Srisailam – श्रीशैलम
श्रीशैलमची गोपुरे

१२ प्रमुख ज्योतिर्लिंगाच्या यादीत आंध्र प्रदेशात जे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे श्रीशैलमचे (Srisailam). याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्रांगणात ज्योतिर्लिंगासोबत भ्रमराम्बा या नावाचे देवीचे शक्तीपीठ असणारे हे भारतातील एकमेव ज्योतिर्लिंग आहे. त्यांच्या या एकत्र असण्याची एक पुराणकथा देखील जोडलेली आहे.

गणपती हा शिव पार्वतीचा बुद्धिमान पुत्र. त्याचबरोबर कार्तिकेय हा दुसरा पुत्र. जेव्हा शिव आणि पार्वतीने त्यांच्या मुलांसाठी योग्य वधू शोधण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यानी पृथ्वी प्रदक्षिणेची अट या दोघांसमोर ठेवली. बुद्धिमान गणपतीने आपल्या मातापित्यांना पृथ्वीसमान मानत प्रदक्षिणा केली व ती अट कमी वेळात पूर्ण केली. शिवाने बुद्धी आणि सिद्धी यांचा गणेशाशी विवाह केला. पण त्याची हचलाखी पाहून कार्तिकेय रागावला आणि कुमार ब्रह्मचारी या नावाने पलानी येथील क्रौंच पर्वतावर एकटाच राहण्यासाठी निघून गेला. त्याचे आई-वडील त्याला शांत करण्यासाठी येत असल्याचे पाहून तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला, परंतु देवांच्या विनंतीनुसार शिव पार्वती तेथेच राहिले. ज्या ठिकाणी शिव आणि पार्वती मुक्कामी होते ते ठिकाण श्रीशैलम म्हणून ओळखले जाऊ लागले, व शिव आणि पार्वती मल्लिकार्जुन-भ्रमराम्बा स्वरूपात ओळखले गेले. यातील चमेलीचे फुल म्हणजे तेलगु भाषेतील मल्लिका म्हणून हा मल्लिकार्जुन.
अलीकडे या मंदिरात मोबाइलला नेण्याला परवानगी नाही म्हणून आतील छायाचित्रे घेता येत नाहीत. पण आतील मंदिरात एक मोठा नंदी शिवलिंगाच्या गाभाऱ्यासमोरील रंगमंडपानंतर असलेल्या नंदी मंडपात आहे. मुख्य मंदिरावर फारसे मूर्तिकाम नाही अथवा कोणत्याच वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीकथा नाहीत. याची गोपुरे दक्षिण भारतीय मंदिरांप्रमाणे असली तरी फार उंच देखील नाहीत. मंदिर अगदी सातवाहनकालीन असल्याची माहिती आपल्याला शिलालेखाद्वारे मिळते.
दक्षिणेकडील इतर अनेक मोठ्या मंदिरांप्रमाणे यात देखील साधारण दर्शन, शीघ्र दर्शन (रु. १५०/-) व अतिशीघ्र दर्शन (रु. ३००/-) अशा रांगा असतात. गर्दी असो वा नसो, या रांगांतून पैसे मिळविण्याचे काम सुरूच राहाते. आधी बुक करून देवस्थानाच्या निवासात राहायची सोय होऊ शकते.
मराठी माणसांसाठी या ज्योतिर्लिंगाचे एक वेगळेच महत्त्व आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिण दिग्विजयादरम्यान या ज्योतिर्लिंगाला दिलेली भेट. महाराजांनी या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला असेही सांगितले जाते. महाराजांच्या या भेटीच्या आठवणी तेथे एका संग्रहालयाच्या स्वरूपात जतन केलेल्या आहेत. हे संग्रहालय श्रीशैलम ज्योतिर्लिंगपासून १ -२  किमी अंतरावर आहे आणि ते निश्चितच पाहायला चुकवू नये असे आहे .   येथे एका प्रशस्त हॉल मध्ये सिंहासनाधिश्वर महाराज आणि त्याच्या अष्टप्रधानांच्या पूर्णाकृती प्रतिकृती आहेत तर तेथील भिंतींवर महाराजांचे संपूर्ण चरित्र उठावशिल्पांच्या माध्यमातून मांडले आहे. याची एक झलक आपल्याला पुढील छायाचित्रातून पाहायला मिळेल.
IMG 7208 Darbaar
महाराजांच्या दरबाराचे दृश्य
« of 24 »
हैदराबाद येथून हे ज्योतिर्लिंग सुमारे २२५ ते २५० किमी अंतरावर असून यात आपल्याला आमराबाद या अभयारण्यातून जावे लागते. त्यामुळे हा रस्ता सकाळी ६ ते सायंकाळी ६ याच वेळात वाहतुकीसाठी खुला असतो. वाटेत सुंदर असे श्रीशैलम धरण देखील आहे. जवळपास साक्षी गणपती मंदिर, हटकेश्वर महादेव मंदिर आणि पालधारा पंचतीर्थ हा पाण्याचा स्रोत आहे. या स्रोताजवळच्या परिसरातच शंकराचार्यांनी तप केले होते व त्या दरम्यान त्यांनी शिवानंदलहरी हे स्तोत्र रचल्याची माहिती तेथे लावलेली आहे.