किरातार्जुनीयम Kiratarjuniya Mahakavyam – किरातार्जुनीयम हे भारवीचे महाकाव्य आहे. याचे कथानक महाभारताच्या वनपर्वातील कथेवर बेतलेले आहे. संस्कृतातील बृहतत्रयी मध्ये हे प्रथम क्रमांकाचे काव्य मानले जाते. या त्रयीतील इतर दोन काव्य म्हणजे माघाचे शिशुपाल वध आणि श्रीहर्षाचे नैषधीयचरित्. पण शिशुपालवध काव्याप्रमाणे यात क्लिष्ट शब्दांचा भडिमार नाही किंवा नैषधीय चरिताप्रमाणे यातील काव्यात क्लिष्ट कल्पना देखील नाहीत.
किरातार्जुनीयम वीररसप्रधान काव्य असल्याने त्यात राजनीति देखील भरलेली आहे. काव्याच्या नावावरून आपल्याला स्पष्ट होते की हे किरात वेशातील शंकर आणि मधला पांडव अर्जुन यांच्याशी संबंधित कथानक आहे. द्युतक्रीडेत पराभूत झाल्यानंतर त्या खेळाच्या अटींप्रमाणे पांडव बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास स्वीकारून द्वैत वनात येतात. या वनात ते वास्तव्याला असताना, युधिष्ठिर आपला हेर हस्तिनापुरात दुर्योधनाचे राज्य कसे चालले आहे याची माहिती काढण्यासाठी पाठवतो. जर राजा जनतेशी दुष्टपणाने वागत असेल तर त्याचे राज्य फार काळ टिकत नाही. दुर्योधन हा स्वभावतः दुष्ट असल्याने तो प्रजेचा छळ करत असेल अशी युधिष्ठराची कल्पना असते. किरात वेशातील हा वनवासी हेर हस्तिनापुरात काही दिवस राहून तेथील माहिती काढून परत येतो आणि ती माहिती तो युधिष्ठिराला सांगतो.
गुप्तहेराने सांगितलेली माहिती युधिष्ठिराच्या अंदाजाच्या विरुद्ध असते. दुर्योधन अतिशय उत्कृष्टपणे राज्यकारभार चालवत असतो आणि त्यामुळे प्रजादेखील त्याच्या राज्यात संतुष्ट असते. दुःशासनाला युवराज्याभिषेक करून, राज्य त्याच्यावर सोपवून, दुर्योधन स्वतःला पुण्यकर्मांमध्ये गुंतवतो. त्यामुळेच प्रजेला देखील त्याच्याविषयी प्रेम निर्माण होते. युधिष्ठिर आपल्या गुप्तहेराला योग्य ते बक्षीस देऊन परत पाठवतो, आणि तो द्रौपदीला बोलवून घेतो. तिच्यासोबत भीमसेन देखील गुप्तहेराची वार्ता ऐकण्यासाठी युधिष्ठिराकडे येतो.
आपला वैरी दुर्योधन याचा उत्कर्ष होत आहे हे ऐकून युधिष्ठिर जरी शांत असला तरी द्रौपदी आणि भीमसेनाचे माथे खवळते. युधिष्ठिराची शिथिलता, शांतताप्रियता, आणि सहनशीलता यांच्याच मुळे आज आपल्यावर ही परिस्थिती आली असे त्यावेळी द्रौपदी युधिष्ठिराला सुनावते. ते ऐकून आधीच स्वभावाने तापट असलेला भीम देखील युधिष्ठेरावर संतापतो. तो देखील युधिष्ठिरावर तोंडसुख घेतो आणि आपण तात्काळ कौरवांवर आक्रमण केले पाहिजे आणि आपले राज्य परत मिळवले पाहिजे असे तो तावातवाने बोलू लागतो.
भीमसेन आणि द्रौपदी उत्तेजित झालेली पाहून देखील युधिष्ठिर त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो आणि सुरुवातीला त्यांच्या होकारात होकार मिळवतो पण हळूहळू त्यांना राजनीतीच्या गोष्टी ऐकवून, आपण आत्ताच असे करणे कसे बरोबर होणार नाही, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या प्रतिज्ञाचे पालन केले पाहिजे तरच आपल्या क्षात्रधर्माचे देखील पालन होईल हे तो भीम आणि द्रौपदीला पटवून देण्याचा प्रयत्न करतो.
त्यांचे हे संभाषण सुरू असतानाच कृष्णद्वैपायन व्यास तिथे येतात. ते या पांडवांना सांगतात की, तुमच्यावर खूप बाका प्रसंग ओढवलेला आहे. पण त्यासाठी आत्ताच युद्ध करणे हा पर्याय नाही. तसे देखील दुर्योधन तेरा वर्षांनी तुम्हाला तुमचे राज्य विनासायास परत देईल याची शक्यता फारच कमी आहे. म्हणून तुम्ही वनवासातील हा वेळ न दवडता कोणत्या ना कोणत्या शस्त्र आणि अस्त्राची प्राप्ती केली पाहिजे आणि स्वतःला युद्धसज्ज केले पाहिजे, म्हणजे भविष्यात जेव्हा युद्ध होईल तेव्हा त्यात तुम्हाला विजय मिळू शकेल, असे ते त्या तिघांना सांगतात. भीष्म, द्रोण यांच्यासारखे रथी महारथी कौरवांच्या बाजूने असताना तुम्हाला विजय कसा प्राप्त होऊ शकेल?, असा प्रश्न ते उपस्थित करतात. आणि म्हणूनच अर्जुनाने इंद्राकडून काही अस्त्रे प्राप्त केली पाहिजेत असे सुचवून ते अर्जुनाने इंद्रकील पर्वतावर जाऊन इंद्राची तपश्चर्या करून त्याच्याकडून ती अस्त्रे मिळवावीत असे सुचवितात.
त्यांचा हा विचार पांडवांना पसंत पडतो. अर्जुन तातडीने तिथून एका यक्षाला वाट दाखवण्यासाठी सोबत घेऊन इंद्रकील पर्वताकडे जायला निघतो. तेथे जातात अर्जुन आपल्या तपश्चर्येला सुरुवात करतो. त्याचे ते कठोर तप पाहून त्या पर्वतावर असलेले देवगण घाबरून जातात. हा आपल्या राजाचे सिंहासन मिळवण्याकरता तर करत नाही ना अशी शंका त्यांना येते आणि म्हणून ते इंद्राला ताबडतोब हा निरोप पोहोचता करतात. जो योगी इथे तप करतो आहे त्याकरता निसर्ग देखील अनुकूल बनत चालला आहे आणि त्याला हवे नको त्या गोष्टी, जसे खाण्यासाठी मधुर फळे, विश्रांतीसाठी मंद वाऱ्याच्या झुळका इत्यादी प्रदान करत चालला आहे असे देखील या गणांना वाटते.
हा तपस्वी दुसरा तिसरा कोणी नसून आपला पुत्र अर्जुनच आहे हे इंद्र ओळखतो. पण वरकरणी तसे न दाखवता आणि लोक व्यवहार आणि इंद्रलोकाच्या मर्यादांचे पालन करण्याकरता तो आपल्या काही अप्सरांना अर्जुनाची तपश्चर्या भंग करण्याची कामगिरी सोपवतो.
देवराज इंद्राच्या अमरावती नगरी पासून या अप्सरा, इंद्रकील पर्वताकडे जायला निघतात तेव्हा देखील या मार्गातील निसर्गाचे वर्णन महाकवी भारवीने केले आहे. अप्सरा इंद्रकील पर्वतावर पोहोचल्यानंतर अर्जुन ज्या ठिकाणी तपश्चर्या करत असतो त्याच्या जवळच त्या आपले निवासस्थान मांडतात आणि त्यांचे तपश्चर्या भंग करण्याचे सर्व प्रयत्न सुरू करतात. अर्जुन आपल्या ध्येयावर ठाम असल्याने तो या अप्सरांच्या कोणत्याही प्रयत्नांना दाद देत नाही आणि आपली तपश्चर्या सुरूच ठेवतो. त्याचा हा दृढ निश्चय पाहून अपयशी ठरलेल्या अप्सरा परत अमरावती नगरीत जाऊन इंद्राला सर्व वृत्तांत सांगतात, तेव्हा इंद्र मनोमन आनंदतो व तो स्वतःच अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी इंद्रकील पर्वतावर जायचे ठरवतो.
कालिदासाच्या कुमारसंभव काव्यामध्ये महादेव शंकर जसे बटूच्या रूपात पार्वतीच्या तपश्चर्येची परीक्षा घेण्याकरता प्रकट होतात त्याचप्रमाणे येथे देखील इंद्र अर्जुनाच्या तपश्चर्येची परीक्षा घेण्यासाठी एका वृद्ध यतीच्या रूपात अर्जुनाची भेट घेतो व त्याला त्याच्या तपश्चर्येचे कारण विचारतो. इंद्र त्याला म्हणतो की तुझ्या वृत्तीवरून तू कैवल्याच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत असशील असे वाटत नाही तर तू यत्कश्चित मानवी ध्येयासाठी तपश्चर्या करत असशील असे वाटते. त्यामुळे हे युवका, तू तुझी ही शस्त्र-अस्त्रे आणि तपश्चर्या सोडून दे आणि केवळ मुक्तीसाठी साधना कर तरच तुझे जीवन सफल होईल.
त्यावेळी अर्जुनाने त्या वृद्ध ब्राह्मणाला आपल्यावर व आपल्या भाऊबंदांवर ओढवलेल्या परिस्थितीची कल्पना दिली व आपण शस्त्रास्त्र प्राप्ति करता इंद्राची आराधना करत आहोत हे देखील सांगितले. तो पुढे म्हणाला, हे ब्राह्मण देवता, तु ज्या कैवल्याची आणि मोक्षाची साधना करण्यासाठी मला सांगतो आहेस त्याचे आम्ही अधिकारी नाही. आमच्या शत्रूंमुळे आमच्यावर हा दुरावस्था प्रसंग ओढवला आहे आणि या प्रसंगाचा सामना करणे आणि आम्हाला स्वतःला पूर्वस्थिती प्राप्त करून घेणे हाच यावेळी आमच्या समोरील एकमेव मार्ग आहे.
अर्जुनाचा तो दृढनिर्धार ऐकून इंद्र संतुष्ट झाला आणि त्याने स्वतःचे रूप प्रकट केले. त्याचबरोबर त्याने अर्जुनाला पशुपतास्त्राच्या प्राप्ती करता भगवान शंकरांची आराधना करण्याची सूचना केली. आपल्या पहिल्या तपश्चर्येच्या फलाने आनंदीत झालेल्या अर्जुनाने मग दुप्पट जोमाने शंकरांची आराधना करण्यास प्रारंभ केला. त्याची ती तपश्चर्या पाहून आजूबाजूचे तपस्वी देखील भयभीत झाले आणि ते भगवान शंकरांच्या दर्शनाला पोहोचले आणि त्यांनी अर्जुनाच्या तपश्चर्येची कल्पना भगवान शंकरांना दिली.
शंकरांना याची आधीच कल्पना होतीच. त्यांनी या सर्वांना सांगितले की हा साधासुधा तपस्वी नसून नारायणाचा अंश असलेला पांडूपुत्र अर्जुन आहे. आता मी याच्या अतुल बलशाली रूपाचा परिचय तुम्हाला घडवेन. याचवेळी मूक नामक दानवाला अर्जुनाच्या या तपश्चर्येचा पत्ता लागला असून, त्यामुळे सज्जनांचे बल वाढणार आहे आणि दुर्जनांचे बल क्षीण होणार आहे, याची कल्पना असल्याने तो आता वराह रूपात अर्जुनाची तपश्चर्या भंग करण्यासाठी चालला आहे त्यामुळे आपण सर्व तिथे जाऊ आणि पुढे काय घडते ते पाहू.

असे म्हणून भगवान शंकरांनी स्वतः किराताचा वेश धारण केला आणि इतर गणांना देखील किराताचाच वेश धारण करून अर्जुन येथे तपश्चर्या करत होता तेथे हे सर्व निघाले. मूक दानव देखील त्याच वेळी वराह रूपात अर्जुनाच्या जवळ पुढे सरकत होता. प्रथम तो अर्जुनाला एक साधासुधा वराह वाटला पण नंतर जसा तो त्याच्या जवळ येऊन आक्रमण करेल असे वाटले तेव्हा अर्जुनाने आपले धनुष्य सरसावले आणि बाण काढत, त्याचा वेध घेतला. त्याचवेळी तो अर्जुनाच्या दिशेने पुढे सरकतो आहे असे पाहून किरातवेशातील शंकरांनी देखील त्याच्यावर आपल्या पिनाक धनुष्यातून बाण सोडला. अर्जुन आणि शंकर या दोघांचेही बाण त्या वराहाच्या शरीरात शिरले आणि तो जागच्या जागी कोसळला.
पण यापुढे एक बाका प्रसंग ओढवला, तो म्हणजे हा निर्णय करण्याचा की कुणाच्या बाणाने वराह मरण पावला आहे. शंकराचा बाण वराहाच्या अंगात घुसून पुढे जमिनीत रुतला होता तर, अर्जुनाचा बाण देखील वराहाच्या अंगात लागून तिथे जवळच पडला होता. अर्जुन जसा तो आपला बाण उचलण्यासाठी पुढे सरसावला त्याच वेळी शंकराने देखील आपल्या एका गणाला आपल्या बाणावर आणि शिकारीवर हक्क सांगण्यासाठी पुढे पाठवले.
त्या शिवगणाने अर्जुनाला सांगितले की माझ्या स्वामींनी मारलेल्या बाणांनी हा वराह मारला गेला आहे. तुझ्या अंगात एवढ्या अजस्त्र वराहाला मारण्याची शक्ती कुठे आहे? जर माझ्या स्वामींनी याच्यावर बाण सोडला नसता तर तू निश्चितच या वराहाची शिकार झाला असतास. त्यामुळे ही शिकार आमची आहे. असे असताना तू ही शिकार आणि आमचा बाण देखील कसे घेऊ शकतोस? तुझा धिक्कार असो.
त्या गणाचे असे शब्द ऐकून अर्जुनाला संताप न येता तरच नवल. अर्जुनाने देखील त्याची आणि त्याच्या तिथे नसलेल्या स्वामीची निर्भत्सना करायला सुरुवात केली. हळूहळू शब्दाला शब्द वाढत गेला आणि बाका युद्ध प्रसंग येऊन ठेपला. शिवाचे गण एका बाजूला आणि अर्जुन दुसऱ्या बाजूला असे युद्ध सुरू झाले आणि अर्जुनाने आपल्या घनघोर शरसंधाने त्या शिवांच्या गणांच्या सेनेला पळवून लावले .
सेना परत पळत शंकराकडे गेली, तेव्हा शंकराने त्यांना धीर दिला आणि परत रणांगणात जाण्यास सांगितले, पण ते जायला तयार होत नव्हते, तेव्हा शंकर स्वतःच त्यांच्याबरोबर जायला निघाले, आणि त्या रणांगणावर सेनेसह येऊन ठेपले. यानंतर शंकर आणि अर्जुन यांच्यामध्येच घनघोर युद्ध सुरू झाले. दोघांनीही एकमेकांवर अनेक शस्त्रांचा आणि अस्त्रांचा प्रयोग केला. अर्जुनाने त्यांच्यावर सर्पास्त्र , आग्नेयस्त्र अशी नानाविध अस्त्रे सोडली पण शंकराने त्यावरील उपाय काढत ही सर्व अस्त्रे निष्फळ केली, याचे अर्जुनाला आश्चर्य वाटले. एक साधारण किरात सेनापती तो काय? पण त्याच्यासमोर माझी सर्व शस्त्रे निरुपयोगी ठरत आहेत याचा अर्जुनाला विषाद आणि आश्चर्य देखील वाटले.
यानंतर शंकरांनी आपले मायाजाळ टाकत अर्जुनाला निशस्त्र केले, त्याचे धनुष्य तोडले. यानंतर अर्जुन आपली तलवार उगारून पुढे सरसावला. शंकरांनी त्याची तलवार देखील भंग केली. यावेळी अर्जुन त्यांच्यावर मोठाले दगड आणि वृक्ष तोडून उन्मळून काढत फेकू लागला. शंकराने त्याचा देखील सामना केला तेव्हा शेवटी अर्जुन त्यांच्याशी थेट भिडत मल्लयुद्ध करण्यास सरसावला.

शंकराचे गण देखील त्यांचे दोघांचे हे युद्ध विस्मयाने पाहत होते. अर्जुनासारख्या प्रबळ योध्याचा त्यांच्या स्वामींशी देखील प्रथमच सामना होताना ते पाहत होते. अर्जुनाचा तो पराक्रम पाहून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपली खरी ओळख प्रकट केली. पाहून अर्जुनाला आनंद झाला आणि त्याने असे युद्ध केल्याबद्दल शंकरांची क्षमा मागितली. शंकर देखील त्याच्यावर अतिप्रसन्न झाले आणि त्यांनी आपले विशेष असे पाशुपतास्त्र त्याला देऊ केले. एवढ्या या प्रसंगावर हे एक संपूर्ण मोठे महाकाव्य महाकवी भारवीने रचले आहे.
या काव्यांमध्ये युधिष्ठिरंसोबत होणाऱ्या भीम आणि द्रौपदीच्या चर्चेदरम्यान राजनीतीच्या अनेक गोष्टींचा उहापोह भारवीने अतिशय सुंदर शब्दांमध्ये केला आहे. द्रौपदी आणि भीम त्याला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी सांगतात त्याचे खंडन युधिष्ठिर अतिशय शांत आणि मधुर भाषेत करतो याचे अप्रतिम वर्णन भारवीने केले आहे. त्याच प्रकारचे वाक्पटूत्वाचे उदाहरण आपल्याला वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात आलेला इंद्र आणि तपश्चर्या करीत असलेला अर्जुन यांच्या संवादामध्ये दिसून येते.
- महाकाव्ये म्हणजे काय ? संस्कृत मधील पंचमहाकाव्ये कोणती ? हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
- कुमारसंभव या महाकाव्याविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .
- अभिज्ञान शाकुन्तलम या कालिदासाच्या नाटकाविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा .
आभार : डॉ . मृणालिनी नेवाळकर, प्राध्यापिका , मुंबई विद्यापीठ.
