मंदिर शिल्पांमधील पंचतंत्र-Panchtantra in Temple Sculptures – काही ठिकाणी मंदिरातील शिल्पांमध्ये आपल्याला पुराणकथांबरोबर पंचतंत्रातील कथा देखील कोरलेल्या आढळतात ,  अशाच काही शिल्पांबद्दल . …

मल्लिकार्जुन मंदिर, पट्टदकल येथील वानर व मगराची कथा

मल्लिकार्जुन मंदिर पट्टदकल येथील या शिल्पात आपल्याला पंचतंत्रातील दोन कथा पाहायला मिळतात. यापैकी वरची कथा आहे ती ताम्रमुख नावाचा वानर व एक मगर यांच्या मैत्रीची. हा वानर एका झाडावरील गोड जांभळे रोज त्या शेजारील तलावात राहणाऱ्या मगराला खाण्याकरिता टाकत असे. करता करता त्या दोघांची मैत्री जमली. एके दिवशी मगराने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली. तेव्हा, “जर जांभळे इतकी गोड असतील तर ती रोज खाणाऱ्या वानराचे काळीज किती गोड असेल? तेव्हा त्याचे काळी जाणून मला द्याच”, असा हट्ट त्या मगराच्या पत्नीने धरला. अनेकदा समजावून देखील ती काही ऐकेना. तेव्हा मगराने शेवटी तो हट्ट पुरवायचे ठरविले व त्यासाठी त्याने आपला मित्र असलेल्या ताम्रमुख वानराला गोड बोलून घरी जेवणासाठी यायचे आमंत्रण दिले.

Monkey crocodile story Mukteshwar Odisha
ओडिशा येथील मुक्तेश्वर मंदिरातील पंचतंत्र कथेचे शिल्प (इंटरनेट वरून)

आपल्या मित्रावर विश्वास टाकून वानर देखील त्याच्या तलावातील घरी जाण्यासाठी त्याच्या पाठीवर बसला. तलावाच्या मध्यावर येताच, आता काही हा आपल्या तावडीतून सुटू शकत नाही याची खात्री वाटल्याने मगराने वानराला खरी हकीकत सांगितली. मनातून घाबरलेल्या वानराने धैर्य राखत थोडा विचार केला व त्या मूर्ख मगराला सांगितले, “ अरे मित्रा, वहिनींना माझे काळीज हवे होते तर आधीच सांगायचेस ना? आम्ही माकडे या झाडावरून त्या झाडावर सतत उड्या मारत असतो. असे करताना ते पडू नये म्हणून मी ते जांभळाच्या झाडावर काढून ठेवले आहे. त्यामुळे आता मी ते वहिनींना कसे देऊ? तर आपण परत जाऊन ते घेऊन येऊया”. मूर्ख मगराला ते खरेच वाटले व ते काळीज झाडावरून घेण्यासाठी तो वानराला पुन्हा त्या तळ्याकाठच्या जांभळाच्या झाडाकडे घेऊन आला. त्यावेळी तो वानर टुणकण उडी मारत परत जांभळाच्या झाडावर गेला व तेथून त्या मगराला म्हणाला, “ अरे विश्वासघातकी मुर्खा, असे काळीज काय कोण बाहेर काढून ठेवते काय? पण तुझ्यासारख्या वर आता मी मुळीच विश्वास ठेवणार नाही”.

मगराला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला, पण त्याने आपला एक चांगला मित्र आपल्या विश्वासघातकी वागणुकीने गमावला होता.

Monkey Croc Story in Tripurantakeshwara Temple Balligavi
कर्नाटकातील बल्लीगावी येथील त्रिपुरांतकेश्वर मंदिरामधील शिल्प (इंटरनेट वरून )

अशी शिल्पे आपल्याला ओडिशा येथील मुक्तेश्वर मंदिर तसेच कर्नाटकातील बल्लीगावी येथील त्रिपुरांतकेश्वर मंदिरामध्येही पाहायला मिळतात .

 

 

 

2 Panchatantra Stories
२ पंचतंत्र कथा, मल्लिकार्जुन मंदिर, पट्टदकल

मल्लिकार्जुन मंदिर पट्टदकल येथील या शिल्पात (निळ्या रेषेच्या वरच्या बाजूचे शिल्प )  आपल्याला झाडावर असलेला वानर, नंतर मगराच्या पाठीवर बसलेला वानर. त्याखाली असलेली दुसरी मगर ( बहुदा मगरपत्नी) दिसते व त्यामुळे हे कथानक लक्षात येते. पंचतंत्रातील चौथे तंत्र मानले गेलेल्या लब्धप्रणाश म्हणजेच “जे लाभले ते गमावले” या तंत्रातील ही सुरुवातीची कथा आहे.

मुंगूस व ब्राह्मणपत्नी

मल्लिकार्जुन मंदिरात एका खांबावर मुंगूस व ब्राह्मण पत्नी ही कथा देखील आपल्याला आढळून येते. (वरील चित्रातील निळ्या रेषेखालील शिल्प)  पंचतंत्राचे शेवटचे म्हणजेच पाचवे प्रकरण आहे अपरिक्षितकारक, म्हणजेच कोणत्याही गोष्टीची परीक्षा अथवा चिकित्सा न करता केलेली गोष्ट अहितकारक ठरू शकते हे सांगणारी एका ब्राह्मण जोडप्याची व त्यांच्या पाळीव मुंगसाची कथा.

या शिल्पात डावीकडे आपल्याला त्या ब्राह्मण जोडप्याचे घरात झोपलेले बाळ दिसते. आपल्या पाळीव मुंगूस या बाळाच्या रक्षणासाठी सोडून जोडपे बाहेर आपल्या कामासाठी जाते. तेव्हा आलेल्या सापाबरोबर मुंगुसाचे चाललेले युद्ध मधल्या शिल्पात दिसते. या युद्धात सापापासून मुंगूस त्या बाळाचे रक्षण करते, पण असे करताना त्या मुंगुसाचे तोंड रक्ताने माखते. हे पाहून त्याचवेळी परत आलेल्या ब्राह्मण पत्नीला, या मुंगूसानेच आपल्या बाळाला अपाय केला की काय, असे वाटून ती या मुंगुसालाच ठार मारते. पुढे बाळाला पाहिल्यावर तिला आपली चूक उमगते पण तेव्हा फारच उशीर झालेला असतो हे सांगणारी ही कथा.

लाकूडतोडे व माकडे

लाकूडतोडे व माकड
लाकूडतोडे व माकड

पंचतंत्रातील माकडांची अजून एक आपल्याला परिचित असलेली कथा मल्लिकार्जुन मंदिर, पट्टदक्कल येथील खांबावर आढळते. एका वनात काही लाकूडतोडे सुतार काम करत असताना काही व्रात्य माकडे पाहत असतात. दुपारच्या वेळी जेवणाकरता जाताना लाकूडतोडे एका अर्धवट कापलेल्या लाकडाच्या खोडात पाचर मारून ठेवतात. त्यातील एक माकड ते पाहते व त्या फटीवर बसून त्यात आपली शेपटी सोडून ती पाचर काढायचा प्रयत्न करते आहे असे शिल्प येथे कोरलेले आहे.

खिद्रापूरचे पंचतंत्रातील बडबडे कासव

बडबड्या कासवाला नेणाऱ्या दोन हंसांची कथा

कोल्हापूर जवळच्या खिद्रापूर या ठिकाणच्या कोपेश्वर मंदिरामध्ये देखील पंचतंत्रातील बडबड्या कासवाची गोष्ट कोरलेली आपल्याला आढळून येते. एका तलावात हे गप्पीष्ट कासव राहत असते. एके वर्षी त्या प्रदेशात खूप दुष्काळ पडतो व त्या तळ्याचे पाणी आटू लागते. त्या कासवाचे मित्र असलेल्या दोन बगळ्यांनी त्या कासवाला तेथून दुसरीकडे पाणी असलेल्या ठिकाणी नेण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी त्यांनी एक युक्ती केली, ती म्हणजे त्या कासवाने एका काठीला तोंडात घट्ट धरून ठेवावे आणि ती काठी दोन्ही बाजूला धरून ते दोन्ही बगळे त्याला इच्छित ठिकाणी नेऊन पोहोचवतील. यासाठी त्याने संपूर्ण प्रवासात फक्त तोंड बंद ठेवणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे शिल्प ज्यात मध्ये कासवाने धरलेली काठी आणि दोन्ही बाजूला त्याला घेऊन उडणारे बगळे, कोपेश्वर मंदिरामध्ये कोरलेले आहे. या गोष्टीचा शेवट आपल्याला माहिती आहेच, तो म्हणजे ते बडबडे कासव न राहून अखेर तोंड उघडते व उंचावरून पडून आपला प्राण गमावून बसते. याच्याच खाली कासवावर हल्ला करणाऱ्या मेंढ्यासारख्या प्राण्याचे शिल्प ही आढळते.

पंचतंत्रांबद्दल अधिक माहितीकरिता हा लेख पहा