Narmada Parikrama by Bus
नर्मदा परिक्रमा (#NarmadaParikrama) ही हिंदूंच्या पवित्र मानल्या गेलेल्या तीर्थयात्रांपैकी एक व गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा व नर्मदा या पवित्र नद्यांपैकी परिक्रमा केली जाणारी एकमेव नदी. अपमृत्यू टाळण्याकरिता शिवाच्या शोधात मार्कंडेय ऋषी नर्मदाकिनारी आले व त्यानी पहिल्यांदा नर्मदेची प्रदक्षिणा केल्याची कथा स्कंदपुराणातील नर्मदा पुराणाच्या भागात येते. त्याना पुण्यप्राप्ती झाली व अपमृत्यूचे देखील निवारण झाले आणि त्या मुळेच पुढे नर्मदा प्रदक्षिणेची प्रथा पडली. पुढे आठव्या शतकात आदि शंकराचार्य देखील आपल्या गुरूच्या शोधात येथे आले आणि आपल्या गुरुना पुराच्या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी जे स्तोत्र रचले ते आजही नर्मदाष्टक म्हणून ओळखले व गाईले जाते.

नकाशा – संपूर्ण श्री नर्मदा परिक्रमा, माँ नर्मदा साहित्य सदन, अमरकंटक यांच्या पुस्तकातून केवळ संदर्भाकरिता, साभार
मध्य प्रदेशातील अमरकंटक येथून उगम पावून पश्चिमगामिनी होणारी नर्मदा एकमेव मोठी नदी. ती गुजरात मधील भरुच येथे समुद्राला मिळते. सर्वसाधारणपणे परिक्रमा करताना ती ओंकारेश्वर येथे सुरु करुन नदीप्रवाहाला कायम उजवीकडे ठेवत ही प्रदक्षिणा केली जाते. यात मधे नदी ओलांडली जात नाही. जेथे ती समुद्राला मिळते तेथेच ती पोहून ओलांडली जात असे पण आता ती पुलावरुन वाहनाने ओलांडता येते.
आम्हीही बसने नर्मदा परिक्रमेस सुरुवात केली. त्याची संकल्पपूजा आम्ही ओंकारेश्वरच्या घाटावर केली. त्या आधी आम्ही ममलेश्वर च्या शिवमंदिराला भेट दिली. ममलेश्वर व ओंकारेश्वर ही दोन लिंगे मिळून एक पूर्ण ज्योतिर्लिंग होते असे मानले जाते. पावसाळ्याच्या दिवसात याआधी मांधाता बेटावर असलेले ओंकारेश्वर नदीकाठापासून पूर्णपणे विलग होत असे त्यामुळे चातुर्मासाच्या काळात ओंकारेश्वर ऐवजी ममलेश्वर हेच मुख्य लिंग समजले जाई, व म्हणून त्याला अर्ध्या ज्योतिर्लिंगाच्या मान मिळाला आहे.


याठिकाणी आम्ही बसने केलेल्या परिक्रमेबद्दलची थोडक्यात माहिती, मार्ग, वाटेतील मंदिरांची माहिती व आमचे अनुभव, याचे संकलन आहे.

परिक्रमा पायी केली तर कमीतकमी ४ महिने (तरुण व्यक्ती रोजचे ३०-३५ किमी चालणे गृहीत धरून) ते सर्व साधारणपणे ३ वर्षे लागतात. यात चातुर्मासात धर्मशाळा उपलब्ध नसल्याने, सर्वत्र पूर, चिखल सदृश्य परिस्थिती असल्याने
या कालावधीत नर्मदा परिक्रमा बंद असते. त्यामुळे अशा प्रकारच्या परिक्रमाना ३ ते ३-१/२ वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो.
पण तुम्ही परिक्रमा पायी करा अथवा वाहनाने, सुरवातीला संकल्प पूजन व अखेरीस संकल्प पूर्ती हे केल्यानंतरच परिक्रमा पूर्ण झाली असे मानले जाते. परिक्रमेचे काही नियम आहेत ते पाळून हि परिक्रमा करावी लागते. ते म्हणजे पूर्ण प्रदक्षिणेत नर्मदा नदी कोठेही ओलांडू नये. नदी उजव्या हाताला ठेवत नदीला वळसा घालत हि प्रदक्षिणा करावी.
प्रभू ट्रॅवेल्स, दादर यांनी या यात्रेचे आयोजन अतिशय शिस्तबद्धपणे केले होते त्यामुळेच यात्रा खूप छान पार पडली. त्यातील प्रमुख मुद्दे येथे मी मांडतो म्हणजे वाचकांच्या मनात असणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
(१) यात्रा ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी नर्मदा नदीला उजवीकडे ठेवत पार पडली.
(२) काही वेळा नदी ओलांडावी लागू नये म्हणून गूगल ने जरी जवळची वाट दाखवली तरी दूरचा रस्ता घेतला गेला.
(३) प्रथम दिवशी घाटावर मैय्या पूजन व संकल्प पूजा केली गेली. प्रत्येक दिवशी एकदा तरी नर्मदा भेट घडली जेथे आम्ही नर्मदा पूजन, आरती व नर्मदाष्टक म्हटले.
(४) सर्व प्रवासादरम्यान भजने अथवा भक्तिगीते (प्रवाशांनी गायलेली अथवा गाडीत वाजणारी) लावून वातावरण मंगलमय ठेवले गेले.
(५) प्रत्येक ठिकाणची ऐतिहासिक, आध्यात्मिक माहिती पुरविली गेली. यात विठ्ठलराम महाराज, सिद्धमाई यासारख्या महात्म्यांची भेट घडविली गेली.
(६) सहल आयोजक प्रभंजन व रागिणी देसाई स्वतः सहलीत उपस्थित होते व सर्वांकडे लक्ष पुरवीत होते. प्रभंजन यांचे वडील श्री सुहास देसाई काका देखिल होते व बऱ्याच घटना, प्रसंग अवगत करून देत होते.
(७) यांचे स्वतःचे स्वयंपाकी व साहित्य सोबत असल्याने प्रत्येक ठिकाणी रुचकर, गरम, वेगवेगळ्या प्रकारचे भोजन रोज मिळत गेले. चहा, नाश्ता, जेवणखाण यातली आपुलकी अन्नाच्या स्वादात उतरत होती. आचारी व वाढपी त्यांच्याच घरचे असल्याप्रमाणे लोकांची काळजी घेत होता त्यामुळे स्त्रीवर्ग अतिशय खुश होता.
(८) बसची स्थिती, चालक उत्तम असल्याने कुणालाही एवढ्या दीर्घ (सुमारे ३२०० किमी) प्रवासाचा त्रास जाणवला नाही.
(९) सर्व ठिकाणी उत्तम एसी हॉटेल्स मिळाल्याने व्यवस्थित झोप मिळाली, गरम पाण्याने आंघोळी करता आल्या.
(१०) रोज पाण्याच्या बाटल्या उपलब्ध असल्याने बाहेरचे पाणी पिण्याची गरज भासली नाही. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी बाटल्यांची एकत्रित विल्हेवाट लावण्याची पद्धत पहिल्याच दिवशी समजाविली गेली.
(११) सर्व सहयात्रींनी वेळेवर (अथवा वेळेआधीच) येत सर्व वेळा पाळून यात्रा आयोजकांना उत्तम सहकार्य केले.
(१२) या यात्रेत जवळपास ३० (७५%) स्त्रिया होत्या. वाटेत प्रवासादरम्यान (विशेषता मध्य प्रदेशात) टॉयलेट्स उपलब्ध नव्हते त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत होती पण यात आयोजकांनी त्यांच्या परीने शक्य तितका प्रयत्न केला, ही एकमेव गोष्ट यात्रा या दृष्टिकोनातून लक्षात घेतली तर उरलेल्या सर्व बाबतीत यात्रा अतिशय सुखकर झाली. सर्व स्थळे (ठरविलेल्या पेक्षा जास्तच) व्यवस्थित व घाई गडबड न करता पाहता आली.
या सर्वांचे सार एकच ……
नर्मदा परिक्रमा करावी तर ती फक्त आणि फक्त प्रभू ट्रॅवेल्स बरोबरच.

