सुमारे एक लक्ष श्लोक असलेले महाभारत हे  केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे आर्ष महाकाव्य  आहे. “यदिहास्ति  तद्न्यत्र यन्नेहास्ति न कुत्रचित” म्हणजे यात जे आहे ते सर्वत्र आहे,  पण यात जे नाही ते इतर कोठेच नाही अशी याची ख्याती आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माउलींनी देखील “व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम” म्हणजे व्यासांनी सर्व जगच उष्टे करून ठेवले  आहे असे गौरवोद्गार काढले  आहेत.  

भारतीय विवाह संस्थेच्या प्रचलित आणि अप्रचलित परंतु ज्ञात, अशा विविध विवाह प्रकारांची पाळेमुळे देखील आपल्याला महाभारतात विविध ठिकाणी मुख्य कथानकांमध्ये व उप कथानकांमध्ये आढळून येतात. महाभारत घडले तेच मुळी अशाच एका आगळ्या वेगळ्या विवाह संबंधातून. त्याची सुरुवातही होते ते राजा शंतनूच्या वेगळ्या प्रकारच्या विवाहातून. शंतनूचा पहिला विवाह झाला तो गंगेशी.  गंगा (महाभारतकार येथे मानवी रूपातील गंगा नदीचा उल्लेख करतात) शंतनुशी विवाहाला तयार होते तेच मुळी तिच्या अटींवर. या अटीतली मुख्य अट म्हणजे तिच्या कोणत्याही कृत्याचा जाब शंतनू तिला विचारणार नाही अशी. म्हणूनच जेव्हा ती एकापाठोपाठ एक असे ७ पुत्र जन्मल्यावर लगेचच नदीला अर्पण करते, तेव्हा शंतनूला गप्प बसण्यावाचून पर्याय नसतो. मात्र आठव्या पुत्राच्या वेळी तेच घडतंय हे पाहून शंतनूला राहवत नाही व तो तिला अडवतो आणि मग ठरलेल्या अटींप्रमाणे ती त्याला सोडून पुत्रासह निघून जाते. काही कालावधीनंतर पुत्र देवव्रताला व्यवस्थित शिक्षण देत राजा शंतनूकडे परत सोडते. 

महाभारतातील विवाह-Marriages in Mahabharat-भीष्म प्रतिज्ञा
भीष्म प्रतिज्ञा

शंतनूची दुसरी पत्नी म्हणजे दाशराजकन्या सत्यवती. एकेकाळी मत्स्यगंधा या नावाने परिचित असलेली सर्वसाधारण कोळी जमातीच्या प्रमुखाची मुलगी. राजा शंतनूला ती आवडते पण तिचा पिता  देखील तिचा विवाह एका समर्थ राज्याच्या राजाशी , शंतनुशी , करून द्यायला तयार होतो तेदेखील काही अटींवर. तिचा होणारा  मुलगाच कुरुंचा उत्तराधिकारी ठरेल हि ती अट. यातूनच भीष्म प्रतिज्ञेचा जन्म होतो. राजकुमार देवव्रत आपल्या पित्याच्या इच्छेखातर राज्यावर तर पाणी सोडतोच, पण आजन्म अविवाहित देखील राहण्याची भीष्मप्रतिज्ञा करतो ते केवळ शंतनू व सत्यवतीच्या विवाह व्हावा म्हणून.

भीष्मांनी वर्णिलेले विवाहाचे आठ प्रकार (8 Types of Marriages in Mahabharat)

याच प्रतिज्ञेमुळे अविवाहित राहिलेल्या भीष्मांना पुढे आपल्या लहान सावत्र बंधूकरिता, विचित्रवीर्याकरिता , काशीराजाच्या कन्यांच्या स्वयंवरात भाग घ्यावा लागतो. सत्यवतीचा थोरला मुलगा चित्रांगद जेव्हा त्याच नावाच्या गंधर्वाकडून सीमायुद्धात मारला जातो तेव्हा कुमारवयात असणाऱ्या विचित्रवीर्याच्या विवाहाची जबाबदारी ओघानेच भीष्मांवर येऊन पडते आणि भीष्म काशी राज्यात जाऊन अंबा, अंबिका व अंबालिका या त्याच्या तीन राजकन्यांच्या स्वयंवरात भाग घेतात आणि तेथून या तीन कन्यांना उचलून रथात घालतात व जमलेल्या राजांचे युद्धाचे आव्हान स्वीकारतात. 

आदिपर्वातील १०२व्या अध्यायात या घटनेचे वर्णन येते. याच वेळी भीष्म उपस्थित राजांना विवाहाचे ८ प्रकार सांगतात ते असे :

(१) वराला आमंत्रित करून कन्येला अलंकार घालून , यथोचित वरदक्षिणा देऊन केलेला विवाह म्हणजे ब्राह्मविवाह होय. 

(२) जर वराकडून गोधन घेऊन त्याला कन्या दिली तर तो आर्ष विवाह होय. 

(३) वराने मागितलेले धन (हुंडा ) देऊन जर कन्या अर्पण केली तर तो आसुर विवाह होय. 

(४) कन्येला तिच्या इच्छेविरुद्ध पळवून नेऊन जर तिच्याशी विवाह केला तर तो राक्षस विवाह होय. 

(५) परस्परसंमतीने वधू – वरानी केलेला विवाह म्हणजे गंधर्व विवाह होय. 

(६) अमली पदार्थाच्या सेवनानंतर बेहोष झालेल्या कन्येला पळवून नेऊन तिच्याशी केलेला विवाह म्हणजे पैशाच विवाह होय. 

(७) कन्येच्या पित्याकडे जाऊन रीतसर मागणी घालून त्याच्या अनुमतीने पण काहीच देवाणघेवाण न करता केला विवाह म्हणजे प्राजापत्य विवाह होय. आणि ….. 

(८) यज्ञामध्ये ऋत्विजाचे काम करून दक्षिण म्हणून कन्येची प्राप्ती करून केलेला विवाह म्हणजे दैव विवाह होय. 

महाभारतात ‘स्वयंवर’ ही  विवाह जमविण्याची पद्धत अनेकदा आढळून येते. यात कन्येला पती निवडण्याचे स्वातंत्र्य असले तरी यातील निवड बरेचदा ‘पण’ लावून केली जाई व हा ‘पण’ पूर्ण करणारा पुरुष त्या कन्येच्या पसंतीला उतरणारा असेलच याची खात्री नसे. या पद्धतीत “पण” जिंकलेला वर, कन्येशी ब्राह्मविवाह करत असला तरी या स्वयंवरातून कधी कधी राजे आपल्या सामर्थ्याच्या बळावर स्वयंवर मंडपातून कन्येचे तिच्या इच्छेविरुद्ध हरण करीत. यासाठी त्यांना तिथे जमलेले राजे, त्या कन्येचा पिता, बंधू , आप्तेष्ट यांचा पराभव करावा लागे आणि मग  हा राक्षस विवाहाचा प्रकार ठरे. यात क्षत्रियाचा पराक्रम सिद्ध होत असल्याने हा विवाहप्रकार क्षत्रियांसाठी श्रेष्ठ मानला गेला आणि म्हणूनच भीष्मांनी देखील काशीराजकन्याना पळविताना याच मार्गाचा अवलंब  केला आणि त्याचवेळी त्यांनी जमलेल्या राजांचा पराभव केला. 

यात भीष्मांनी कन्या स्वतःसाठी पळविल्या नव्हत्या तर त्यांनी त्या आपल्या सावत्र बंधूंसाठी, विचित्रवीर्यासाठी, पळविल्या होत्या. त्यातील अंबिका व अंबालिकेने विचित्रवीर्याशी विवाह करणे मान्य केले पण थोरल्या अंबेने मात्र आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे जाण्याची इच्छा बोलून दाखविली व भीष्मांनी ती मान्य देखील केली. पण जेव्हा भीष्मांकडून या स्वयंवराच्या वेळी पराभूत झालेल्या मानी शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही, तेव्हा तिचा सूडाग्नी चेतविला  गेला तो मात्र भीष्मांविरुद्ध. त्यांच्या मृत्यूच्या इच्छेनेच तिने पुढे शिखंडीनी म्हणून स्त्रीजन्म घेतला आणि जी पुढे शिखंडी रूपात पुरुष म्हणून महाभारत युद्धात  लढताना भीष्मांच्या पतनाला कारणीभूत ठरली. 

महाभारताच्या महारण्यात शिरताना विवाहांची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. यातील पांडूचा कुंतीशी झालेला विवाह हा स्वयंवरातील परस्परसंमतीने झालेला विवाह आहे व म्हणूनच तो ब्राह्मविवाह प्रकारात मोडतो तर त्याचा दुसरा म्हणजे मद्रकन्या माद्रीशी झालेला विवाह म्हणजे मद्राना भरपूर द्रव्य कन्याशुल्काच्या रूपात देऊन केलेला आर्षविवाह. याचप्रकारे पांडूचा मोठा बंधू अंध धृतराष्ट्राचाही विवाह गांधारच्या सुबल नरेशाची कन्या गांधारीशी झालेला आढळतो. हे दोन्ही विवाह भरपूर द्रव्य देऊन भीष्मांनी घडवून आणले आहेत. 

धृतराष्ट्र व पांडू यांची संतती म्हणजेच कौरव व पांडव. पैकी पांडवांचा जन्मच मुळी अरण्यातील. पांडवांच्या बालपणाच्या सुरुवातीचा काळ देखील पर्वतीय प्रदेशात गेला. मात्र पांडूच्या आकस्मिक निधनानंतर माद्री सती गेली व कुंती पाचही मुलांसह हस्तिनापुरी परतली. 

यानंतरचा कालावधी एका सुप्त वैराचा कालावधी आहे. आपल्या राज्याच्या अधिकारात पांडव हे वाटेकरीच नव्हे तर श्रेष्ठ दावेदार ठरू पाहताहेत हे लक्षात येताच कौरवांनी, त्यातही दुर्योधन दुःशासनानी त्यांना आपल्या मार्गातून हटविण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न होता वारणावत येथीस लाक्षागृहात पांडवांना त्यांच्या कुंतीमातेसह जाळून मारण्याचा. मात्र विदुराच्या सावधपणामुळे पांडव या लाक्षागृहाला पडलेल्या भुयारातून गुपचूप निसटले. 

यानंतर कुंतीसह रानोमाळ फिरणाऱ्या पांडवांची अरण्यात गाठ पडली ती राक्षसकन्या  हिडिंबेशी. दोन भिन्न जमातीची ही  माणसे. पांडव राजकुलीन मानव तर हिडिंबा राक्षसकुळातील. मात्र हि हिडिंबा त्यातील धडधाकट पांडवावर, भीमावर , मोहित होते व पांडवांना  मारण्याऐवजी यातील भीमाने आपल्याशी विवाहबद्ध व्हावे अशी गळ घालते. भीम तिच्या भावाशी युद्ध करून त्याला ठार मारतो पण तरीदेखील ती भीमाशी विवाहबद्ध होण्यासाठी कुंतीलाही विनविते व मग काही अटींवर कुंती देखील या विवाहाला संमती दर्शविते आणि भीम – हिडिंबेचा गंधर्व विवाह संपन्न होतो. पांडवांपैकी कुण्या एकाचा  हा पहिलाच विवाह, मात्र दूरगामी परिणाम करणारा. राक्षसकुळाशी संबंध प्रस्थापित करणारा. यातून जन्मलेल्या भीम व हिडिंबेच्या पुत्राने – घटोत्कचाने – महाभारत युद्धात नंतर पांडवांच्या बाजूने आपल्या राक्षस सेनेसह भाग घेत, कर्णाच्या अर्जुनासाठी राखून ठेवलेल्या शक्तीला वाया घालविण्यासाठी वीरमरण पत्करले व पांडवांच्या महाभारत युद्धातील विजयाचा मार्ग प्रशस्त केला.

कृष्ण रुक्मिणी विवाह – प्रेमविवाह कि राक्षस विवाह ?

कृष्ण रुक्मिणी विवाह हा प्रेमविवाह असल्याची सर्वमान्य समजूत आहे. रुक्मिणीने कृष्णाला सुदेव नावाच्या ब्राह्मणांमार्फत निरोप (प्रेमपत्र ?) पाठवून त्याला कुंडिनपुरात बोलावून घेतले. तिथे तिचा विवाह शिशुपालाशी होणार होता. विवाहाच्या पूर्वसंध्येला आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊ, तेथून आपल्याला पळवून न्यावे अशी विनंती तिने श्रीकृष्णाला केली होती अशी सर्वसाधारण कथा आपण ऐकलेली असते. पण त्यामागील सत्य व तथ्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला महाभारताच्या खिलपर्वात म्हणजेच हरिवंशात डोकावावे लागते. आणि मग आपल्या लक्षात येते कि कृष्णाने रुक्मिणीचे केलेले हरण हा राक्षसविवाह आहे.

हरिवंशानुसार प्रथम हे स्वयंवर आयोजिल्याचे कृष्णाला हेरांद्वारे कळल्यावर कृष्ण या लग्नाला उपस्थित राहायचे ठरवतो. कृष्ण अभिषिक्त राजा नाही म्हणून तो या स्वयंवरात भाग घेऊ शकत नाही असा आक्षेप इतर राजे नोंदवतात तेव्हा कुंडीनपूर जवळील विदर्भ देशाचे राजे क्रथ व कौशिक हे आपलं राज्य कृष्णाला अर्पण करत त्याला राज्याभिषेक करतात. मग मात्र पेच प्रसंग निर्माण होतो व याचं पर्यवसान युद्धात होऊ नये म्हणून रुक्मिणीचा पिता राजा भीष्मक ते स्वयंवरच रद्द करतो व पुन्हा काही कालावधीनंतर चेदिराज दमघोषाचा पुत्र व जरासंधाचा सेनापती आणि मानसपुत्र असलेल्या शिशुपालसोबत हा विवाह ठरवितो, म्हणून यावेळी श्रीकृष्ण येतो तो आपल्या आतेभावाच्या, शिशुपालाच्या विवाह समारंभात. त्यामुळे त्याच्यासह सर्व यादवांचा तळ मात्र नगराबाहेरच आहे आणि याच ठिकाणच्या जवळ असलेल्या कुलदेवतेच्या दर्शनाला रुक्मिणी आलेली असताना पहिल्यांदा श्रीकृष्णाच्या दृष्टीस पडते.

रुक्मिणीहरण व तिचा कृष्णाशी विवाह हि श्रीकृष्णाच्या दृष्टीने राजनैतिक दृष्ट्या महत्वाची घटना आहे. असे केल्याने कृष्णाच्या विरोधी गटातील व द्वारकेवर वारंवार चालून येणाऱ्या जरासंधाच्या गटातील एका प्रभावशाली राजाचा , भीष्मकाचा व त्याच्या पुत्राचा रुक्मिचा , विरोध कमी होतो. जरासंध विरोधी लढ्यात त्याची मदत या विवाहामुळे होणार नसली तरी त्याचा त्रास तरी होऊ शकणार नाही हि या संबधामागची मेख आहे. आणि असे केल्याने आपला पुरुषार्थ सिध्द होऊन जरासंधाच्या गटातील राजांचा जळफळाट होईल हेदेखील उघड होते. आणि रुक्मिणी सुंदर असल्याने या विवाहाद्वारे हे अनमोल रत्न श्रीकृष्णाच्या हाती लागत होते.

याच विचाराने कृष्ण शिशुपाल विवाहाच्या वेळी आपल्या सेनेसह उपस्थित राहिला होता. बलराम व इतर यादव सेनानी त्याच्याबरोबर होते. रुक्मिणी कुलदेवतेच्या दर्शनाला आली तेव्हाच कृष्णाने तिला पहिले व तेथेच पक्का निर्धार केला तिला पळविण्याचा. एका झटक्यात निर्णय प्रक्रिया झाली , रथाला अश्व बांधले गेले या समस्त यादव सेनेला सज्जतेचा आदेश दिला गेला. रुक्मिणी देवळातून पूजा करून येईस्तोवर यादव सेना सज्ज झाली. रुक्मिणीला काही समजण्यापूर्वीच ती देवालयातून बाहेर येताच कृष्णाने रथ तिच्याजवळ नेत तिला रथात घातली व रथ पळवायला सुरुवात केली. असे काही होईल याची कल्पना नसलेले अल्पसे संरक्षक दल प्रतिकार करू पाहताच तो प्रतिकार बलराम व यादव सेनेने मोडून काढला आणि त्यातील काही जीव वाचवून हि बातमी सांगायला राजवाड्यात गेले.

रुक्मिणीला कृष्णाने पळविली हि बातमी ऐकून संतप्त झालेला शिशुपाल व त्याच्या गटातील राजे पाठलागावर निघाले पण यादवसेनेने त्यांना रोखून धरत त्यांचा पराभव केला. रुक्मिणीचा भाऊ रुक्मि तर कृष्णाला मारून रुक्मिणीला सोडवेन तरच कुंडिनपुरात पाऊल ठेवेन अशी घोर प्रतिज्ञा करून निघाला. नर्मदेच्या काठाने द्वारकेकडे जाणाऱ्या कृष्णाला त्याने काही अंतरानंतर गाठले. पण पराक्रमी कृष्णाने त्याचा पराभव तर केलाच पण रुक्मिणीच्या विनंतीवरून त्याला जीवदान देखील दिले. अपमानित रुक्मि पुन्हा कुंडिनपुरात न जाता भोजकट नावाचे वेगळे शहर वसवून राहिला. अशा रीतीने रुक्मिणीला पळवून कृष्णाने तिच्याशी जो विवाह केला त्याचे वर्णन हरिवंशात राक्षस विवाह म्हणूनच येते.

अर्जुनाचे विविध विवाह

द्रौपदी स्वयंवराचा पण जिंकणाऱ्या अर्जुनाने व त्याच्या इतर चार बंधूनी द्रौपदीशी केलेला विवाह एक आगळावेगळा विवाह आहे. हा विवाह घडवून आणण्यासाठी महाभारतकार व्यासांनाही बऱ्याच करामती कराव्या लागल्या. पांडवांमधील एकजूट टिकवून ठेवण्यासाठी पाचही पांडवांचा एका द्रौपदीशी विवाह घडणे आवश्यक होते. बहुपत्नीत्व हे त्याकाळच्या समाजात सर्वमान्य असले तरी बहुपतित्व मात्र प्रचलित नव्हते. पांडवांचे बालपण ज्या पर्वतीय प्रदेशात गेले होते, त्या प्रदेशात बहुपतित्वाची हि पद्धत सर्वसाधारण असली, तरी आर्यावर्तात मात्र रूढ नव्हती. म्हणूनच व्यासांनी राजा द्रुपदाची समजूत काढून त्याला राजी करण्यासाठी द्रौपदीच्या मागील जन्मातील शंकराने दिलेल्या वरदानाचा आश्रय घेतला, आणि एका द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह घडवून आणला व या प्रकाराला देखील समाजमान्यता मिळवून दिली.

नंतर पुढे खांडवप्रस्थात पांडव आल्यानंतर त्यांनी नारदांच्या सांगण्यावरून पांडवांनी द्रौपदी बरोबरच्या एकांतात दिवसांची वाटणीचा कालावधी निश्चित केला व या एकांत भंगाचे प्रायश्चित म्हणून १२ वर्ष वनवासाची शिक्षापण निश्चित केली. दुर्दैवाने एका ब्राम्हणाच्या चोरांनी पळविलेल्या गायी सोडविण्यासाठी शस्त्र हवीत यासाठी अर्जुनाकडून युधिष्ठिराच्या एकांत काळाचा भंग झाला व त्याच्याच नशिबी हा वनवास आला. या वनवासाच्या काळात अर्जुनाने उलुपी या नागकन्येशी व चित्रांगदा या मणिपूरच्या राजकन्येशी विवाह केलेला आढळतो. या विवाहापासून त्यांना अनुक्रमे इरावान व बभ्रुवाहन असे दोन पुत्र झाले. यानंतरचा त्याचा विवाह आहे तो श्रीकृष्णाची भगिनी सुभद्रेशी. या राक्षस विवाहाची म्हणजेच सुभद्राहरणाची कहाणी देखील बरीच उत्कंठावर्धक आहे.

अर्जुनाचे सुभद्राहरण

आपल्या वनवासादरम्यान देशोदेशी भ्रमंती करत अर्जुन भारत वर्षाच्या पश्चिमेला प्रभास क्षेत्राजवळ पोहोचला. इथे त्याचा सखा श्रीकृष्ण त्याला भेटला. याच ठिकाणी आपल्या सख्यांसोबत विहाराला आलेली सुभद्रा त्याच्या दृष्टीस पडली व त्याचे चित्त हरपले. त्याची हि स्थिती श्रीकृष्णाच्या लक्षात आली व त्याने ती आपलॆच बहीण असल्याचे सांगताच तो वरमला. त्याच्या मनाची स्थिती समजून चुकलेल्या श्रीकृष्णाला हा नातेसंबंध हवाच होता. अर्जुनाने कृष्णाजवळ तिच्या स्वयंवराबद्दल विचारणा केली तेव्हा धूर्त कृष्णाने त्याला सांगितले कि स्त्रियांच्या मनाचा काय भरवसा ? त्या कधी कुणावर भाळून त्याच्या गळ्यात माल घालतील हे काही सांगता यायचे नाही, त्यापेक्षा तू तिला पळवून न्यावेस हेच उत्तम, बाकीचे सर्व मी पाहून घेईन.

मग अर्जुनाने खांडवप्रस्थाकडे दूत पाठवून या विवाहासाठी युधिष्ठिराची अनुमती घेतली. ती मिळताच कृष्णार्जुनानी सुभद्राहरणाची योजना आखली. अर्जुन यावेळी द्वारकेतच कृष्णासोबत राहात होता व एके दिवशी सुभद्रा रैवतक पर्वतावर देवदर्शनाला जाणार असे समजताच अर्जुनाने त्याच दिवशी मृगयेचा बेत आखला. कृष्णाने त्या निमित्ताने त्याला आपला वेगवान रथ व शस्त्रास्त्रे देऊ केली. आणि मग योजनेबरहुकूम अर्जुनाने रैवतक पर्वतावरून सुभद्रेला आपल्या रथात घालून पळवून नेले.

यादवांना द्वारकेत हि बातमी काळातच यादव कुळातील एका मुलीला पळविल्याचे कळताच सर्व यादव खवळून उठले व त्यांनी तातडीने त्यांची सुधर्मा राजसभा भरवली. यात सर्व यादव तावातावाने अर्जुनाचा बिमोड करण्याविषयी व सुभद्रेला सोडवून आणण्याविषयी बोलू लागले. श्रीकृष्ण मात्र शांत होता. त्याचा हा शांतपणा पाहून बलरामाने इतर यादवांचे त्याकडे लक्ष वेधले व त्याचाही विचार घेण्याविषयी सुचविले. त्यावर श्रीकृष्णाने उसळलेल्या बलरामाचे व इतर यादवांचे शांतवनच केले नाही तर त्याने सुभद्रेसह अर्जुनालादेखील स्वीकारणे कसे यादवांच्या हिताचे आहे हे त्याने पटवून दिले. यासाठी त्याने सुधर्म राजसभेसमोर पुढील मुद्दे मांडले
(१) अर्जुनाला सुभद्रेशी स्वयंवरमंडपात लग्न करता आले असते पण ती आपलायचं गळ्यात माल घालेल याची त्याला खात्री नसावी म्हणूनच त्याने तिला पळवून न्यायाचे ठरविले असावे.
(२) क्षत्रियांचा अजून एक विवाह प्रकार म्हणजे आर्षविवाह. यात वधूपक्षाला म्हणजे यादवांना धन देऊन अर्जुनाला सुभद्रेशी विवाह करता आला असता, पण यादव द्रव्यलोभी नाहीत व म्हणूनच मुलीची अशी विक्री करण्यास ते कदापि तयार होणार नाहीत अशी अर्जुनाला खात्री असावी म्हणूनच त्याने या मार्गाचा अवलंब केला नसावा. यावरून त्याचे यादवांविषयीचे मत किती उच्चीचे आहे हेच दिसून येते.
(३) कुरुंच्या थोर कुळात जन्मलेल्या अर्जुनाने यादव कुळातील सुभद्रेला पळविली आहे. शिवाय तो आमच्या कुंती आत्याचा पुत्र आहे. कुलाचाराप्रमाणे देखील हा विवाह शास्त्र संमत व बरोबरीचाच ठरतो आणि सुभद्रा एका चांगल्या कुळातच पडली आहे.
(४) अर्जुन एक प्रतिष्ठित व पराक्रमी धनुर्धर आहे. त्याला अनेक अस्त्रविद्या देखील ज्ञात आहेत. जर तुम्ही त्याचा पाठलाग केलात आणि त्याला युद्धासाठी ललकारल्यावर त्याने एकट्याने तुमचा पराभव केला तर यादवकुळाची नाचक्कीच होईल.
अशा प्रकारे धूर्तपणे श्रीकृष्णाने अर्जुन व सुभद्रेला सन्मानपूर्वक माघारी बोलवून त्यांचा समारंभपूर्वक विवाह लावून देण्याची योजना यादवांच्या गली उतरवली. आणि सर्व यादव शांत होत या विवाहाला तयार झाले.

या विवाहानंतर अर्जुन आपल्या वनवासाचा १२ वर्षाचा कालावधी पूर्ण करण्याकरिता अजून १ वर्ष द्वारकेतच राहिला व हा कालावधी पूर्ण झाल्यावरच खांडवप्रस्थात परतला. इतक्या वर्षांनी, ते देखील कृष्णाची सावत्र भगिनी असलेल्या सुभद्रेला पत्नी म्हणून स्वीकारत तिच्यासह परतलेल्या अर्जुनावर व सुभद्रेवरदेखील द्रौपदीचा रोष असणे स्वाभाविक होते. परंतु तो घालविण्यासाठी अर्जुनाने सुभद्रेला गोपीचं वेष परिधान करून द्रौपदीला भेटायला पाठविले व तिने देखील द्रौपदीला “मला तुमची दासी समजा” असे म्हणत द्रौपदीचे मन जिंकले.

अभिमन्यू – उत्तरा विवाह – एक राजकीय संबंध

यानंतर महाभारतात राजसूय यज्ञ व त्यासाठी युधिष्टिराच्या ४ बंधूनी चारी दिशांना केलेल्या दिग्विजयाचे वर्ण येते. या यज्ञाच्या वेळी शिशुपालाचा कृष्णाने वध केला. याचवेळी पांडवांचे वैभव पाहून दुर्योधन द्वेषाने भरला. पांडवांचा सूड घेत त्यांचे वैभव कसे धुळीला मिळविता येईल याचा विचार त्याने सुरु केला. यातच त्याच्या मामाने, शकुनीने मांडलेला द्यूतक्रीडेचा प्रस्ताव त्याला पसंत पडला. हि योजना त्याने धृतराष्ट्राच्याही गली उतरवली व पांडवांना व विशेषतः युधिष्ठिराला द्यूताचे आव्हान दिले. यानंतर जे घडले ती महाभारत युद्धाची नांदीच होती असे म्हणावे लागते. द्रौपदी वस्रहरणाचा सर्वज्ञात प्रसंग घडला तो याच प्रसंगी.

द्यूतक्रीडेत हरलेल्या पांडवांना १२ वर्षाचा वनवास व १ वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला. यातील अज्ञातवासाच्या काळात पांडव विविध रूपे घेऊन मत्स्य देशाच्या विराट राजाच्या पदरी राहिले. यावेळी अर्जुन इथे एका तृतीयपंथी नृत्यशिक्षकाच्या , बृहन्नडेच्या , वेशात विराटराजाच्या कन्येला , उत्तरेला, नृत्य शिकविता राहिला. महापराक्रमी पांडव आपल्या दरबारात राहून आपली सेवा करीत होते या कौरवांनी केलेल्या गोधन हरण प्रसंगी त्यांनीच आपले रक्षण केले हे नंतर मत्स्यराज विराटाला कळताच तो ओशाळला व त्या बदल्यात त्याने आपली कन्या उत्तरा, अर्जुनाला देण्याची इच्छा बोलून दाखविलीय. पण वयाने ती आपल्या कन्येप्रमाणे व नात्याने ती आपली शिष्या असल्याचे सांगत अर्जुनाने आपल्या पुत्रासाठी, अभिमन्यूसाठी तिला मागणी घातली, जी राजा विराटाने आनंदाने मान्य केली. पांडवांसाठी दुर्योधन त्यांचे राज्य परत देणार नाही व त्यासाठी युद्ध करावे लागेल हे स्पष्ट दिसत होते व त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त राजे आपल्या बाजूने वाळविणे या त्यांना घट्ट नातेसंबंधाने बांधून ठेवणे आवश्यक होते. पुढे पांडवांच्या विजयासाठी ते एक मोठे कारण ठरले. कौरवांच्या बाजूने लढणारी बहुतांश सेना दुर्योधनाच्या बाजूने लढली तरी त्यातील बऱ्याच सेनानायकांना सर्वसमावेशक ध्येय नव्हते. पांडवांच्या बाजूने मात्र त्यांचे सगेसोयरे म्हणजे पांचाल , विराट, यादवांचा एक गट व स्वतः श्रीकृष्ण , असल्याने पांडवांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्याचे ध्येय या सर्वांसमोर होते आणि म्हणूनच त्यांचा जय झाला.