बेलूर येथील चेन्नकेशव मंदिर हे आम्ही आजवर पाहिलेल्या मंदिरातील सर्वोत्कृष्ट मंदिर. हे होयसळ वास्तुकलेचे प्रतीक आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाह्य भागावर असंख्य मूर्ती कोरलेल्या आहेत. यात रामायण, महाभारत व विविध पुराणातील कथा दर्शविणाऱ्या मूर्त्यांची रेलचेल आहे. पण हे मंदिर प्रसिद्ध आहे ते त्याच्या छताजवळील भागावर कोरलेल्या उत्कृष्ट नर्तक / नर्तिका यांच्या मूर्त्यांसाठी. याना शिला बालिका, मदनिका अथवा सुरसुंदऱ्या म्हणता येईल. या मंदिरात असलेल्या एकूण अशा ४२ (बाहेर ३८ व आत ४) उत्कृष्ट कलाकृती आपले लक्ष छताकडे वेधून घेतात. या आकृत्यांच्या कोरीव कामात होयसाळ राजघराण्याच्या शिल्पकलेतील उच्च दर्जाची परिपूर्णता आपण पाहू शकतो. या सुंदर छतावरील शिल्पकृती एका विशिष्ट प्रकारच्या दगडात कोरलेल्या आहेत, ज्याला स्थानिक भाषेत बालापद कल्लू (सोपस्टोन) म्हणतात
. या कोरीव कामासाठी वापरलेले हे दगड सुरुवातीला मऊ असतात आणि नंतर वातावरणाच्या प्रभावामुळे ते कठीण होतात. या आकृत्यांची उंची सुमारे अडीच फूट आहे.
या उत्कृष्ठ आणि मोहक मदनिकापैकी काही विष्णूच्या विशिष्ट स्त्री रूपाशी मिळतीजुळती आहेत, येथेच आपल्याला भस्मासुराचा नाशासाठी विष्णूने घेतलेले मोहिनीरूपही दिसते. काही मूर्त्या या विष्णूवर्धन राजाची राणी शांतलादेवी यांच्यावरून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते. या शिलाबालिका विविध नृत्यासनांमध्ये कोरलेल्या आहेत, ज्यात त्यांची वेषभूषा, नृत्य, गायन, सोबतच्या सेविका, प्राणी इ. म्हणजे त्या काळातील तज्ञ शिल्पकारांनी तयार केलेली उत्कृष्ट शिल्पे आहेत.”
या आकृत्या मंदिरासभोवताली छताच्या उंचीवर ४५ अंशाच्या कोनात आढळतात. यातील मुख्य प्रतिमा उभ्या स्थितीत असते तर त्या मूर्तीच्या प्रभावळीत तळाशी सहाय्यक कलाकार, प्राणी आणि सेविकांच्या लहान मूर्ती आढळतात.
या सर्व मुर्त्यांच्या हातातील बांगड्या, आर्मलेट, ब्रेसलेट, कानातले रिंग, हार, कंबरपट्टा, अलंकारिक स्कर्ट्स. पायातील दागिने, पैंजण, पायाच्या अंगठ्या आणि खांदे, हातांचे दागिने यांसारख्या दागिन्यांच्या उत्कृष्ट कोरीव कामाने सुशोभित केलेले आहेत. कुशलतेने कोरीव काम करून, या सुरसुंदरींच्या शिल्पकारांनी त्या काळात अस्तित्वात असलेल्या आधुनिक फॅशनचे प्रदर्शन केले आहे, असेच म्हणावे लागते व त्यामुळे मंदिर पाहताना , या मूर्त्या पाहताना त्यांच्या प्रभावळीकडे तसेच त्यांच्या अलंकारांकडे देखील बारकाईने पाहणे आवश्यक ठरते.
मंदिराच्या बा
हेरील भागावर जी इतर असंख्य सुंदर शिल्पे आहेत यात विष्णूची , शिवाची विविध रुपे , अवतार व त्यांच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. काही शिल्पे कशी बनवली असतील याचाही अचंबा वाटतो. रामायण महाभारतातील अनेक प्रसंग देखील आपल्याला येथे आढळतात.
या मंदिराच्या बाह्य भागावरील मुर्त्यांची माहिती हिंदीतून करून घेण्यासाठी पुढील विडिओ पहा.
