वेदांग म्हणजेच वेदांची अंगे (Vedangas mean the limbs of the Vedas).
वेदांना प्रमाण मानणाऱ्या वैदिकांची अशी श्रद्धा होती, की वेदांतील विधिनिषेधांच्या पालनानेच आपल्या भावी पिढ्यांचे सर्वथा कल्याण होईल. असे मानणाऱ्या या वर्गाने वेदांचे पठन पिढ्यान्पिढ्या जतन करून वैदिक साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याचे जे विविध मार्ग शोधले व त्यांची मांडणी केली ते मार्ग म्हणजेच वेदांगे. वेदांचे बौद्धिक चिंतन सुरू झाले व त्या चिंतनातून वैदिकांनी बौद्धिक ज्ञानाचा पाया घातला आणि त्यातून वेदांगे निर्माण झाली. (१ ) शिक्षा, (२) कल्प, (३) व्याकरण, (४) निरूक्त, (५) छंद आणि (६) ज्योतिष अशी एकूण सहा वेदांगे आहेत.
वेद वाङ्मय टिकवून पुढे नेण्यामध्ये वेदांगांचा मोठा वाटा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पाणिनीने वेदांगांचे महत्त्व त्याच्या दोन सूत्रांमध्ये नोंदविलेले आहे व याला त्याने वेद पुरुषाची उपमा देत या पुरुषाला असलेले सहा अवयव म्हणजे ही सहा वेदांगे असे म्हटलेले आहे. यात
छन्दः पादौ तुवेदस्य हस्तौ कल्पोऽथ पठ्यते।
ज्योततषामयनंचक्षुतनिरुक्तं श्रोत्रमुमुययते।।
शिक्षा घ्राणंतुवेदस्य मुखं व्याकरणं स्मतृ म्।
तस्मात्साङ्गमधीत्यैव ब्रह्मलोके महीयते।|
पाणिनीय शिक्षा ४१ /४२ याचा अर्थ असा कि
● छंद म्हणजे त्याचे दोन पाय,
● कल्प त्याचे दोन हात,
● जोतिष म्हणजे दोन डोळे,
● निरुक्त म्हणजे दोन कान,
● शिक्षा म्हणजे त्याचे नाक आणि
● व्याकरण म्हणजे त्याचे तोंड आहे, असे त्याने म्हंटले आहे.
वेदांगे आपल्याला मुलगामी पद्धतीने वेदांचा अभ्यास करण्याकरिता व वेद समजून घेण्याकरिता मदत करतात. ही वेदांगे सूत्रशैलीत असल्यामुळे त्यांना सूत्रांची सर्व वैशिष्ट्ये लागू पडतात.
१) शिक्षा(Shiksha) : उच्चारणशास्त्र
पाणिनीने कल्पिलेल्या वेद पुरुषाची शिक्षा ही नासिका आहे
वेदमंत्रांचे उच्चारण शुद्ध व अचूक होण्याच्या दृष्टीने ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून रचण्यात आलेल्या शास्त्रांना ‘शिक्षा’ असे म्हणतात. वेदातील मंत्र उच्चारताना त्यात दोष उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे ते एका पिढी करून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होताना त्यात बदल घडून येऊ शकतो. पण त्यांना स्वरात बांधल्यामुळे त्यातील दोष काढले गेले. वेद पाठशाळेत हातांच्या भावभावाने आणि त्याबरोबर केलेल्या उच्चाराने हे निर्दोष बनविले गेले. लिहिताना देखील ते कसे लिहायचे याचे नियम बनविले गेले. या नियमांनाच शिक्षा असे म्हणतात.
यज्ञाचे इष्ट फल साध्य होण्यासाठी ऋत्विजांना मंत्रोच्चार शुद्ध व बिनचूक करणे, आवश्यक असल्यामुळे अशा शास्त्राची आवश्यकता होती. वेदमंत्रांतील अक्षरांच्या शुद्ध उच्चारांबरोबरच उदात्त (उच्च स्वर), अनुदात्त (नीच स्वर) आणि स्वरित (उच्च व नीच ह्या दोहोंच्या मधला स्वर) हे स्वरांचे प्रकार, छंदांचे प्रकार, पठनाच्या विविध पद्धती व व्याकरण ह्यांसंबंधीचे शिक्षा-ग्रंथ वैदिकांनी निर्माण केले.
‘शिक्षा’ या विषयात, म्हणजे वेदमंत्रपठनात, काय शिकले पाहिजे, ह्याचे क्रमवार वर्णन तैत्तिरीय उपनिषदाच्या शिक्षावल्लीमध्ये आले आहे.
- वर्ण (अक्षर), अ ते ह हे वर्ण.
- स्वर, मात्रा (स्वरोच्चार करावयास लागणारा वेळ) – उदात्त (उच्च स्वर), अनुदात्त (नीच स्वर) आणि स्वरित (उच्च व नीच ह्या दोहोंच्या मधला स्वर),
- ऱ्हस्व, दीर्घ व प्लुत असे मात्रेचे तीन प्रकार, – उदा. राम हा ह्र्स्व अन्त , रमा हा दीर्घ अन्त व रमा(S) हा प्लुत स्वर जो रमा३ असा दर्शविला जातो.
- बल (उच्चाराची शक्ती) – अल्पप्राण आणि महाप्राण.
- साम (पठनाची सुस्वरता वा समता) – श्रुती मधुर पाठ आणि
- संतान (अखंड पठन) – वेदिक संधीला संतान संधी असे म्हणतात.
सध्या प्रचारात असलेल्या शिक्षा-ग्रंथांत पाणिनीय शिक्षा, याज्ञवल्क्य शिक्षा, वासिष्ठी शिक्षा अशा काही–ग्रंथांचा अंतर्भाव होतो. हे ग्रंथ बरेच अलीकडचे आहेत. त्यांतील पाणिनीय शिक्षा हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. ह्याच्या कर्त्यासंबंधीची माहिती मिळत नाही. पाणिनीच्या मतांना अनुसरुन रचलेल्या ह्या ग्रंथात ६० श्लोक आहेत. वर्णोच्चाराचे नियम व माहिती ह्यात दिलेली आहे.
काही वेद गद्यात तर काही पद्यात आहेत. त्यातही शाखेनुसार उपविभाग आहेत व म्हणूनच या शिक्षा शाखा वेगवेगळ्या असतात. हे गाण्यात जसे वेगवेगळे घराणी असतात त्याप्रमाणेच आहे.
२) कल्प (Kalpa):
कल्प हे वेदांग वेध पुरुषाच्या हाताशी संबंधित आहे कारण यज्ञ कर्म हातानेच केले जाते. आपल्याला भूत यज्ञ पित्र यज्ञ अतिथी यज्ञ देव यज्ञ यासारखे पंच यज्ञ माहित आहेत. हे यज्ञ कोणत्या मुहूर्तावर, कोणत्या साधनाने करायचे, यासाठी लागणाऱ्या समिधा- दर्भ कशाचे हवेत, हे समजावून सांगण्यासाठी कल्पसूत्रांची निर्मिती झाली.
ह्या वेदांगास ‘कल्पसूत्रे’ असेही म्हणतात. कल्पसूत्रांमध्ये (१) श्रौतसूत्रे, (२) गृह्यसूत्रे (३) धर्मसूत्रे आणि (४) शुल्बसूत्रे, ह्यांचा समावेश होतो.
संहिता व ब्राह्मणग्रंथ ह्यांतील यज्ञसंस्थेचे सांगोपांग स्वरूप व्यवस्थित, एकत्र आणि विषयवारीने उपलब्ध करण्यासाठी श्रौतसूत्रे निर्माण झाली. सूत्रांमध्ये वैदिक यज्ञांचे विवेचन येते. यात राजसूय, अश्वमेध, वाजपेय, पुत्रकामेष्टी अशा यज्ञांची माहिती येते. अर्थवादात्मक वाक्यांचा पसारा मोठा असतो. यज्ञात म्हणावयाच्या मंत्रांचे अर्थही दिलेले असतात. शब्दांचे व्याकरणदृष्ट्या योग्य किंवा अयोग्य असे व्युत्पत्यर्थ दिलेले असतात. हे सगळे विधिनिषेधव्यतिरिक्त विवेचन वगळून शुद्ध कर्मकांड व कर्मकांडोपयोगी मंत्रांची प्रतीके किंवा सबंध मंत्र हे सगळे श्रौतसूत्रात ग्रथित केलेले असते. प्रत्येक वेदशाखेचे श्रौतसूत्र वेगळे असते. त्या त्या वेदशाखेतील श्रौतसूत्रात त्या त्या वेदाचे मंत्र प्रतीकाच्या द्वारेच निर्दिष्ट केलेले असतात.
कल्पाचा दुसरा भाग म्हणजे गृह्यसूत्रे होत. ह्यात अग्नित्रयसाध्य नसलेली व एकाग्निसाध्य किंवा गृह्याग्निसाध्य धार्मिक कर्मे सांगितलेली आहेत. उपनयन, समावर्तन, विवाह, गर्भाधान, जातकर्म, नामकरण, अन्नप्राशन, चौल, पंचमहायज्ञ, वास्तूप्रवेश, शूलगव, राजाने करावयाचे हस्त्यारोहण इ. संस्कार, विविध श्राद्धे व अन्य आश्रमकर्मे सांगितलेली असतात. विवाहादी संस्कार हा गृह्यसूत्रांचा मुख्य विषय आहे. गृह्यसूत्रांतील बरीचशी कर्मे वेदांत सांगितलेली नाहीत. गृह्यसूत्रांत पंचयज्ञ आणि नामकरण, उपनयन, विवाह इ. सोळा संस्कार तसेच श्राद्धे ह्यांचे विधी सांगितले आहेत. आश्वलायन, शाखायन, बौधायन, आपस्तंब, पारस्कर, गोभिल, कौशिक इ. १७ गृह्यसूत्रे आज उपलब्ध आहेत.
धर्मसूत्रे हा कल्पसूत्रांचा तिसरा भाग वर्णाश्रमधर्म प्रतिपादणारा आहे. मनु-याज्ञवल्क्यादी स्मृतींच्या पूर्वी झालेले, प्राधान्याने गद्यात्मक सूत्रशैलीत लिहिलेले, हे ग्रंथ आहेत. उपनयन, विवाहादी संस्कार हेही वर्णाश्रमधर्मच होत. परंतु त्यांचे प्रत्यक्ष कर्मकांड धर्मसूत्रांत सांगितलेले नसते. ते गृह्यसूत्रांत असते, तथापि संस्कारांचा अधिकार, काल, कर्मलोपनिमित्तक प्रायश्चित्ते इ. गोष्टी धर्मसूत्रांत येतात. वर्णाश्रमांचे भक्ष्याभक्ष्य इ. संबंधी आचार, विवाहाचे ब्राह्म, दैव इ. प्रकार व त्यासंबंधीचे अधिकार व विधिनिषेध धर्मसूत्रांत प्रतिपादिलेले असतात.
धर्मसूत्रांत त्रैवर्णिक समाजाचे आश्रमधर्म व लौकिक आचारधर्म म्हणजे कायदे व राजधर्म सांगितले आहेत. वर्णधर्म व आश्रमधर्म हे धर्मसूत्रांचे मुख्य विषय होत. पितृ धर्म, मातृधर्म, पति धर्म, भार्या धर्म अशा आचारधर्मांची माहिती आपल्याला धर्मसूत्रांद्वारे मिळते.
शुल्बसूत्र – काही श्रौतसूत्रांना–उदा. बौधायन, मानव, आपस्तंब व कात्यायन – ‘शुल्बसूत्र’ नावाचा अध्याय जोडलेला असतो. शुल्ब म्हणजे आखण्याची व मोजण्याची दोरी. यज्ञकुंड, यज्ञवेदी व यज्ञमंडप यांची निर्मिती करीत असताना जी मोजमापे घ्यावी लागतात, त्या मोजमापांचे गणित शुल्बसूत्रांत सांगितलेले असते. भारतीय भूमिती व त्रिकोणमिती ह्यांचे प्राथमिक स्वरूप शुल्बसूत्रांमध्ये पहावयास मिळते.
महत्त्व
विधींची अचूकता: कल्प ग्रंथ हे सुनिश्चित करतात की विधी योग्य आणि एकसमानपणे केले जातात. ही अचूकता महत्त्वाची आहे कारण, वैदिक परंपरेत, धार्मिक विधींचे योग्य प्रदर्शन हे वैश्विक व्यवस्था आणि वैयक्तिक धर्माचे समर्थन करते असे मानले जाते.
सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्था: धार्मिक विधींच्या पलीकडे, कल्पातील धर्मसूत्रे सामाजिक आणि वैयक्तिक आचरणाच्या विविध पैलूंना संबोधित करतात, नैतिक आणि नैतिक वर्तन, सामाजिक जबाबदाऱ्या आणि कायदेशीर नियमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात.
स्थापत्य आणि गणितीय ज्ञान: कल्प साहित्यातील सुलबा सूत्रांमध्ये भूमितीचे काही प्राचीन संदर्भ आहेत, विशेषत: वैदिक वेद्या बांधण्याच्या संदर्भात. हे प्राचीन भारतातील गणित आणि स्थापत्यशास्त्राची अत्याधुनिक समज दर्शवते.
३) व्याकरण (Vyakaran) :
व्याकरण हे वेद पुरुषाचे मुख आहे. भाषेला शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधण्याचे काम व्याकरण करते.
वेदमंत्रांतील शब्द अपभ्रष्ट होऊ नयेत, तसेच संधी होऊन शब्दात बदल होत असल्यामुळे मूळ शब्द कसा आहे तो कळावा तसेच अर्थही कळावा ह्यांसाठी वैदिक मंत्रांचा पदपाठ तयार करण्यात आला. तो करताना व्याकरण अगोदरच तयार होते. पदपाठ तयार झाल्यानंतर संस्कृत भाषेत बदल झालेले होते. तेव्हा सबंध शिष्ट संस्कृतचे व्याकरण तयार झाले. अनेक व्याकरणे झाली. त्यांत ⇨पाणिनीचे व्याकरण श्रेष्ठ ठरले.
व्याकरणाचे वर्णन एक वेदिक वृषभ म्हणून देखील केले गेले आहे. या वेदिक वृषभाला चार शृंगे आहेत, तीन पाद आहेत, दोन शीर्षे आहेत, सात हात आहेत
● या बैलाची चार शृंगे म्हणजे नाम, क्रियापद, उपसर्ग आणि अव्यय
● या बैलाचे तीन पाद म्हणजे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष.
● या बैलाची दोन शीर्षे म्हणजे – परस्मय पद आणि आत्मनेपद
● या बैलाचे सात हस्त म्हणजे सात विभक्ती
● असा हा वृषभ तीन बंधाने बांधला गेलेला असून हे बंध आहेत एकवचन, द्विवचन आणि बहुवचन
महाभाष्यकार पातंजलीने व्याकरणाचे पाच प्रयोजन सांगितले आहे ते म्हणजे
- रक्षा( भाषेचे रक्षण करणे),
- उह ( जे आधी सांगितले गेले आहे त्याचे जतन करणे),
- आगम( वेदिक ज्ञान स्वीकारणे),
- लघु( थोडक्या शब्दात बांधणे) आणि
- असंदेह (असंदिग्ध असणे)
पाणिनीने व्याकरणाला नियमबद्ध करण्यासाठी अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला. हे व्याकरण जर नसते तर आपल्याला वेदांचेही ज्ञान नीटपणे होऊ शकले नसते.
महत्त्व
शास्त्राचा अर्थ: वैदिक ग्रंथांचा अचूक अर्थ लावण्यासाठी व्याकरण आवश्यक आहे, कारण स्तोत्र आणि श्लोकांचे अभिप्रेत अर्थ समजून घेण्यासाठी व्याकरणाचे अचूक आकलन महत्त्वाचे आहे.
बौद्धिक परंपरा: व्याकरणाचा अभ्यास ही भारतातील एक महत्त्वपूर्ण बौद्धिक परंपरा आहे, ज्याने केवळ भाषिक अभ्यासच नव्हे तर तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आणि साहित्यिक टीका यावरही प्रभाव टाकला आहे.
४) निरुक्त (Nirukta): शब्दव्युत्पत्ती
निरुक्ताला वेद पुरुषाचे चक्षु मानले गेले आहे.
वेदांची भाषा कालांतराने समजणे कठीण जाऊ लागले. त्यामुळे शब्दांची व्युत्पत्ती व अर्थ सांगण्याचे शास्त्र निर्माण झाले. तेच निरुक्त होय. वेदांतील शब्दांचे व धातूंचे संग्रह म्हणजे ‘निघंटू’ वा शब्दकोश. वैदिक समानार्थक व अनेकार्थक पदांचा वा धातूंचा जो सर्वप्राचीन उपलब्ध कोश आहे, त्याला निघंटू असे नाव आहे. निघंटूचा कर्ता आपल्याला ज्ञात नाही. पण ह्या कोशावर यास्काने लिहिलेले भाष्य निरुक्त ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
यास्काच्या काळाविषयी मतभेद आहेत. अनेक विद्वान त्याला पाणिनिपूर्वकालीन मानतात तथापि तो पाणिनीनंतर होऊन गेला असावा, असेही काहींचे मत आहे. निरुुक्तावर दुर्गाचार्यांनी लिहिलेली टीका उपलब्ध आहे.
निघंटूची एकूण तीन कांडे आणि पाच अध्याय आहेत. पहिल्या कांडात तीन अध्याय आणि दुसऱ्या व तिसऱ्या कांडांत प्रत्येकी एक-एक अध्याय अशी ही पाच अध्यायांची विभागणी आहे.
‘नैघंटुक’ हे पहिल्या कांडाचे नाव. त्यात समानार्थक शब्दांचा संग्रह असून कोणत्या शब्दाचा कोणता अर्थ आणि त्या अर्थाचे वाचक असे किती शब्द आहेत, हे सांगितले आहे. ते करीत असताना नामांचा गट आणि क्रियापदांचा गट असा भेदही ठेविलेला आहे. नामांचा गट असल्यास ‘नामानि’ किंवा ‘नामधेयानि’ आणि क्रियापदांचा गट असल्यास ‘कर्माण:’ असे शब्दप्रयोग त्याने केले आहेत (हिरण्यनामानि, पृथिवीनामधेयानि ज्वलतिकर्माण:).
‘नैगमकांड’ किंवा ‘ऐकपदिक कांड’ हे निघंटूचे दुसरे कांड होय. ‘जहा’, ‘निधा’ इ. ‘अनवगतसंस्कार’ किंवा व्याकरणदृष्ट्या अवघड अशा अनेकार्थ शब्दांचा संग्रह त्यात आहे.
निघंटूच्या ‘दैवतकांड’ नामक तिसऱ्या कांडात अग्नी, इंद्र, वरुण इ. देवतांच्या नावांच्या संग्रहाबरोबरच त्यांच्याशी संबंधित असलेल्या इषु, रथ, दुंदुभी ह्यांसारख्या वस्तु किंवा अश्व, मंडूक इ. प्राणी ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. ह्या कांडातील एका अध्यायाचे एकूण सहा विभाग असून पहिल्या तीन विभागांत पृथ्वीवरील देवता वा वस्तू चौथ्या व पाचव्या विभागांत अंतरिक्षातील देवता व सहाव्या विभागात द्यूलोकातील देवता समाविष्ट आहेत.
यास्काच्या निरुक्ताचे एकूण बारा अध्याय असून त्यांचे पूर्वषट्क आणि उत्तरषट्क असे दोन समभाग करण्यात आलेले आहेत. ह्यांखेरीज परिशिष्टरूप असे आणखी दोन अध्याय निरुक्ताच्या उपलब्ध हस्तलिखितात मिळतात. तथापि हे दोन अध्याय यास्काने रचिले नसावेत, असे सामान्यतः मानले जाते.
५) छंद (Chandas) :
छंद हे वेद पुरुषाचे पाद आहे. ते चलनात्मक अंग असल्याने त्याला सुरात बांधता येते. वेदमंत्रांची शुद्धता आणि सर्वश्रेष्ठता टिकवून ठेवण्यासाठी लयबद्ध . मांडणीची आवश्यकता निर्माण झाली. त्यातून हे वेदांग तयार झाले.
छंद या वेदांगाला ‘छंदोविचिति’ अशीही संज्ञा आहे. पिंगलनागाने रचलेले छंदःसूत्र हे छंदोविषयक वेदांग समजण्यात येते परंतु ते फारसे प्राचीन नसावे. कारण त्यात वैदिक छंदांबरोबर संस्कृतातील लौकिक वृत्तांचाही परामर्श घेण्यात आला आहे.
वेदांमध्ये जे मंत्र आहेत, त्यांपैकी बरेचसे छंदोबद्ध आहेत. यजुर्वेदात यजुस् म्हणजे गद्य मंत्र आहेत, तसे छंदोबद्ध मंत्रही आहेत. छंदांचा संबंध वेदपठणाशी जसा आहे, तसा वेदमंत्रांनी करावयाच्या यज्ञकर्माशीही आहे. छंद हे वेदाचे पाय होत, असे पाणिनीय शिक्षेत म्हटले आहे.
वेदांमध्ये प्रामुख्याने सात छंद आहेत.
1. गायत्री छंद यात २४ अक्षरे असतात आणि तीन ओळी असतात प्रत्येक ओळीत ८-८ अक्षरे असतात.
2. उष्णिक या छंदामध्ये २८ अक्षरे असतात. यातील प्रथम दोन ओळींमध्ये ८-८ आणि तिसऱ्या ओळींमध्ये १२ अक्षरे असतात
3. अनुष्ठुप छंदामध्ये ३२ अक्षरे असतात. यातील चार ओळीत प्रत्येकी ८-८ अक्षरे असतात.
4. बृहती छंदामध्ये ३६ अक्षरे असतात. या चार ओळी असून त्यात पहिल्या दोन ओळीत ८-८, तिसऱ्या ओळीत १२ आणि चौथ्या ओळीत पुन्हा ८ अक्षरे असतात.
5. पंक्ति छंदामध्ये ४० अक्षरे असतात व यातील पाच ओळींमध्ये प्रत्येकी ८-८ अक्षरे असतात.
6. त्रिष्टुप छंदामध्ये ४४ अक्षरे असतात. यात चार ओळीत प्रत्येकी ११ अक्षरे असतात.
7. जगती छंदामध्ये ४८ अक्षरे असतात व यातील चार ओळीत प्रत्येकी १२ अक्षरे असतात.
प्रत्येक ऋचेत किती अक्षरे हवीत हे छंदाने ठरविले जाते. आपल्याला माहीत असलेली मंदाक्रांता, शार्दुलविक्रीडित इत्यादी वृत्ते वैदिक छंदांवरूनच तयार झाली आहे. प्रत्येक सूक्त कोणत्या छंदात आहे हे त्याच्या सुरुवातीलाच लिहिलेले असते. उदाहरणार्थ अग्नि सुक्त गायत्री छंदात असून, इंद्र सुक्त त्रिष्टोपछांदात आहे. कधीकधी यात छंदांची सरमिसळ देखील असते. पिंगलांचा छंदसूत्र नावाचा ग्रंथ या छंद शास्त्राला समर्पित आहे.
६) ज्योतिष (Jyotisha):
लग्न आचार्य हे ज्योतिष शास्त्राचे मूळ पुरुष मानले जातात. यज्ञ करण्यासाठी आवश्यक असलेले मुहूर्त ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थानांवरून ठरविले जाऊ लागले यासाठी आवश्यक असलेले गणिती ज्ञान आपल्याला ज्योतिष या वेदांगांमध्ये आढळून येते.
जशी मुरांसाठी शिखा, सर्पांसाठी मणी तसेच सर्व वेदांगांमध्ये ज्योतिष हे मूर्धन्य म्हणजे सर्वात महत्त्वाचे अंग मानले गेले आहे. इतर सर्व अंगे जरी ज्ञात झाली, म्हणजे यज्ञ कसा करायचा, कोणती साधने वापरायची, त्यासाठी कोणते मंत्र म्हणायचे, त्या मंत्रांचे छंद कोणते असावेत, यज्ञवेधीची मापे काय असावीत हे सर्व जरी ज्ञात असले, तरी ज्योतिष गणिताने योग्य मुहूर्त काढल्याशिवाय त्या यज्ञाचे फल मिळू शकत नाही.
वेदकाली ज्योतिष हे सहावे वेदांग तयार झाले होते. सत्तावीस नक्षत्रे, चंद्राच्या अवस्था, सूर्याचे संक्रमण, ऋतूंची परिवर्तने ह्या सर्वांचे पद्धतशीर परिगणन यज्ञाच्या निमित्ताने वैदिक ऋषीला काळजीपूर्वक करावे लागे. श्रौत व गृह्य कर्मांसाठी लागणारे पंचांग वैदिक काळी अस्तित्वात आले. सत्तावीस नक्षत्रांची आकाशातील मांडणी ही प्रथम वेदकाली वैदिकांनी शोधली. शुक्लयजुर्वेदात ‘नक्षत्रदर्श’ म्हणजे ज्योतिषी ह्याचा उल्लेख आलेला आहे.
वेदांगज्योतिषाचे बरेच ग्रंथ लुप्त झाले असून लगध नामक आचार्यांचा ‘ज्यौतिषम्’ (इ. स. पू. १४००) हा एकच लहानसा निबंध शिल्लक राहिला आहे. ह्या निबंधाचे ऋग्वेद शाखेत ३६ व यजुर्वेद शाखेत ४४ श्लोक मिळतात. यांतील अनेक श्लोक क्लिष्ट असून त्यांचा अर्थ नीट लागत नाही. त्यात ३६६ दिवसांचे वर्ष व पाच वर्षांचे एक युग होते, असे म्हटले आहे. उत्तरायण व दक्षिणायन केव्हा होते, ह्याचे गणित त्यात सांगितले आहे. लगध यांच्या कालखंडात गर्ग ह्या आचार्यांनी केलेली गर्गसंहिता आज लुप्त झालेली असली, तरी तिच्यातील संदर्भ नंतरच्या ग्रंथांमध्ये घेतलेले आढळतात. ह्या आचार्य गर्गांचा महाभारतात ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून निर्देश केलेला आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या ज्योतिषाचे दोन प्रातिनिधिक ग्रंथ उपलब्ध आहेत. एक म्हणजे ऋग्वेदाची संबंधित आर्च ज्योतिष आणि दुसरा यजुर्वेदाशी संबंधित यजूष ज्योतिष.
