पंचतंत्र आणि हितोपदेश – Panchatantra and Hitopdesha

पंचतंत्र आणि हितोपदेश – Panchatantra and Hitopdesha –  राजनीति शिकवण्यासाठी केलेला प्राणी,पशु, पक्षांचा संकेतात्मक वापर आपल्याला पंचतंत्र व हितोपदेश यांसारख्या साहित्यात आढळून येतो. अशाच प्रकारचा रूपकांचा आणि उदाहरणांचा वापर आपण उपनिषदातील कथांमध्ये देखील आढळतो. इतर वाङ्मये खूप आदर्शवादी असतात पण पंचतंत्र व हितोपदेश मात्र खूपच व्यावहारीक पातळीवर हा उपदेश करतात. पण यात कल्पनाविलास भरपूर आहे. यातील प्राणी, पक्षी एकमेकांशी बोलतात आणि माणसांना या गोष्टी शिकवतात. त्यामुळे अतिशय कमी बुद्धीच्या लोकांनाही हे समजावे अशा प्रकारची ही रचना आहे.

पंचतंत्रचे कथानक विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणाने रचले असे मानले जाते. पार वर्षांपूर्वी दक्षिणेकडील देशात महिलारोप्य नावाचे एक राज्य होते. त्यावर अमरशक्ती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला तीन राजपुत्र होते त्यांची नावे होती बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती. ते तिन्ही राजपुत्र नावाप्रमाणे शक्तिमान होते पण त्यांना फारशी बुद्धी नव्हती. त्यांना राजकारण अजिबात कळत नव्हते. राज्यातील सर्व पंडितांनी त्यांना शिकविण्याचे खूप प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले. त्यानंतर सुमती ( म्हणजे चांगल्या बुद्धीचा) नावाच्या मंत्र्याने राजाला विष्णू शर्मा नावाच्या ब्राह्मणाला त्यांना शिकविण्यासाठी पाचारण करायला सांगितले. तो येताच राजाने त्याला विपुल धन देऊ केले. पण आपली विद्या विकाऊ नसल्याचे सांगत त्याने ते नाकारले.  राजपुत्रांच्या शिक्षणाकरिता त्याने एक नवीन तंत्र अवलंबिले ते म्हणजे नितीकथांचे.
.
पंचतंत्र आणि हितोपदेश या दोन्ही नीतिग्रंथातील कथांची रचना, एकातून दुसरी कथा उलगडत जावी अशा प्रकारे केलेली आहे. अशा कथा उलगडत असताना मध्येच कुठेतरी एखाद्या कथेचे धागे पुन्हा एकदा एकत्र केले जातात. अशा अनेक कथांचे धागे एकत्र करून पुन्हा ते मूळ कथेपर्यंत पोहोचतात. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या भागाचा नीती संदेश पूर्ण होतो. पंचतंत्रात पाच भाग आहेत तर हितोपदेशमध्ये चार भाग आहेत.

पंचतंत्राचा पहिला भाग आहे मित्रभेद. याची सुरुवात सिंह आणि वृषभ यांच्यातील मैत्रीच्या कथेने होते. एका कोल्ह्याने ही मैत्री प्रथम कशी जोडली आणि नंतर ती कशी तोडली हे आपल्याला या मित्रभेदाच्या भागांमध्ये दिसून येते. या कथेद्वारे सुरुवातीच्या गोष्टींतून एक उत्सुकता निर्माण केली जाते, ज्यामुळे हे राजपुत्र अधिक खोलात जाऊन चौकशी करू लागतात, की कोणता हा सिंह? कोणता हा वृषभ? कोण तो जंबुक ?. त्यांना उत्तरे देताना एकाची कथा सुरू होते आणि दुसऱ्याच्या तोंडून ती पुढे सरकत जाते. या कथा त्या भागाच्या सूत्राला धरून सरकत जातात. पुढे हवा तो उपदेश देऊन झाल्यावर त्या कथा संपतात आणि पुन्हा मागच्या कथेकडे जोडल्या जातात.

एका पेटीतून दुसरी पेटी उलगडावी, मग त्यातील काही पेट्या पुन्हा बंद करत याव्यात आणि सगळ्यात शेवटी मुख्य पेटी बंद करावी अशा प्रकारची या कथानकाची रचना हितोपदेश आणि पंचतंत्र यांच्या प्रत्येक भागांमध्ये आढळून येते.

पंचतंत्राचे कथानक

भाग १ – मित्रभेद

पंचतंत्र – मित्रभेद

मित्रभेदातील कथेत पिंगलक नावाचा सिंह आणि संजीवक नावाचा बैल यांच्या मैत्रीची कथा आहे. एक व्यापारी आपल्या नंदक आणि संजीवक या दोन बैलांना बैलगाडीला जुंपून व्यापाराचे सामान घेऊन, आपल्या गावातून दुसऱ्या गावात जात असतो. वाटेतील जंगलात त्यातील संजीवक या बैलाचा पाय मुरगळतो व त्याला चालणे अशक्य होते. तेव्हा आपल्या दोन सेवकांना त्या बैलासोबत त्याची निगा राखण्यासाठी सोडून, दुसऱ्या बैलाला गाडीला जुंपून तो व्यापारी व्यापाराच्या ठिकाणी निघून जातो. त्या जंगलात, त्या बैलाबरोबर राहायला घाबरलेले दोन्ही सेवक त्या बैलाला जंगलात सोडूनच निघून जातात. त्यानंतर त्या जंगलात मिळालेले मऊ लुसलुशीत गवत, आणि छान हवेवर संजीवक बैलाची तब्येत सुधारते आणि तो मुक्तपणे जंगलात डुरक्या फोडत विहार करू लागतो.

एकदा पिंगलक नावाचा जंगलचा राजा असलेला सिंह त्या जंगलातील तळ्यावर पाणी पिण्यासाठी येतो तेव्हा त्याला तिथे जवळ असलेल्या संजीवक बैलाचा आवाज ऐकू येतो. त्या सिंहाने जंगलात बैल कधीच पाहिला नसल्याने त्याचा आकार आणि त्याचा आवाज याला घाबरून तो त्या तळ्यावरून पाणी न पिताच परत आपल्या गुहेकडे जातो. ही गोष्ट करटक आणि दमनक नावाचे दोन कोल्हे पाहतात, पण त्यांना सिंहाच्या घाबरण्याचे कारण कळत नाही. हे दोन कोल्हे पिंगलकाच्या एका माजी मंत्र्याचे पुत्र आहेत, पण काही कारणाने पिंगलकाकडून दूर लोटले गेले आहेत. ही घटना बघून दमनक हा त्यातील हुशार कोल्हा याचा फायदा घेण्याचे ठरवतो आणि आपल्या करटक या भावासोबत सिंहाकडे जाऊन, तो नक्की पाणी न पिता तळ्यावरून का परत आला याचे कारण जाणून घेतो.

कारण समजल्यावर दमनक आपल्या अक्कल हुशारीने, पिंगलक हा सिंह आणि संजीवक हा बैल यांच्यात मैत्री घडवून आणतो. हळूहळू या दोघांची मैत्री घट्ट होते आणि सिंह संजीवक बैलाबरोबरच जास्त वेळ घालवू लागतो. एका शाकाहारी प्राण्याबरोबर मैत्री केल्याने त्याची इतर प्राण्यांना मारून मांसाहार करण्याची इच्छा देखील कमी होऊ लागते. या साऱ्यांमुळेच इतर सल्लागारांचे महत्त्व कमी होते तसेच त्यांना अन्न मिळणे ही कमी होते. जेव्हा दमनकाला या मैत्रीचे तोटे जाणवू लागतात तेव्हा तो युक्तीने त्यांच्यात फूट घडवून आणतो आणि संजीवक बैलाला पिंगलकाद्वारे ठार मारतो.

हे सर्व घडते ते अनेक उपकथांद्वारे विविध उदाहरणे देत, कधी मैत्रीचे फायदे, तर कधी राज्य कारभाराची तंत्रे सांगत. आपल्या चातुर्याने दमनक आपला भाऊ करटक याला प्रथम मैत्री आणि विश्वास कसा संपादन करायचा याच्या गोष्टी सांगतो तर नंतर तो संजीवकाला, पिंगलकाला त्यांच्यात फूट पडण्यास आवश्यक अशा गोष्टी सांगतो आणि आपले उद्दिष्ट साध्य करतो. या कथानकाच्या शेवटी तो पिंगलकाचा विश्वास संपादन करत त्याचा मुख्य प्रधान बनतो.

मित्रभेद या पहिल्या भागात एकूण २३ कथा येतात.

भाग २ – मित्रलाभ

पंचतंत्र - मित्रलाभ
पंचतंत्र – मित्रलाभ

दुसऱ्या मित्रलाभ नावाच्या तंत्रात मित्रांमुळे होणारे फायदे, विशेषता बुद्धिमान आणि प्रामाणिक मित्रांमुळे आपल्याला काय व कसे लाभ होतात याच्या कथा येतात. लघुपतनक नावाचा कावळा प्रथम आपल्या बांधवांना पारध्यापासून कसा वाचवतो व नंतर चित्रग्रीव नावाचा कबुतरांचा राजा, त्या पारध्याच्या जाळ्यात अडकल्यानंतर सर्व कबुतरांच्या मदतीने जाळ्यासह उडून आपल्या हिरण्यक नावाच्या उंदीर मित्राकडे जाऊन ते जाळे तोडून घेतो. ते पाहून लघुपतनक कावळा देखील हिरण्यकाशी मैत्री करू इच्छितो. तेव्हा प्रथम हिरण्यक प्रासंगिक वैर व स्वाभाविक वैर याबद्दल माहिती देत, उंदीर व कावळा हे स्वाभाविक वैरी आहेत त्यामुळे आपली मैत्री शक्य नाही हे देखील सांगतो. पण शेवटी त्या कावळ्याच्या मनाचा प्रामाणिकपणा पाहून त्याच्याशी मैत्री जोडतो. हे सर्व अनेक उपकथांच्या माध्यमातून समजावले जाते आणि अनेक सुभाषितांद्वारे देखील. यातीलच एक सुप्रसिद्ध सुभाषित म्हणजे

विद्वत्तम च नृपत्त्वम च नैव तुल्यम कदाचन
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते

(विद्वत्ता व राजेपण यांची तुलना करता येत नाही कारण राजाला केवळ त्याच्या देशातच मान मिळतो तर विद्वानाला सर्वत्र मान मिळतो)

नंतर लघुपतनक कावळा या हिरण्यक उंदराला घेऊन मंथरक नावाच्या कासवाकडे जातो. हे तिघे मित्र होतात, व एकमेकांची सुखदुःखे वाटत काही मित्र लाभाच्या गोष्टी सांगतात, आपण आपले मूळ स्थान का सोडले, हाव कशी वाईट, याबद्दल एकात एक गुंफलेल्या गोष्टी सांगतात. नशिबाने जर ठरवले तर भाग्य कसे उदयाला येते. असे बोलत असताना चित्रांग नावाचे हरीण पारध्याच्या बाणाच्या टप्प्याबाहेर जाण्यासाठी पळत तेथे येते व त्यांचे मित्र बनते. अशा प्रकारे चार मित्रांचा एक समूह तयार होतो. या पुढील कथानकात ते पुन्हा एकदा चित्रांग हरणाला व मंथरक कासवाला पारध्यापासून युक्तीने वाचवत आपली मैत्री दृढ करतात आणि तिसाव्या कथेत आपली मैत्री जोपासत सुखाने एकत्र नांदतात.

भाग ३ – काकोलुकीय (काक + उलुकीय)

पंचतंत्र - काकोलुकीय
पंचतंत्र – काकोलुकीय

तिसरे तंत्र आहे काकुलकीय. काक + उलुकीय म्हणजेच कावळे आणि घुबड यांच्या बद्दल. एकेकाळचा शत्रू जरी नंतर मित्र बनला तरी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकू नये हे तत्व या तंत्रात सांगितले आहे, अन्यथा कावळ्यांकडून घुबडांचा जसा नाश झाला तसा प्रसंग ओढवतो.

कावळ्यांचा राजा मेघवर्ण व त्यांच्यावर वारंवार हल्ले करणाऱ्या घुबडांचा राजा अरिमर्दन यांची ही गोष्ट. वारंवार हल्ल्याने हतबल झालेला कावळ्यांचा राजा मेघवर्ण आपल्या मंत्र्यांचा सल्ला घेतो तेव्हा ते तह, युद्ध, पलायन, ऐक्य, बलवान मित्राची मदत असे वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देतात, पण त्याचा वयोवृद्ध सल्लागार स्थिरजीवी मात्र शत्रूशी मैत्री करत असल्याचा बहाणा करत, शत्रू बेसावध असताना त्याच्यावर हल्ला करून त्याचा नायनाट करावा असा सल्ला देतो. यावेळी तो कावळे आणि घुबड यांच्यात वैर कसे निर्माण झाले याची गोष्ट देखील सांगतो.

घुबडांची मैत्री करावी यासाठी स्थिरजीवी एक युक्ती सुचवितो ती अशी की, त्यालाच फितूर म्हणून घोषित करून, चोचीनी रक्तबंबाळ करून, अर्ध मेल्या अवस्थेत त्याला घुबडांचे हेर बघतील अशा ठिकाणी टाकून देणे. कावळे त्याप्रमाणे करतात. घुबडांचा राजा अरीमर्दन याचे हेर ते पाहतात आणि आपल्या राजाला कळवितात. तो देखील याबाबतीत काय करायचे म्हणून आपल्या मंत्र्यांचा सल्ला घेतो तेव्हा त्याचे काही मंत्री कावळ्यावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देतात व त्यासाठी काही गोष्टी सांगतात तर काही मंत्री त्याला शरण देण्याचा सल्ला देत त्याच्या समर्थनार्थ काही गोष्टी सांगतात.

शेवटी अरिमर्दन स्थिरजीवी कावळ्याला शरण देण्याचे ठरवतो. ते पाहून तो अरिमर्दन कावळा त्याला इतर घुबडांच्या भीतीने आपण किल्ल्याच्या दरवाजा जवळच राहो असे सांगतो. आपण आता कावळे दुसऱ्या कोणत्या नवीन ठिकाणी जाणार आहेत, त्याचाही पत्ता ते गेल्यावर दाखवू असे देखील सांगतो. दिवसा जेव्हा घुबडे किल्ल्यात असतात, व त्यांना दिवसा उजेडी दिसत नसते त्यावेळी तो हळूहळू काटक्या गोळा करून किल्ल्याच्या जवळपास जमवत राहतो. पुरेसा ढीग जमल्यावर एके दिवशी तो तेथून उडत जाऊन मेघवर्ण या आपल्या राजाला सूचना देतो व त्याच्या सैन्यासह अग्नी घेऊन बोलवितो. ते सर्व कावळे झोपेतील घुबडांना घेऊन चहुबाजूनी आग लावतात आणि त्यात सर्व घुबडे घुसमटून आणि जळून मरतात. घुबडांचा केवळ रुद्राक्ष नावाचा एक मंत्री, जो आपला राजा आपले ऐकत नाही म्हणून निघून गेलेला असतो, तेवढाच मात्र वाचतो.

स्थिरजीवीचा त्याच्या चातुर्याबद्दल सत्कार करतो, तेव्हाही स्थिरजीवी त्याला गाफील न राहण्याचा सल्ला देतो कारण राज्य सुरक्षित कधीच नसते. ऋण, अग्नी, शत्रू व रोग यांना नेहमीच मुळापासून निपटून काढावे अशी शिकवण यात आहे.

भाग ४ – लब्धप्रणाश

पंचतंत्र - लब्ध प्रणाश
पंचतंत्र – लब्ध प्रणाश

लब्ध = लाभलेले अथवा मिळवलेले, प्रणाश = गमावणे

पंचतंत्रातील चौथे तंत्र आहे लब्ध प्रणाश. याचा अर्थ होतो “जे मिळवले ते घालवले”. संकटकाळी आपली बुद्धी स्थिर ठेवली तर आपण त्या संकटावर मात करू शकतो ही शिकवण आपल्याला जांभळे खाणाऱ्या ताम्रमुख नावाचा वानर आणि त्याचा प्रथम अतिथी असलेला व नंतर मित्र बनलेल्या मगराच्या कहाणीतून कळते.

ताम्रमुख नावाचा वानर रोज या मगराला चांगली जांभळे खायला घाली. यातूनच त्यांची घट्ट मैत्री झाली. या मैत्रीबद्दल मगराने आपल्या बायकोला सांगितले, तेव्हा मला अशी गोड जांभळे खाणाऱ्या माकडाचे काळीज हवे असा हट्ट मगराच्या बायकोने धरला. मगराने तिला समजावण्याचे केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि शेवटी मगराने आपल्या पाठीवर बसवून वानराला जेवण्यासाठी नदीत आपल्या घरी बोलाविले.

नदीच्या मध्यावर येताच, आता हा वानर कुठे जाऊ शकत नाही ही गोष्ट लक्षात आल्यावर मगराने .भोळेपणाने ताम्रमुख वानराला, आपण त्याला आपल्या बायकोच्या इच्छेवरून आपल्या घरी का घेऊन जात आहोत, याची कल्पना दिली. तेव्हा ताम्रमुखाने आपल्यावरचे संकट ओळखले, पण धीराने आणि विचाराने याचा सामना करण्याचे ठरविले. त्याने मगराला सांगितले, की आपण या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असतो, आणि या दरम्यान आपले काळीज पडू नये म्हणून आपण ते त्याच जांभळाच्या झाडावरील एका ढोलीत ठेवले आहे. तू जर मला आधीच सांगितले असते तर मी माझे काळीजच काय पण तुझ्यासाठी माझे प्राण देखील दिले असते. असे बोलल्यावर मगराचा त्याच्यावर विश्वास बसला व ते काळीज घेण्यासाठी त्याने वानराला पुन्हा काठावर आणले. तेथे येतात तो पुन्हा झाडावर उंच ठिकाणी गेला आणि त्याने मगराला त्याचा मूर्खपणा आणि वस्तुस्थिती सांगितली.

.यानंतर मगराने त्याच्या बऱ्याच विनवण्या केल्या पण ताम्रमुखाने त्याला अनेक कथा सांगून, “दगाबाजाच्या बोलण्यावर सुज्ञाने विश्वास ठेवू नये”, हे पटवून दिले. पुढे त्या मगराची बायको देखील धक्क्याने मरण पावल्याचा निरोप आला. मगराचे घर देखील दुसऱ्या मगराने बळकवल्याचा निरोप आला. तेव्हा समशक्तीवानाशी युद्ध करूनच त्याला हकलायचे असते असा सल्ला देणारी गोष्ट सांगत मगराशी असलेली आपली मैत्री वानराने संपवली.

भाग ५ – अपरिक्षितकारक

पंचतंत्राचे पाचवे व शेवटचे प्रकरण म्हणजे अपरिक्षितकारक. याचा अर्थ आहे, “ न जाणता करण्यात येणाऱ्या गोष्टीसंबंधीचे प्रकरण”. या प्रकरणात स्वतः समजून उमजून मुळाशी जाऊन गोष्टी का करायला हव्यात याविषयीच्या कथा आहेत. याची सुरुवात एका ब्राह्मण कुटुंबाने पाळलेल्या मुंगसाच्या कथेने होते व पूर्ण ज्ञान न घेता, आपल्या बाळाला मुंगुसानेच खाल्ले असेल अशा संशयातून ब्राह्मण स्त्रीने मुंगुसाची हत्या केली, ही कथा येते. यात अजून एक तीन ज्ञानी मित्र व त्यांचा एक अज्ञानी पण व्यवहारी मित्र यांची कथा येते. हे तीन मित्र आपल्या ज्ञानाने एका सिंहाला जिवंत करतात पण तो सिंह त्यांना खाऊन टाकतो. व्यवहारी मित्र मात्र वेळी सावधगिरी बाळगल्याने त्या सिंहाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतो. एकूण १४ कथांच्या गुंफणीतून यात केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान कसे महत्त्वाचे यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

अशाप्रकारे अनेक बोधप्रद गोष्टींमधून व्यवहार ज्ञानाचे धडे देत विष्णू शर्माने राजपुत्रांना शहाणे करून सोडले.


हितोपदेशचे कथानक

हितोपदेशाची कहाणी देखील थोड्याफार फरकाने अशीच आहे. मात्र ही कथा उत्तर भारतीय आहे. या कथेची रचना नारायण पंडिताने केली असून तो राजा धवनचंद्र यांच्या दरबारात असल्याचा उल्लेख मिळतो. हितोपदेश हे पंचतंत्र व इतर नीतिकथांवरून तयार केल्याचा उल्लेख त्यातच येतो. पंचतंत्र हे देखील अनेक विद्वान पूर्वसुरींच्या म्हणजे पराशर, व्यास यांच्या अनुभवातील प्रसंगांवरून घेतले असल्याचा उल्लेख येतो..

हितोपदेशाच्या कथेत राजा सुदर्शनाची कथा नारायण पंडिताने गोवली आहे. हा बिहारच्या पाटलीपुत्र प्रदेशाचा राजा आहे. या राजाच्या ऐकण्यात एकदा दोन श्लोक येतात ज्याचा अर्थ असतो….
(१ ) शास्त्र किंवा ज्ञान हेच नेत्र आहेत. ज्याच्याकडे शास्त्र किंवा ज्ञान नाही तो अज्ञान आहे आणि
(२) अशा व्यक्तीकडे यौवन, धन, प्रभुता आणि अविचार यातील एक जरी असेल तरी अनर्थ होऊ शकतो, आणि जर चारही एकत्र आले असतील तर काय? मग तर पाहायलाच नको.

हे श्लोक ऐकून राजाला वाटते आपली मुले शक्तिशाली आहेत पण ज्ञानी नाहीत. त्यांच्याकडे धन आहे, प्रभुता आहे, तारुण्य आहे, त्यामुळे हे राजपुत्र अविचारीपणाने वागू शकतील. जो पुत्र पंडितही नाही आणि धर्मशीलही नाही असा पुत्र काय कामाचा? राजा मग आपल्या मंत्र्यांचा सल्ला घेतो. याविषयीच्या श्लोकांमधून त्या पुत्रांचे दोष वर्णन येते, ज्याचे सार असे आहे की असे अज्ञानी पुत्र असण्यापेक्षा नसणेच उत्तम. या मंत्रणेअंती विष्णू शर्मा याच नावाचा पंडित उभा राहतो व तो राजाच्या पुत्रांना सहा महिन्यात शिकवून शहाणे करण्याचे आश्वासन देतो. यानंतर हितोपदेशाच्या कथा सुरू होतात

हितोपदेश या ग्रंथाचे चार भाग आहेत ते म्हणजे मित्रलाभ, सुहृदभेद, विग्रह आणि संधी. या आधीच सांगितल्याप्रमाणे राजा सुदर्शन आपल्या राजपुत्रांना धर्मज्ञान देऊन शहाणे करण्याची विनंती विष्णू शर्माला करतो अशी कथा धवनचंद्र राजाच्या पदरी असलेल्या नारायण पंडिताने हितोपदेशाद्वारे सांगितली आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे तर प्राण्यांमध्ये असते पण मनुष्यात धर्म अधिकचा असायला हवा अन्यथा तो मनुष्य पशु समानच होय. विष्णू शर्मा राजाला म्हणतो हे उच्चकुलीन राजपुत्र असल्यानेच मी त्यांच्यावर उचित संस्कार करू शकेन व सहा महिन्यात त्यांना सर्व नीतीशास्त्रात निपुण बनवेन.

भाग १ – मित्रलाभ:

हितोपदेश - मित्रलाभ
हितोपदेश – मित्रलाभ

पंचतंत्राचा दुसरा भाग असलेला मित्रालाभ हा भागच हितोपदेशचा प्रथम भाग आहे. तो देखील लघुपतनक या कावळ्याच्या गोष्टीने सुरू होतो. यातही कबुतरांचा राजा चित्रग्रीव स्पर्धेने पसरलेले तांदळाचे दाणे पाहून इतर कबुतरांना सावध करतो, पण ते ऐकत नाहीत व त्यामुळे पारध्याच्या जाळ्यात अडकतात. अखेरीस त्यांना तो एकत्रितपणे सर्व जाळ्यासह उडायला सांगतो व हिरण्यक या उंदराकडून ते जाळे तोडून घेतो. हे तेवढंच असताना कबुतरांचा राजा चित्रग्रीव त्याला आपल्या साथीदारांचे जाळे आधी तोडायला सांगतो, कारण जर ते तोडताना हिरण्यकाचे दात तुटले तरी त्याचे प्रजाजन आधीच मुक्त झालेले असतील.

बारीक तांदळाचे दाणे पाहू शकणारे हे पक्षी, मोहाबाई जाळ्याच्या गाठी मात्र पाहू शकत नाही, हा संदेश यातून दिला गेला आहे.

हे पटवून देण्यासाठी चित्रग्रीव आपल्या साथीदारांना एक कथा सांगतो, ज्यात सोन्याच्या कंकणाच्या लोभाने, एक म्हातारा वाघ कसा प्रवाशांना भुलवून, तळ्यातील दलदलीत फसवून त्यांची शिकार करत होता. आपल्या म्हातारपणात आपण आपला हिंसक स्वभाव सोडल्याचे सांगत, आपल्याकडील सोन्याचे कंकण दाखवत, ते घेण्यासाठी तो तळ्यात या प्रवाशांना स्नान करायला लावीत असे व असा लोभी माणूस दलदलीत फसला की त्याला खात असे. चित्रग्रीवाची ही कथा ऐकून देखील कबुतरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते व म्हणूनच त्या जाळ्यात अडकली हे आपल्याला कळते..

माता, पिता आणि मित्र हे स्वभावाने हितकारी असतात हे सांगून चित्रग्रीवाने त्या सर्वांना हिरण्यक उंदराकडे नेले होते.

या कथेतील लघुपतनक कावळा व हिरण्यक उंदीर पुढे मंथरक नावाच्या कासवाकडे जातात. तो देखील हिरण्यकाने आधीचे बीळ का सोडले त्याची कथा ऐकतो. या कथेत देखील अनेक उपकथनके येतात. त्यांनाही पुढे चित्रांग नावाचा मृग मिळतो जो व्याधाच्या भयाने पळून आलेला असतो, व तो देखील यांचा चौथा मित्र होतो.

आपली जागा बदलण्यासाठी हे चारही मित्र अरण्यातून प्रवास करत असताना, मंथरक कासव व्याधाच्या तावडीत सापडते. तेव्हा हिरण्यक उंदीर त्यांना एक युक्ती सांगतो की मृगाने तळ्याजवळ मेल्यासारखे पडून राहावे व कावळ्याने ते खरे वाटण्यासाठी त्याच्या डोक्यावर उभे राहून त्याला टोचा माराव्यात. ते पाहून कासव खाली ठेवून त्या हरणाला पकडण्यासाठी व्याध तिथे जाईल, त्या अवधीत मी मंथरक कासवाचे बंध तोडेन व त्याने पाण्यात पळावे आणि व्याध जवळ येतात मृगाने उठून पळावे. असे केल्याने हे चारही मित्र संकटातून सुटून पुढे निघून जातात.

अशा रीतीने ही मुख्य कथा संपते व त्यातील अनेक उपकथानकांमधून विविध उपदेश मिळत जातात.

भाग २ – सुहृदभेद

सुहृदभेद या दुसऱ्या उपदेशाची कथा पंचतंत्रातील मित्रभेद प्रमाणेच आहे. येथेही पिंगलक नावाचा सिंह आणि संजीवक नावाचा बैल यांची प्रथम मैत्री व नंतर भेद, दमनक आणि करटक हे दोन कोल्हे घडवून आणतात.

भाग ३ – विग्रह:

हितोपदेश - विग्रह
हितोपदेश – विग्रह

हितोपदेशच्या या कथानकात हंस आणि मोर यांच्यातल्या वितुष्ठामध्ये कावळ्यांनी हंसांच्या किल्ल्यात जाऊन त्यांचा विश्वास संपादन करून शेवटी त्यांना कसे पराभूत केले याची कथा येते.

कर्पूरद्वीपामध्ये पद्मकेली नावाचे सरोवर होते. या सरोवरात हिरण्यगर्भ नावाचा हंस राहत होता. सर्व जलचर पक्षांच्या सहमतीने त्याला राज्याभिषेक करण्यात आला होता. एके दिवशी हा राजा आपल्या कमल सिंहासनावर बसला असताना कोण्या दुसऱ्या देशातून दीर्घमूख नावाचा बगळा आला व त्याला प्रणाम करत म्हणाला, महाराज मी आता जम्बुद्वीप मध्ये एक विंध्य नावाचा पर्वत आहे तिकडे गेलो होतो. तिथे चित्रवर्ण नावाचा पक्षांचा राजा मोर राहतो. त्याच्या अनुचरांनी मला विचारले, की तू कुठून आला आहेस तेव्हा मी आपले नाव सांगितले आणि नवा देश पहायच्या अभिलाषेने आलो असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी मला विचारले या दोन देशांमधला कोणता देश तुला सुंदर वाटला तेव्हा मी त्यांना आपला कर्पूरद्वीप स्वर्गासारखा सुंदर असून, राजा राजहंस दुसऱ्या इंद्रासारखाच आहे असे सांगितले.

माझे ते बोलणे ऐकून ते क्रोधित झाले, कुण्या मूर्खांसमोर एखाद्या चांगल्या गोष्टीची वाचता करणे म्हणजे पक्षांनी माकडांना घर बांधायला सांगण्यासारखे आहे असे करत दीर्घमूख बगळ्याने हिरण्यगर्भ राजाला, पक्षी आणि वानरांची कहाणी सांगायला सुरुवात केली. यापुढे काही गोष्टीतून वेगवेगळे स्वभाव उलगडत गेले.

पुढे आपला मंत्री पोपटाच्या सांगण्यावरून चित्रवर्ण या मयूर राजाने कर्पूरद्वीपा मधील हिरण्यगर्भ या हंसाच्या राज्यावर आक्रमण करायचे ठरविले. याकरिता हंसाच्या राजाचा भेद जाणून घेण्याकरता त्याने मेघवर्ण नावाच्या आपल्या कावळ्याला हिरण्यगर्भाकडे पाठवले. हिरण्यगर्भाच्या मंत्र्यांनी एका परक्या पक्षाला आपल्या राज्यात थारा देऊ नये अशी सूचना आपल्या राजाला केली. पण त्याने त्याच्या चांगुलपणामुळे त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले.
इकडे मोरांचा राजा चित्रवर्ण याने युद्धाची तयारी सुरू केली. याकरिता त्याने गिधाडाला सेनापती बनविले. या आक्रमणाची बातमी लागतात सारस पक्षाला सेनापती करत, हंसाने प्रति-आक्रमण केले. त्यांचा विजयही होत होता. परंतु पुढे गिधाडाच्या सल्ल्यावरून राजा चित्रवर्ण याने हंसांच्या किल्ल्याला धडक मारण्याचे ठरविले, आणि त्याचबरोबर त्यांच्या किल्ल्यात भेद घडवून आणण्यासाठी मेघवर्ण कावळ्याला त्याच्या साथीदारांसह आग लावायला सांगितले. या भेदामुळे हंसराज हिरण्यगर्भ हतबल झाला. त्याचा सेनापती सारस या युद्धात मारला गेला आणि हिरण्यगर्भाला हार पत्करावी लागली.

या कथेद्वारे शत्रूला जिंकण्याचे विविध उपाय, शत्रूच्या किल्ल्यात फिरण्याचे विविध उपाय, त्यांच्यात भेद घडवून आणण्याच्या कथा या भागामध्ये सांगण्यात आल्या आहेत. हितोपदेशाचा हा भाग राजकुमारांसाठी अतिशय उपयुक्त असा सल्ला आहे.

भाग ४ – संधी

युद्ध जिंकल्यानंतर सेनापती असलेल्या गिधाडाने आपला राजा मयूर चित्रवर्ण याला असा उपदेश केला की आता काही दिवसांनी वर्षा ऋतू सुरू होईल. अशावेळी आपल्याला प्रतिकूल असलेल्या आणि आपल्या शत्रूला अनुकूल असलेल्या परिस्थितीत त्याच्या प्रदेशात राहणे योग्य नव्हे. आपला शत्रू समान बलशाली आहे. अशा शत्रूशी संधी करणे योग्य होईल. असे सांगून त्याने कोणकोणत्या प्रकारच्या शत्रूंची संधी करणे योग्य असते तर कोणत्या प्रकारच्या शत्रूंशी संधी करू नये याबद्दलच्या कथा सांगितल्या. परराज्यात राहणारा राजा थोड्या शत्रूंनी देखील मारला जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे छोटासा मगर देखील मोठ्या हत्तीला पाण्यात खेचू शकतो. पण सत्यरहित आणि धर्म रहित व्यक्तीसोबत कधीही संधी करू नये, कारण असा मनुष्य संधी केल्यानंतरही बदलून पलटवार करू शकतो.

आपला मंत्री गिधाडाच्या सल्ल्याला राजा चित्रवर्ण याने जुमानले नाही. तेव्हा जलपक्षांचा राजा हिरण्यगर्भ याने आपला मित्र सिंहालाद्विपाचा राजा सारस याच्याकडे मदतीची चिठ्ठी देऊन पाठविले.

गिधाडाच्या अनेकदा केलेल्या विनवणीनंतर पक्षांचा राजा चित्रवर्ण मयूर याने मेघवर्ण या आपल्या हेर असलेल्या कावळ्याला बोलावून जलपक्षांचा राजा हिरण्यगर्भ व त्याचा मंत्री चक्रवाक यांच्या बद्दल विचारले. तेव्हा मेघवर्णाने राजा हिरण्यगर्भ व त्याचा मंत्री चक्रवाक दोघेही सदवर्तनी असून त्यांच्याशी संधी करण्यास कोणतीही हरकत नसल्याची ग्वाही दिली.

.मेघवर्ण असेही म्हणाला, की राजाच्या मंत्र्यांनी मला ओळखले होते व माझ्याबद्दल राजाला सावधही केले होते पण राजा सुशील व सद्वर्तनी असल्याने त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच त्याची फसगत झाली . यानंतर याच्या समर्थनार्थ, काही कथा सांगितल्या.

याचवेळी सिंहलद्विपाहून आलेल्या पोपटाने, त्याला तेथील राजा सारस, हिरण्यगर्भावरील या आक्रमणामुळे आपल्यावर रागावला आहे असे सांगितले. ही बातमी ऐकून सेनापती गिधाडाला जलपक्षांचा राजा हिरण्यगर्भ याच्या सेनापतीचे म्हणजेच चक्रवाकाचे कौतुक वाटले, आणि आता त्याचा सल्ला आपला राजा मानणार याबद्दल त्याच्या मनात शंका उरली नाही .

आता केवळ मागे फिरून चालणार नव्हते तर संधी करून चांगल्या मनाने मागे फिरणे आवश्यक होते हे मयूर राज चित्रवर्णच्या लक्षात आले. मी आपल्या मंत्र्यांसोबत विविध प्रकारच्या संधी प्रस्तावान बद्दल चर्चा केली, आणि शेवटी कांचननामक संधी प्रस्ताव पाठवण्याचे ठरविले. जो प्रस्ताव येतात जलपक्षांचा राजा हंस हिरण्यगर्भ याने त्याला मान्यता दिली.

अशा प्रकारे विष्णू शर्माने राजपुत्रांना संधी बद्दल विविध कथा सांगून त्यांना या प्रकारात देखील शहाणे करून सोडले.


मंदिर शिल्पांमध्ये असलेल्या पंचतंत्र कथांबद्दल जाणून घ्या