Narmada Parikrama – Narmadapuram to Omkareshwar
आज परिक्रमेच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा. यात आजचा नर्मदापुरम ते ओंकारेश्वर हे सुमारे २७५ किमीचे अंतर होते. यात थोडीशी वाट वळवून आम्ही मध्यप्रदेशातील खांडवा या ठिकाणी असलेल्या श्री श्री १००८ धुनीवाले दादाजी या समाधिस्थळी गेलो. येथे आजही एक धुनी अखंड पेटती असते व येथे बडे दादाजी व छोटे दादाजी अशा दोन समाध्या आहेत.

येथेच पुढे मुख्य रस्त्यालगत सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचेही समाधिस्थळ आहे. ते पाहून आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो, व येथे आमच्या परिक्रमा प्रवासाची समाप्ती झाली. आता उद्या रीतसर उद्यापन व परिक्रमा संकल्प समाप्ती आणि ओंकारेश्वराला अभिषेक केल्यानंतर यात्रा समाप्ती होईल.
आजच्या प्रवासात सर्व सहप्रवाशानी यात्रेच्या प्रवास, जेवण व नियोजनाबद्दल आपली मते मांडली. प्रभू ट्रॅवेल्स यांनी या यात्रेचे आयोजन अतिशय शिस्तबद्धपणे केले होते त्यामुळेच यात्रा खूप छान पार पडली. त्यातील प्रमुख मुद्दे येथे मी मांडतो म्हणजे आतापर्यंत मला विचारल्या गेलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
(१) यात्रा ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी नर्मदा नदीला उजवीकडे ठेवत पार पडली.
(२) काही वेळा नदी ओलांडावी लागू नये म्हणून गूगल ने जरी जवळची वाट दाखवली तरी दूरचा रस्ता घेतला गेला.
(३) प्रथम दिवशी घाटावर मैय्या पूजन व संकल्प पूजा केली गेली. प्रत्येक दिवशी एकदा तरी नर्मदा भेट घडली जेथे आम्ही नर्मदा पूजन, आरती व नर्मदाष्टक म्हटले.
(४) सर्व प्रवासादरम्यान भजने अथवा भक्तिगीते (प्रवाशांनी गायलेली अथवा गाडीत वाजणारी) लावून वातावरण मंगलमय ठेवले गेले.
(५) प्रत्येक ठिकाणची ऐतिहासिक, आध्यात्मिक माहिती पुरविली गेली. यात विठ्ठलराम महाराज, सिद्धमाई यासारख्या महात्म्यांची भेट घडविली गेली.
(६) सहल आयोजक प्रभंजन व रागिणी देसाई स्वतः सहलीत उपस्थित होते व सर्वांकडे लक्ष पुरवीत होते. प्रभंजन यांचे वडील श्री सुहास देसाई काका देखिल होते व बऱ्याच घटना, प्रसंग अवगत करून देत होते.
(७) यांचे स्वतःचे स्वयंपाकी व साहित्य सोबत असल्याने प्रत्येक ठिकाणी रुचकर, गरम, वेगवेगळ्या प्रकारचे भोजन रोज मिळत गेले. चहा, नाश्ता, जेवणखाण यातली आपुलकी अन्नाच्या स्वादात उतरत होती. आचारी व वाढपी त्यांच्याच घरचे असल्याप्रमाणे लोकांची काळजी घेत होता त्यामुळे स्त्रीवर्ग अतिशय खुश होता.
(८) बसची स्थिती, चालक उत्तम असल्याने कुणालाही एवढ्या दीर्घ (सुमारे ३२०० किमी) प्रवासाचा त्रास जाणवला नाही.
(९) सर्व ठिकाणी उत्तम एसी हॉटेल्स मिळाल्याने व्यवस्थित झोप मिळाली, गरम पाण्याने आंघोळी करता आल्या.
(१०) रोज पाण्याच्या बाटल्या उपलब्ध असल्याने बाहेरचे पाणी पिण्याची गरज भासली नाही. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी बाटल्यांची एकत्रित विल्हेवाट लावण्याची पद्धत पहिल्याच दिवशी समजाविली गेली.
(११) सर्व सहयात्रींनी वेळेवर (अथवा वेळेआधीच) येत सर्व वेळा पाळून यात्रा आयोजकांना उत्तम सहकार्य केले.
(१२) या यात्रेत जवळपास ३० (७५%) स्त्रिया होत्या. वाटेत प्रवासादरम्यान (विशेषता मध्य प्रदेशात) टॉयलेट्स उपलब्ध नव्हते त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत होती पण यात आयोजकांनी त्यांच्या परीने शक्य तितका प्रयत्न केला, ही एकमेव गोष्ट यात्रा या दृष्टिकोनातून लक्षात घेतली तर उरलेल्या सर्व बाबतीत यात्रा अतिशय सुखकर झाली. सर्व स्थळे (ठरविलेल्या पेक्षा जास्तच) व्यवस्थित व घाई गडबड न करता पाहता आली.
या सर्वांचे सार एकच ……
नर्मदा परिक्रमा करावी तर ती फक्त आणि फक्त प्रभू ट्रॅवेल्स बरोबरच.
आतापर्यंत आमच्यासोबत ही रोजनीशी वाचत अनेक मित्रमंडळींनी नर्मदा वाचनयात्रा केली व मला लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. आमच्या सहप्रवाश्यांनी देखील रोजनिशीचा रोजच्या रोज पाठपुरावा केला. या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.
……महेश नाईक (६ नोव्हेंबर २०२३)
