महाभारत एक सूडाचा प्रवास – दाजी पणशीकर
महाभारताच्या प्रत्येक अभ्यासकाला ते वेगवेगळे गवसलं. कोणी त्यात व्यक्तिदर्शन शोधलं, तर कोणी त्यातील पात्रांच्या तोंडून संपूर्ण कथा कशी असेल ते वदविले. हे करताना त्यातून कृष्ण, कर्ण, दुर्योधन, अर्जुन यांसारखे अनेक महानायक पण तयार केले. महाभारताचा विविध अंगाने अर्थ लावायचा प्रयत्न विविध लेखकांनी केला. दाजी पणशीकर यांचा या पुस्तकातील प्रयत्न हा असाच एक “सूड” हि वेगळी मध्यवर्ती संकल्पना उलगडण्याचा प्रयत्न होता व तो कमालीचा यशस्वी झालाय.
१९७७ साली प्रथम प्रसिद्ध झालेल्या महाभारत - एक सूडाचा प्रवास, या दाजी पणशीकर यांच्या पुस्तकाला नरहर कुरुंदकर यांची विस्तृत प्रस्तावना आहे. हीच प्रस्तावना पुढे "व्यासांचे शिल्प" या नरहर कुरुंदकरांच्या लेखांचं / प्रस्तावनांचे संकलन असलेल्या पुस्तकात देखील संकलित केली आहे.
महाभारत घडण्यास कारण ठरलेल्या क्रोधातून जन्मलेल्या सूड या संकल्पनेभोवती या पुस्तकाचा विषय उलगडला जातो. याची सुरुवात होते ते परशुरामांचा क्रोध व सूड उलगडून. आणि महाभारताची सुरुवात पणशीकर यांच्या मते होते ते अंबेच्या प्रतिशोधाच्या धुमसणाऱ्या आगीतून. काशीराजाच्या अंबा, अंबिका व अंबालिका या तीन कन्यांच्या स्वयंवरासाठी भीष्म पोहोचतात ते राजकुमार विचित्रविर्यासाठी. आणि या पळवून आणलेल्या मुलींपैकी अंबा जेव्हा आपले शाल्व राजावर प्रेम असल्याचे हस्तिनापुरात त्यांना सांगते, तेव्हा ते तिला सन्मानाने शाल्वाकडे परत देखील पाठवतात. पण दुसऱ्याने पळवलेली मुलगी, म्हणून शाल्व तिला स्वीकारायला नकार देतो. प्रतिज्ञाबद्ध भीष्मही तिला स्वीकारत नाहीत आणि मग संतप्त अंबा याचा सूड म्हणून भीष्मांच्या विनाशासाठी विविध उपाय योजते. अगदी परशुरामांना ही भरीस घालते पण शेवटी तिचा निरुपाय होतो आणि ती अग्नीसमर्पण करते तेच भीष्मनाशासाठी पुनर्जन्म घेण्याच्या इच्छेने. सुडाची ही साखळी व्यवस्थितपणे मांडण्यासाठी पणशीकरांनी या पुस्तकातील आठ प्रकरणे वापरली आहेत. 
द्रुपद व द्रोण यांच्यातील कटुतेचा उद्रेक हि सुडाची अजून एक साखळी. द्रुपदाला बालमित्र म्हणून भेटायला गेलेल्या द्रोणाचा, राजा द्रुपद अपमान करतो, आणि द्रोण मग सूडाच्या भावनेने पेटून उठतात. त्यांच्या पुढच्या सर्व क्रिया, त्यांचे कुरू दरबारात जाणे, राजपुत्रांना शिकवणे, त्यांच्याकडून द्रुपदाला बंदी बनवून आणण्याची गुरुदक्षिणा मागणे, हे सारे काही द्रुपदाचा सुड घेण्यासाठी. आणि तो घेतला गेल्यावर द्रुपद सुडाने पेटून उठतो तो द्रोणांना संपविण्यासाठी आणि मग दुसरे सूडचक्र सुरू करतो. ते मग दृष्टद्युम्न, द्रौपदी यांना जन्माला घालण्यापासून ते अंतिम युद्धात द्रोणाचा शिरच्छेद दृष्टद्युम्न करेपर्यंत संपतच नाही. आणि यामध्येही अनेक लहान मोठी सूडचक्र सुरूच राहतात. द्रौपदी स्वयंवर प्रसंगी कर्णाचा अपमान करते याचा प्रतिशोध कर्ण घेत राहतो, प्रत्येक वेळी तिला अपमानित करण्याची संधी शोधत. दुर्योधनाला त्याची साथ मिळत जाते आणि त्यातून निर्माण होणारे सूडचक्र तर सर्वांनाच गिळंकृत करते. यातच मध्ये जन्मांधांच्या अंधारयात्रेचे चक्र आहे आणि डोळस गांधारीचे देखील.
महाभारत युद्धाचा अंत देखील सूडचक्रामुळेच करुण झाला आहे. आपल्या पित्याच्या हत्येने सूडाग्नी प्रज्वलित झालेला अश्वत्थामा, युद्ध संपल्यानंतर पांचालांच्या शिबिरात निद्रिस्त असलेल्या पांचाल सेनापती दृष्टद्युम्न, द्रौपदीची पाच मुले, शिखंडी इत्यादींची रात्री अमानुष हत्या करतो आणि या सूड चक्राची पुढची पायरी गाठतो.
अशा या संहार पर्वाचे वर्णन दाजी पणशीकरांनी व्यवस्थित उलगडून दाखवले आहे व ते देखील विविध श्लोकांचे प्रमाण देत, आणि त्यांचा अर्थ विशद करीत. त्यामुळेच महाभारत कथानकातील बारीक-सारीक पैलू देखील एका वेगळ्या स्वरुपात आपल्या समोर उघड होतात. पणशीकरांचा महाभारताचा अभ्यास, त्यांचे त्यावरील चिंतन, आणि विषय समजावण्याची हातोटी केवळ अप्रतिम आहे व म्हणूनच महाभारताचे सूड हे अंग समजावून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचणे आवश्यक ठरते.
More info →कर्ण खरा कोण होता ? Karn Khara Kon Hota?
मृत्युन्जय , राधेय यासारख्या पुस्तकांतून कर्णाची थोरवी वाचत ज्या पिढ्या मोठ्या झाल्या त्यातलाच मी देखील एक. या दोन्ही पुस्तकांची मी एकेकाळी अक्षरशः पारायणे केली होती व कित्येकदा कर्णाच्या दुर्दैवावर अश्रू देखील ढाळले होते. एवढेच नव्हे तर कर्णाच्या या उदात्त चारित्र्यावर आधारित अशी “मृत्युंजय” व “तो राजहंस एक” अशी दोन नाटके देखील वडिलांनी मला दाखविली होती व त्यामुळेच अनेकांप्रमाणे कर्ण हा माझा हिरो होता.
पुस्तकाच्या आत काय असावं याची कल्पना श्री धोंडो विठ्ठल देशपांडे यांनी लिहिलेल्या १४ पानी प्रस्तावनेवरूनच येते. हे पुस्तक म्हणजे , पणशीकरांनी मराठा या वृत्तपत्रातून दर रविवारी लिहिलेल्या, तत्कालीन कर्ण विषयक लेखांचा संग्रह आहे. सुमारे १८ लेखातून पणशीकरांनी कर्णाचे विविध पैलू समोर आणले आहेत. व्यासांच्या महाभारतात सर्व व्यक्तिरेखा येतात त्या प्रसंगवर्णनातून. कर्ण जन्मही असाच, त्यात त्याचा तीळभरही दोष नाही. पण नंतर त्याच्या प्रसंग-प्रवेशात त्याचे स्वभावदोषही उलगडू लागतात. पणशीकर, यावेळी द्रोणांच्या स्पर्धेच्या रंगमंचावर प्रवेश करणारा विशीचा तरुण कर्ण, आपल्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी लहान असणाऱ्या युवा अर्जुनाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान देताना दाखवतात व आपल्याला देखील त्यांची वयं ध्यानात घेता, हा फरक स्पष्ट होऊ लागतो. सूतपुत्र म्हणून हिणविला गेलेल्या कर्णाला लगेचच राजा करून दुर्योधनाने त्याला राज्याभिषेक करताच, तात्कालीन जातीयतेच्या भिंती किती तकलादू होत्या ते दाखवून दिले.
यानंतरच्या दुर्योधनाच्या कारस्थानांमध्ये मात्र कर्णाचा सहभागच नव्हे, तर पुढाकार देखील होता असे काही वेळा दिसून येते. पांडवांचा द्वेष करण्यासाठी दुर्योधनाला कारण तरी होते, पण कर्णाला मात्र असे कोणतेही सबळ कारण नव्हते. असे असताना पण त्याने घोष-यात्रेसाठी दुर्योधनाला प्रवृत्त केले. तेथेही त्याला चित्रसेन गंधर्व कडून पराभूत होऊन पळावे लागले. त्यानंतर विराटाच्या युद्धप्रसंगी देखील अर्जुनाने ज्या कौरवांचा पराभव केला त्यात कर्ण देखील होता, हे पणशीकर नमूद करतात. कृष्ण-कर्ण नात्याबद्दल जा गोष्टी मृत्युंजयातून फुलविल्या गेल्या त्याचा समाचार घेताना, “कृष्णाने कर्णाचे आर्जव का केले?” या प्रकरणात पणशीकरांनी कृष्ण-कर्ण युद्ध पूर्व संवादाची फोड करत, त्याचे सर्व पैलू उघड केले आहेत व त्यातील कृष्णाचा धुरंधरपणा कौरवांची बाजू कशी दुबळी करतो, तेच समजाविले आहे.
कर्णाला द्रोणांनी ब्रह्मास्त्र का नाकारले? हे देखील पणशीकर सप्रमाण स्पष्ट करतात आणि हेच प्रमाण मग परशुरामांकडून कर्ण ब्रह्मास्त्र मिळवितो तेव्हा कसे अधोरेखित होते हे दाखवून देतात.
द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग
द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगाचा बराचसा दोष कर्णाच्या माथी तसा पण जातोच. “द्रौपदीच्या विटंबनेचा सूत्रधार” या लेखातून पणशीकरांनी ते अधिक स्पष्ट केले आहे. मृत्युंजय कार त्यावर पश्चातापाचे पांघरुण घालत असताना पणशीकर मात्र कर्णाचे हे वैगुण्य उघडे पाडतात.
महायुद्धातील कर्ण
प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी कर्ण पहिले दहा दिवस युद्धा पासून दूर राहिला. असे असले तरी या ताज्या दमाच्या कर्णाचा पुढच्या ७ दिवसात अनेकांनी पराभव देखील केला आहे. युद्धपूर्व बैठकीत जेव्हा भीष्म, द्रोण, कृप, व अश्वत्थामा, पांडवांचा पराजय करण्यासाठी किमान दहा दिवस किंवा जास्त कालावधी लागेल असे सांगत होते तेव्हा कर्ण मात्र “कर्णस्तु पंचरात्रेण प्रतिजज्ञे ने महास्त्रवित” म्हणजेच आपण केवळ पाच दिवसात त्यांचा निःपात करू अशी वल्गना करीत होता. आणि सेनापती बनल्यावर मात्र तो केवळ २ दिवसातच संपला.
एवढं सगळं असून देखील कर्ण वीर होता व म्हणूनच कृष्णाला, त्याला अर्ध-निशस्त्र अवस्थेत का होईना, मारण्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त करावे लागले, हेदेखील पणशीकर नमूद करतात. अन्यायाचा सल मनात ठेवून का होईना, पण कर्णाच्या वर्तनाने आणि त्याच्या अति पांडव द्वेषाने, त्याचा नेहमीच घात केला.
कर्णाची दुसरी व वास्तव बाजू दर्शविणारे हे पुस्तक कदाचित कर्णप्रेमींना तितकेसे रुचणारे नाही मात्र कर्णाची हि बाजूदेखील विचारात घेण्यासाठी वाचणे आवश्यक आहे
More info →



