रावणानुग्रह – Ravan Anugrah Murti – रावण अनुग्रहाचे कथाशिल्प म्हणजे दशाननाचा रावण कसा झाला? आणि या रावणाने शिवतांडव स्तोत्राची निर्मिती कशी केली? याची कथा. या कथेवर आधारित शिल्पे आपल्याला अनेक ठिकाणी आढळून येतात.
लंकेचा राजा रावण कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान घेऊन परतत असताना मध्येच त्याला शरवन लागले. हे शरवन म्हणजे जिथे कार्तिकेयाचा जन्म झाला होता ते वन. हे वन पाहून दशानन प्रसन्न झाला व त्याने पुढे दिसणाऱ्या निसर्गरम्य पर्वताच्या, कैलासाच्या दिशेने आपले विमान नेले. पण कैलासा जवळच्या परिघात येतात ते विमान पुढे जाईचना. तेव्हा रावण हे असे नक्की का घडले असावे याचा शोध घ्यायचा प्रयत्न करू लागला. त्याच सुमारास त्याला एक बुटकासा, माकडासारखे विचित्र तोंड असलेला प्राणी दिसला. तो होता नंदिकेश्वर, शिवाला पुत्रवत असलेला त्याचा एक गणनायक.
दशाननाने त्याला आपले विमान या प्रदेशावरून का उडू शकत नाही याचे कारण विचारले. तेव्हा त्याने उत्तर दिले की, देवाधिदेव महादेव आपल्या पत्नी संगे, पार्वती देवी संगे येथे विहार करीत आहेत त्यामुळे या पर्वतावर येण्याची परवानगी देवादिकांसह कुणालाच नाही. तेव्हा दशाननाने नंदीला मग्रुरीपूर्ण उत्तर दिले की एवढा हा महादेव कोण लागून गेलाय ते मी पाहतोच आणि तो नंदीच्या त्या विचित्र रूपाकडे पाहून कुत्सितपणे हसला. त्याच्या या वागण्याचा नंदीला राग आला व त्याने दशाननाला शाप दिला की माझ्यासारख्याच म्हणजे मर्कटसदृश्य दिसणाऱ्या ताकदवान वानरांकडूनच त्याचा समूळ नाश होईल.
आता दशाननाला पुढेही जाता येईना व त्यातच या शापाची भर. या दोघांमुळे क्रुद्ध झालेल्या दशाननाने आपल्याला अडविणाऱ्या कैलास पर्वतालाच मुळापासून उखाडून काढायचे ठरविले. याकरिता त्याने आपले बाहू पर्वताच्या खाली घालून तो गदागदा हलवायला सुरुवात केली. त्याबरोबर पर्वतावरील वृक्ष हलू लागले, प्राणी धावपळ करू लागले, शिवगण भयभीत झाले, पार्वती देखील घाबरून शिवाला बिलगली, पण एवढ्या कोलाहलात शिव मात्र शांतचित्त होते. त्यांनी मनोमन याचे कारण जाणून घेतले व शांतपणे आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने पर्वत दाबून धरला.
आता मात्र भयभीत आणि घामाघुम होण्याची पाळी दशाननाची होती. तो भार त्याला सहन होईना. त्याच्या हाताच्या शिरा तटतटा फुगू लागल्या. तो रडकुंडीला आला व अर्थ स्वरात त्याने शिवाची आळवणी सुरू केली. त्यातून निर्माण झाले ते शिवतांडव स्तोत्र, आणि त्याच्या रुदनामुळे त्याचे नाव रावण असे पडले. शिव अखेर रावणावर प्रसन्न झाला व त्याने रावणाला आशीर्वाद दिले, तसेच स्वतःकडील तलवार भेट दिली.
शिवाने रावणावर केलेल्या अनुग्रहाच्या कथेचे शिल्प आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते यातील काही महत्त्वाची शिल्पे पुढीलप्रमाणे आहेत.
बान्ते स्रेई (Banteay Srei) येथील अप्रतिम रावणानुग्रह मूर्ती

भारतातील विविध ठिकाणची रावण अनुग्रहाची शिल्पे पाहण्याआधी आपण कंबोडिया या देशातील बान्ते स्रेई (Banteay Srei) अथवा बान्तेश्री या ठिकाणच्या मंदिरातील एक सुंदर शिल्प पाहू. या शिल्पातील सर्व बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. शिल्पकाराने या शिल्पात रावणाची दहा शिरे भारतातील संकल्पनेनुसार न दाखविता, एकावर एक पद्धतीने दाखविली आहेत. यात सर्वात खाली ४ दिशांना ४ शिरे. त्यावर तशीच ४ शिरे व सर्वात वर २ शिरे अशी एकूण १० शिरे दाखविली आहेत. कंबोडियातील सर्व ठिकाणी रावणशिल्पांची शिरे अशाच पद्धतीने दाखविली जातात. रावणाला कैलास पर्वत उचलायला जोर लावावा लागला असल्याने त्याची शिरेही तिरपी झालेली दिसत आहेत. या दशाननाचे दोन्ही बाजूला १० असे एकूण २० हात देखील आपल्याला या शिल्पात मोजता येतात. याच्या वरच्या भागात आपल्याला पर्वतावरील प्राणी , अनेक गण, ज्यात गरुड , गणपती असे मनुष्याचे शरीर व पक्षांची , प्राण्यांची मुखे असलेली शिल्पे आढळतात. हे सर्व नक्की काय होत आहे या विचाराने गडबडून आणि घाबरून गेलेले आहेत. पार्वतीदेखील भीतीने शिवाला बिलगलेली दिसते पण शिव मात्र शांत आहेत व समोर बसलेल्या ऋषींना ते हातानेच शांत राहायचा इशारा देत ते आपल्या उजव्या पायाने कैलास पर्वत दाबून धरत आहेत . असे हे कथावर्णनानुसार परिपूर्ण असलेले शिल्प आहे .
पल्लव – चालुक्य – राष्ट्रकूट यांच्या शिल्पांमधील रावणानुग्रह



पल्लव – चालुक्य – राष्ट्रकूट या तीन राजसत्तानी विविध मंदिरे बांधली त्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आपल्याला रावणानुग्रहाची मिळतीजुळती शिल्पे आढळून येतात . पल्लवांचे कांचीपुरम येथील कैलासनाथार मंदिर , चालुक्यांचे पट्टदकल येथील विरुपाक्ष मंदिर आणि राष्ट्रकूटांचे महाराष्ट्रातील वेरूळचे कैलास लेणे या तीन ठिकाणच्या शिल्पांमध्ये आपल्याला काही साम्यस्थळे आढळतात. १०० वर्षाच्या कालावधीत बांधल्या गेलेल्या या मंदिरांमध्ये एकाच ठिकाणच्या कारागिरांच्या अनेक पिढ्यांनी काम केले असावे याला पुष्टी मिळते . ही तीनही मंदिरे आठव्या शतकातील १०० वर्षांच्या काळातील आहेत.

वेरूळच्या कैलास लेणी क्रमांक १६ मध्ये असलेले रावणानुग्रहाचे अजून एक शिल्प फार प्रसिद्ध आहे . या शिल्पाची बरीच पडझड झालेली असली तरी पर्वतावर बसलेले गण, ऋषी , शिवाला बिलगलेली पार्वती येथे दिसून येते. वरच्या बाजूला काही गंधर्व विहार करताना दिसतात. शिवाच्या पायाखाली काही गण आहेत . शिव मात्र शांतपणे बसून रावणाचे प्रयत्न पाहात आहेत.

वेरूळच्याच लेणी क्रमांक २१ मधेही एक सुस्थितीत असलेले रावणानुग्रहाचे शिल्प दिसते . या शिल्पातील रावणाच्या मधल्या शिरावर आपल्याला गाढवाचे एक शिल्प आढळून येते . या ठिकाणच्या इतरही काही रावणाच्या शिल्पांमध्ये असे आढळले आहे . येथील शिल्पात रावणाने आपले बाहू तसेच पाय पसरवून कैलासाला उचलण्यासाठी जोर लावायचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
होयसळ मंदिरांमधील रावणानुग्रह
होयसळांच्या कोणत्याही शिल्पात आपल्याला खूप बारीकसारीक गोष्टी दाखविलेल्या आढळून येतात . त्यांच्या रावणानुग्रहाचे शिल्प देखील असेच भरीव आहे . कैलास पर्वताची उंची यात बरीच जास्त असून त्यात निसर्गसंपदा , प्राणी, मनुष्य खूप मोठ्या प्रमाणावर दाखविलेले आहेत . बेलूरचे चेन्नकेशव मंदिर, हाळेबिडूचे होयसळेश्वर मंदिर व केदारेश्वर मंदिर येथे हि शिल्पे आढळून येतात. प्रातिनिधिक स्वरूपात अशा दोन शिल्पांची छायाचित्रे इथे दिली आहेत.


घारापुरी (ELEPHANTA) येथील रावण अनुग्रह मूर्ती
घारापुरी येथील पहिल्या क्रमांकाच्या गुहेत उत्तमोत्तम शिवकथांची शिल्पे आहेत पण ती बरीच पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. असे असले तरी त्यांचे देखणेपण लपून राहात नाही. येथील रावणानुग्रहाचे शिल्प देखील कधीकाळी फारच सुंदर असावे असा अंदाज त्याच्या सद्यस्थितीवरून बांधता येतो. शिव शांत मुद्रेने आपला डावा पाय मुडपून व उजवा पाय जमिनीला समांतर ठेऊन बसलेले आहेत, म्हणजे अजून पर्वत खाली दाबून धरण्याची वेळ समीप आलेली नाही. शिवाच्या जटा उजव्या कानांवरून रुळताना दिसत आहेत. दोन्ही बाजूला प्रत्येकी ३ असे एकूण सहा हात दिसून येतात. या पैकी शिवाच्या उजव्या हातातील एक आयुध, त्रिशूल, अजून दिसून येतो. शिवाच्या उजव्या मांडीवर कधीकाळी पार्वतीची मूर्ती असावी पण आता तीचे केवळ मस्तकविरहित अवशेष तेथे आढळतात.

यासोबतच या ठिकाणी आपल्याला बऱ्याच इतर आकृत्या देखील दिसतात, पण पडझडीमुळे त्या ओळखणे कठीण जाते. शिवाच्या डावीकडील सापळा, भृंगी असावा व शिवाचा एक डावा हात ज्यावर आहे तो कार्तिकेय असावा असा अंदाज व्यक्त केला जातो. याचे कारण म्हणजे भृंगींच्याही डावीकडे आपल्याला गणेशाची आकृती त्याच्या हत्तीच्या मस्तकामुळे ओळखता येते. शिव व कार्तिकेय यांच्या मध्ये आपल्याला बोकडासारखे तोंड असलेली आकृती दिसते ती नैगमेशाची असण्याची शक्यता आहे.
यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रावण अनुग्रहाच्या पौराणिक कथेच्या शिल्पाचे वर्णन कोणत्याही शिल्पग्रंथात येत नाही. असे असूनदेखील यातील वैविध्य , बारकावे आपल्याला मोहून टाकतात . वेगवेगळ्या मंदिरातील ही कथारूप शिल्पकला पाहून आपल्याला थक्क व्हायला होते .
या वेबसाइट वरील इतर शिवकथा
