Waman Avatar & Trivikram – बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) आणि ओणम 
ओणम हा केरळचा कापणीच्या हंगामाचा सण (Harvesting Festival), “बळी” या केरळच्या लोकप्रिय राजाचे या सुमारास राज्यात पुनरागमन होते म्हणून त्याचे जोरदार आगतस्वागत करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या सणाचा काळ म्हणजे चिंगम महिना (ऑगस्ट/सप्टेंबर), हा भाद्रपद शुद्ध द्वादशीपासून चार दिवसाचा काळ. 
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा)महाराष्ट्रासह उत्तर आणि मध्य भारतात हा दिवस राजा बळी पृथ्वीवर येतो या विश्वासाने साजरा केला जातो. या दिवशी राजा बळीची पूजा केली जाते आणि ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते, ज्यातून बळीच्या सुराज्याची आठवण जपली जाते. हा  काळ म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच  दिवाळीनंतरचा दिवस.  या दोन्ही सणांशी एकच कथा जोडलेली आहे पण भारताच्या दोन भिन्न प्रदेशात हे सण वेगवेगळ्या वेळी साजरे होतात. विष्णूंनी बळीला पाताल लोकाचा राजा बनवले आणि त्याला वरदान दिले की, वर्षातून तीन दिवस (अश्विन कृष्ण चतुर्दशी, अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा) तो पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेला भेटू शकेल व त्यांना आशीर्वाद देऊ शकेल.

बळीराजाची कथा

Waman Avatar & Trivikram - बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराच्या बाह्यभिंतीवरील वामनावतार
बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराच्या बाह्यभिंतीवरील वामनावतार

भागवत पुराणात विष्णूचा परमभक्त असलेल्या प्रल्हादाची कथा येथे .  हा प्रल्हाद दैत्यराज हिरण्यकश्यपू व त्याची राणी कयाधू यांचा पुत्र. हिरण्यकश्यपूचा वध श्रीविष्णूंनी आपल्या नरसिंह अवतारात केला. पुढे प्रल्हाद राजा झाला व त्याच्यानंतर त्याचा पुत्र विरोचन .  याचा विरोचनाचा पुत्र व प्रल्हादाचा नातू म्हणजे राजा बाली. हा स्वतः धर्मपरायण होता तसेच प्रजाहितदक्ष देखील होता .  या  बळीने दिग्विजयासाठी यज्ञ करायचे ठरविल्यावर आपले इंद्रपद डळमळीत होईल या भीतीने इंद्राने श्रीविष्णूंना साकडे घातले .  आदितीच्या पोटी जन्मलेल्या भगवंतांनी याच यज्ञात “बालबटू” म्हणून जायचे ठरविले. हाच तो “वामनावतार”, ज्याचा उद्देश बळीचे राज्य त्याच्याकडून हिरावून घेऊन त्यातील स्वर्ग राज्याचा भाग इंद्रादी देवांना परत करणे हा होता. याचक म्हणून यज्ञस्थळी दाखल झालेल्या वामनाला बळीने प्रसन्न होत हवे ते दान मागण्यास सांगितले. तेव्हा मोठ्या चतुराईने त्याने अवघी तीन पावले राहतील एवढी भूमी मागितली. त्याच्या या मागणीने बळी  आश्चर्यचकित झाला. पण दैत्यगुरू शुक्राचार्यांनी वामनाचे खरे स्वरूप व कावा ओळखला आणि बळीला हे दानाचे उदक वामनाच्या हातावर न सोडण्याची विनंती केली.

Waman Avatar & Trivikram दान देणारा बळीराजा, दान घेणारा वामन व दान अडवू पाहणारे शुक्राचार्य
दान देणारा बळीराजा, दान घेणारा वामन व दान अडवू पाहणारे शुक्राचार्य – होयसळेश्वर मंदिर, हळेबिडू
पण सत्यवचनी बळी त्याला तयार झाला नाही. त्याने जसे हे उदक सोडण्याची तयारी केली तसतसा वामनाचा आकार वाढू लागला, व तो त्रिविक्रम रूपात परिवर्तित झाला. पहिल्या पावलाने त्याने सकल  पृथ्वी पादाक्रांत केली तर दुसऱ्याने स्वर्ग. आता प्रश्न होता तिसरे पाऊल कुठे ठेवायचे याचा. अशा वेळी बळीने नतमस्तक होत स्वतःचे शीर पुढे केले व त्यावर आपले तिसरे पाऊल ठेवावे असे त्रिविक्रमाला सुचविले. यामुळे बळी “सूतल” नावाच्या पाताळात ढकलला जाणार होता त्यावेळी त्याने आपल्या प्रजेवर आपले व प्रजेचंही आपल्यावर आत्यंतिक प्रेम असल्याने दरवर्षी एकवेळ आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पाताळातून येऊन द्यावे अशी विनंती त्रिविक्रमाला केली. असा हा लोकप्रिय बळी राजा कापणीच्या हंगामाच्या वेळी प्रजेला भेटण्यासाठी दरवर्षी येतो म्हणून केरळवासी हा सण “ओणम” या नावाने दरवर्षी साजरा करतात.
या बळी राजाला सप्तचिरंजीवींमध्ये देखील स्थान मिळालेले आहे. बळीने अत्यंत न्यायाने राज्य चालविले. कार्तिक शु. प्रतिपदा ही त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. हा विक्रम संवताचा प्रारंभदिन असून हिंदूंच्या साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो.

त्रिविक्रम अवताराच्या इतर काही सुंदर मूर्ती

Waman Avatar & Trivikram पट्टदकल
त्रिविक्रम , पट्टदकल
Waman Avatar & Trivikram, Badami
त्रिविक्रम, बदामी
Waman Avatar & Trivikram
बळीला पाताळात ढकलल्यावर त्रिविक्रमाचे पाद्यपूजन करणारे ब्रह्मदेव
बेलूर, हळेबिडू, हंपी, बदामी या ठिकाणी फिरताना आपल्याला वामनावतार व त्रिविक्रमाची सुंदर शिल्पे अनेक ठिकाणी आढळून येतात. यातील वामनाचे बटू स्वरूप व त्रिविक्रमाचे भव्य स्वरूप आपल्याला आकर्षित करते. याच शिल्पात काही ठिकाणी बळीला अडविणारे शुक्राचार्य, त्रिविक्रमाचे पादप्रक्षालन करणारे ब्रह्मदेव, पाताळात पडणारा बळी अशी विविध चित्रीकरणे आढळून येतात.
कर्नाटकातील इतर काही महत्त्वाच्या मंदिराविषयी