Narmada Parikrama - Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

Narmada Parikrama – Garudeshwar-Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

आजची पहाट झाली तीच गरुडेश्वरच्या प्राचीन शिवमंदिराच्या दर्शनाने. हे मंदिर सुप्रसिद्ध टेंबेस्वामी समाधीपासून जवळच आहे. टेंबेस्वामी हे मूळचे कोकणातील माणगाव या ठिकाणचे. तेथील दत्त मंदिराचीही स्थापना त्यांनीच केली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व स्वामी नृसिंह सरस्वती यानंतरचे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबेस्वामी) हे दत्ताचा तिसरा अवतार असल्याची त्यांच्या भक्तगणांची श्रद्धा आहे. आयुष्याच्या अखेरच्या काळात दत्तगुरूंच्या दृष्टांताप्रमाणे ते गरुडेश्वरला आले. इथे त्यांचे वास्तव्य सुमारे वर्षभर होते आणी अखेरीस इथे नर्मदेच्या काठी त्यांनी, आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १८३६ (इ स १९१४) ला समाधी घेतली. टेंबेस्वामी मंदिरातील पुजाऱ्यांनी स्वामींच्या चरित्राबद्दल विस्ताराने माहिती दिली.

या समाधिस्थळाला लागूनच असलेल्या निरीक्षणस्थानहून नर्मदेचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते व पूर्वेकडे असलेला जगातील सर्वाधिक उंचीचा सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळाही (Statue of Unity) पाहायला मिळतो. मुख्य सरदार सरोवर धरणाचे एक छोटे उप-धरण या ठिकाणी आहे व त्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे नर्मदेची गाज आपल्याला सतत ऐकायला मिळते. येथेच आम्ही आजचे सामूहिक नर्मदाष्टक पठण केले व Statue of Unity ला भेट देऊन माहेश्वरच्या २५० किमीच्या दीर्घ प्रवासासाठी निघालो.

 

Narmada Parikrama - Statue of Unity-Kevadia-Maaheshwar

त्वदम्बु लीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकम
कलौ मलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकं
सुमस्त्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक् शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ।।२।।

भावार्थ –
तुझ्या जळात वास करणाऱ्या दीन मत्स्यांनादेखील तू दिव्यत्त्व देतेस. कलियुगात मल-दोषांची भारवाहक असलेली तू सर्व तीर्थांमधील श्रेष्ठ तीर्थ आहेस. मासे, कासवे, मगरी, चक्रवाक पक्षी यांची तूच कल्याणकर्ती आहेस. अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

वाटेत दुपारच्या जेवणासाठी एका छोट्याशाच पण सुंदर हनुमान मंदिरात थांबलो. सर्व जण  मंदिराच्या इतके प्रेमात पडले कि बऱ्याच जणांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरघोस मदत केली. यानंतरचा मुक्काम माहेश्वरला होता  व  येथील घाटावर आंघोळ करून माहेश्वर दर्शन करता येईल.