यमान्तक शिव-Yamantak Shiva
मृकंड नावाच्या ऋषींना पुत्र नव्हता म्हणून त्यांनी भगवंताची तपश्चर्या केली व त्यांना देवाने विचारले की तुम्हाला कसा पुत्र हवा? ते सांगा. बुद्धिमान हवा असेल तर तो अल्पायुषी ठरेल म्हणजेच त्याचे आयुष्य अवघे सोळा वर्षाचे असेल व सामान्य कुवतीचा हवा असेल तर तो दीर्घायुषी होईल. यावर ऋषींनी बुद्धिमान पण अल्पायुषी पुत्राची निवड केली.
काही दिवसातच त्यांची पत्नी मनस्विनी हिला गर्भधारणा झाली, व जो पुत्र झाला त्याचे नाव मार्कंडेय ठेवण्यात आले. मार्कंडेय मोठा लोभस व बुद्धिवान होता. पण त्यामुळेच तो जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्या अकालमृत्यूमुळे भविष्यात होणाऱ्या विरहाच्या कल्पनेने त्याच्या माता-पित्यांना दुःख होऊ लागले. त्यांच्या दुःखाचे हे कारण पुत्र मार्कंडेयाला समजताच त्याने तीर्थयात्रा करायचे ठरविले. यात त्याने विविध ठिकाणी शिवलिंगाची पूजा आरंभली. अशाच एका पूजेच्या दरम्यान त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आली म्हणून यमदूत त्याला न्यावयास आले, परंतु तो शिवपूजेत मग्न असल्याने त्याला घेऊन जाऊ शकले नाहीत. ही गोष्ट त्यांनी यमराजाला सांगतात त्याला नेण्यासाठी यमराज स्वतःच तेथे आले व त्यांनी आपला पाश त्या शिवलिंगाला कवटाळून बसलेल्या कुमार मार्कंडेयाभोवती आवळला. यमाचे ते कृत्य पाहून त्याचवेळी शिवलिंगातून शिव प्रकट झाले व त्यांनी यमाच्या छातीवर इतक्या जोराने लत्ताप्रहार केला की त्यामुळे यमाचेच प्राण जायची वेळ आली.
शिवाच्या या प्रकटीकरणाला घाबरून यमाने मार्कंडेयाभोवतीचा पाश सोडला व तो तेथून निघून गेला. मार्कंडेयाची ती भक्ती पाहून शिवाने त्याला दीर्घायुष्याचा वर दिला.
कालारीमूर्ती अथवा यमान्तक शिव मूर्ती कशी असावी ?
कालारी मूर्तीचे वर्णन आपल्याला बऱ्याच आगमांमुळे समजते. यामध्ये शिवमुर्तीचा उगम पिंडीतून झाला हे दर्शविण्यासाठी शिवाचा डावा पाय पिंडीतून येणारा अथवा तेथील पद्मपिठात रोवलेला, तर उजवा पाय समोर उभ्या असलेल्या यमाच्या छातीपर्यंत पोहोचेल एवढा उंचावलेला दाखविला जातो. शिवाला त्रिनेत्र असून काही वेळा त्याचे सुळे मुखाबाहेर डोकावताना दाखवले जातात. त्याच्या शिरावर जटा मुकुट असून त्याला विविध आयुधे असणारे चार अथवा आठ हात दाखविले जातात.
जर या मूर्तीतील शिवाला चार हात असतील तर
- उजव्या हातात कानापर्यंत उंचावलेला त्रिशूल व दुसऱ्या उजव्या हातात परशु अथवा तो हात वरद मुद्रेत दाखविला जातो.
- पुढचा डावा हात सूची मुद्रेत व मागचा विस्मय मुद्रेत दाखविला जातो. तर्जनी जवळपास उष्णिशापर्यंत (डोक्यावरील पागोटे अथवा जटा मुकुट) उंचावलेली दाखवली जाते.
जर या मूर्तीतील शिवाला आठ हात असतील तर
- उजव्या हातामध्ये शूल, परशु, वज्र व खड़ग दाखवले जाते.
- डाव्या हातात खटवांग व पाश आणि उरलेले दोन हात विस्मय आणि सूची मुद्रेत असतात.
काळ अथवा यमाची प्रतिमा मात्र दोन हस्त व दोन पाद असणारी असावी. डोईवर करंड मुकुट, एका हातात पाश व दुसरा हात अंजली मुद्रेत असावा. यम घाबरलेल्या स्थितीत असून त्याचे शरीर रक्ताने माखलेल्या स्थितीत असावे आणि त्याची नजर शिवाच्या चेहऱ्याकडे असावी असे अंशुमदभेदआगम सांगते.
कामिक आगम शिवाच्या डाव्या हातात “नागपाश” दाखविते व शिवाच्या लत्ताप्रहाराने काळ अथवा यम जमिनीवर पडलेला, डोळ्यात अश्रू असलेला, तोंडातून सुळे बाहेर आलेला, जाड भुवया व मिशी असलेला असा दाखविते. यात त्याची उंची शिवाच्या नाभीपर्यंत असू शकते असे सांगितले आहे.
या सर्व शिल्पांमध्ये कुमार मार्कंडेय शिवपिंडीच्या जवळपास, फुले अर्पण करताना, काळाला पाहून भेदरलेला व शिवाला पाहून आनंदी तसेच विस्मयचकीत झालेला दाखविला जातो.
वेरूळच्या दशावतार लेण्यातील कालारी मूर्ती

या शिल्पामध्ये शिव लिंगातून प्रकट होत असल्याने त्याचा एक ( उजवा) पाय आगम ग्रंथांनी सांगितल्याप्रमाणे लिंगामध्ये असून डाव्या पायाने त्याने गुडघ्यावर बसलेल्या यमाच्या कटीप्रदेशावर प्रहार केला आहे. शिवपिंडी समोर मार्कंडेय बसलेला असून, एका उजव्या आणि एका डाव्या हाताने धरलेला त्रिशूल शिवाने यमाच्या पोटाच्या दिशेने घुसविला आहे.
यम गुडघ्यावर बसलेला असून त्याच्या डाव्या हातात, बसलेल्या मार्कंडेयाच्या गळ्याभोवती आवडलेला पाश दिसत आहे.

अल्पायुषी असलेल्या मार्कंडेयाला यमाच्या पाशातून वाचविताना शिवपिंडीतून प्रकटलेला शिव. शिवाचा त्रिशूळ यमाच्या छातीत घुसलेला दिसत आहे. ही मूर्ती देखील उजवा पाय शिवपिंडीत रोहन प्रकटलेल्या व डाव्या पायाने यमाच्या छातीवर लत्ताप्रहार करणाऱ्या शिवाची आहे. यात यम उभा असून उंचावलेल्या उजव्या हाताने तो शिवाला अभिवादन करीत आहे तर डाव्या हातात त्याने मार्कंडेयाभोवती आवळलेला पाश आहे. पण यातील मार्कंडेयाची प्रतिमा भंगलेली असल्याने स्पष्ट नाही .

वेरूळच्या कैलास लेणे (लेणे क्रमांक १६) येथेच आतील गॅलरी मध्ये असलेले अजून एक कालारीमूर्तीचे शिल्प. हे देखील थोड्या फार प्रमाणात दशावतार लेण्यातील शिल्पासारखेच आहे .
वेरूळ येथील लेणींसंबंधी इतर महत्त्वपूर्ण लेख
-
वेरूळला जाताय? मग हे वाचा Going to Ellora..Read This First – वेरूळची लेणी (Ellora Caves)
-
कालिदासाचे कुमारसंभव महाकाव्य – वेरूळचे रामेश्वर लेणे २१ मध्ये – Ellora Cave 21-Rameshawar Lene
