

Narmada Parikrama – Amarkantak to Dindouri
अमरकंटकाच्या गोड गुलाबी थंडीत आज थोडं उशिरा उठता आलं. रामघाट जवळच होता. सकाळची आरती व नर्मदाष्टक तेथेच करायचे ठरलं व सर्वजण शेजारील कल्याण आश्रम, मृत्युंजय आश्रम पहात राम घाटावर पोहोचलो. नर्मदा मातेचे साग्रसंगीत पूजन करुन आरत्या केल्या व तसेच नर्मदाष्टक देखील पूर्ण केले.
नर्मदाष्टक ७
अलक्षलक्ष लक्षपाप लक्ष सार सायुधं
ततस्तु जीवजंतु तंतु भुक्तिमुक्ति दायकं
विरन्ची विष्णु शंकरं स्वकीयधाम वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे॥७॥
भावार्थ – तू असंख्य दृश्य व अदृश्य अशांच्या लक्षावधी पापराशींचा नाश करणारी आहेस.तूच सर्व जीवजंतूना भोग आणि मोक्ष प्रदान करणारी आहेस.तूच ब्रह्मा, विष्णु व महेश यांना त्यांच्या धामावर प्रस्थापित करणारी आहेस. अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

अमरकंटकमध्ये कल्याण सेवा आश्रम आणि मृत्युंजय आश्रम हे २ आश्रम पाहण्यासारखे आहेत. या पैकी यातील मृत्युंजय आश्रमात झाशीची राणी, मगरींवर उभी असलेली शिवपुत्री नर्मदा यांचे देखणे पुतळे आहेत.
अमरकंटक येथे बाहेर फिरताना शेजारच्या धर्मशाळेपाशी महाराष्ट्रातील येवला या ठिकाणाहून आलेले यात्रेकरू भेटले. त्यातही बऱ्याच स्त्रिया होत्या. बिचाऱ्या प्रवासाने बेजार झाल्या होत्या. थोडीशी चौकशी करताच कळले की त्यांच्यापैकी बरेच जण बदलत्या पाण्याचा त्रास झाल्यामुळे आजारी पडले होते. बस मधे सुमारे ४० यात्रेकरू, आचारी, इ धरून ५० जण होते. त्याना कपिलधारा व दुधधारा या तीर्थांपाशी व घाटावर स्नानाला जायचे होते व त्यासाठी त्यांच्या सहल आयोजकाने त्यांना जीपवाल्यांशी संगनमत करून प्रत्येकी ३००/- अधिक सांगितले होते, कारण काय तर तिथे बस जात नाही (आम्ही मात्र काल बसनेच गेलो होतो). भोळ्या भाबड्या भाविकांना असेही लुबाडले जाते. पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी, शुद्ध पाणी मिळण्याचे महत्त्व आपल्याला इथे लक्षात येते. “पेट सलामत तो यात्रा पचास”.

दुपारच्या भोजनानंतर आम्ही छोट्या गाड्यांमधून नर्मदेच्या उगमस्थानाकडे निघालो. “माई का बगीचा” नावाच्या या ठिकाणी एका छोट्याश्या कुंडात हा उगम असल्याची धारणा आहे. तेथून पुढे “नर्मदा उद्गम मंदिर” समूहापर्यंत भूगर्भाखालून प्रवास करते (सुमारे १ किमी). नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांनी माई का बगीचा इथे नर्मदेला उत्तर तटावरून दक्षिण तटाकडे येण्यासाठी वळसा घातला की पुन्हा उत्तर बाजूकडे न जाण्याची काळजी घ्यायची असते. तसे फलक पण जागोजागी असतात.
अमरकंटकला एक श्रीयंत्र मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १९९१ मध्ये सुरु झालेय पण अजून पूर्ण झालेले नाही याचे मुख्य कारण म्हणजे या मंदिराचे निर्माणकार्य फक्त गुरु पुष्य योगाच्या पंधरवड्यातच सुरु राहाते व इतर वर्षभर ते बंद ठेवले जाते. या मंदिराची निर्मिती महामंडलेश्वर अटल पीठाधीश्वर स्वामी सुखदेवानंद यांच्या देखरेखीखाली होत आहे.


येथून जवळच अजून दोन नद्या उगम पावतात, भद्रा व शोण. पण यातील भद्रा नदी अगदी १०-२० फुटातच शोण नदीला मिळते (संगम) व हि शोण नदी पुढे पूर्व दिशेने वाहात जाते (म्हणजेच नर्मदेच्या अगदी विरुद्ध दिशेने).
परतीच्या वाटेत अजून एक वयोवृद्ध परिक्रमवासी भेटले. वय वर्षे ७६. दंतेवाडा परिसरातील जंगलातून एकटेच चालले होते. गेली २ वर्षे परिक्रमेत आहेत. आता ओंकारेश्वरला पुन्हा पोहोचतील तेव्हा ही परिक्रमा पूर्ण होईल. वाटेत गाव, मंदिरे, धर्मशाळा अशा ठिकाणी मुक्काम करायचा. लोक श्रद्धेने देतील तेवढे खायचे. चातुर्मासात एखाद्याच ठिकाणी मुक्काम करुन रहायचं असा दिनक्रम. मैय्या वरती प्रचंड श्रद्धा.

आम्ही तरी सुखवस्तू पद्धतीने राहतो, जेवतो व फिरतो आहोत. पण आज सकाळी भेटलेले येवलेकर यात्रेकरू असो, की हे ७६ वर्षाचे एकट्याने चालणारे बाबा, माणसे नक्की कोणत्या अपेक्षेने की श्रद्धेने हे खडतर कर्म करतात याचाच विचार करीत राहिलो.
अमरकंटकहून आजचा प्रवास छोटासा होता. अगदी १०० किमी हुन कमी. त्यामुळे साधारण २ तासात दिंडोरी या पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.

