Iconography of Narasimha-नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र-

विष्णूच्या दशावतारांपैकी नरसिंह अवतार एक महत्त्वाचा अवतार आहे. या अवताराच्या महात्म्याचे वर्णन “नरसिंह पुराण” नामक उप पुराणामध्ये विस्ताराने येते. या कथेच्या अनुषंगाने या कथेविषयीचे मूर्तिशास्त्र व तसेच नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र आपल्याला अनेक मंदिरांमध्ये आढळून येते. भारताच्या दक्षिण भागात विशेष करून नरसिंह अवताराला वाहिलेली मंदिरे आहेत. या मंदिरांच्या बाहेरील भागावर असलेल्या भितिशिल्पांमध्ये देखील आपल्याला नरसिंहाचे विविध प्रकार पाहायला मिळतात. या लेखाद्वारे आपण नरसिंह कथेशी संबंधित शिल्पे आणि नरसिंह अवताराचे मूर्तीशास्त्र याचा आढावा घेऊ.

नरसिंह म्हणून विष्णूचा उल्लेख विविध पुराणांमध्ये येतो. एकूण १७ पुराण, उप पुराणांमध्ये, नरसिंह म्हणून विष्णूचा उल्लेख आहे. वाल्मिकी रामायण, हरिवंश, विष्णू पुराण, भागवत पुराण, अग्नि पुराण, ब्रह्माण्ड पुराण, वायु पुराण, ब्रह्म पुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, कुर्म पुराण, मत्स्य पुराण, पद्म पुराण, शिव पुराण,लिंग पुराण, स्कंद पुराण आणि नरसिंह पुराण सर्वांचा उल्लेख आहे. या सर्व पुराणांमध्ये, नरसिंहाचे वर्णन विनाशाचा देव म्हणून केले आहे, जो प्रलयच्या वेळी विनाश करतो आणि काल म्हणून वर्णन केला आहे. शिवाप्रमाणेच नरसिंहाला तीन डोळे असल्याचेही वर्णन केले आहे आणि तो त्याच्या तिसऱ्या डोळ्यातून येणाऱ्या अग्नीने नाश करतो.

भागवत पुराणानुसार, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय आहेत, ज्यांचा जन्म चार कुमारांच्या (सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार) शापामुळे पृथ्वीवर झाला. सत्ययुगात, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष यांचा जन्म दिती (दक्षाची मुलगी) आणि ऋषी कश्यप यांच्या पोटी झाला. असे म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळी त्यांच्या संयोगाचा परिणाम म्हणून त्यांना असुरांचा जन्म झाला, जो अशा कृतीसाठी अशुभ काळ असल्याचे समजले जात असे.

या कथेनुसार चारही कुमार (सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार) त्यांच्या इच्छेनुसार संपूर्ण विश्वात भ्रमंती करीत होते. त्यांच्या भ्रमंतीदरम्यान ते विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाला पोहोचले. या ठिकाणच्या प्रवेशासाठी सात दरवाजे होते. चारही कुमार पहिल्या सहा दरवाजातून कोणत्याही अडथळ्याविना गेले. परंतु सातव्या दरवाजाचे रक्षण विष्णूच्या राजवाड्यातील दोन द्वार-रक्षक जय आणि विजय करत असत. या दोन द्वारपालांनी चार कुमारांना रोखले आणि त्यांच्याकडे रुपाकडे पाहून हसले कारण ते अगदीच अज्ञ बालकांसारखे दिसत होते आणि नग्नही होते. हे द्वारपाल त्यांना सातव्या दरवाजातून आत जाऊ देईनात.

चारही कुमार द्वारपालांच्या वागण्याने गोंधळून गेले कारण त्यांना अशा परिस्थितीला आणि उपहासाला इतर कुठेही सामोरे जावे लागले नव्हते. त्यांची अपेक्षा होती की जय आणि विजय हे त्यांच्या आद्य दैवतासारखेच म्हणजे विष्णूसारखे असावेत, जो कधीही कुणामध्येही फरक करत नाही. संतप्त झालेल्या कुमारांनी त्यांना “वासना, राग आणि लोभ” अशी वैशिष्ट्ये असलेले राक्षस म्हणून पृथ्वीवर तीन वेळा जन्म घेण्याचा शाप दिला.

आता मात्र त्यांचे माहात्म्य द्वारपालांच्या लक्षात आहे व त्यांनी हा शाप स्वीकारला व कुमारांना नमन करून त्यांची क्षमा मागितली. विष्णूला या घटनेची माहिती मिळताच तो कुमारांसमोर प्रकट झाला. चारही कुमारानी त्याला भक्तीभावाने नमस्कार केला व आपले भक्त म्हणून स्वीकारावे अशी विनंती केली. विष्णूने त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला आणि जय आणि विजय यांना आश्वासन दिले की ते पृथ्वीवर राक्षस म्हणून जन्म घेतील परंतु विष्णूच्या अवताराद्वारे सर्व जन्मांपासून मुक्त होतील. पृथ्वीवर जन्म घेऊन कुमारांचा शाप भोगण्यासाठी आणि शाप संपल्यानंतर आपल्या निवासस्थानी परत येण्यासाठी विष्णूने या दोन रक्षकांना सेवामुक्त केले.

त्यानंतर त्यांचा जन्म पृथ्वीवर सत्ययुगात एका अशुभ काली झाला. यात ते ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी दिती (दक्षाची मुलगी) यांच्या पोटी असुर म्हणून जन्माला आले. त्यांना हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष अशी नावे देण्यात आली. विष्णूने हिरण्याक्षाला मारण्यासाठी वराह अवतार आणि हिरण्यकश्यूला मारण्यासाठी नरसिंह अवतार घेतला अशी कथा पुढे येते.

नरसिंह, भागवत आदी पुराणात असे म्हटले आहे की विष्णूने वराह अवतारात हिरण्याक्ष या हिरण्यकश्यपूच्या धाकट्या बंधूंचा वध केला. त्यामुळेच हिरण्याक्षाचा मोठा भाऊ, राक्षस राजा हिरण्यकश्यपू, विष्णूचा द्वेष करू लागला. त्याला आपल्या बंधूंच्या वधाचा सूड घ्यायचा होता. याकरिता त्याने अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली व ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व ब्रह्माकडून एक असे वरदान प्राप्त केले कि ज्याद्वारे हिरण्यकश्यपूला त्याच्या निवासस्थानी किंवा कोणत्याही निवासस्थानाबाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात मरण येणार नाही. तसेच त्याला कोणत्याही अस्त्राने अथवा शस्त्रांनी मरण येणार नाही, किंवा कोणत्याही माणसाकडून अथवा प्राण्याकडून देखील मरण येणार नाही. ब्रह्माने त्याला वरदान दिले आणि हिरण्यकश्यपूला ही शक्ती प्राप्त झाली. असे केल्याने आपण जवळ जवळ अमर झालो आहोत याबद्दल त्याची खात्री पटली.

Narsimha Puran Adhyay 40

हे भगवान जर तुम्ही मला वर देणार असाल तर असा वर द्या की मला शुष्क वस्तू अथवा ओल्या वस्तूने मरण येणार नाही, मला जलाने अथवा अग्नीने मरण येणार नाही. मला काष्ठाने अथवा कीटकाने, पाषाणाने, वायुने, आयुधाने, शूलाने मृत्यू येणार नाही.

मला मनुष्य, सूर, असुर, गंधर्व, राक्षस, किन्नर, यक्ष, विद्याधर, भुजंग, वानर, मृग, पशु, दुर्गा आदि मातृगण यांच्याद्वारे मृत्यू येणार नाही.

मला घराच्या आत अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, काली तुझ्या प्रसादाने कोणत्याही प्रकारे मृत्यू येऊ नये असा वर द्या

 

 

हिरण्यकश्यपू हे वरदान मिळावे म्हणून तप करत असताना, इंद्रादी देवांनी त्याच्या अनुपस्थितीत फायदा घेत त्याच्या नगरावर हल्ला केला व त्यांचा पराभव केला .  इंद्राने हिरण्यकश्यपूची गर्भवती पत्नी कयाधूचे युद्धलूट म्हणून अपहरण केले. नारदांनी त्या बिचाऱ्या गरीब असुरीचे रडणे ऐकले आणि तिला इंद्राच्या बंदिवासातून मुक्त केले. ती गर्भवती होती म्हणून ती कृतज्ञतेने नारदांच्याच आश्रयाला त्यांच्या आश्रमात राहिली. प्रल्हाद, त्याच्या आईच्या गर्भात असताना, नारदाचे विष्णूभक्तीचे मंत्र ऐकत जन्माला आला व पुढे जन्मल्यानंतर नारदाप्रमाणे विष्णूचा भक्तच बनला.

आपली तपश्चर्या फळल्यामुळे जवळजवळ अमरत्वाचे वरदान मिळालेल्या हिरण्यकश्यपूला गर्व झाला आणि त्याने त्रैलोक्यात हाहाकार माजवला. देवांसाठी चालणारे यज्ञादिविधी त्याने बंद करविले व स्वतःलाच सर्वात मोठा म्हणजेच परमेश्वर घोषित केले आणि तिन्ही लोकात आपलीच भक्ती करण्यात यावी याची आज्ञा केली. असे असताना देखील त्याच्या घरातच त्याचा स्वतःचाच पुत्र प्रल्हाद मात्र विष्णूची भक्ती करण्यात तल्लीन होऊन जात होता.

हिरण्यकश्यपू आपल्या मुलाच्या विष्णूभक्तीमुळे इतका रागावला आणि अस्वस्थ झाला की त्याने त्याला ठार मारायचे ठरवले. पण प्रत्येक वेळी प्रल्हादाला विष्णूच्या गूढ शक्तीने संरक्षण दिले. त्यासाठी त्याने आपल्या असुरांद्वारे प्रल्हादावर शस्त्रांनी प्रहार करविले, पण विष्णूच्या प्रार्थनेत लीन झालेल्या प्रल्हादावर कोणतेही शस्त्र परिणाम करू शकले नाही.

प्रल्हादाच्या मृत्यूचे प्रयत्न

प्रल्हादाचा मृत्यू घडवून आणण्यासाठी त्याचा पिता हिरण्यकश्यपू याने जे विविध प्रयत्न केले त्याचा शिल्पपट आपल्याला दक्षिणेकडील काही मंदिरांच्या बाह्यभिंतीवर पाहायला मिळतो. केदारेश्वर मंदिर आणि होयसळेश्वर मंदिर या कर्नाटकातील हळेबिडू येथील दोन मंदिरातील शिल्प पटांच्या साहाय्याने पुराणांमध्ये येणारे हे वर्णन दाखविण्याचा प्रयत्न पुढील छायाचित्रांद्वारे करण्यात आला आहे.

Story of Pralhad
उजवीकडून डावीकडे – प्रल्हादाला सर्पांद्वारे विषबाधेने मारण्याचा व हत्तीच्या पायी देऊन मारण्याचा प्रयत्न. होयसळेश्वर मंदिर, हळेबिडू
Story of Pralhad
उजवीकडून डावीकडे – प्रल्हादाला आगीत जाळून मारण्याचा प्रयत्न, शस्त्रांद्वारे मारण्याचा प्रयत्न, उंच कड्यावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न, विषारी अन्न खायला देऊन मारण्याचा प्रयत्न. केदारेश्वर मंदिर, हळेबिडू
Story of Pralhad
उजवीकडून डावीकडे – प्रल्हादाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न, त्यानंतर हिरण्यकश्यपूचा प्रल्हादाला “या खांबात तुझा विष्णू आहे का?” असा प्रश्न, नरसिंहाचे खांबातून प्रकटन व मांडीवर घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केदारेश्वर मंदिर, हळेबिडू

नरसिंह मूर्तीचे प्रकार (Various Types of Narasimha Sculptures)

अशा नरसिंहाच्या उगम हिरण्यकश्यपूच्या वधासाठी झाला. पण आपल्याला त्याची काही वेगळी रूपे देखील शिल्पांमध्ये पाहायला मिळतात. दक्षिणेकडील प्रदेशात नरसिंह हे अनेकांचे कुलदैवत आहे. यात तो वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येतो. त्याचे हे प्रकार आगमग्रंथांनी वर्णन केले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.

१. स्थानक, गिरीज अथवा पर्वतातील नरसिंह

हा सर्वसाधारणपणे एकटाच असतो. अशा मूर्ती फार आढळत नाहीत. स्थानक अथवा उभ्या स्थितीतील नरसिंह या प्रकारात येऊ शकतो.

Sthanak Narasimha-नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र-Iconography of Narasimha
ऐहोले येथील उभी नरसिंह मूर्ती. याला उभा केवल नरसिंह देखील म्हणतात.

२. योग नरसिंह

या प्रकारात नरसिंह दोन पायांची मांडी घालून बसलेला असतो. याची मांडी स्थिर ठेवण्याकरता त्या भोवती योगपट्ट असते. कर्नाटकातील हम्पी या ठिकाणी अशा प्रकारचा एक मोठा नरसिंह आपल्याला आढळून येतो. इतर काही मंदिरांमध्ये पण आपल्याला योग नरसिंहाच्या मूर्ती आढळतात.

Yog Narasimha-नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र-Iconography of Narasimha
योग नरसिंह – हम्पी

३. केवल नरसिंह

महाराष्ट्रातील सर्वात जुनी नरसिंहाची मूर्ती आपल्याला नागपूरच्या जवळ असलेल्या रामटेक या ठिकाणी पाहायला मिळते.ही मूर्ती केवल नरसिंह या नावाने ओळखली जाते. ललितासनात बसलेल्या या मूर्तीच्या उजव्या हातात सुदर्शन चक्र आपल्याला पाहायला मिळते. ही मूर्ती वाकाटक कालीन आहे.

Keval Narasimha-नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र-Iconography of Narasimha
रामटेक येथील बसलेला “केवल नरसिंह”

४. यानक नरसिंह

आपल्या वाहनावर अथवा यानावर बसलेला नरसिंह म्हणजे यानक नरसिंह. हा बरेचदा चतुर्भुज असतो. गरुडावर बसलेला नरसिंह लक्ष्मीसह देखील दाखवला जातो. तसेच क्वचितच तो आपल्याला फणा उभारलेल्या शेष या आपल्या शयनस्थानावर बसलेला आढळतो.

५. लक्ष्मी नरसिंह

नरसिंह हा विष्णूचा अवतार आहे हे दर्शविणारे शिल्प म्हणजे नरसिंहाचे लक्ष्मीसह असणारे शिल्प. दक्षिणेकडील भागात बरीच लक्ष्मी नरसिंह मंदिरे आपल्याला आढळून येतात. यात लक्ष्मी नरसिंहाच्या वामांकावर बसलेली दाखविली जाते.

Lakshmi Narasimha
लक्ष्मी नरसिंह, मंदिर हरनहळ्ळी , कर्नाटक

६. स्थौण नरसिंह

खांबातून प्रकटणारे नरसिंहाचे रूप आपल्याला काही मूर्ती शिल्पांमध्ये पाहायला मिळते. अशा प्रकारच्या शिल्पांना स्थौण नरसिंह असे म्हणतात. याचे एक सुंदर शिल्प वेरूळ येथील दशावतार लेणी मध्ये दिसून येते. अशाच प्रकारचे एक शिल्प कांचीपुरम येथील कैलासनाथार मंदिरात देखील आहे. या प्रकारातील नरसिंह नुकताच खांबातून बाहेर पडलेला असून तो उभ्या स्थितीतच हिरण्यकश्यपूशी युद्ध करताना दिसून येतो.

Sthaun Narasimha
स्थौण नरसिंह, दशावतार लेणे क्र १५, वेरूळ

६. विदरण नरसिंह

नरसिंहाचे हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन मारतानाचे सर्वत्र आढळणारे शिल्प म्हणजेच विदरण नरसिंहाचे शिल्प. हे शिल्प मुख्य कथानकाचा भाग असल्याने सर्वत्र आढळते. नरसिंह रुपाची रौद्रता दर्शवणारी ही शिल्पे आपल्याला विविध प्रकारांमध्ये आढळून येतात. यात तो कधी द्विभुज असतो , तर बरेचदा तो चतुर्भुज, षडभुज, अष्टभुज, दशभुज, द्वादशभूज (१२ भुजांचा) अथवा षोडशभुज (१६ भुजांचा) देखील असतो. त्याच्या विविध भुजांमध्ये विविध प्रकारची शस्त्रे दाखविली जातात. अशा प्रकारच्या विदरण नरसिंहाची काही रूपे आपण आता पाहू.

बेलूर येथील १६ हाताचा विदरण नरसिंह

१६ हाताच्या नरसिंहाचे हे अतिशय रौद्र वाटणारे सुंदर रूप सर्व वैशिष्ट्यांसह आपल्याला बेलूर येथे चेन्नकेशव मंदिरामध्ये पाहायला मिळते. या शिल्पात नरसिंह सव्य ललितासनात बसलेला आहे. म्हणजे त्याचा उजवा पाय आसनावरून खाली सोडलेला असून डाव्या पायाची मांडी घातली आहे. यात नरसिंहाने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन आपल्या नखाने त्याची आतडी बाहेर काढलेली स्पष्टपणे दिसून येतात. त्यातील आतड्यांचा एक मोठा भाग त्याने आपल्या एका उजव्या व डाव्या हाताने ओढून बाहेर काढून आपल्या गळ्याभोवती हारासारखा घेतलेला दिसून येतो. त्याच्या हातात घंटा, शंख ही वाद्ये व चक्र (थोडे तुटलेल्या अवस्थेतील), गदा, परशु, तलवार अशी आयुधे असून हिरण्यकश्यपू त्याच्या मांडीवर आडवा पडला आहे. त्याच्याही हातात आपल्याला खेटक(ढाल) दिसून येते. हिरण्यकश्यपूच्या उजव्या हाताकडे आपल्याला विष्णूचे वाहन असलेला गरुड नमस्कार मुद्रेत दिसून येतो. त्याच्याच बरोबरीने बाल प्रल्हाद देखील या शिल्पात आपल्याला आढळतो.

नरसिंहाचे रौद्र स्वरूप दाखवण्याकरता शिल्पकाराने सिंहाच्या आकाराचे त्याचे मुख सिंहगर्जना करीत असल्यासारखे उघडे असल्याचे दाखविले आहे. त्याच्या हाताच्या नख्या सिंहासारख्या वाढलेल्या दिसून येतात. नरसिंहाचा गळा अलंकृत असून त्याच्या सर्व हातात कडी दाखविली आहेत. शिल्प अतिशय प्रमाणबद्ध असल्याने एकंदरीतच सौंदर्यपूर्ण भासते. मांडीवर आडव्या पडलेल्या हिरण्यकश्यपूचे शिल्प देखील उत्कृष्ट आहे. त्याच्या मुखावाटे बाहेर दिसणारे सुळे त्याचे असूरपण दर्शवतात.

Narasimha
षोडशभुज (१६ हातांचा) विदरण नरसिंह, चेन्नकेशव मंदिर, बेलूर
१२ हातांचा विदरण नरसिंह

अशाच प्रकारचे एक शिल्प हळेबिडू  येथील होयसळेश्वर मंदिरामध्ये आहे.  पण या शिल्पात नरसिंहाने त्याला फक्त आपल्या मांडीवर उचलून घेतले आहे,  मात्र त्याचा कोथळा बाहेर काढलेला नाही. हा नरसिंह बारा हातांचा (द्वादशभुज) आहे.

Hoaysaleshwar Narasimha-नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र
द्वादशभुज (१२ हातांचा) विदरण नरसिंह, होयसळेश्वर मंदिर हळेबिडू

या शिल्पात गरुड नरसिंहाच्या डावीकडील बाजूस असून बाल प्रल्हाद उजवीकडील बाजूस आहे. नरसिंहाच्या हातातील शस्त्रात ढालीची भर पडलेली आहे. पण शिल्पामध्ये आढळणारी अतिशय अप्रतिम कलाकुसर हे होयसळ शिल्पशैलीचे वैशिष्ट्य. यातील केवळ मुख्य मूर्तीच नाही तर त्यांच्या पार्श्वभागावर असणारे पीठ देखील अप्रतिम कलाकुसरीचे आहे. दोन्ही शिल्पात आपल्याला कीर्तीमुख दिसून येतो. त्याचबरोबर नरसिंहाचे आसन सिंहासनासारखे नटलेले आहे. दोन्ही शिल्पातील नरसिंह उत्तम दागिन्यांनी मढवलेला असून मुकुट देखील उत्कृष्ट कलाकुसरीचा आहे. नरसिंहाचा भव्य दिव्य आकार आणि त्याने मांडीवर आडव्या घातलेल्या हिरण्यकश्यपूचा आकार, याची प्रमाणबद्धता वाखाणण्यासारखी आहे.

१० हातांचा विदरण नरसिंह

बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराच्या वितानावर (मंदिराच्या छताचा भाग) आपल्याला एक अप्रतिम दहा हातांच्या नरसिंहाची मूर्ती आढळून येते. एक फुटापेक्षाही कमी आकाराच्या या शिल्पातील बारकावे थक्क करून सोडणारे आहेत. विदरण नरसिंहाची सर्व वैशिष्ट्ये या छोट्याशा शिल्पात आढळून येतात. हा नरसिंह देखील आपल्या दोन हातांनी हिरण्यकश्यपूचे आतडे ओढून स्वतःभोवती हारासारखे असल्याचे दर्शवितो आहे.

Iconography of Narasimha
दशभुज (१० हातांचा) विदरण नरसिंह, चेन्नकेशव मंदिर, बेलूर या मंदिराच्या वितानावर
८ हातांचा विदरण नरसिंह

काही ठिकाणी आपल्याला ८ हातांची नरसिंह मूर्ती पाहायला मिळते. अंबरनाथ येथील शिवमंदिरावरील हे ८ हाताच्या (अष्टभुज) नरसिंहाचे शिल्प वेगळ्या शैलीतील असून यात नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे मस्तकावरील केस आपल्या हातानी धरले असून तो त्याला मारण्याचा पवित्र घेत आहे. त्याच्या उजव्या पायाजवळून बाल प्रल्हाद हे दृश्य डोकावून पाहताना दिसत आहे.

Narasimha at Ambarnath Temple-Iconography of Narasimha-नरसिंह अवताराचे मूर्तिशास्त्र
अंबरनाथ येथील शिवमंदिरावरील हे ८ हाताच्या (अष्टभुज) नरसिंहाचे शिल्प

नरसिंह अवताराचे विविध रूपे आपल्याला भारतभरातील अनेक मंदिरांमध्ये आढळून येतात. त्यातही दक्षिणेकडील भागात नरसिंह हा अनेकांचे कुलदैवत असल्याने व तसेच काही राजघराण्यांचा देखील तो कुलपती असल्याने, त्याच्याशी संबंधित मंदिरे देखील आपल्याला दक्षिणेकडे आढळून येतात. होयसळ राजवटीने जी अनेक मंदिरे बांधली त्यात काही मंदिरे लक्ष्मी नरसिंह मंदिरे आहेत. या राज्यांनी जी शिव आणि वैष्णव मंदिरे बांधली त्यांच्या बाह्य भागांवरही त्यांनी दशावतारांची शिल्पे घडविली. यात नरसिंहाची उत्कृष्ट शिल्पे पाहायला मिळतात. भारतभरातील नरसिंह शिल्पांचा अभ्यास हा स्वतंत्र विषय असून हाताळण्यास बराच वाव आहे.

यापुढील वामन अवताराशी आणि विष्णूच्या त्रिविक्रम अवतारही संबंधित कथा जाणून घेण्यासाठी येथे पहा