हिंदू धर्मातील १६ संस्कार

16 Sanskaras in Hinduism-हिंदू धर्मात, मानव जीवनाचा सर्वांगीण विकास घडविणारे १६ संस्कार महत्त्वपूर्ण भूमिका बजावितात. खरे तर वैदिक ग्रंथांमध्ये ४० संस्कारांचा उल्लेख येतो पण यातील बरेच संस्कार आता लोप पावले असून केवळ १६ संस्कार प्रचलित आहेत. मनुष्याच्या जन्मापूर्वीपासून ते मृत्यूनंतर देखील करण्यात येणारे हे विविध संस्कार म्हणजे परिपूर्ण मनुष्य जीवनातील उत्सव. या संस्कारांच्या माध्यमातून हिंदू धर्मातील व्यक्ति आध्यात्मिकता, नैतिकता, आणि सामाजिक समरसता याद्वारे एका परिपूर्ण व्यक्तिमत्त्वात रूपांतरित होते. हे १६ संस्कार मुख्यत्त्वेकरून पुढील प्रकारांमध्ये विभागले जातात. याबद्दलची चर्चा ६ वेदांगांचा भाग असलेल्या कल्पसूत्रांमधील गृह्यसूत्रांमध्ये येते. यातील काही संस्कारांचा उल्लेख संस्कृत महाकाव्यांमध्ये म्हणजे कालिदासाचे कुमारसंभवम, रघुवंश, किंवा श्रीहर्षाचे नैषधीयचरितम यात देखील आढळून येतात. यातील काही संस्कारांची नावे थोड्याफार फरकाने वेगळी आढळून येतात.
१) गर्भाधान (Garbhadhana):
विवाहाच्या पूर्वील हे संस्कार जन्मधारण किंवा गर्भधारण साधण्यासाठी केले जातात. गर्भाधान म्हणजे योग्य दिवशी,योग्य वेळी,पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मिलन होऊन स्त्रीच्या गर्भाशयात गर्भाची बीज रुपाने स्थापना होणे. रजोदर्शनापासुन १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होउ शकतो.या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासुन पहील्या चार रात्री वर्ज्य कराव्या.अशुभ दिवस,ग्रहणदिवस,कुयोग त्या दिवशी असू नये. हा संस्कार विवाहानंतर प्रथम रजोदर्शन झाल्यापासून (मासिक पाळी संपल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून) पहिल्या सोळा रात्री, ज्यास ‘ऋतूकाल’ म्हणतात, त्या वेळी करतात.
२) पुंसवन (Pumsavana):
गर्भधारणा झाल्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी हा संस्कार केला जातो. गर्भधारणा झाली आहे हे कळल्यानंतर लगेचच अथवा तिसऱ्या महिन्यात शु. एकादशीपासून वद्य पंचमीपर्यंत रिक्त तिथी सोडून कोणत्याही तिथीला हा संस्कार केला जातो. पुंसवन संस्कार केल्याने निरोगी मूल जन्माला येते, तसेच या कर्माने गर्भातील बालकाचे रक्षणही होते, असे मानले जाते.
३) सीमंतोन्नयन (Simantonnayana):
गर्भवती स्त्रीला विशेष सुरक्षितता देण्याचा संस्कार हे म्हणजे सीमंतोन्नयन. हा आश्वलायन गृह्यसूत्र या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे सोळा संस्कारातील चौथा तसेच एक महत्त्वाचा संस्कार आहे. आधुनिक काळातील डोहाळे जेवण या प्रथेचे प्राचीन रूप या संस्कारात आहे असे मानले जाते.
४) जातकर्म (Jatakarma):
आईच्या उदरातून बाळ बाहेर आल्यानंतर नालच्छेदनापूर्वी हा संस्कार करत असत. हल्ली रुग्णालयात प्रसूती होत असल्याने हा संस्कार लोप पावला आहे. गर्भातील पाण्याचे दोष नाहीसे व्हावेत हा या संस्कारामागील हेतू आहे.
५) नामकरण (Namakarana):
जन्म झाल्यापासून मुलाला बारावे दिवशी व मुलीला तेराव्या दिवशी प्रथम पाळण्यात ठेवावे. याच दिवशी मुलाचे व मुलीचे व्यावहारिक नाव ठेवले जाते . याकरता इतर शुभ दिवस पाहण्याची गरज नसते.
६) निष्क्रमण (Niskramana):
जन्मानंतर दुस-या / तिस-या महिन्यात हा संस्कार करतात. या संस्काराबरोबरच “सूर्यावलोकन” हा संस्कार देखील करतात. बालकाला प्रथमच घराबाहेर नेऊन विधिपूर्वक सूर्यदर्शन तसेच शक्यतोवर देवदर्शन करवतात. पंचमहाभूतांप्रती बालकाचा आदरभाव जागृत व्हावा हा या संस्कारामागील हेतू आहे.
७) अन्नप्राशन (Annaprashana):

जन्मानंतर सहाव्या महिन्यात हा संस्कार करतात. बालकाला प्रथमच घन पदार्थ (Solid Food) भरवतात. बालकाला निरनिराळ्या पदार्थांची रुची निर्माण व्हावी तसेच त्याची पचनशक्ती वाढावी हा या संस्कारामागील हेतू आहे. दक्षिणेकडील बऱ्याच मंदिरांमध्ये या विधीसाठी वेगळा कक्ष असतो व तेथे हा विधी मंदिरातील मंडपांमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो.
८)कर्णवेध (Karnavedh):

कर्णवेध म्हणजे कान टोचणे. यात मुलींचेच नव्हे तर मुलांचेही कां टोचले जातात. या संस्काराचे शास्त्रीय स्पष्टीकरणही आहे. कानाच्या पाळीमध्ये एक महत्त्वाचा दबावबिंदू असतो. त्यामुळे कान टोचल्याने बुद्धिमत्ता विकसित होण्यास आणि श्वसनाच्या संसर्गाविरूद्ध तसेच हर्नियासारख्या रोगांपासून प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. दक्षिणेकडील मंदिरांमध्ये कर्णवेध विधीसाठी असलेले मंडप आढळून येतात व आजही असे विधी या मंडपांमध्ये केले जातात .
९) वर्धापन (Vardhapan):
जन्मकालापासुन एक सौरवर्ष पुर्ण झाल्यावर जन्मनक्षत्राचे दिवशी बालकाचा वाढदिवस केला जातो तो म्हणजे वर्धापन संस्कार. तिळगुळ आणि दूध यांच्या मिश्रणाचे प्राशन, नारीनिरांजन (सुवासिनींनी ओवाळणे), अभिषेक, विविध सूक्तांचे पठण इत्यादि धार्मिक विधी यथाशक्ति करावेत. आता मात्र या संस्कारानें पूर्णपणे पाश्चात्य रुप धारण केले आहे.
१०) चूडाकर्म किंवा चौलकर्म (Chudakarana):
जन्मानंतर तिस-या वर्षी विधीपूर्वक केस कापून शेंडी ठेवण्याच्या या संस्कारास चूडाकर्म किंवा चौलकर्म असे म्हटले जाते. आयुष्य, बल व तेज यांची वृद्धी व्हावी हा या संस्कारामागील हेतू आहे. सध्याच्या काळात हा संस्कार वेगळा न करता उपनयन (मुंज) या संस्काराबरोबर करतात,किंवा मुलाचे अथवा मुलीचे जावळ करून बोरनहाण केले जाते.
११) अक्षरारंभ (Akshararambh):
म्हणजे अक्षर शिक्षणाला आरंभ. बालकाला वयाच्या पाचव्या वर्षी अक्षरे काढण्यास शिकविण्यास आरंभ करावा. योग्य दिवशी व वारी, शुभ योग, शुभ पक्ष इत्यादी बघून सुरुवात करावी. या वेळी, गणपती, लक्ष्मी, विष्णू, सरस्वती, वेद, गुरूजन, ब्राह्मण यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे. सर्वप्रथम, ॐ (ओम) लिहून मग दुसरी अक्षरे लिहावी. अलीकडच्या काळात मुलांना बालवाडीमध्ये घातले जाते.
१२) उपनयन (Upanayana): / वेदारंभ (Vedarembh)

ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य वर्णाच्या बालकांना वेदांत वाचनाचा अधिकार होता. जन्मानंतर आठव्या वर्षी हा संस्कार करतात. (गुरुच्या) जवळ नेणे असा याचा अर्थ होतो. या संस्कारानंतर बालकाचा दुसरा जन्म (Spiritual Birth) होतो असे समजतात. त्यानंतरच त्या बालकाला द्विज असे संबोधण्यात येते. या संस्कारानंतर ख-या अर्थाने अध्ययनाची सुरुवात होते व बालकाचा ब्रह्मचर्याश्रमामधे प्रवेश होतो.
१३) केशांत / ऋतूशुद्धी: Keshanta/ Ritusuddhi: Cutting the hair
‘केश’ म्हणजे केस आणि ‘अंत’ म्हणजे शेवट. या संस्कारामध्ये विद्यार्थ्याने प्रौढत्व गाठल्यावर प्रथम दाढीचे मुंडण केले जाते, विशेषत: मुलाच्या चेहऱ्यावर केसांची थोडीशी वाढ होते. त्याचप्रमाणे, मुलींसाठी ऋतुशुद्धी सोहळा, जेव्हा तिला पहिल्यांदा मासिक पाळी सुरू होतो तेव्हा केला जातो.
हा संस्कार हे बालपणापासून प्रौढत्वापर्यंतचे महत्त्वपूर्ण संक्रमण दर्शवतो. जीवनाच्या या वळणावर, विद्यार्थी शारीरिक आणि मानसिक दोन्ही रीत्या झालेल्या बदलांना ओळखतो आणि स्वीकारतो.
१४) समावर्तन (Samavartana):
पूर्वीच्या कालच्या गुरुकुलातील शिक्षण समाप्तीनंतर, गुरूच्या संमतीने ब्रह्मचर्याश्रमातून निवृत्त होणे म्हणजेच समावर्तन संस्कार किंवा सोडमुंज. किमान १२ वर्षे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे साधारणपणे विसाव्या वर्षी हा संस्कार करतात. या संस्कारा नंतर मुलगा विवाहयोग्य झाला आहे असे समजतात.
१५) विवाह (Vivaha):

पुढील आयुष्याची जबाबदारी स्वतंत्रपणे स्वीकारणे, संसारासाठी आवश्यक असलेल्या वस्तू / पैसा मिळवणे, उत्तम व निरोगी प्रजा निर्माण करणे तसेच प्रसंगानुसार योग्य ते धार्मिक विधी पार पाडून देव आणि पितर यांच्या ऋणातून अंशत: मुक्त होणे हा या संस्कारमागील हेतू आहे. यामधे सुमारे दहा ते बारा निरनिराळ्या विधींचा समावेश असतो. हा त्या व्यक्तीचा गृहस्थाश्रम प्रवेश.
१६) अंत्येष्टि (Antyeshti):
माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे.
जरी या षोडश संस्कारांना खूप महत्त्व आहे, तरी आधुनिक काळात नामकरण, उपनयन, विवाह आणि अंत्येष्टी या चार संस्कारांचेच पालन केले जाते.
