#NarmadaParikrama

ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर या नर्मदा परिक्रमेच्या (Narmada Parikrama) प्रवासाची जरी काल समाप्ती झाली असली तरी यात्रेची सांगता / संकल्प पूर्ती होण्याकरिता आवश्यक असणारी “कर्मकांडे” आज पूर्ण केली गेली. यात नर्मदा कलश पूजन, आरती, ओंकारेश्वराला जलाभिषेक व नंतर कन्या पूजन या सर्व गोष्टींची रीतसर पूर्णता केली गेली आणि आमची ही यात्रा संपली.
या सर्व गोष्टी पाहिल्यावर आपलं मन विविध गोष्टींचा विचार करू लागतं. नर्मदा परिक्रमेसारख्या अनेक यात्रा आपल्या देशात पुराणकाळापासून अस्तित्त्वात आहेत. महाभारतात देखील धौम्य मुनी युधिष्ठिराला वनवासात भेटले असताना अनेक यात्रांबद्दल सांगतात. या यात्रांमागचा दृष्टीकोन केवळ धार्मिक नसून सामाजिक व आर्थिक उन्नतीचाही आहे हे आपल्या सहज लक्षात येते.
नदीकिनारी संस्कृतीचे निर्माण व्हायची सुरुवात होते. जगभर सर्वत्र नदीकिनाऱ्याने लोकवस्तीची सुरुवात झाली आहे. तेथूनच आर्थिक व्यवहारांची सुरुवात होत लोकवस्तीची घनता वाढीस लागते. मग यातून नगरसत्ता व राजसत्ता निर्माण होते. त्याचा विस्तार वाढला की आर्थिक केंद्रे तयार होतात व लोकभावना व अर्थकेंद्रे यांना पुरक असे धार्मिक केंद्र उभे राहायला सुरुवात होते. त्या धर्मस्थानाचे महत्त्व वाढण्याकरिता मग मंदिरे मोठी होतात, कथा जोडल्या जातात, पुराणकथांचे संदर्भ जोडले जातात. अनेक तपस्वी, महाराज येथे मानसोपचार तज्ज्ञासारखे काम करतात व त्या त्या भागात त्यांचे प्रस्थ वाढत त्यांचा संप्रदाय तयार होतो. नर्मदाकिनारी वावरताना, वेगवेगळी देवस्थाने, मठ पाहताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. एका नर्मदेने परिक्रमा स्वरूपातच कितीतरी लोकाना मनःशांती दिली, समाजस्वास्थ्य दिले, रोजगार दिला, दातृत्त्व वाढीस लावले, भक्तिभाव निर्माण केला, एकात्मता वाढीस लावली, हे आपल्या लक्षात येते.
भारतीय समाजमन मुळातच आध्यात्मिक. त्याची पूर्तता करणारी जी अनेक केंद्रे आहेत, त्यापैकीच ही एक परिक्रमा. याद्वारे नर्मदा मैय्या गेली हजारो वर्षे समाजजीवन बहरवत आली आहे. नर्मदेच्या काठावर असणारी असंख्य मंदिरे, शिवलिंगे, घाट, धर्मशाळा, गावे, मठ, वैरागी, परिक्रमावासी हे सर्व याची साक्ष देत आहेत. आणि हे कसे ते पाहण्यासाठी ही यात्रा प्रत्येकाने एकदा तरी करायलाच हवी.
आमचा नर्मदा परिक्रमा संकल्प सुखरुपपणे पूर्ण करविणाऱ्या प्रभू ट्रॅवेल्स च्या श्री सुहास देसाई (काका), प्रभंजन (उर्फ प्रभू) देसाई, सौ रागिणी देसाई या सर्वांचे मनापासून आभार. त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे आमची यात्रा सुखरुप पार पडली.
ॐ नर्मदे हर
…. Mahesh Naik (7th November 2023)
