The Kanheri Caves (कान्हेरीच्या गुंफा )are a group of Buddhist rock caves cut into a massive basalt rock landscape, in the dense forests of the Sanjay Gandhi National Park (SNGP), Near Borivali suburb of Mumbai. They contain nearly 109 Buddhist sculptures and relief carvings, few paintings and nearly hundred inscriptions, dating from the 1st century CE to the 10th century CE. Thus these date back to nearly 2000 years of History.
The Name Kanheri comes from the Sanskrit Krishnagiri, which means “black mountain”. The descriptions of these caves are found in the travelogues of various foreign travellers like Fa-Hein who visited India during 399-411 CE and later by several other travellers. At a later date in 1892, even Swami Vivekanand had visited Kanheri Caves. These caves contain a rare rock carving of Eleven headed Avalokitesvara as well as Stories about Litany of Buddha or Litany of Avalokiteshwara.
मुंबईच्या अगदी जवळ, म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत एक पुरातन बौद्ध गुंफांचा राष्ट्रीय ठेवा आहे. कान्हेरी, मरोळ, महाकाली लेणी, मागाठाणे, मंडपेश्वर लेणी आणि जोगेश्वरी लेणी असे अनेक लेणीसमूह आपल्याला मुंबई परिसरात आढळून येतात. त्यापैकी कान्हेरी येथील बौद्ध लेण्यांचा समूह ही सर्वात विस्तृत मालिका आहे, ज्यामध्ये सुमारे १०९ स्वतंत्र लेणी आहेत. भर मुंबईत असूनदेखील एका टोकाला असल्याने या उद्यानात येणारे सगळेच लोक तिथे जातात असे नाही, पण हा लेणीसमूह अतिशय उत्कृष्ट असा असून अभ्यासकांना एक पर्वणीच आहे. त्यामध्ये बौद्ध शिल्पे आणि रिलीफ प्रकारातील कोरीवकाम, चित्रे आणि बरेचसे शिलालेख आहेत. हा सर्व खजिना इ. स. १ ले शतक ते १० वे शतक इतक्या प्रदीर्घ कालावधीतील, म्हणजे काहींचा कालावधी २००० वर्षांपूर्वीचा मानता येईल असा आहे. यातील कान्हेरी हे नाव “कृष्णगिरी” या संस्कृत शब्दातून आले आहे, ज्याचा अर्थ “काळा पर्वत” असा होतो. या लेण्यासंबंधी पल्लवी, संस्कृत, चिनी भाषेतील काही आणि ब्राह्मी लिपीतील सुमारे १०० शिलालेख येथे तसेच इतरत्र उपलब्ध आहेत व त्यामुळे आपल्याला या लेण्याच्या काळाबद्दल तसेच त्याच्याशी संबंधित व्यक्ती व राजघराण्याबद्दल माहिती मिळते.
या लेण्यांपर्यंत पोहोचायचे कसे ?
मुंबईजवळ पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (Sanjay Gandhi National Park – SGNP) असलेल्या या लेण्यांपर्यंत पोहोचायला तुम्हाला या उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी स्वतःच्या वाहनाने, बसने अथवा ट्रेनने (मुंबईच्या बोरिवली स्टेशन पर्यंत व तेथून रिक्षाने) यायला हवे. येथे स्वतःचे वाहन पार्क करण्याची सोय आहे (सध्या रु ३५ प्रति तास चार चाकी वाहनांसाठी). आपले वाहन घेऊन आत जात येत नाही. पण आत फिरण्यासाठी व विशेषतः कान्हेरी लेण्यांपर्यंतचा ६ किमी चा प्रवास करण्यासाठी १८८ क्रमांकाची BEST ची बस सेवा उपलब्ध आहे. या बस दर ३० मिनिटांनी उपलब्ध असतात.
याशिवाय आत जे आदिवासी पाडे आहेत त्यापैकी काही तरुणांची वाहने आपल्याला १०००/ ते १६००/ रुपये फेरीकरता मिळू शकतात. यात ते लेण्यांपाशी तासभर थांबतात व परत घेऊन येतात. यात जैन मंदिर, बोटींग, सफारी हि ठिकाणे दाखवली जातात. पण हि ठिकाणे वेळ असल्यास आपणही बसने फिरू शकतो व स्वतःच हवा तेवढा वेळ येथे घालवू शकतो म्हणून बसने जाणे हा योग्य पर्याय ठरतो. शनिवार-रविवार व सुटीच्या दिवशी बसला गर्दी असून शकते व या वेळी इतर वाहनांचे दर देखील वाढू शकतात. पावसाळ्यात तर इथे फारच गर्दी होते.
SNGP मधील प्रवेशासाठी आपल्याला प्रत्येकी ९४ रुपये शुल्क द्यावे लागते (५ ते १२ वर्षापर्यंत मुलांसाठी रु ५०/-) तर कान्हेरी लेणी पाहण्यासाठी अधिकचे रु २५/- माणशी द्यावे लागतात. येथे मार्गदर्शक (गाईड) उपलब्ध नाहीत, पण काही सुरक्षारक्षक माहिती देण्यास तत्पर असतात. तसेच प्रत्येक महत्त्वाच्या लेण्यांपाशी माहितीफलक लावलेले आहेत.
लेणीगुंफांचे वैशिष्ट्य
यातील बहुतेक गुहा बौद्ध विहार होत्या. म्हणजेच यांचा वापर राहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी होत होता. यातील मोठी लेणी म्हणजेच चैत्य, जे सामूहिक उपासनेसाठी, सभांसाठी, समूहभोजनासाठी वापरले जात असावेत. यात आपल्याला अतिशय सुंदर कोरीव बौद्ध शिल्पे, नक्षीदार खांब, स्तूप आदी आढळून येतात.
यातील बऱ्याचश्या गुहांना स्वतःच्या पाण्याच्या टाक्या आहेत. गुहांच्या वर असलेल्या खडकातून कापलेल्या वाहिन्यांनी पावसाचे पाणी या टाक्यांमध्ये साठवून ठेवण्याची सोय केलेली आपल्याला आढळते. यात काही ठिकाणी यातील गाळ खाली बसवून स्वच्छ पाणी पुढच्या टाकीत घेण्याची सोय आहे. एकदा लेण्यांचे कायमस्वरूपी मठांमध्ये रूपांतर झाल्यानंतर, त्यांच्या भिंतींवर बुद्ध आणि बोधिसत्वांच्या मुरतो / कथा कोरलेल्या आहेत.
या ठिकाणी जरी १०९ लेणीगुंफा असल्या तरी सर्वच काही सुस्थितीत आणि महत्त्वाच्या नाहीत. या लेण्यांना क्रमांक दिले असून त्याचा नकाशा या लेणीसमूहाच्या प्रवेशद्वारावर लावलेला आहे. यात नमूद केल्याप्रमाणे लेणी क्रमांक ३, ११, ३४, ४१, ६७, ८९ व ९० या गुहा कोणत्या न कोणत्या कारणाने पर्यटकांसाठी फार महत्त्वाच्या आहेत. इतर गुहा म्हणजे छोटीमोठी निवास स्थाने असून त्यातही काही लेण्यांमध्ये आपल्याला शिलालेख आढळून येतात व त्या अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. यातील काही महत्त्वाची लेणी आपण थोडक्यात पाहू.
गुहा क्रमांक १ : प्रवेशद्वारापाशी असलेली हि गुहा द्विस्तरीय आहे पण अपूर्ण आहे. बहुधा येथील प्रस्तरात दोष आढळल्याने हे लेणे अपूर्ण सोडण्यात आले असावे.

गुहा क्रमांक ३ : हे कान्हेरी लेण्यातील सर्वात उल्लेखनीय चैत्यगृह असून या लेण्याच्या बाह्य भागातील ब्राह्मी शिलालेखावरून याच्या निर्मितीबद्दल माहिती कळते. हे लेणे सातवाहन कालीन असून राजा यज्ञश्री सातकर्णी याच्या कारकिर्दीत (इ स १७२ ते २०१) गजसेन व गजवीर या दोन व्यापारी बंधूनी याचे निर्माण करविले. या लेण्याच्या आत गजपृष्ठाकार सभागृह असून भव्य स्तूप देखील आहे. बाजूच्या खांबांवर हत्तीवर आरूढ युगुल शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराशी देखील युगुल शिल्पे असून दोन्ही बाजूनं भव्य बुद्ध प्रतिमा आहेत.
(फोटोवर क्लिक करून “i” बटन वर क्लिक केल्यास फोटोची वैयक्तिक माहिती पाहता येईल)
गुहा क्रमांक ४ : यात एक छोटासा स्तूप असून त्यावर बुद्धमूर्ती कोरलेल्या आहेत. हि गुहा प्राचीन असावी असे मानले जाते.
गुहा क्रमांक ११: हि एक विस्तीर्ण गुहा असून यात बरेच जण एकावेळी पठण करण्यासाठी, चर्चासत्रासाठी अथवा भोजनासाठी बसू शकतील अशी व्यवस्था आहे. यातील हॉलच्या मध्यभागी, ७३ फूट लांब व ३२ फूट रुंद , मोकळी जागा आहे ज्यात दोन लांबलचक दगडी बाक आहेत त्यावरून ही लेणी केवळ एक विहार नसून धर्मशाळा असल्याचे स्पष्ट दिसते. या गुहेच्या बाहेरच एक पाण्याचे टाके आहे ज्यात त्यावरील खडकातून झिरपलेले पाणी संस्थावून ठेवण्याची व्यवस्था केलेली आढळते. या टाक्याच्या वरच एक शिलालेख कोरलेला आपल्याला दिसतो. या गुहेपासून वर जाताना आपल्याला एक पाणी शुद्धीकरण प्रक्रिया कुंड दिसून येते यात झिरपलेल्या पाण्याचा गाळ खाली बसल्यावर शुद्ध पाणी पुढील दगडी खड्ड्यात साठवले जाईल याची व्यवस्था केलेली दिसते.
(फोटोवर क्लिक करून “i” बटन वर क्लिक केल्यास फोटोची वैयक्तिक माहिती पाहता येईल)
गुहा क्रमांक ३४ : ही एकमेव अशी गुहा आहे जिथे छतावर चित्रांचे अवशेष आढळतात. बुद्धाला भूमी-स्पर्श-मुद्रेमध्ये दाखवले आहे. हे भूमी-स्पर्शाचे चिन्ह फक्त इथल्या पेंटिंग्जमध्ये दिसते पण कोरीव कामात नाही. चित्रकला पूर्ण टिकली नसली तरी त्यात एकापेक्षा जास्त आकृती असाव्यात हे नक्की.

गुहा क्रमांक ४१ :
या गुहेची दोन महत्त्वाची चिन्हे म्हणजे (१) अकरा डोक्याची अवलोकितेश्वराची प्रतिमा. अकरा डोक्यांचा अवलोकितेश्वर – अवलोकितेश्वर हा सर्वात प्रसिद्ध बौद्ध देव आहे. त्यांना पद्मपाणी बोधिसत्व म्हणूनही ओळखले जाते. अवलोकितेश्वराची प्रतिमा भारतात विकसित झाली असली तरी अकरा डोक्यांचा अवलोकितेश्वर फारसा आढळत नाही. भारतातील दगडात अवलोकितेश्वराचे असे हे एकमेव प्रतिनिधित्व आहे.अकरा डोक्यांचा अवलोकितेश्वर साधारणपणे नेपाळ आणि तिबेटमध्ये पाहायला मिळतो . (२) याच ठिकाणी उजवीकडे अवलोकितेश्वराची लिटनी हे प्रसिद्ध शिल्प जे येथे खूपच भंगलेल्या अवस्थेत आहे पण गुहा क्रमांक ९० मध्ये थोडेफार कळून येते.
(फोटोवर क्लिक करून “i” बटन वर क्लिक केल्यास फोटोची वैयक्तिक माहिती पाहता येईल)
गुहा क्रमांक ६७ :
बुद्धाच्या जीवनाशी संबंधित विविध शिल्पे असल्यामुळे ही गुहा चित्रशाळा म्हणून प्रसिद्ध आहे. यातील काही शिल्पांमधे दीपंकर जातकातील कथा असल्याचे समजते.
गुहा क्रमांक ८९:
यात आत शिरल्यावर डावीकडे असणाऱ्या प्रतिमेत बुद्ध आम्र वृक्षाखाली बसलेले दाखविले आहेत व या वृक्षावर एक माकड आणि एक पक्षी (पोपट) देखील दाखविला आहे. तसेच ते ज्या कमळावर बसलेले आहेत त्या कमळाचा देठ नागांनी धरून ठेवला असल्याचे दर्शविले आहे. या गुहेत अशी अनेक शिल्पे आहेत पण ती बरीचशी एकसारखी आहेत. इतर शिल्पांमध्ये आम्रवृक्ष दाखविलेला नाही. यात बुद्धाच्या दोन्हीकडे असलेले पद्मपाणी आणि अवलोकितेश्वर हे बोधिसत्त्व सर्व शिल्पांमध्ये आहेत.
(फोटोवर क्लिक करून “i” बटन वर क्लिक केल्यास फोटोची वैयक्तिक माहिती पाहता येईल)
गुहा क्रमांक ९० :
या गुहेच्या प्रवेशद्वारापाशीच चिनी भाषेतील एक शिलालेख आपल्या दृष्टीस पडतो. तसेच या छोट्या गुहेत लिटनी ऑफ अवलोकितेश्वर नावाने प्रसिद्ध असलेले अवलोकितेश्वरांचे व त्यांच्यासह तारा आणि भ्रिकुटी या त्यांच्या रूपांचे एकत्रित शिल्प आहे. यात बुद्ध धर्मातील ८ संकटे (या ठिकाणी १० संकटे दाखविली आहेत) व त्यापासून बचावासाठी अवलोकितेश्वरांकडे प्रार्थना करणारे अनुयायी दाखविले आहेत. यातील हत्तीचा हल्ला, सिंहाचा हल्ला, नागाचा हल्ला हि ३ संकटे तर अतिशय स्पष्टपणे ओळखू येतात. याव्यतिरिक्त याखाली आगीचे भय, बुडत्या जहाजातून सुटकेसाठी प्रार्थना, असावीत अवलोकितेश्वरांच्या उजवीकडील सर्वात वरचे शिल्प ओळखता न येण्याइतपत खराब झाले आहे, त्याखाली एखाद्या नागाला ओळखता न येणाऱ्या प्राण्याने धमकावले आहे, एका मुलासह असणाऱ्या एका महिलेला दरोडेखोर/पतीने मारहाण केली आहे, माणसाला दरोडेखोरांनी मारहाण केली आहे आणि सर्वात खालचा फलक ओळखता येत नाही कारण तो खूप विद्रूप आहे.
या शिल्पात तारेच्या अंगांवर दाखविलेली वस्त्रे व दागिने उत्कृष्ट कोरीव काम केलेली आहेत. याच्याच शेजारील एक मकरशिल्प चमकणाऱ्या दगडात बनविले असल्याचे आपल्याला आढळते.
या गुहेत बुद्धाचे आणखी एक खास शिल्प आहे. यात बुद्ध कमळावर विराजमान आहेत ज्याचे देठ तळाशी नाग आणि मध्यभागी इंद्राने धरलेला आहे. कमळाच्या देठाच्या खाली इंद्र आणि त्याच्या सेवकांचे असणे हे या शिल्पाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे जे इतरत्र दिसत नाही. त्याचबरोबर पल्लवी आणि चिनी लिपीत सापडलेल्या शिलालेखांसाठीही ही गुहा महत्त्वाची मानली जाते.
(फोटोवर क्लिक करून “i” बटन वर क्लिक केल्यास फोटोची वैयक्तिक माहिती पाहता येईल)
मुंबईच्या जवळ राहणाऱ्यानी तर हा अमूल्य ठेवा पाहायलाच हवा पण तुम्ही मुंबई बाहेरील असाल तरीदेखील कान्हेरीची हि लेणी पाहायला नक्की जा. त्यानिमित्ताने बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालादेखील भेट द्या.
