श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिन २२ जानेवारी २०२४ च्या भावनांचा परामर्श (Ram Mandir Day)
२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येच्या मंदिरात होत असलेल्या श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे सारे समाजमन ढवळून निघाले आहे. चैतन्याची एक लहर सर्वत्र उसळत असताना काही गट मात्र या घटनेला हिन्दू समाजाची प्रातिनिधिक मानबिन्दु घटना न मानता त्याला विशिष्ट राजकीय , सामाजिक आणि धार्मिक रंग देण्यात गुंतले आहेत.

लहानपणापासून आई वडिलांनी सांगितलेल्या रामायण , महाभारतातील कथा ऐकूनच माझे बालपण गेले. पुढे पाचवीत गेल्यावर रामायणाचे संक्षिप्त सार रुपी पुस्तक वडिलांनी आणून दिले आणि मी त्याची अक्षरशः पारायणे केली. तो राम मनावर बिंबला तो कायमचाच. आणि मग मी रामायण वेगवेगळ्या स्वरूपात वाचले व पाहिले, अगदी कम्युनिस्ट व बौद्धांचे आणि जैनांचे देखील. यातून मलाही प्रत्येक वेळी वेगळा राम दिसत गेला. यात काहींनी तर रामकथा भारताची नाहीच मुळी तर ती मूळ इजिप्तची कथा असल्याचे पटवून देईपर्यंत मजल मारली, पण मी मात्र यातील राम शोधला होता तो होता “धर्म पालक राम”.
आज धर्माच्या नावाने बोटे मोडणारे, धर्माची व्याख्या “Religion” सारख्या इंग्रजी शब्दाने करतात तेव्हा त्याना हाच “राम” समजत नाही असे मला वाटते.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कधी क्षात्रधर्म, कधी पुत्र धर्म, कधी भ्रात्र धर्म, कधी मित्र धर्म, कधी पतिधर्म, कधी राजधर्म अशा विविध धर्मांचे पालन करणारा राम, या त्याच्या धर्म पालनानेच भारताच्या धर्मध्वज अस्मितेचा मानबिन्दु बनला. हे त्याचे रूप जगाच्या अनेक संस्कृतीना भावले आणि म्हणूनच ते कोणत्याही तलवारीच्या धाकाशिवाय जगभरात पसरले आणि विशेषत: पूर्वेकडील अनेक संस्कृतींनी ते आपलेसे केले. म्हणूनच आजही इंडोनेशिया, कंबोडिया आदि देशांमध्ये रामकथा वाचायला व पाहायला देखील मिळते.
“ते” मात्र राम चरित्रातील दोष शोधून दाखविण्यात गुंतले आहेत. राष्ट्राची अस्मिता ठरत असलेल्या रामाला खोटे ठरवत, त्याचे अस्तित्त्व नाकारण्यात गुंतले आहेत. हिंदू समाज एकत्रिकरणाचे कार्य सुरु असताना दुहीची बीजे पेरण्यात गुंतलेले आहेत. आणि हे सर्व घडवून आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीना येन केन प्रकारेण बदनाम करत, चूक ठरवत, दोष देण्यात गुंतलेले आहेत आणि पंतप्रधान मात्र “वसुधैव कुटुंबकम” चा नारा देत “सबका साथ सबका विकास” चा मूलमंत्र प्रत्यक्षात आणत आपल्या “धर्म कार्याकडे” वाटचाल करत पुढे निघाले आहेत, कारण त्यांना खरा “राम” समजला आहे, त्यांना खरा “राजधर्म“ समजला आहे.
केवळ देशभरातीलच नव्हे तर सर्व जगातील हिन्दू या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वाट पहात असताना धर्म (Religion नव्हे) काय असतो हे आपल्या आयुष्याद्वारे दाखवून देणारा राम, आपणा सर्वांचा होवो हीच या प्राणप्रतिष्ठादिनी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना.
आम्ही आज तीर्थयात्रांच्या प्रवासात (कुरवपूर-पिठापुर इ.) असलो तरी आजच्या दिवशी मात्र मनाने अयोध्येतच आहोत. आम्हीही तोच राम अनुभवतो आहोत जो “धर्मपालक” राम आहे, आणि तोच राम देखील मनापासून आपल्या सगळ्यांचा होवो हीच त्या प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना
महेश नाईक
