महाभारत – संघर्ष आणि समन्वय – रवींद्र गोडबोले

महाभारत – संघर्ष आणि समन्वय – रवींद्र गोडबोले

महाभारत जाणून घ्यायचं असेल तर ते केवळ कथा वाचून होत नाही. त्यातील मर्म जाणण्यासाठी ही, बहुरंगी बहुढंगी कथा अंतर्बाहय समजून घ्यायला हवी. हे समजावण्याचे काम फारच कमी पुस्तके करतात. श्री रवींद्र गोडबोलेंचे “महाभारत - संघर्ष आणि समन्वय” हे त्यातलेच एक उत्कृष्ट पुस्तक.

एकूण १० प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकाची सुरुवात “महाभारत का उद्भवले?” या प्रश्नापासूनच होते. “पांडवांचा राज्यावर हक्क होता का?”, “राजा कोण हे ठरविण्याचा अधिकार कोणा कोणाला होता?”, या प्रसंगी सत्यवती व भीष्म यांचे वागणे, पुढे दुर्योधनाचे व धृतराष्ट्राचे वागणे, यातील बारकावे आपल्याला उलगडत जातात. 

Order Now!
About the Book

पुढे “वारणावत ते खांडवप्रस्थ” या प्रकरणात पांडवांना हस्तिनापुरात मिळालेली वागणूक, उमलत जाणारा सुप्त सत्तासंघर्ष, भीमाची दांडगाई व दुर्योधनाची प्रतिक्रिया, युधिष्ठिराच्या उत्तम स्वभावाबद्दल प्रजेतली कुजबुज आणि त्याला करावा लागलेला युवराज्याभिषेक, या सर्वांतून श्री. गोडबोले वारणावत येथील जतुगृहाची घटना का व कशी घडली हे समजावतात. या घटनेबद्दलची कल्पना असतानाही पांडव बराच काळ वारणावतात का राहिले? तेथून पळून का जाऊ शकले नाहीत? इत्यादी बऱ्याच गोष्टींचा विचार श्री. गोडबोले, आपल्याला करायला भाग पाडतात. पांडव तेथून निसटल्यावर द्रुपदाच्या राज्यात पोहोचेपर्यंतच्या भागातील घटनांचे बारकावे देखील ते विशद करतात. द्रुपदाला पांडवांचा व पांडवांना द्रुपदाचा कसा फायदा होणार होता हे आपल्याला तत्कालीन राजकारणाचे संदर्भ देत समजावतात आणि मग आपल्या आतेभावानां कधीही न भेटलेला कृष्ण, द्रौपदी स्वयंवरात येतो पण भाग का घेत नाही?, ते देखील आपल्याला स्पष्ट होत जातं. 

पुढील भागात जरासंधवध व शिशुपालवध या घटना येतात. युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्यामागची प्रेरणा काय होती? आणि कृष्णाने आपला शत्रू जरासंधाला पांडवांची मदत घेत आणि कोणते डावपेच वापरून संपविले याचे विवेचन यात येते. या वधाने संतापलेल्या शिशुपालाचा वध कृष्णाला का करावा लागला हे देखील मग स्पष्ट होते. जरासंधाचा वध हि अतिशय नियोजनबद्ध घटना तर शिशुपालवध हि आकस्मिक घटना. पण या दोन्ही घटनांमध्ये शत्रूला विचार करायला अवसर कसा ठेवला गेला नाही याचे इंगित कळते व श्रीकृष्णाच्या चातुर्याचा पुरेपूर अनुभव येतो. 

या दोन्ही प्रकरणात क्षात्रधर्माचेही विवेचन येते. क्षात्रधर्म नक्की कशाला म्हणावे? कुणाचा क्षात्रधर्माचा दृष्टिकोन कसा होता? कृष्ण, जरासंध व शिशुपालाचे यावेळचे विचार काय होते ? हे श्री गोडबोले आपल्याला ध्यानात आणून देतात. 

यानंतर द्यूत प्रसंगाचे प्रकरण आहे. श्री. गोडबोले द्यूत प्रसंगातील बारकावे आपल्यासमोर आणतात. दुर्योधनाने कोणकोणत्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून धृतराष्ट्राची परवानगी मिळविली? पुन्हा द्यूतनिपुण शकुनीशी द्यूत  खेळायला युधिष्ठिराला कसे भाग पाडले? द्यूत हा फाशांचा  खेळ असला तरी तो नशिबावर अवलंबून नसून खेळणाऱ्याच्या कौशल्यावरच कसा अवलंबून होता? कोणकोणत्या डावात नक्की काय काय पणाला लावले गेले? याबाबतची महाभारतात असलेलीच पण सहसा प्रकाशझोत न टाकली जाणारी माहिती श्री. गोडबाळे उजेडात आणतात. द्रौपदी वस्रहरणाच्या वेळी धर्माची सूक्ष्म व्याख्या देखील सखोलपणे ते मांडतात.  असे हे आगळे वेगळे पुस्तक प्रत्येक महाभारत प्रेमीने नक्कीच अभ्यासायला हवे

टीप : २०१४ मध्ये श्री गोडबोले यांचे निधन झाले व आपण एका चांगल्या अभ्यासकाला व प्रकाशकाला मुकलो (ते देशमुख आणि कंपनीची धुरा सांभाळत होते).

Details
Author: Ravindra Godbole
Genre: Mahabharat
Tags: Mahabharat Book, Marathi Book
Publisher: Deshmukh & Co. Pvt Ltd
Publication Year: 2013
Format: Paper
Length: 344 Pages
Rating:

List Price: Rs 600/-
Order Now
Disclosure of Material Connection: Some of the links in the page above are "affiliate links." This means if you click on the link and purchase the item, I will receive an affiliate commission. I am disclosing this in accordance with the Federal Trade Commission's 16 CFR, Part 255: "Guides Concerning the Use of Endorsements and Testimonials in Advertising."