सुमारास पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने (BORI) महाभारतावर काही दशकं संशोधन करीत महाभारताची चोखंदळ अथवा संशोधित आवृत्ती (ज्याला इंग्रजीमध्ये Critical Edition or CE , म्हणून ओळखलं जातं) प्रसिद्ध केली होती. मूळ महाभारतात नसलेले आणि नंतर घुसडले गेले असावेत असे वाटणारे – सर्व श्लोक त्यांनी बाजूला काढले व महाभारताच्या तत्कालीन अभ्यासकांना महाभारताच्या अभ्यासासाठी एक नवं दालन उपलब्ध झालं. असं करताना BORI च्या अभ्यासकांनी भारताच्या विविध भागात उपलब्ध असणाऱ्या महाभारताच्या विविध प्रतींचा सुमारे चाळीसएक वर्ष अभ्यास केला व त्यामुळे या संदर्भ ग्रंथाला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. या संदर्भ ग्रंथांच्या आधी, बर्याच जणांनी महाभारताच्या निळकंठ प्रतीला प्रमाण मानलं होतं. ही प्रत म्हणजे महाराष्ट्रातील गोदावरी तीरावरील कोपरगाव या ठिकाणच्या, निळकंठ चतुर्धर, या संस्कृत अभ्यासकांने महाभारतावर केलेलं सतराव्या शतकातील विवेचन. सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी जन्मलेले हे कवीवर्य पुढे संस्कृतच्या अभ्यासासाठी वाराणसीत स्थायिक झाले येथूनच त्यांनी महाभारतावरील हे संस्कृत टिपण लिहिलं. बऱ्याच संस्कृत अभ्यासकांकडून ते आजही प्रमाण मानले जाते.
याबद्दल एक विशेष सांगायचे म्हणजे निळकंठ यांची ही प्रत सतराव्या शतकातील असल्याने यातील युध्दवर्णनात युद्धांच्या उल्लेख तोफांचे उल्लेख देखील आहेत. याचा उपयोग महाभारतकाळी देखील तोफा होत्या असे सांगायला आज केला जातो तो पूर्णतः चुकीचा आहे.
भांडारकर प्रत उपलब्ध झाल्यावर मराठीत देखील अनेक साहित्य कृतींना बहर आला. यात मृत्युंजय, राधेय, युगंधर सारख्या ललित कादंबरी वजा लिखाण होते तसेच युगांत, व्यासपर्व, हा जय नावाचा इतिहास आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, महाभारत एक सूडाचा प्रवास असे विश्लेषणात्मक वृत्तपत्रीय लेखन संकलन अथवा पुस्तके देखील होती. कर्ण व श्रीकृष्ण या व्यक्तिरेखाना त्यामुळे बराच उठाव मिळाला. कर्णावर तर मृत्युंजय, तो राजहंस एक अशी मराठी नाटकं देखील निघाली होती जी मी देखील त्याकाळी पाहिली होती.
१९७० व १९८०च्या सुमारास वृत्तपत्रातून महाभारतावर बरेच लेख-प्रति लेख छापून येत. त्यातून यातली बरीचशी पुस्तकं संकलित केली गेली आणि म्हणूनच त्याचे साहित्यिक मूल्य देखील फार आहे. या टीकात्मक व विश्लेषणात्मक लेख आणि पुस्तकांबरोबरच महाभारताचे एक मानवी स्वरूप देखील उलगडायला सुरुवात झाली व त्यातील प्रत्येक चमत्कृतीपूर्ण व अनाकलनीय प्रसंगावर सांगोपांग विचार व चर्चा सुरू झाली. यातूनच श्री एस एल भैरप्पा यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून १९८०च्या सुमारास पर्व ही कादंबरी साकारली आणि महाभारताचा एक वेगळाच मानवी पैलू लोकांच्या ध्यानात आला व हळूहळू वाचकांच्या पचनी पडू लागला.
माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक मात्र यापासून बराच दूर होता. मी शालेय जीवनात युगंधर, मृत्युंजय सारखे ललित कादंबरी प्रकारात मोडणारे वाङ्मय वाचले होते. परंतु या टीकात्मक अथवा विश्लेषणात्मक लेख व पुस्तकांपासून मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो व म्हणूनच माझ्या पिढीच्या अनेकांप्रमाणे मलादेखील बी. आर. चोप्रा यांचे दूरदर्शनवरील महाभारत हेच संपूर्ण महाभारत होते. अभ्यासाच्या व नंतरच्या नोकरीच्या व्यस्ततेत महाभारत हा विषय मागे पडला आणि मधल्या कालावधीत केवळ ज्ञानरंजन म्हणून अधून मधून जमेल तसे वाचत राहिलो.
पण काही वर्षांपूर्वी श्री. एस. एल. भैरप्पा यांची पर्व ही कादंबरी माझ्या हातात पडली. ती वाचताच मी भारावून गेलो. पर्व मधील घटना मनाला पटू लागल्या. चमत्कारांवरील दैवी आवरण बाजूला होऊ लागले. त्या मागचा मानवी चेहरा जास्त जवळचा वाटू लागला आणि मग कुठेतरी मनाच्या मागच्या कोपऱ्यातील अडगळीतून असलेल्या युगांत, व्यासपर्व, महाभारत एक सूडाचा प्रवास, महाभारत-संघर्ष आणि समन्वय, अशा अनेक पुस्तकांचा शोध सुरू झाला आणि हळूहळू ती वाचताना महाभारता बद्दलची उत्सुकता नव्याने जागृत झाली. त्यातील घटनांना नवे आयाम मिळाले.नवीन दृष्टीकोन मिळाला. एकदम काहीतरी नवीन वेगळं गवसल्याचा आनंद मिळाला. मग हे सगळं सांगायचं कुणाला? कळणार कोणाला? आणि कधी? हेच समजेना म्हणून हा ब्लॉग लेखन प्रपंच.
आता ही सर्व पुस्तक दोन-दोनदा वाचल्यावर डॉक्टर रा. शं. वाळिंबे संपादित विदर्भ-मराठवाडा कंपनीचे सर्व खंड नव्याने वाचायला घेतले आहेत. संदर्भासाठी गीता प्रेस, गोरखपुर यांची संस्कृत हिंदी आवृत्ती व भांडारकर इन्स्टिट्यूटची संस्कृतमधील संशोधित प्रत देखील आहे. या सर्वांचा वापर करून हळूहळू मला उमगलेले महाभारत मराठीतून उलगडण्याचा विचार आहे. तसं पाहिलं तर, ते इतर बऱ्याच ब्लॉगवर पण उपलब्ध आहे तरी पण मला त्याचे अस्तित्व पुर्ण वाटत नसल्याने, माझ्या दृष्टीकोनातून ते सादर करण्याचा माझा प्रयत्न राहील. अर्थात यासाठी बराच कालावधी लागेल याचीही मला जाणीव आहे तरीपण पाहुया किती तग धरता येतो ते.मला उपलब्ध झालेले काही साहित्य (गीता प्रेस व भांडारकर प्रती) नेटवर उपलब्ध आहे. यथावकाश मी ते माझ्या या ब्लॉग वर पण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेनच पण त्याआधी त्याचे माझ्या दृष्टिकोनातून परीक्षण देखील वेगळ्या लेखात करेन.
