
कर्ण म्हणजे महाभारत कथेतील एक भारदस्त व तितकेच वादग्रस्त पात्र. कर्ण - महापुरुष की खलपुरुष? हे पुस्तक देखील कर्णाचा तौलनिक अभ्यास करून, कर्णाला उलगडून महाभारतातील त्याची प्रतिमा आपल्यासमोर उभी करते .
कर्ण म्हणजे महाभारत कथेतील एक भारदस्त व तितकेच वादग्रस्त पात्र. मृत्युंजय, कौंतेय सारख्या कादंबऱ्यांनी कर्णाला एक उदात्ततेचे वलय मिळवून दिले. शोषितांचा प्रतिनिधी म्हणून त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त करून दिलं व म्हणूनच कर्णाचा विषय निघताच सर्वसामान्य वाचक भावुक होतो. मृत्युंजयातील कर्ण हाच त्याला खरा महाभारतातील कर्ण वाटू लागतो. पण वस्तुस्थिती तशी आहे काय? आणि हे समजणार कसे? मूळ महाभारतातील कर्ण समोर येणार कसा ? इतर बऱ्याच पुस्तकांमध्ये तो, एक प्रकरण म्हणून उलगडलेला आहे. पण दाजी पणशीकरांनी “कर्ण खरा कोण होता?” या पुस्तकाद्वारे कर्णाची एक वेगळीच बाजू समोर आणली. त्याचप्रमाणे सौ माधुरी सप्रे यांचे “कर्ण - महापुरुष की खलपुरुष?” हे पुस्तक देखील कर्णाचा असाच तौलनिक अभ्यास करून, कर्णाला उलगडून महाभारतातील त्याची प्रतिमा आपल्यासमोर उभी करतात.
हे पुस्तक दोन भागांत विभागलेलं आहे. पहिल्या भागात महाभारतातील कथानकांत कर्णाचा संदर्भ आलेली अशी सर्व प्रकाराने आलेली आहेत ज्यातून आपल्याला कर्णाच्या मनाची व व्यक्तिमत्त्वाची जडणघडण उलगडत जाते. कर्णाला कुंती जन्मल्यावर पेटीत घालून पाण्यात सोडते त्या क्षणापासून त्याला दुर्योधन रंगभूमीवरील स्पर्धेच्या वेळी कसा राजा करतो, त्यानंतर वेळोवेळी त्याने अर्जुनाशी केलेली स्पर्धा पण त्याचबरोबर दुर्योधनाच्या कारस्थानांमध्ये सहभागी असलेला कर्ण आपल्याला आढळत जातो. याची सुरवातच वारणावतापासून होते. विविध प्रसंगातून, महाभारतातील अवतरणांतून आपल्याला माधुरी ताईंनी कर्णाचे महाभारतातील स्वरूच आपल्यासमोर उभे केले आहे.
या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात विविध नामवंत लेखकांनी कर्णाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले याचा तपशीलवार उहापोह आहे. यात महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास, कौन्तेयकार वि. वा. शिरवाडकर, दुर्गा भागवत, गो. नी. दांडेकर, आनंद साधले, शं. के. पेंडसे, इरावती कर्वे, मृत्युंजयकार शिवाजी सावंत, अ. दा. आठवले, राधेयकार रणजित देसाई, विजयराव देशमुख, आणि दाजी पणशीकर अशा नामवंत लेखकांच्या १९५० ते १९७६ या दरम्यानच्या कर्णावरील लेखनाचा समिक्षात्मक आढावा आहे. यातून आपल्याला या नामवंतांची मते त्यांची पुस्तकेही ना वाचताच आपल्यासमोर उलगडत जातात. व हेच या पुस्तकाचे वेगळेपण देखील आहे.
