Marathi Book

हस्तिनापूर – मनोहर रं. शिरवाडकर

हस्तिनापूर – मनोहर रं. शिरवाडकर

Rs 125

सत्तरीच्या दशकातील महाभारतावरील विविध अंगांचे विवेचन करणारी जी पुस्तके आली त्याच परंपरेतील म.रं. शिरवाडकर यांचे हे आणखी एक पुस्तक. यातदेखील महाभारताच्या काही अंगाचं नव्याने दर्शन घडते. विशेषतः चमत्कार , वर, शाप या संकल्पना व त्यांचा विशेषतः पांडवांवरील प्रभाव याचं उत्कृष्ट विवेचन या पुस्तकात आहे. महाभारतातील कोणकोणत्या  घटनांना वर शापांनी प्रभावी किंवा अतिरंजित केले आहे हे देखील शिरवाडकरांनी सप्रमाण स्पष्ट केले आहे. उदाहरण द्यायचं झालंच  तर द्रौपदी वस्रहरणाचा प्रसंग. हा प्रसंग प्रत्यक्षात कसा घडलेला नसावा व श्रीकृष्णाचा वस्त्र पुरविण्यात कोणताही सहभाग कसा नव्हता यावरील शिरवाडकरांचा युक्तिवाद मुद्देसूद व बिनतोड वाटतो. 

कृष्णानं अर्जुनाच सारथ्य का स्वीकारलं याची देखील छान उकल शिरवाडकर करतात व ते आपल्याला पटल्यावाचून राहात नाही. हे करताना अर्जुनाचा हळवा , भावुक स्वभाव आणि श्रीकृष्णची कर्तव्य कठोरता आपल्या मनावर बिंबत जाते.

शिरवाडकरांनी कर्ण , अर्जुन, धृतराष्ट्र , युधिष्ठिर , भीम आणि द्रौपदी या पात्रांचीदेखील व्यक्तिचित्रे सुंदर रेखाटली आहेत आणि याचबरोबर महारथी सात्यकी आणि कौरव सेनापती झालेल्या पांडवांच्या मामाचं , शल्याचं  देखील.

शतपुत्रा या प्रकरणात त्यांनी १०० कौरवांतील गांधारीपुत्र किती व कृतकपुत्र किती व का? याचं केलेलं स्पष्टीकरण देखील मुद्देसूद आहे.

पुस्तक छोटेसेच असले तरी महाभारताविषयी कुतूहल असणाऱ्यांना वाचायला अतिशय सुंदर पूरक पुस्तक आहे. काहीसा वेगळा विचार ते नक्कीच देतं पण युगांत , व्यासपर्व सारखा आपला वेगळा ठसा ते उमटवत नाही.

More info →
Buy from Amazon
महाभारताचा मूल्यवेध – डॉक्टर रवींद्र शोभणे

महाभारताचा मूल्यवेध – डॉक्टर रवींद्र शोभणे

Rs 210

डॉक्टर शोभणे यांनी याआधी महाभारतावर आधारित उत्तरायण ही कादंबरी लिहिली आहे (मी ती वाचलेली नाही) आणि या कादंबरी स्वरूपात ज्या गोष्टी बऱ्याच गोष्टींची उकल त्यांना मांडता आली  नाही त्याचा अंतर्भाव त्यांनी मूल्यवेध या पुस्तकात केल्याचे त्यांनी या पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हटले आहे.

मूल्यवेध  हे पुस्तक त्यांनी आठ प्रकरणांत विभागले आहे यात पहिल्या प्रकरणात महाभारत संहितेचं माहितीपूर्ण विवेचन आहे ज्यावर इरावती कर्वेंच्या युगांत चा प्रभाव जाणवतो. तसाच तो पुस्तकातील इतर प्रकरणावर प्रकरणांवर ही जाणवतो.  दुसऱ्या  प्रकरणात  आर्य संस्कृती चे वर्णन आहे यात मुख्यत्वेकरून वैदिक काळ, संस्कृती ,धर्मशास्त्रे, यज्ञसंस्था, वर्णव्यवस्था, कुटुंब पद्धती, विवाह संस्था, कृषी संस्कृती, व्यापार, देव आणि स्वर्ग संकल्पना, इत्यादीं बद्दल बरीच माहिती आहे

महाभारताच्या वाचकांसाठी यानंतरची प्रकरणे वाचावीशी वाटणारी आहेत. पुस्तक हळूहळू पकड घेते ते महाभारतातील पुरुष, स्त्रिया व महाभारतीय युद्ध या प्रकरणांमध्ये.  तर शेवटच्या तीन प्रकरणांमध्ये म्हणजेच वर-शाप, युद्धानंतर व पाऊलखुणा यात ही पकड हळू पुन्हा सुटत जाते.

महाभारतातील पुरुष, महाभारतातील स्त्रिया व महाभारतीय युद्ध या प्रकरणांमध्ये बरीचशी वर्णने व निष्कर्ष इतर पुस्तकांतून येऊन गेलेले आहे. डॉक्टर शोभणे देखील इरावती बाईंची युगांत मधली मते मान्य करताना आढळतात.  मात्र शिखंडीनी चे शिखंडी बनणे आणि  द्रौपदीच्या जन्माचे कोडे हे कोडेच राहते. इतर काही कोड्यांची जसे द्रोण, कृप , कृपी यांचा जन्म,अश्वत्थाम्याचे नामकरण, परीक्षिताची जन्मकथा, द्रौपदी वस्त्रहरण कथा, सत्यवतीची जन्मकथा यांची उकल त्यांनी व्यवस्थितपणे केली आहे त्यामुळेच डॉक्टर शोभणेंच हे पुस्तक आपल्या ज्ञानात भर घालत असले तरी विचारांना फार वेगळी दिशा मात्र ते देत नाही.

More info →
Buy from Amazon
युगान्त – इरावती कर्वे

युगान्त – इरावती कर्वे

Rs 260eBook: Rs 200

हा वरचा क्रम त्याच्या दर्जा वरून जसा आहे, तसाच तो विचार मंथनाच्या काळा वरून देखील आहे.  महाभारताची भांडारकर संस्थेची संशोधित प्रत त्याच्या प्रसिद्धीच्या शेवटच्या टप्प्यात असताना, उपलब्ध पर्वाचा संदर्भ घेत इरावतीबाईनी  आपलं वेगळं विचारमंथन सुरू केलं आणि १९६२ पासून यातील पात्र व प्रसंगावर वृत्तपत्रीय लिखाण सुरू केलं या आगळ्यावेगळ्या विचारमंथनाची परिणती म्हणजे १९६७ साली, म्हणजे  सुमारे ५०-५५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं  युगांत हे पुस्तक.

More info →
Buy from Amazon
Buy from Amazon
पर्व – डॉ एस एल भैरप्पा / मराठी भावानुवाद – डॉ सौ उमा कुलकर्णी

पर्व – डॉ एस एल भैरप्पा / मराठी भावानुवाद – डॉ सौ उमा कुलकर्णी

Rs 370

लहानपणापासून मी महाभारत अनेकदा वाचलंय , कधी गोष्टीरूपात तर कधी कादंबरी स्वरूपात. या प्रत्येक वाचनात महाभारता बद्दलचं गूढ वाढतच गेलं  व नंतर हळूहळू ते वाढलं कि महाभारत हे वास्तववादी न वाटता एक रचित काल्पनिक कथानक वाटू लागलं व याला कारणीभूत होत्या उदात्तीकरण केलेल्या काही घटना. मृत्युंजय  वाचताना  कर्ण आवडला तर युगंधर वाचताना कृष्ण मोहवून गेला. अर्जुनादी पांडवांनी पण मनात चांगलंच घर केलं.इतक्या पिढ्यांचं इतकं  सुसंगत वर्णन एखादा कथाकार कसं  रचू  हेही कळत नव्हतं पण बऱ्याचश्या अवास्तव वाटणाऱ्या घटना सत्यतेची ग्वाही देऊ  शकत नव्हत्या. पण डॉ एस एल भैरप्पा  यांचं   डॉ सौ उमा  कुलकर्णी यांनी अनुवादित केलेलं पर्व हे पुस्तक हातात पडलं व अनेक गोष्टींचा सहज उलगडा झाला आणि महाभारत खरं असावं कि खोटं?  हे द्वंद्व  देखील संपलं.

More info →
Buy from Amazon