

सुमारे २०० किमी चा प्रवास करून आम्ही “नेमावर” या ठिकाणी आलो. अमरकंटक या ठिकाणी उगम पावणाऱ्या नर्मदा नदीचे “नेमावर” हे नाभीस्थान मानले जाते. येथेदेखील स्नानासाठी घाट आहेत व घाटाला लागूनच सिद्धेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मार्कंडेय ऋषींनी अपमृत्यू निवारणासाठी ज्या शिवलिंगाला मिठी घालत शिवआराधना केली ते हेच अशी आख्यायिका या मंदिराबाबत सांगितली जाते. या मंदिराच्या स्थापत्य शैली वरून हे मंदिर ११-१२ व्या शतकातील परमार कुलीन राजांनी निर्मिले असावे असा फलक भारतीय पुरातत्त्वविभागाने लावलेला आहे.
सिद्धेश्वर मंदिर वैशिष्ट्ये
छोटेखानी असलेल्या या मंदिराची रचना आकर्षक असून रंगमंडप, सभामंडप व गर्भगृह यात विभागलेली आहे. पैकी सभामंडपाच्या छताचे वर्तुळाकार कोरीव काम आकर्षक असून वर्तुळाभोवती विविध मुद्रेतील सुरसुंदरी घडविलेल्या आहेत. त्या फारश्या आकर्षक नसल्या तरी भारतातील इतर मंदिरांशी साधर्म्य दर्शवितात. मंदिराच्या रंगमंडपावर बाहेरील बाजूने दशावतारां

ची एक पट्टिका आहे पण तिचे काम देखील फारसे आकर्षक नाही. यातीलच एका बाजूच्या शिखरपट्टीकेवर काही मैथुन शिल्पे देखील आहेत. मंदिराच्या बाह्यांगवर बरेच शिल्पकाम असून येथे ब्रम्हा, विष्णु, महेश, गणेश तसेच वराह अवतार, महिषासूर मर्दिनी अशा अनेक मूर्तींचे भग्नावशेष पाहायला मिळतात.

मंदिराच्या वरच्या बाजूला चिन्मयानंद आश्रम आहे. या ठिकाणचे सध्याचे प्रमुख श्री विठ्ठलराम महाराज यांची भेट झाली. या छोट्याश्या भेटीत महाराजानी “अहंकार बाजूला ठेवून कर्म करीत रहा” याचा संदेश काही निवडक कथांद्वारे दिला तो ऐकून मन प्रसन्न झाले.

तेथून निघतानाच नाशिकचा एक तरुण परिक्रमावासी भेटला. २५-३० चा तरुण, एकटाच पायी परिक्रमा करत होता. व्यवसायाने इंजिनिअर असलेला हा तरुण कामावरून सुट्टी घेऊन परिक्रमा करतोय हे पाहून आम्हा सर्वांना कौतुक वाटले व त्याला शुभेच्छा देत आम्ही परतीच्या मुक्कामाला निघालो.
नर्मदाष्टक ४
गतं तदैव में भयं त्वदम्बु वीक्षितम यदा
मृकुंडूसूनु शौनका सुरारी सेवी सर्वदा
पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥४॥
ज्या तुझ्या जलाचे मार्कंडेय, शौनक, सुरेंद्र सेवन करतात त्या जलाच्या दर्शनाने माझे भय पळून जाते. पुनर्जन्माच्या भवसागरातून मुक्ती देणाऱ्या अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

