याचमुळे त्याने हे नाट्य रंगवताना मूळ कथानकात बदल करून, थोडेसे नाट्यमय प्रसंग टाकून या नाटकाला कलाटणी दिली आहे. या नाटकातील शकुंतला एक साधी आणि भोळीभाबडी आश्रम कन्या आहे. त्यामुळे आपल्यासमोर आलेल्या प्रसंगामुळे ती भांबावून जाते. पण दुष्यंत शकुंतलेचे एकत्रीकरण रंगवण्यासाठी कालिदासाने वेगळ्या कथानकाची मांडणी केली आहे.
कालिदासाचे हे नाटक सात अंकी असून धर्माच्या विविध संकल्पना आपल्याला विविध ठिकाणी या नाटकांमध्ये पाहायला मिळतात. कालिदासाने अनेक काल्पनिक पात्रे कथानकाच्या रंगण्यासाठी यात घातली आहेत. त्यातील प्रत्येक प्रसंग अभिनीत करण्यासाठी नाट्यमय करण्यात आलेला आहे. प्रत्येक नाटकात असते तसे विदूषकाचे पात्र देखील या नाटकांमध्ये असून तो राजा दुष्यंताचा मित्र आहे. या लेखाद्वारे आपण या ७ अंकी नाटकाचे कथानक थोडक्यात पाहू.
अंक पहिला
या अंकात दुष्यंत एका हरणाच्या मागे लागला असून त्याचा सारथी अतिशय वेगाने रथ पळवत त्या हरणाचा पाठलाग करतो आहे. ते हरिण देखील थोड्या थोड्या अंतराने थांबून आपला धोका वळून पाहते आहे. राजा त्या हरणाच्या जवळ येऊन त्यावर बाण सोडणार, एवढ्यात त्याला एका आश्रमकुमाराचा आवाज येतो की, हे आश्रमाचे हरीण आहेस त्याची हत्या करू नकोस. त्याला राजधर्माची आठवण करून देणारे एक वक्तव्य देखील या आश्रम कुमाराच्या तोंडी आहे, ते म्हणजे क्षत्रियांची शस्त्रे आर्त्रत्राणाय , म्हणजे दुबळ्यांच्या रक्षणासाठी असतात, निरपराधांच्या हत्येसाठी नव्हेत. ते ऐकून राजा थांबतो. ते पाहून प्रसन्न झालेला आश्रमवासी राजाला आशीर्वाद देतो की, तुला तुझ्यासारखा सुलक्षणी आणि चक्रवर्ती पुत्र होईल. आश्रमवासी त्याला आपल्या आश्रमात बोलावतात. त्यावर राजा दुष्यन्त, कुलपती कण्व आश्रमात आहेत का? याची विचारणा करतो. ते नसले तरी त्यांची मुलगी शकुंतला असल्याने तुमचा यथोचित सत्कार होईल, असे उत्तर त्याला मिळते. कण्व ऋषी शकुंतलेच्या कुंडलीतील दुष्ट ग्रह दूर करण्याकरता प्रभासतीर्थावर गेले असल्याची माहिती देखील राजाला मिळते.
राजा आश्रमात जाण्यापूर्वी आपली राजचिन्हे काढून रथात ठेवतो. तपोवनात प्रवेश करताना नत व्हायला हवे ही भावना त्यामागे असते. राजाच्या उजव्या हाताला कम्प सुटतो, हे त्याला आश्रमात शिरण्यापूर्वीचे सूचिन्ह वाटते. आश्रमाभोवतीच्या बागेत, आश्रमातील तीन कन्या झाडांना पाणी घालत संवाद करताना राजाला आढळतात. त्या म्हणजेच शकुंतला आणि तिच्या दोन सख्या अनुसूया आणि प्रियंवदा. (येथेही कालिदासाने मित्र किंवा सुहृद ही संकल्पना आपल्यासमोर ठेवली आहे). या ठिकाणच्या वर्णनात कालिदासाने निसर्गाचेही अतिशय सुंदर चित्रण केले आहे. आश्रमातील वनराई, लतांनी वेढलेला आम्रवृक्ष याचे वर्णन करताना त्याने शकुंतलेच्या तोंडी, आपल्या पतीला विळखा घालून बसलेल्या प्रणयणीप्रमाणे, असे त्या लतेचे वर्णन केले आहे. राजा झाडाच्या आडून त्या मैत्रिणींच्या तोंडचे संवाद ऐकतो आहे आणि त्यावरून शकुंतला ही कण्व कन्या असल्याचे त्याच्या लक्षात येते.
राजाच्या मनात एक शंका आहे ती म्हणजे कण्व तर ब्रह्मचारी आहेत मग ही त्यांची कन्या कशी? आणि जर ती ब्राह्मण कन्या असेल तर मी तिच्याशी प्रतिलोम विवाह कसा करू शकेन ? एका ब्राह्मण मुलीशी मी क्षत्रिय कसा काय विवाह करू शकेल, असे विचार राजाच्या मनात येतात. हे विचार दर्शवताना कालिदास धर्माचा विचार कसा सूक्ष्मपणे करत होता हे देखील आपल्या लक्षात येते.
याचवेळी एक भुंगा (भ्रमर), शकुंतलेला त्रास देऊ लागतो आणि ती तिच्या मैत्रिणींना मदत करायला सांगते, त्यावेळी त्या म्हणतात की तू राजा दुष्यंतला का बोलवत नाहीस? आश्रम परिसराचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्यच असते. हा देखील त्याच्या राजधर्माचाच भाग आहे. आणि हे त्यांचे संभाषण सुरू असतानाच दुष्यंत तेथे प्रवेश करतो. त्याला पाहताच त्या तिघी सुरुवातीला चकित होतात. पण लगेचच सावरून त्या त्याचे आदरातिथ्य करतात. त्याला एका वृक्षाखाली आसन देतात. आणि प्रियंवदा व अनुसया राजाला विचारतात, कोणत्या देशाचे लोक तुझ्या वनात येण्याने या क्षणी दुखी झाले आहेत? कोणता वंश त्यांच्या कुळात जन्म घेतल्याने आनंदी झाला आहे? त्यांची प्रश्न विचारण्याची ही पद्धत त्यांच्या अतिथी धर्माला साजेशीच अशी आहे. राजा देखील सुरुवातीला त्यांना सरळ उत्तर न देता, तो या राज्याच्या राजाने नियुक्त केलेला धर्माधिकारी, धर्मरक्षक असल्याचे सांगतो.
अशा धर्माधिकाऱ्यामुळे हे वनही आणि वनवासी देखील सनाथ झाल्याचे त्या सख्या दुष्यंतला सांगतात. ते ऐकून आणि त्यांचा हेतू ध्यानात होऊन शकुंतला गोरीमोरी होते.
त्यावर राजा शकुंतलेची चौकशी करतो. तिच्या सख्या अनुसूया आणि प्रियंवदा राजाला तिच्या गोत्राची कल्पना देतात. एका क्षत्रिय ऋषींपासून म्हणजे विश्वामित्रांपासून आणि स्वर्गीय अप्सरेपासून म्हणजे मेनकेपासून झालेली ही कन्या असल्याचे राजाला समजते. म्हणजेच ती क्षत्रिय कन्या आहे आणि त्यामुळे तिच्यासोबत विवाह करता येईल हा विचार राजाच्या मनात येतो.
यावर ती विवाहित आहे की विवाहयोग्य आहे? तिचा विवाह ठरला आहे का? ती विवाह करणार आहे का? असे अनेक प्रश्न राजा विचारतो. त्यावेळी तिच्या सख्या, “तिचा विवाह योग्य वर मिळतात होईल” असे सांगतात आणि शकुंतला लाजते. तो आपली अंगठी काढून तिला देतो. तो राजा नाही असे दाखवण्याचा जरी प्रयत्न करत असला तरी त्याच्या वागणुकीवरून तो राजा असल्याचे त्या कन्या ओळखतात. आम्ही आर्यांचे आभार मानायचे की महाराजांचे? असा प्रश्नच त्या करतात. त्याच वेळी रानटी हत्तींचा आश्रमावर हल्ला झाल्याची बातमी येते व आपले कर्तव्य आणि राजधर्म निभावण्यासाठी राजा तिथून लगेच निघतो.
दुसरा अंक
दुसरा अंक सुरू होतो तो विदूषक माधव्य याच्या प्रवेशाने. विदूषक शिकारीची अवहेलना करतो आहे, कारण वनात राहून त्याचे हाल होत आहेत. पण राजा शिकारीला आल्यामुळे त्यालाही राजा बरोबर रहावे लागते आहे. आता राजाही म्हणतो की मलाही विश्रांती हवी आहे तुझे ऐकतो आणि मी देखील थांबतो. आता याचे कारण म्हणजे शकुंतलेच्या सहवासासाठी राजालाही आश्रमात थांबायचे आहे.
राजा विदूषकाला शकुंतले बद्दल सांगतो. तो राजाची थट्टा करतो. आता राजधानीला आणि वनातल्या शिकारीलाही कंटाळून तू एका तापसीच्या मागे लागला आहेस का? तेव्हा राजा म्हणतो “आम्ही पुरुवंशीय राजे ज्या गोष्टीची अभिलाषा राजाने धरू नये अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही”, ती विश्वामित्र आणि मेनकेची कन्या म्हणजेच क्षत्रिय कन्या आहे. ती देखील माझ्याकडे पाहून लाजते आहे. जाताना ती मागे मागे पाहतच गेली. तेव्हा विदूषक म्हणतो तू आता तपोवनाला उपवनच बनवले तर.
त्याचवेळी आश्रमातून निरोप येतो. राक्षस आश्रमाला त्रास देत आहेत. दुसरीकडे राजमातेचाही निरोप येतो. तिचे व्रत पूर्ण झाले आहे आणि समापनासाठी तिने दुष्यंत त्याला बोलावले आहे. त्यावेळी दुष्यंत म्हणतो, विदूषक म्हणजे तिचा दुसरा पुत्रच आहे, मला बंधूसारखाच आहे म्हणून तोच जाईल. याचे कारण म्हणजे इथे मला राक्षसांचा बंदोबस्त करायचा आहे. विदूषक राजधानीत परत जायला आनंदाने तयार होतो.
फक्त दुष्यंतला एक शंका आहे ती म्हणजे विदूषक इतर राहण्यांकडे किंवा राजवाड्यात शकुंतले बद्दल काहीतरी बोलेल. तेव्हा तो त्याला जाण्यापूर्वी सांगतो की शकुंतले बद्दल जे बोललो ते विसरून जा ती केवळ एक गंमत होती. विदूषक होकार देतो आणि परत जायला तयार होतो.
तिसरा अंक
तिसरा अंक सुरु होतो तेव्हा आश्रमात शांत वातावरण आहे. राक्षसांचा बंदोबस्त झालेला आहे. शकुंतला काही आजाराने ग्रस्त आहे म्हणून शकुंतलेच्या सख्या तिची सेवा करत आहेत. तिला उटी लावून थंड राखण्याचा प्रयत्न करत आहेत. तिला उष्माघात झाला असल्याने शीतल उपचार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण त्याचबरोबर दुष्यंतला पाहिल्यानंतर तिची अशी ही अवस्था झाली हे त्यांच्या लक्षात आल्याने, त्या तिची थट्टा ही करत आहेत की हा उष्माघात नसून ही मदनबाधा असावी. दोघेही एकमेकाला अनुरूप असल्याने त्या देखील यात सामील आहेत. त्यांची चाललेली चर्चा राजा ऐकतो. त्यावेळी त्याला त्या शशांकलेखा (चंद्रकोर म्हणजे शकुंतला) आणि तिच्या सख्या म्हणजे, विशाखा नक्षत्रांच्या दोन ताऱ्यांचा समान भासतात.

त्यांच्या गप्पा दरम्यान प्रियंवदा व अनुसया तिला कमलपत्रावर नखांनी प्रेमपत्र लिहायचे सुचवितात. शकुंतला हे प्रेम पत्र लिहिते आहे आणि तिची ती अवस्था तिच्या बोलण्यातून सुचित झालेली ऐकून, त्याचवेळी राजा दुष्यंत तिथे प्रवेश करतो. तो देखील आपल्याला मदनबाधा झाल्याचे सांगतो. तिच्या सख्या त्यावेळी राजाला तो बहुवल्लभा ( म्हणजे अनेक पत्नी असलेला) असल्याचे सूचित करतात आणि अशा परिस्थितीत आमच्या सखीची स्थिती काय असेल? असा प्रश्न करतात.
तेव्हा राजा उत्तरतो “जरी मला अनेक पत्नी असल्या तरी केवळ शकुंतला आणि पृथ्वी या दोनच माझ्या कुलाच्या प्रतिष्ठा असतील”. ते ऐकून त्या सख्या संतुष्ट होतात. त्या त्यांना एकांतात तिथेच सोडून निघून जातात. त्यावेळी शकुंतला राजाला म्हणते, मी माझे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. त्याचवेळी ते आर्या गौतमीला, शांतोद्यक घेऊन येताना पाहते आणि राजाला लपायला सांगते.
आर्या गौतमी ते उदक शकुंतलेच्या अंगावर शिंपडते. त्याचवेळी पुन्हा एकदा राक्षसांचा आश्रमावर हल्ला झाल्याची बातमी येते आणि राजाला तिथून निघावे लागते.
चौथा अंक
प्रियंवदा आणि अनुसया दुष्यन्त आणि शकुंतलेच्या गांधर्व विवाहाने आनंदी झालेल्या आहेत. राजाला पुन्हा राजधानीत परतावे लागले आहे. जाण्यापूर्वी दुष्यंताने आपली अंगठी तिच्याकडे दिली आणि तिला सांगितले की या अंगठीवरचे अक्षरे रोज एक एक करून मोज. त्यावरील सर्व अक्षरे संपायच्या आधीच मी तुला राजधानीत बोलवण्यासाठी माझा लवाजमा पाठवेन.

राजा राजधानीत परत गेल्याने दुखी झालेली शकुंतला, स्वतःच्याच दुःखात हरवून बसली आहे. त्यामुळे आश्रमात आलेल्या दुर्वास मुनींकडे तिचे लक्ष गेले नाही. आपला योग्य तो आदर सत्कार न झाल्याने दुर्वास संतापले आणि त्यांनी तिला शाप दिला, “तू ज्याच्या आठवणींमुळे माझ्याकडे दुर्लक्ष केलेस त्याला तुझे विस्मरण होईल”. हा शाप शकुंतलेने ऐकला नाही, पण तिच्या दोन्ही संख्यांनी मात्र ऐकला, आणि तात्काळ दुर्वासांकडे उ:शाप मागितला. तेव्हा त्यांनी एखाद्या खुणेच्या वस्तूमुळे त्याला अभिज्ञान होईल असा उ:शाप दिला. अनुसूया आणि प्रियंवदा ही गोष्ट शकुंतलेला न सांगण्याचे ठरवितात. ती आधीच दुःखी आहे आणि या शापाची माहिती देऊन तिला आणखी दुःख द्यायची त्यांची इच्छा नसते. शिवाय दुष्यंताची अंगठी त्यांच्याकडे असल्याने अभिज्ञान करून देणारी वस्तू आपल्याकडे आहे या विचाराने त्या निश्चिंत होतात.
काही दिवसांनी कण्व आश्रमात परततात. एका दैवीवाणीने त्यांना दुष्यंत आणि शकुंतला यांच्या संबंधांची माहिती दिलेली आहे. शकुंतला आता गरोदर आहे. आश्रमातील मुली तिची काळजी घेतात, सर्व प्रकारे सेवा करतात, मात्र ती चिंतीत आहे कारण अजून हस्तीनापुर हुन कोणताही निरोप आलेला नाही. कण्व तीची हस्तिनापुरला पाठवणी करायचे ठरवतात. तेव्हा तिच्या सख्या तिला वनदेवतांनी, लतावेलींनी एखाद्या राणीसारखे सजवतात.
असे म्हणतात की संस्कृत साहित्यात नाटक श्रेष्ठ आहे, नाटकात शाकुंतल श्रेष्ठ आहे, आणि या शाकुंतलात चौथा अंक श्रेष्ठ आहे. या श्रेष्ठत्वाचे कारण आपल्याला यापुढील संवादांमध्ये कळते जेथे कण्वना शकुंतलेची पाठवणी राजा दुष्यंतताकडे करायची आहे.
कण्वना पाठवणी करताना भरून येते. मी एक तपस्वी, ब्रह्मचारी असून माझी, माझ्या मानलेल्या कन्येवरील प्रेमाने, जर ही स्थिती असेल, तर गृहस्थ आपल्या मुलीची पाठवणी कशी सहन करत असतील? असे म्हणत ते तिला, शर्मिष्ठा जशी ययातिची प्रेमिका पत्नी बनली आणि त्याला पुत्र दिला, तशीच तुही बन, असा आशीर्वाद देतात. त्यावर आर्या गौतमी म्हणते हा केवळ आशीर्वादच नाही तर हा वर आहे.
शार्ङ्गरव् आणि शारद्वत हे आश्रमातील दोन शिष्य तिला वनातून सोबत करीत असतात. सोबत आर्या गौतमी देखील असते. कण्व राजाला देण्यासाठी निरोप देतात, आम्ही वनात राहणारे मुनिजन सत्शीलतेने आचरण करतो, तुझेही कुल एक उच्च कुल आहे. त्यामुळे एक वधूपिता म्हणून मी तुझ्याकडे पाहतो आहे कि तू माझ्या कन्येची योग्य ती काळजी घेशील.
यावेळी कण्व तिला पत्नी धर्म सांगतात, “कुटुंबातील सर्व थोरामोठ्यांचे मार्गदर्शन घेऊन रहा, तिथे अनेक सवती असतील त्यांच्याशी चांगली मैत्री करून रहा. पती जरी कठोर वागला तरी रागावू नकोस. सेवकांना भरभरून दे. भाग्य उजळले तरी ताठा मिरवू नकोस. जर स्त्री अशी वागली तरच ती गृहिणीपदाला पोहोचते”. अशा अनेक प्रकारे ते तिला उपदेश करतात. आर्या गौतमी देखील त्याला मान्यता देते.
आता शकुंतला दुःखी आहे, कारण तिच्यातील कन्या जागी झाली आहे. चंदनाचा वेल / झाड एका ठिकाणाहून उपटून दुसरीकडे लावले तर ते कसे जगेल? अशा प्रकारचे वक्तव्य ती करते. यावर कण्व तीचे सांत्वन करतात. तू तिथे रमलीस की हळूहळू आम्हाला विसरशील. तू तिथे सर्व सुखे उपभोगून वानप्रस्थाश्रमात परत येशील तेव्हा पुन्हा आपली भेट होईल, असा विश्वास ते तिला देतात.
तिच्या सख्या हळूच तिला सांगतात, की जर राजाने तुला ओळखले नाही तर ही अंगठी त्याला आपली ओळख म्हणून दाखव. यावर तिच्या मनात काळजीची आणि शंकेची पाल चुकचुकते. तेव्हा तिच्या सख्या, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून काळजीपोटी असे बोलल्याचे सांगतात.
पाचवा अंक
शार्ङ्गरव् आणि शारद्वत या दोन शिष्यांबरोबर आणि आर्या गौतमीसह शकुंतला राजधानीत पोहोचते. राजा दुष्यंताला तपसव्यांच्या आगमनाची वर्दी दिली जाते. त्यांना अग्निशाळेत पाठवून आश्रमवासीयांचे श्रौत विधीने स्वागत करण्यासाठी, राजा पुरोहितांना बोलावणे पाठवितो. शकुंतला अग्निशाळेत फिरत असताना तिचा उजवा डोळा लवतो आहे. हा शकुन काही बरोबर नाही.
दोन आश्रमवासियांसोबत दोन स्त्रियांना पाहून राजा गोंधळून जातो. यावेळी शकुंतलेचा चेहरा अवगुंठीत आहे. राजाला ती विवाहिता वाटते, आणि परकलत्र असल्याने तिच्याकडे पाहणे चुकीचे आहे असे राजा ठरवितो. शापाच्या प्रभावामुळे राजा तिला ओळखत नाही. तिने तिच्या चेहऱ्यावरचे अवगुंठण काढल्यावर देखील तो ओळखत नाही. तो तिच्याकडे पाहत नाही. हे पाहून प्रतिहारी देखील राजाला नावाजतो, की राजा पर-पत्नीकडे वाकड्या नजरेने पाहत नाही.
त्या दोन शिष्यांकडून कण्व ऋषींचा निरोप राजाला कळवला जातो. त्याला शकुंतलेबद्दल ऐकून आश्चर्य वाटते. त्याला तिच्याबद्दल काहीही आठवत नाही याचे कारण म्हणजे दुर्वास ऋषींच्या शापाचा प्रभाव. येथे आपल्याला वेगळी धर्म संकल्पना समोर येते, ती या शापाच्या प्रभावाच्या स्वरूपात. कोणत्याही कृत्याचे परिणाम धर्मानुसार भोगावेच लागतात याची आठवण कालिदास आपल्याला याद्वारे करून देतो.
आर्या गौतमी राजाला गांधर्व विवाहाची आठवण करून देते. शार्ङ्गरव् देखील राजाला समजावतो. शकुंतला राजाला आठवण करून देण्याचा प्रयत्न करते. ती त्याला सुरुवातीला आर्यपुत्र म्हणून संबोधते, पण जसे तिच्या लक्षात येते की तो ओळख दाखवायला तयार नाही, तेव्हा पुढे ती त्याचे संबोधन पौरव असे करते. ती राजाला दाखवण्यासाठी अंगठी काढू पाहते पण तिच्या लक्षात येते की ती अंगठी हरवली आहे. तेव्हा तेव्हा गौतमीच्या लक्षात येते की ही अंगठी शची तीर्थावर अर्घ्य देताना पाण्यात पडली असावी, कारण ती शकुंतलेच्या बोटाच्या आकारापेक्षा मोठी होती. पण दुष्यंतला हे एक लटके कारण वाटते.
यावर शकुंतला त्याला त्यांच्या एकांतातल्या नाजूक क्षणांची आठवण करून देते. आपण दोघे एकत्र बसलो असताना आश्रमातले हरणीचे पाडस राजाच्या जवळ येत नव्हते, पण शकुंतलेने बोलावल्यावर ते तात्काळ तिच्या जवळ आले. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की, तुम्ही दोघेही वनवासी आहात म्हणून एकमेकांच्या इतके जवळ आहात.
राजाला यातील काहीच आठवत नाही. मात्र अशावेळी तो बोलून जातो, स्त्रिया जन्मतःच चतुर असतात. कोकीळ जशी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात घालते आणि कावळीला ते समजत नाही, अप्सराही तशाच म्हणजे परभ्रूता किंवा दुसऱ्यांनी वाढवलेल्या असतात. पक्षी जसे द्विज तसेच ब्राह्मण ही द्विज, अप्सरांनी सोडून दिलेली बाळे म्हणजेच कोकीळ जशी कावळ्यावर आपली पिल्ले लादते, तसेच या अप्सरांचे वागणे. त्यांची बाळे देखील ब्राह्मण वाढवितात.
शकुंतलेला हा आपल्या आईचा, म्हणजे मेनकेचा अपमान वाटतो. राजा तिला स्वीकारायला तयार नाही. शार्ङ्गरव् राजाला सांगतो, की ही तुझीच पत्नी आहे, तूच तिचे काय करायचे ते ठरव. पत्नीवर केवळ तिच्या पतीचा अधिकार असतो, हा धर्म देखील कालिदास आपल्याला याद्वारे दाखवून देत आहे. यावेळी अग्निशाळेत प्रियंवदा, अनुसूया किंवा विदूषक यापैकी कोणीही नाही. गौतमी आणि शार्ङ्गरव् तेथून निघतात. जाताना शार्ङ्गरव् कठोरपणे तिला सांगतो, स्वतःचे निर्णय स्वतःच घेणारी तूच पूरोभागा आहेस. तू आमच्याबरोबर येऊ नये. कारण राजा जसे म्हणतो तसे असेल तर, तू कलंकिनी आहेस. आणि जर तू जे म्हणतेस ते बरोबर असेल तर तू तुझ्या पतीचीच दासी बनवून रहा.
हे सर्व एकूण राजा दुष्यंत द्रवत नाही पण गडबडतो. त्याच्यावर अजूनही दुर्वासांच्या शापाचा प्रभाव आहे. तो पुरोहिताला म्हणतो, या परस्त्रीला मी कसा स्पर्श करू?. आणि जर ही म्हणते तशी ती खरच माझी पत्नी असेल तर मी दारत्यागी म्हणजे पत्नीचा त्याग करणारा ठरेन. तेव्हा सोमरात पुरोहित यावर तोडगा काढत म्हणतो, मी तिला सोबत माझ्या घरी घेऊन जातो. जर तिला चक्रवर्ती लक्षणांचा पुत्र झाला तर राजाने तिचा पुत्रासह स्वीकार करावा. अन्यथा आपण तिला कण्व ऋषींच्या आश्रमात परत पाठवू.
सोमरात पुरोहित तिला घेऊन जात असताना एक चमत्कार होतो. एक अप्सरा तिथे अवतीर्ण होते आणि तिला स्वतःबरोबर घेऊन जाते.
सहावा अंक
या अंकामध्ये एका कोळ्याला शक्रावतार तीर्थावर माशाच्या पोटात राजाची अंगठी मिळाली आहे. नगररक्षकांनी त्या कोळ्याला धरून ही अंगठी त्याला नक्की कशी मिळाली कुठे मिळाली याबद्दल चौकशी करणे चालू आहे. तो वारंवार ही अंगठी माशाच्या पोटात मिळाल्याचे सांगतो. यावेळी शाल हा त्या नगररक्षकांचा प्रमुख ती अंगठी घेऊन राजाकडे जातो आणि ती अंगठी बघितल्यावर राजाला अभिज्ञान होते आणि तो त्या कोळ्याला सोडून देण्याचा इतकेच नाही तर त्यांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतो.
आता हे बक्षीस तो कोळी, नगररक्षक, आणि शाल एकमेकांमध्ये वाटून घ्यायचे ठरवतात आणि हा सुटकेचा आणि मिळालेल्या बक्षिसाचा आनंद एकत्र साजरा करतात. समाजातील खालच्या स्तरातील लोकांचे चित्रण कालिदासाने यथार्थपणे केले आहे. त्याकाळी देखील या स्तरातील लोक छोट्याशा बक्षीसाने खुश होऊन तो आनंद सर्व विसरून एकत्र साजरे करत असत हे आपल्याला या प्रसंगातून दिसून येते
राजाला आता शकुंतलेची तीव्रतेने आठवण येते. पण तिचा नक्की ठावठिकाणा राजाला माहित नाही. त्यामुळे तो विदूषकाकडून शकुंतलेचे चित्र काढून घेत आहे. तो फार व्याकुळ झालाय.
याचवेळी राजाच्या समोर एक घटना निर्णय घेण्यासाठी येते. धनमित्र नावाचा व्यापारी व्यापारासाठी नगराबाहेर गेला असताना त्याचा मृत्यू झाला. या व्यापाऱ्याला मूलबाळ नाही. राज्याच्या नियमाप्रमाणे त्याची संपत्ती राजकोषात जमा व्हायला हवी. यावर आता हळवा झालेला राजा आपल्या मंत्री गणांना शोध घ्यायला सांगतो की त्याच्या अनेक पत्नींपैकी कोणी गर्भार आहे का? यावर एक पत्नी गर्भार असून तिचा पुंसवन संस्कार झाला असल्याचे राजाला समजते. यावरून राजा आपल्या निर्णयात बदल करून त्या व्यापाराची संपत्ती पुढे होणाऱ्या अपत्याला देण्यात यावी अशा अर्थाचा कायदा करतो.
पुन्हा निपुत्रिक राजाला आठवण होते ती शकुंतलेची. राजा दुःखात आहे. पण याचवेळी इंद्राचा सारथी मातली तिथे प्रकटतो आणि राजा दुष्यंताला दुर्जय नावाच्या राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी इंद्राचे आमंत्रण देतो. येथे प्रश्न राजधर्माचा असल्याने दुष्यंत राजा ते आमंत्रण स्वीकारतो आणि स-सैन्य इंद्रलोकात जातो.
सातवा अंक
या अंकामध्ये राजा दुष्यंताने दुर्जय राक्षसाचा पराभव करण्याकरता इंद्राला मदत केली म्हणून तो इंद्राचा सत्कार स्वीकारतो. येथून राजा परत आपल्या राज्यात हस्तीनापुरला येण्यासाठी निघाला आहे. वाटेत तो हेमकुट पर्वतावर, मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये ऋषी कश्यप आणि देवमाता अदितीची भेट घेण्यासाठी थांबतो. इथे पुन्हा त्याचा उजवा डोळा लवतो व त्याला काहीतरी चांगले घडणार असल्याचा संकेत मिळतो. इथे मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये सिंहाच्या छाव्याशी खेळणारा एक बालक त्याला दिसतो. तो त्या छाव्याचे तोंड उघडून त्याचे दात मोजायचा प्रयत्न करत असतो. त्याच्या सोबतच्या दोन स्त्रियांकडून त्याचे नाव सर्वदमन असल्याचे राजा दुष्यंतला समजते. राजाला त्याच्यात चक्रवर्तीची लक्षणे दिसतात.
ही तर क्षत्रियांची लक्षणे. ही या ऋषी कुमारात कुठून आली? तो त्याच्या सोबतच्या दोन स्त्रियांना त्या बाळाबद्दल विचारतो तेव्हा तो बालक पूरु कुटुंबातील असल्याचे त्या सांगतात. यावर राजाला आणखीनच आश्चर्य वाटते. त्याचवेळी त्या शकुंत पक्षाचा उल्लेख करतात आणि तो बाळ, कुठे माझी आई? असे त्यांना विचारतो. तेव्हा राजाला या बाळाची आई शकुंतला असेल असा संशय येतो.
या बाळाच्या हातात असणारे रक्षा कंकण त्याचवेळी खाली पडते. राजा ते उचलून घेतो आणि त्याला देतो. त्या स्त्रिया त्याला अडवू पाहतात. पण राजा झटक्यात ते उचलतो आणि पुन्हा त्याला देतो. राजाला काहीच होत नाही हे पाहून त्या स्त्रियांना आश्चर्य वाटते. या आश्चर्याचे कारण विचारल्यावर त्या सांगतात की जर या मुलाच्या आई-वडिलांव्यतिरिक्त या कंकणाला कुणी हात लावला तर त्याला लगेच सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होईल. आणि या प्रकारच्या घटना याआधी देखील घडलेल्या आहेत. त्यावरून राजा दुष्यंतची खात्री पडते की आपणच या बाळाचे पिता आहोत. त्याचवेळी येणाऱ्या कृश झालेल्या शकुंतलेेकडे त्याची दृष्टी पडते. तो शकुंतलेला सर्व घटनाक्रम सांगून तिची क्षमा मागतो. त्यानंतर मारीच त्यांना दुर्वासांच्या शापाची कथा सांगून त्यांच्यातील कटुता कमी करतात व येथे हा नाट्यक्रम संपतो .
आभार : डॉ . मृणालिनी नेवाळकर, प्राध्यापिका , मुंबई विद्यापीठ.
