बसने नर्मदा परिक्रमा सुरुवात

Omkareshwar to Shahadaनर्मदा परिक्रमेच्या संकल्प पूजेनंतर आमचा पहिल्या दिवसाचा प्रवास सुरु झाला. या यात्रेत आम्ही नर्मदा उजव्या हाताला ठेवत प्रवास करण्याचा नियम शेवटपर्यंत पाळला. दर दिवशी एकदा तरी नर्मदा दर्शन व पूजा झाली व त्याचबरोबर त्याचवेळी नर्मदाष्टकाचे पठणदेखील करण्यात आले. घाट असेल त्या ठिकाणी नर्मदास्नान घडत गेले, असे या यात्रा सहलीचे स्वरूप होते.
पहिल्या दिवशीचा आमचा प्र
वास नर्मदेच्या दक्षिण तटावरून, म्हणजे ओंकारेश्वरहून गुजरातच्या दिशेने सुरु झाला. आजच्या दिवसाची नर्मदा भेट, बरवानी येथील राजघाट या ठिकाणी घडली. वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे येथील रस्ता बराचसा पाण्याखाली गेला आहे. पण या ठिकाणी नर्मदाभेट सहज घडू शकते. येथेही आम्ही नर्मदा पूजा व प्रार्थना केली.

त्यानंतरची भेट होती बावनगजा या जैन तीर्थस्थळाला. येथे जैनांचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची ८४ फूट उंच, एकसंध दगडातील दुसऱ्या क्रमांकाची उंच, मूर्ती आहे. (सर्वात उंच १०८ फूट उंचीची मूर्ती नाशिक जवळ मांगी तुंगी येथे आहे (संदर्भ – विकिपीडिया). हे बावनगजा ठिकाण म्हणजे अनेक डोंगरटेकड्यांचा समूह. यापैकीच एका डोंगराच्या कुशीत हे मोहक स्थान वसले आहे.
सुमारे ३१५ किमीचा प्रवास केल्यानंतर पहिली रात्र महाराष्ट्रातील शहादा (जि. नंदुरबार) या ठिकाणी विश्राम केला. दुसऱ्याच दिवशी आणखी पश्चिमेकडे सरकत नर्मदा ओलांडायची होती.
पायी नर्मदा परिक्रमा ही कष्टदायी असली तरी ती करणारे बरेच जण आजही दिसून येतात. त्यासाठी दुर्दम्य इच्छा
शक्ती व वेळही हवा. समविचारी मित्रमंडळी असतील तर अशी यात्रा सुखद ठरु शकते. पण किमान ४ महिन्यांचा कालावधी तर निश्चितच लागू शकतो, त्यावरचा “वाहन यात्रा” हा पर्याय. येथे रोज माता नर्मदाही भेटते व अशी अनेक आडवाटेवरची देवस्थानेदेखील.
