गंगावतरण शिव Gangavataran Shiv – शिवाच्या या मूर्ती शिल्पाशी भगीरथाने केलेली तपस्या व त्याने स्वर्गातून पृथ्वीवर आणलेली गंगा ही कथा जोडलेली आहे. याचा शिल्पाना गंगाधर शिव असे देखील म्हटले जाते.
सगर नावाच्या राजाला केशिनी नामक पत्नीपासून “असमंजस” नावाचा एक उद्धट, उर्मट पुत्र होता व सुमती नावाच्या दुसऱ्या पत्नीपासून ६०,००० पुत्र होते. असमंजसाच्या संगतीने ते देखील बिघडले होतेच.
राजा सगराने अश्वमेध यज्ञ केला आणि या यज्ञाच्या अश्वाच्या रक्षणासाठी आपल्या ६०,००० पुत्रांची नियुक्ती केली. राजा सगरचा हा यज्ञ म्हणजे आपल्या इंद्रपदालाच आव्हान आहे असे वाटून या यज्ञाचा हा अश्व इंद्राने मधेच पळविला व पाताळलोकी असणाऱ्या कपिलमुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधला. त्या अश्वाच्या रक्षणासाठी बद्ध असणाऱ्या असमंजसादी सगर पुत्रांनी त्याचा माग काढत पाताळापर्यंत गेले व तेथे कपिलमुनींच्या आश्रमासमोर तो अश्व बांधलेला त्यांनी पाहिला. त्यांना वाटले की, कपिलमुनींनी हा अश्व धरलाय, त्यामुळे त्यांना मारण्याच्या उद्देशाने ते सर्वजण कपिलमुनींवर धावून गेले, पण कपिलमुनींनी आपल्या तप :सामर्थ्याने त्यांना क्षणार्धात भस्म करून टाकले.
बराच काळ लोटला तरी आपले पुत्र परत येत नाहीत हे पाहून राजा सगराने आपला नातू अंशुमत (असमंजसाचा पुत्र) याला त्यांच्या व अश्वाच्या शोधार्थ पाठविले. तोदेखील त्यांचा माग काढत पाताळलोकी पोहोचला व कपिल मुनींच्या आश्रमात गेला. तेथे त्याला आपल्या यज्ञाचा अश्व दिसला तेव्हा समंजस वृत्तीच्या अंशुमतने कपिलमुनीजवळ त्याबद्दल चौकशी केली. त्याचा विनयशीलपणा पाहून कपिलमुनी प्रसन्न झाले व त्यांनी अंशुमतला झालेला प्रकार कथन केला आणि त्याचबरोबर अश्व देखील परत दिला. तो देताना त्यांनी अंशुमतला त्याचा पिता व अनेक काका यांच्या मुक्तीचा मार्ग देखील सांगितला. ते म्हणाले, की स्वर्गातील गंगा जर पृथ्वीवर आणली तर तिच्या स्पर्शाने हे राख झालेले सर्व मृतात्मे स्वर्गलोकी जातील. हे कार्य तुझ्या नातवाच्या पिढीत पूर्णत्वाला जाईल असे देखील कपिलमुनींनी त्याला सांगितले.
अंशुमत अश्व घेऊन परत गेल्यावर राजा सगराने आपला अश्वमेध यज्ञ पूर्ण केला. काही काळाने आपल्या नातवाच्या, अंशुमतच्या हाती राज्याची धुरा सोपवून तो निजधामास गेला. अंशुमतला दिलीप नावाचा पुत्र झाला व पुढे या दिलीपला, भगीरथ नावाचा पुत्र झाला. या दरम्यान अंशुमत व दिलीप या दोन्ही गंगेला पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले, पण ते पूर्णत्वाला गेले नाहीत. तेव्हा भगीरथाने गंगेचे कठोर तप आरंभले. त्याच्या या कठोर तपश्चर्येने गंगा प्रसन्न झाली व तिने पृथ्वीवर येण्याचे कबूल केले. यापुढे प्रश्न निर्माण झाला तो तिच्या स्वर्गातून पृथ्वीवर पडणाऱ्या प्रवाहाला नियंत्रित कसे करायचे हा. तिच्या एवढ्या उंचीवरून पृथ्वीवर पडण्याने येथे एक विवर तयार झाले असते आणि त्यात तो प्रवाह लुप्त झाला असता, त्यामुळे याचे नियंत्रण कसे करणार ? हा प्रश्न भगीरथासमोर देखील उभा राहिला.

भगीरथानेच मग तिला रुद्राचे नाव सुचविले व तो स्वतःही रुद्रासाठी तप करू लागला. त्याच्या तपाने प्रसन्न होऊन रुद्राने भगीरथाला गंगा स्वतःच्या मस्तकी धारण करण्याची तयारी दर्शविली व त्याकरिता रुद्र हिमालयात गेला. गंगेला वाटले, हा रुद्र काय आपल्याला धारण करणार ? तेव्हा तिचे गर्वहरण करण्याकरिता शिवाने प्रथम तिला आपल्या मस्तकी धारण करून जटांमध्ये गुंतविली. तिचे गर्वहरण होताच हळूच आपली एक बट मोकळी करत, त्याने गंगेचा प्रवाह पृथ्वीवर खेळता केला. तेव्हा भगीरथाने ते पाणी आपल्या पूर्वजांच्या राखेवरून नेत त्यांना मुक्ती देवविली. अशा रीतीने गंगा शिवाच्या जटे मधून पृथ्वीवर अवतीर्ण झाली, अशी कथा आपल्याला विष्णुपुराण, भागवत पुराण तसेच वाल्मिकी रामायणात पाहायला मिळते. याच कथेवर आधारित शिवाच्या गंगावतरण अथवा गंगाधर मूर्ती या शिल्पाचे अंकन केलेले आपल्याला आढळून येते.
गंगेची जाह्नवी कशी झाली ?

यालाच जोडून जान्हवी या गंगेच्या रूपाची एक उपकथा येते. यामध्ये शंकराच्या जटेतून निघालेली गंगा पुढे वाहत जन्हू ऋषींच्या आश्रमाच्या दिशेनं गेली व तिने विध्वंस घडविला, तेव्हा भगीरथाने जन्हू ऋषींची प्रार्थना केल्यावर त्यांनी आपल्या कानातून गंगेला नियंत्रितपणे प्रवाही करत पुढे पाठविले आणि म्हणूनच तिचे नाव जान्हवी असे पडले. अशा कथेचे शिल्प देखील आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते.
सोबतच्या छायाचित्रात आपल्याला तपश्चर्या करणारा भगीरथ डावीकडे दिसून येतो. मध्ये स्त्रीरूपातील गंगा दिसते तर तिच्या शेजारी तिला धारण करणारा शिव. उजव्या कोपऱ्यात बसलेले जन्हू ऋषी दिसतात ज्यांच्या कानातून गंगा प्रवाही होते आहे असे या शिल्पात दाखविले आहे. याचमुळे गंगेचे नाव जान्हवी असे पडले.
गंगाधर मूर्ती शिल्पे कशी असावीत ?
गंगाधर मूर्ती शिवाच्या शिल्पांची वर्णने आपल्याला अंशुमदभेद आगम, कामिक आगम, करण आगम या ग्रंथांमध्ये केलेली आढळतात. या ग्रंथांप्रमाणे शिव आपला उजवा पाय पृथ्वीवर सरळ रोवून, तर डावा पाय थोडासा उचलून उभा असतो. त्याचा उजवा हात उमेच्या अणुवटीजवळ तर डावा हात उमेला विळखा घालून असेल व पाठचा डावा हात कपाळावरील उष्णिषाजवळ असून तो जटा सोडवून गंगेला मुक्त करणारा असेल.
या शिल्पांमध्ये उमेच्या चेहऱ्यावरील भाव देखील महत्त्वाचे आहेत. गंगेच्या रूपाने अजून एका स्त्रीचे अस्तित्व आपल्या पतीच्या मस्तकावर तिला जाणवल्याने ती अस्वस्थ झालेली दिसायला हवी. तिच्या डाव्या हातात एखादे फुल व उजवा हात मोकळा अथवा एखाद्या वस्त्राला सावरणारा असायला हवा.

याच सोबत या शिल्पात भगीरथाचे अस्तित्व देखील ठळकपणे दिसायला हवे. शिवाची प्रशस्ती करणारे ऋषी, गंगेमुळे मुक्त झालेले सगरपुत्र हे देखील या शिल्पाची शोभा वाढवतील.
कामिकागम व करणागम ही आगमे तर शिवाचा तृतीय नेत्र दाखविण्याबद्दल सांगतात व त्याच्या अभयामुद्रेबद्दल देखील. शिवाच्या हातात परशु व मृग असावा. भगीरथाचा आकार तसेच त्याची वस्त्रप्रावरणे प्रावरणे कशी असावी याचीही सविस्तर माहिती ही आगमे देतात.
या वर्णनाबरहुकूम शिवाच्या गंगाधर मूर्तीची रूपे आपल्याला एलिफंटा लेणी, वेरूळचे कैलास लेणे अशा विविध ठिकाणी आढळून येतात.
घारापुरी (ELEPHANTA) येथील गंगाधर शिव – गंगावतरण शिल्पाचा उत्कृष्ट अविष्कार
मुंबईजवळ घारापुरी येथे आपल्याला या शिल्पाचा उत्कृष्ट अविष्कार पाहायला मिळतो . घारापुरीच्या इतर शिल्पांच्या तुलनेत हे शिल्प सुस्थितीत असल्याने कथावास्तू ओळखता येते . या शिल्पातील शिवाचे उजवे दोन हात सुस्थितीत असून त्यापैकी मागील हाताने त्याने शिरावर पडणाऱ्या गंगेला मुक्त करणारी बट सोडविली असल्याचे कळते. डावे दोन्ही हात मात्र भंगले आहेत, पण एका डाव्या हाताभोवतीच्या बाजूतील नाग त्याच्या उभारलेल्या फणेमुळे सुंदर दिसत आहे. शिव त्रिभंगावस्थेत उभे असून त्यांच्या मस्तकावर त्रिमुखी गंगा दर्शविली आहे तर उजव्या पायाशी नम्र झालेला भगीरथ आहे. शिवाच्या मस्तकाभोवती प्रभावळीसारखा भाग दिसतो तो कदाचित या गंगेच्या वाहत्या पाण्याचा असण्याची शक्यता आहे .

पार्वतीचे शिल्प बव्हंशी चांगल्या अवस्थेत असल्याने देवीचे सौन्दर्य, वस्त्रप्रावरणे, कर्णभूषणे आणि इतर आभूषणांनी खुललेले आहे . शिव व पार्वतीच्या पायांमध्ये एक शिवगण असून तोदेखील शिवाकडे पाहतो आहे. पार्वतीच्या डावीकडे तिची एक सेविका असावी .
या शिल्पातील महत्त्वाचे दृश्य म्हणजे शिवाच्या उजव्या हाताला कमळावर बसलेले ब्रह्मदेव दिसून येतात, त्यांच्या शेजारी ऐरावत या हत्तीवर बसलेला इंद्र असून शिवाच्या डाव्या बाजूला गरुडावर बसलेले श्रीविष्णू दिसतात. वरील आकाशात हे मनोहर दृश्य पाहण्याकरिता गंधर्वांनी दाटी केलेली दिसते.
