Bhikshatan Shiv at Kailasnathar Temple, Kanchipuram
Bhikshatan Shiv at Kailasnathar Temple, Kanchipuram

A different form of Shiva named as BHIKSHATAN SHIV is seen in some of the Shiv Temples of Southern India, including Kailasnathar Temple at Kanchipuram, Tamilnadu. The Story here briefly describes the story of Bhikshatan Shiv as found in various Puranas and its Sculptural representation in various Temples. Interestingly, we can connect the Stories of (1) Lingodbhav Shiv (2) Bhikshatan Shiv (3) Bhairav form of Shiv and (4) Kapalik Shiv though these stories and Sculptures.

कांचीपुरमच्या कैलासनाथार मंदिरात फिरताना शिवाचे एक वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळालं आणि याचे वेगळेपण शोधताना एक आगळीवेगळी कथा समोर आली ती म्हणजे “भिक्षाटन” करणाऱ्या शिवाची. ही मूर्ती जवळपास नग्न, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केलेली आहे आणि भैरवासारखी उग्र देखील नाही. याची कथा थोडक्यात समजली ती अशी…

लिंगोद्भव शिवाच्या स्वरूपाने कालभैरवाला जन्म देत ब्रम्हाचे ५वे शीर कापले. या ब्रह्महत्येच्या पापामुळे ते शीर त्याचा हाताला चिकटले. म्हणून पापाचे परीक्षालन करण्या करिता शिवाने भैरवाचे रुप टाकून कापालिकाचे (ब्रम्हाच्या कपालातून भिक्षा मागणारा) रुप धारण केले. हाच कापालिक म्हणजे देशोदेशी भिक्षाटन करत फिरणारा शिव.

Bhikshatana Shiva-Thiruvannamalai Temple
Bhikshatana Shiva-Thiruvannamalai Temple

दक्षिणेकडील काही देवळात शिवाचे हे “भिक्षाटन” रुप आढळते. राजाराजा चोलाचा पुत्र राजेंद्र चोला याने बांधलेल्या गंगाईकोंडा चोलापूरम येथील मंदिरात देखील हे आहे. भिक्षाटन करणारा हा शिव तिन्ही लोकात भटकतो तसा तो देवदार वनात (अथवा दारुक वनात) देखील जातो. तेथे ऋषीमुनी यज्ञ कार्यात गुंतलेले असतात. ऋषीपत्नी या शिवाचे नग्न पण तेजस्वी रुप पाहून मोहित होतात व त्यांची वस्त्रे ढळतात, अशीही शिल्पे काही ठिकाणी आहेत. कधीकधी या शिवाबरोबर इतर स्त्रिया, किंवा भिक्षा टोपलीत घेऊन चालणारा सहायक असेही दाखविले जातात. काही ठिकाणी ऋषीमुनी त्याला मारायला धावतात (आपल्या स्त्रियांना नादाला लावल्यामुळे) अशीही शिल्पे आहेत. यात शिल्पांमध्ये बरेचदा शिवाच्या पायात खडावा देखील दाखविल्या जातात. बरेचदा भिक्षा देणारी स्त्री “देवी अन्नपूर्णा” म्हणून देखील दर्शविली जाते.

भिक्षाटन शिवाच्या पुराणातील कथा

पुराणातील कथांनुसार यात वैविध्य आढळते. कूर्म पुराणानुसार या भटकंतीत शिव पुढे वैकुंठाला जातो तेव्हा त्याचे हे कापालिक रूप बघून विष्णूंचा द्वारपाल “विश्वकसेन” त्याला अडवितो तेव्हा संतप्त झालेला भिक्षाटन शिव विश्वकसेनाला आपल्या त्रिशुळाने मारून उचलतो व अजून एक पाप जोडतो. आता हे भिक्षाटन रुप कंकालमूर्तीत परिवर्तित होते व विष्णूकडे आपल्या मुक्ततेसाठी भिक्षा मागते. यावेळी विष्णू त्याच्या मस्तकाची शीर कापून त्याचीच धार अन्नरूपात या कंकालाच्या भिक्षापात्रात टाकतो व त्याला वाराणसीत जाऊन पापक्षालनाचा सल्ला देतो. तसे केल्यावर भिक्षाटन शिवाच्या हस्ताला चिकटलेले ब्रम्हाचे शीर गळून पडते. ही जागा म्हणजेच वाराणसीतील “कपाल मोचन कुंड” याच ठिकाणी विश्वकसेनाचे शव देखील अदृश्य होते व शिवाचे पापक्षालन होऊन तो पुन्हा कैलासावर परततो.

Bhikshatan Shiv , Bruhadeeshwar
भिक्षाटन शिव, बृहदीश्वर मंदिर, तंजावर

वामन पुराणात हि कथा थोड्या वेगळ्या स्वरूपात येते. या कथेनुसार प्रजापती दक्षाच्या यज्ञात सती पार्वतीने स्वतःला झोकून दिल्यावर तिच्या विरहाने व्याकुळ झालेला व त्याचबरोबर मदनाने त्याला उन्माद आणि विजृम्भण नावाचे दोन बाण मारून विद्ध केले. हा शिव संतापात विश्वात भ्रमण करून जगताला पीडा देत असताना यक्षाधिपती कुबेराचा पुत्र “पांचालिकाने” त्याला पाहिले व शिवाकडून ही दोन्ही अस्त्रे धारण करत तो “पांचालिकेश” झाला आणि शिव पुढे विंध्य पर्वताकडे भिक्षाटनासाठी निघाला तोच शिव म्हणजे हा “भिक्षाटन शिव”. पण शंकराला त्या अवस्थेत पाहून वसिष्ठ पत्नी अरुंधती आणि अत्री पत्नी अनुसूया यांच्या व्यतिरिक्त इतर ऋषीपत्नी मोहित होऊ लागल्या, त्यांची वस्त्रे ढळू लागली आणि म्हणून संतप्त झालेल्या ऋषींनी शिवलिंग पृथ्वीवर पतित होईल असा शाप दिला आणि शंकराची कामभावना गळून पडली, आणि शंकर तेथून अंतर्धान पावले.

BHIKSHATAN SHIV Jalkanteshwar, VELLORE
भिक्षाटन शिव, जलकंठेश्वर मंदिर , वेल्लोर

याप्रकारे शांत झालेले शंकर वनांत शांत बसलेले असताना कामदेव मदन त्यांच्या मागावर आला. त्याला पाहून शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले, म्हणजेच त्यांनी कामभावनेवर संपूर्ण विजय प्राप्त केला. भस्म झालेला कामदेव मदन त्यानंतर विना अंगाचा म्हणजेच अनंग म्हणून फिरू लागला.

Bhikshatan Shiv Ekambareshwar, Kanchipuram
भिक्षाटन शिव, एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरम

स्कंद पुराणानुसार ही कथा अगदी वेगळ्या स्वरुपात येते. यानुसार दारुक (देवदार) वनातील ऋषींचे गर्वहरण करण्याकरिता शिवाने “भिक्षाटन” रूप धारण केले तर विष्णूने मोहिनीरूप. तेथे तपश्चर्या करणाऱ्या ऋषींचे गर्वहरण करण्याकरिता शिव तेथे भिक्षेला गेले तेव्हा ते सतीच्या विरहाने व्याकुळ व तिच्याच विचारात होते. म्हणून ऋषिपत्नींना त्यांची दया आली व त्या त्यांना भिक्षा देऊ लागल्या. ते सहन न झाल्याने ऋषींनी त्यांना तुम्ही षंढ व्हाल असा शाप दिला पण यानंतर त्या ऋषींना सर्व जागाच लिंगमय भासले व त्याचा आदी आणि अंत त्यांना सापडेना. यावर त्यांनी हि गोष्ट ब्रह्मदेवानं सांगितली तेव्हा ब्रह्मदेवांनी शंकरांना हंसरूप घेऊन त्या लिंगाचे मूळ सापडल्याची कथा सांगितली आणि केतकीच्या फुलाची साक्ष दिली. यानंतर लिंगपूजा सर्वव्यापी झाली व अनेक ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली गेली.

भिक्षाटन शिव शिल्प ओळखायचे कसे?

Bhikshatan-Shiv-Veerabhadraswami-Temple, Lepakshi
भिक्षाटन शिव, वीरभद्रस्वामी मंदिर, लेपाक्षी. उजवीकडील खांबावर वस्त्र ढळलेली स्त्री

या शिवाच्या रूपाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाचे नग्न स्वरूप.  यातील शिल्पात बरेचदा शिवचरणी लीन झालेल्या स्त्रिया असतात. कामासक्तीने वस्त्रे ढळलेल्या स्त्रीचे शिल्पदेखील कधी कधी सोबत दाखविलेले असते. तर कधी जमलेली भिक्षा एका टोपलीत सोबत घेऊन चाललेला गण असतो व शिव त्यातीलच काही भाग सोबत असणाऱ्या कुत्र्याला देत असतात. भैरव स्वरूपात हातात ब्रम्हाचे ५वे शीर हातात घेऊन चाललेला शिव असतो. खांद्यावर अथवा हातात त्रिशूल असतो आणि बरेचदा या शिल्पांच्या पायात खडावा असतात ज्या इतर शिव शिल्पांमध्ये आढळून येत नाहीत.

भिक्षाटन शिवाच्या पायातील खडावा, कैलासनाथार मंदिर, कांचीपुरम
भिक्षाटन शिवाच्या पायातील खडावा, कैलासनाथार मंदिर, कांचीपुरम

भिक्षाटन शिवाच्या अनेक मूर्ती तामिळनाडूच्या विविध देवळातून पाहायला मिळाल्या. बृहदीश्वर मंदिर (तंजावर), एकांबरेश्वर मंदिर (कांचीपुरम), जळकंठेश्वर मंदिर (वेल्लोर) अशा काही मूर्तींची छायाचित्रे मी येथे टाकली आहेत पण सर्वसाधारणपणे दक्षिणेकडील बऱ्याच मंदिरात एकाहून अनेक खांबांवर शिवाचे भिक्षाटन, भैरव, कापालिक अशी अनेक रूपे सापडतात. फक्त आपण नीट निरीक्षण केले पाहिजे आणि या पाठीमागची कथा आपल्याला समजली तर ती शिल्प कळल्याचा आनंद देखील होतो.

महाराष्ट्रातील काही मंदिरांतील  मी घेतलेली छायाचित्रे देखील मग मी चाळली आणि यात मला खिद्रापूरच्या कोप्पेश्वर (Koppeshwar Temple, Khidrapur, Maharashtra)  मंदिरात, अंबरनाथच्या आम्रेश्वर शिव मंदिरात (Ambreshwar Temple, Ambarnath, Maharashtra) देखील हि शिल्पे कोरली असल्याचे आढळले.