Lakshminarayan Mandir Walaval
Lakshminarayan Mandir Walaval

वालावल मंदिरातील दुर्मिळ अग्नीमूर्ती – Rare Agni Sculpture in Kokan – कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या गावी एक पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर आहे. निसर्गरम्य तळ्याच्या काठावर वसलेले हे मंदिर म्हणजे एक शांत, पवित्र आणि प्राचीन पुण्यस्थळ आहे. विस्तीर्ण परिसरात शांत तळ्याकाठी निसर्गरम्य वालावल गावातील हे कौलारू मंदिर अतिशय स्वच्छ आणि देखणे आहे. भव्य प्रवेशद्वार, आकर्षक दीपमाळ आणि सभागृह, मंडप आणि गर्भगृह असणाऱ्या या मंदिराचे बरेचसे खांब लाकडी असले तरी मुख्य मंडप मात्र ६ दगडी खांबांवर तोलून धरलेला आहे आणि याचे गर्भगृह देखील दगडी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात इतरत्र कुठेही न आढळणारे दगडी खांबांवरील आणि गर्भगृहावरील शिल्पकाम. येथे आपल्याला पंचमुखी शिव व पार्वती, कार्तिकेय, गणपती, महिषासुरमर्दिनी अशा परिचित देवतांच्या मूर्ती तर आढळतातच पण त्याच बरोबर दोन मुखे, ४/५ मुखे असलेल्या, ४/५ पाय/ असणाऱ्या देवता देखील आढळतात. याच्या गर्भगृहाच्या ललाटबिंबावर शेषशायी विष्णूची एक सुरेख मूर्ती आहे.

मंदिरातील दुर्मिळ अग्नीमूर्ती

पण या सर्वांहुन एक आगळीवेगळी आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती या मंदिराच्या गाभाऱ्यावर आहे ती ऋग्वेदात वर्णिलेल्या अग्नीची. हा अग्नी आपले वाहन मेंढ्यावर बसलेला आहे.  ऋग्वेदातील ऋग्वेदातील ४थ्या मंडळातील ५८ व्या सूक्तातील हि तिसरी ऋचा पुढीलप्रमाणे आहे.

चत्वारि शृङ्गा त्रयो अस्य पादा द्वे शीर्षे सप्त हस्तासो अस्य ।
त्रिधा बद्धो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्याँ आ विवेश ॥४.५८.३

दुर्मिळ अग्नीमूर्ती
दुर्मिळ अग्नीमूर्ती

याचाच अर्थ असा – “त्याची चार शिंगे आहेत, त्याला तीन पाय आहेत; त्याची डोकी दोन आहेत, त्याचे हात सात आहेत. तिहेरी बंधाने बांधलेला वृषभ मोठ्याने गर्जना करतोः जणू पराक्रमी देवाने मनुष्यांमध्ये प्रवेश केला आहे”.

हे वर्णन आहे अग्नीचे. अग्नि जो चिरतरुण आणि अमर आहे. तो स्वर्ग आणि पृथ्वी, देवता आणि मानव यांच्यातील दुवा आहे. तो वैदिक यज्ञाशी संबंधित आहे,त्याच्याकडे सोपविलेला हवि तो देवतांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतो. मेंढा हे त्याचे वाहन आहे. अग्नीला सात हात (त्याच्या उजवीकडे ४  व डावीकडे ३), दोन डोकी (त्यावर एकूण ४  शिंगे त्यापैकी २  पाहता येतात)  आणि तीन पायांनी चित्रित केले आहे (या शिल्पात त्याचा आपल्या बाजूचा एकाच पाय दिसतो ).

अग्नी हे ज्ञानाचे प्रतीक आहे. तो नाम आणि रूपाचा अहंकार नष्ट करतो. शिवाचा तिसरा नेत्र हा अग्निस्वरूप आहे. एखादी वस्तू जाळताना अग्नी त्या वस्तूचे रूप धारण करतो. पण अग्नीला स्वतःचे रूप नाही. तो ईश्वराप्रमाणेच निराकार आहे. म्हणून अग्निरूप असलेल्या ज्ञानामुळे बुद्दीतील अहंभाव जळतो आणि तो आपल्या बुद्दीतील अज्ञानाचा अंधकार दूर करतो.

पतंजलीने मात्र आपल्या भाष्यात याचे अर्थनिरूपण करताना म्हटले आहे की हा मंत्र म्हणजे संस्कृत भाषेचे स्पष्टीकरण देत आहे- ज्यात ४ शिंगे म्हणजे ४ प्रकारचे शब्द आहेत (संज्ञा, क्रियापद, उपसर्ग आणि निपाता) तीन पाय म्हणजे तीन काळ (भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ) दोन डोकी म्हणजे दोन प्रकारची भाषा (वैदिक आणि सामान्य) ७ हात म्हणजे ७ अपभ्रंश, तीन ठिकाणी बांधलेले (छाती, डोके आणि तोंड) याला वृषभ म्हणतात कारण यामुळे इच्छेचा पाऊस गर्जना करतो (आपण भाषेचा आवाज ऐकतो) आणि या दैवी भाषेने आपल्यात प्रवेश केला आहे नश्वर (आपण ते वापरत आहोत).

सायनाचार्य याचे विवरण वेगळ्या प्रकारे करतात. त्यांच्या मते चार वेद म्हणजेच अग्नीची चार शिंगे. तीन पाय हे तीन दैनंदिन यज्ञ आहेत (सकाळ, दुपार आणि संध्याकाळ). त्याची दोन शिरे म्हणजेच ब्रह्मौदान आणि प्रवर्ग्य हे समारंभ. सात हात हे वेदांचे सात छंद (मीटर) आहेत. त्यांनी याची एक फोड प्रकाशाची सात किरणे अशी देखील केली आहे. तीन बंध (त्रिधा बद्धो) हे वेदांमधील तीन उपविभाग आहेत (मंत्र, ब्राह्मण आणि कल्प) किंवा तीन लोक आहेत (भुह, भुवाह, स्वाह).

या एकाच ऋग्वेदातील ऋचेचे असे वेगवेगळे अर्थ मांडलेले आपल्याला आढळून येतात. पण ऋग्वेदातील ४थ्या मंडळातील ५८ व्या सूक्तातील हि तिसरी ऋचा आणि त्याचे कोकणातील एका मंदिरामध्ये आढळणारे त्याचे वाहन असलेल्या मेंढ्यासह अग्नीचे शिल्पांकन निश्चितच या मंदिराचे वेगळेपण दर्शविते.

मंदिरातील इतर वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

लक्ष्मीनारायण मूर्ती
लक्ष्मीनारायण मूर्ती

या मंदिरातील मुख्य मूर्ती आहे ती गरुडासह लक्ष्मीनारायणाची. हि सुमारे ५ ते साडेपाच फूट उंचीची असून या मूर्तीच्या डाव्या बाजूस गरुड उभा असलेला दिसतो. हि मूर्ती कमलासनावर उभी आहे. त्याच्या उजव्या हातास लक्ष्मीची मूर्ती आढळते.
मंदिराच्या गर्भगृहाच्या ललाटबिंबाच्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी शेषशायी विष्णूची चतुर्भुज मूर्ती आहे. याच्या हातात गदा, चक्र, शंख आणि पद्म ही आयुधे आढळून येतात. मूर्तीच्या किरीटामुकुटाच्या मागे ५ मुखांचा शेषाचा फणा असून त्याच्या नाभीतून निघणाऱ्या कमलपुष्पावर ब्रह्मदेव विराजमान झालेले दिसतात. पायाशी, विष्णूचा एक पाय हाती घेऊन तो चुरणारी लक्ष्मी असून गरुड अंजलीमुस्रेत उभा आहे. विष्णूंचा चेहरा प्रसन्न असून त्यांच्या निजलेल्या देहावर वैजयंतीमाला रुळताना दिसते. भगवान विष्णूंची हि मूर्ती खरेच फार सुबक, प्रमाणबद्ध आणि मनमोहक आहे. याचा द्वारशाखेच्या खालच्या बाजूने आपल्याला गरुड आणि हनुमंत उभे दिसतात. त्यांच्या शेजारीच जय विजय या द्वारपालांच्या मोठ्या प्रतिमा दिसून येतात.

शेषशायी विष्णू
शेषशायी विष्णू
गरुड आणि नारद
गरुड आणि नारद
उंदरावर बसलेली गणेशमूर्ती आणि मोरावर बसलेली सरस्वती मूर्ती
उंदरावर बसलेली गणेशमूर्ती आणि मोरावर बसलेली सरस्वती मूर्ती

  

पंचमुखी शिव व पार्वती - डावीकडे नंदी
पंचमुखी शिव व पार्वती – डावीकडे नंदी

मंदिराच्या खांबांवरदेखील अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आहेत. यात पंचमुखी शिवाचे एक शिल्प आहे ज्याच्या अंकावर पार्वती असून , या शिवाच्या गळ्यात रुंडमाळा आले. शेजारील चौकटीत नंदी आहे, तर दुसऱ्या बाजूच्या चौकटीत वीणाधारी शिवाचे रूप मानला गेलेला वीरभद्र दाखविलेला आहे. नंदीच्या शेजारच्या चौकटी नारद, गरुड हे विष्णूचे भक्त दिसतात व गरुडाशेजारी आपल्याला विष्णू व लक्ष्मीची मूर्ती आढळते. त्याच्या शेजारी सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याची मूर्ती आपल्याला सहज ओळखता येते. याच्याच शेजारी महिषासुरमर्दिनीची एक उत्कृष्ट मूर्ती आहे.

७ घोड्यांच्या रथासह सूर्यमूर्ती
७ घोड्यांच्या रथासह सूर्यमूर्ती

वीणाधारी वीरभद्राच्या शेजारच्या चौकटीत पाहताना आपल्याला मोठ्या उंदरावर बसलेली गणेशमूर्ती आणि मोरावर बसलेली सरस्वती मूर्ती आढळते. त्याच्या शेजारी हनुमान मूर्ती असून ती दुसऱ्या बाजूने असणाऱ्या राम-सीता यांच्या मूर्तीला नमस्कार करताना आढळून येते.

मंदिराच्या इतर खांबांवर देखील आपल्याला देवता मूर्ती, स्त्रीशक्ती मूर्ती आढळून येतात. यात शिवलिंगाची पूजा करणारी पार्वती, दोन्ही हातात कमळे असणारी सूर्याची शक्ती अशा काही देवता आहेत. कार्तिकेयाची  स्त्रीशक्ती कौमारी (मोरावर बसलेली) आहे. पंचमुखी, पंचपद व दशहस्त असलेल्या देवता आहेत. नागावर बसलेली स्त्रीदेवता आहेत. थोडासा अधिक अभ्यास केला तर या सर्व देवता ओळखणे शक्य होईल असे वाटते.

 

 

अग्नीचे काष्ठशिल्प
अग्नीचे काष्ठशिल्प

मंदिराच्या मुख्य मंडपाच्या लाकडी छतावर देखील दशावताराची शिल्पे आहेत. यात देखील दोन मुखांच्या मेंढ्यावर बसलेल्या अग्नीचे काष्ठशिल्प आहे. म्हणजेच या एकाच मंदिरात आपल्याला अग्नीचे दगडी आणि काष्ठशिल्प अशी दोन अतिशय दुर्मिळ शिल्पे पाहायला मिळतात. असे हे वैशिष्ट्यपूर्ण मूर्तिशिल्पे असलेले मंदिर चुकवू नये असेच आहे .