Bhetaghat-Amarkantak त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

Day 7 of Narmada Parikrama by Bus – Bhedaghat to Amarkantak

आजचा दिवस आमच्यासाठी खास होता. आज आमच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण होत असताना आमच्या दिवसाची सुरुवात ग्वारीघाटावरील (गौरीघाट?) नर्मदा मैयाच्या आरतीने व नर्मदाष्टकाने व्हावी हा किती सुखद योगायोग. उगवता सूर्य पूर्वेच्या भाळीच्या ललाटबिंबासारखा दिसत असताना आमच्या मुखातून शब्द उमटत होते,
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे

नर्मदाष्टक ६

सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षटपदै
धृतम स्वकीय मानषेशु नारदादि षटपदै:
रविन्दु रन्ति देवदेव राजकर्म शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे॥६॥

भावार्थ – सनत्कुमार, नचिकेत , कश्यप , अत्री , नारद इ नी तुझ्या पदकमालांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले आहे.तू सूर्य, चंद्र, देवराज इंद्र यांनाही त्यांच्या चांगल्या कर्मानी सुखावले आहेस. अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

Bhetaghat-Amarkantak कपिलधारा धबधबा

Bhetaghat-Amarkantak दूधधारा धबधबा
दूधधारा धबधबा

अमरकंटक कडे प्रवास करताना आमच्यामधील आंतरपाट दूर झाल्यानंतरच्या ३० वर्षांचा जीवनपट आमच्या डोळ्यासमोरून सरकत होता. ही ३०वी वर्षापूर्ती नर्मदा परिक्रमेत होणे आमच्यासाठी फारच सुखद होते. बसमधे आज आम्हाला कपिलधारा तीर्थाजवळ आश्रमात वास्तव्य करणाऱ्या सिद्धमाई यांच्या सिद्धीबद्दल ऐकायला मिळाले तसेच सहप्रवासी डॉ गीता दलाल यांच्याकडून आपल्या शरीरातील चक्रांबद्दल.

संध्याकाळपर्यंत आम्ही अमरकंटकला पोहोचलो. येथून कपिलधारा व दूधधारा ही उत्तर बाजूचीच दोन स्थाने. अजून अमरकंटकचा वळसा पूर्ण झाला नसल्याने आज ही दोन स्थाने पाहून घेतली. उगमापासून येणारे पाणी येथे काही उंचीवरून धबधब्यांच्या रुपात झेपावत खाली वाहते. पैकी कपिल मुनींच्या तपाचे स्थान ते कपिल धारा टीएसआर दुर्वास मुनींच्या तपाचे दूध धारा. दूध धारेच्या गुहेसाठी थोडे खाली उतरावे लागते. आता तेथील गुहा विस्तारून या गुहेत पिंडीसोबत एक ऋषी मूर्ती व एक देवीची मूर्ती ठेवली आहे. त्या शांत, रम्य वातावरणात धबधब्याचा आवाज मोहवत होता, पण अंधार पडू लागल्याने पुन्हा वार चढलो. मधे योगिनी सिद्धमाई यांच्या आश्रमात त्यांचे दर्शन घेतले व हॉटेलवर परतलो.