पंचमहाकाव्ये – Pancha Mahakavya in Sanskrit

इंदुमतीच्या मृत्यूमुळे राजा अज याचा विलाप

काव्य शब्दाचा उगम संस्कृत मधील कव या धातूपासून झालेला आहे. याचा अर्थ आहे रचना करणे. साहित्य दर्पण या त्याच्या काव्यरचनेत विश्वनाथ म्हणतात “वाक्यम रसात्मक काव्यम”. ज्या वाक्यात रस आढळतो ते म्हणजे काव्य. याचबरोबर काव्य हे छंदात बांधलेले असते, त्यामुळे त्याला गेयता येते.

काव्याचा उगम आपल्याला वेदांच्या रचनेमध्ये सर्वप्रथम आढळून येतो. ऋग्वेदातील सूक्ते ही काव्याचा प्रथम अविष्कार मानली जातात. ऋग्वेदातील देवता निसर्ग देवता आहेत. यात आपल्याला रुद्र, मरुत, पर्वत, वरूण, उषस, अशा निसर्गातील गोष्टींचा देवता म्हणून उल्लेख करत त्यांना प्रसन्न करण्यासाठी ही गीते रचल्याचे आढळून येते. यात आपल्याला त्यांची सूक्ष्म अवलोकन शक्ती,कल्पना-रम्यता, रसिकता आणि भावनांचा अविष्कार देखील आढळून येतो.

यानंतरच्या काळामध्ये आपल्याला पहिलं काव्य किंवा आदि काव्य आढळते, ते म्हणजे रामायण. महर्षी वाल्मिकींनी तमसा नदीच्या तीरावर, एका झाडाच्या फांदीवर क्रौंच पक्षांच्या जोडीला, रतिकडेत मग्न असताना पाहिले, पण त्याचवेळी एक बाण आला आणि त्यातील नराचे प्राण घेऊन गेला. आपल्या जोडीदाराला पडलेला पाहून मादी विलाप करू लागली. तिचा तो विलाप पाहून वाल्मिकींच्या मुखातून शापवाणी उच्चारली गेली, “हे निषाद,अनंत काळपर्यंत तुला प्रतिष्ठा मिळणार नाही“. त्यांचे हे उच्चारण अनुष्ठुप छंदात होते. या घटनेनंतर ब्रह्मदेवांनी त्यांना रामायणाची रचना त्याच अनुष्ठुप छंदात करायला सांगितली.

यानंतरचे काव्य आहे महाभारत. महाभारताची रचना महर्षी व्यासांनी केली. ही दोन्ही काव्ये आर्ष महाकाव्ये  म्हणून ओळखली जातात. यात राम व कृष्ण या देवतांचा उल्लेख येतो.

यानंतरच्या काळात अनेक कवींनी लहान मोठी असंख्य काव्ये रचली. त्यापैकी काही अभिजात काव्यरचना महाकाव्य आणि लघु काव्य किंवा खंड काव्य या सदरामध्ये विभागल्या गेल्या. यातील काही रचना, नदीस्तोत्रे होते, काही मानसस्तोत्रे होती, काही चरित्रे होती, काही शृंगार काव्ये  होती, काही ऐतिहासिक काव्ये  होती, तर काही नीतिकाव्ये  देखील होती.या महाकाव्यापैकी ५ महाकाव्ये संस्कृतातील पंचमहाकाव्ये या नावाने प्रसिद्ध पावलेली आहेत व ही आहेत, कुमार संभव, रघुवंशम, किरातार्जुनीयम, शिशुपालवधम आणि नैषधीय चरित्र याबद्दलची माहिती यापुढे येईलच. त्या आधी महाकाव्य म्हणजे नेमके काय ते आपण जाणून घेऊ.

महाकाव्यांची लक्षणे

एखादे काव्य जेव्हा महाकाव्य म्हणून ओळखले जाते तेव्हा त्याला खालील लक्षणे लागू पडतात.

  1. महाकाव्य हे सर्गबद्ध असायला हवे. सर्ग म्हणजे त्यातील प्रकरणे अथवा विभाग. यांना कांड, पर्व, उल्हास, अध्याय, तंत्र, वल्ली अशा विविध नावाने देखील ओळखले जाते.
  2. महाकाव्यातील सर्ग संख्या ८ पेक्षा जास्त व सुमारे ३० पर्यंत असते.
  3. महाकाव्यातील पूर्ण सर्ग एकाच वृत्तात असतो पण शेवटच्या श्लोकात मात्र वृत्त बदलले जाते. “एकमेव वृत्तम , सर्गांते वृत्तभेद:” हे महाकाव्याचे लक्षण मानले जाते.
  4. महाकाव्याला एक मध्यवर्ती कथावस्तू असते. याद्वारे आपल्याला पौराणिक, ऐतिहासिक, लोकप्रसिद्ध कथा, सज्जन चरित्र इत्यादींचा परिचय होत असतो.
  5. या महाकाव्याला नायक असतो. ते काव्य देवतेवरचे असले तर एखादा देव अथवा देवी म्हणजेच जसे कुमार संभव मध्ये शिवपार्वती. एखादा वीर पुरुष अथवा राजा याचा नायक असू शकतो नैषधीयचरितम् मध्ये राजा नल हा काव्याचा नायक आहे. किंवा एखाद्या राजवंशाची कहाणी याची मध्यवर्ती संकल्पना असू शकते जसे जसे रघुवंशम मध्ये राजा रघुचा वंश.
  6. महाकाव्याला शृंगाररस अथवा वीररस हा प्रधान रस असतो. त्यातील काही सर्वांमध्ये इतर रस अंगीरस म्हणून येऊ शकतात.
  7. यात सर्व बाबतीत कवीच्या प्रतिभेचा विलास दिसून येतो. उत्सव (सोळा संस्कारातील संस्कार सोहळ्यांचे वर्णन), विवाह सोहळे (कुमार संभवातील शिवपार्वती विवाह, नैषधीय चरितातील नल दमयंती विवाह), युद्ध ( किरातार्जुनियातील किरात आणि अर्जुनाचे युद्ध), पर्वतादी निसर्ग ( किरातार्जुनियातील इंद्रकील पर्वताचे वर्णन किंवा शिशुपालवधातील रेवतक पर्वताचे वर्णन) इत्यादींचे वर्णन कवी आपल्या प्रतिभेने अलंकृत करताना आढळून येतो.
  8. एखाद्या चरित्राचा, किंवा सामाजिक विषयाचा परिचय हा जसा मनोरंजनासाठी आवश्यक असलेला काव्याचा भाग आहे तसेच या काव्यांमधून कोणती ना कोणती शिकवण दिल्याचे आढळते. यात धर्म, नीती, सत्य यांचे समर्थन असते, तर दुर्जनांची निंदा, मानवी मूल्यांची शिकवण आणि त्यांचा प्रसार हा काव्याचा मूळ हेतू असतो. हे करण्यासाठी अर्थातच काव्य मनोरंजक असायला हवे असते.
  9. याचबरोबर एखाद्या कवीचे हे काव्य लिहिण्या मागचे प्रयोजन म्हणजे त्याच्या प्रतिभेचा परिचय सर्व समाजाला करून देणे. मम्मटाने काव्य निर्मितीचे प्रयोजन सांगताना असे म्हटले आहे की काव्य निर्मितीचा यशप्राप्ती आणि धनप्राप्ती हा हेतू असतोच पण याचबरोबर कवी कांता-सम्मित उपदेशाप्रमाणे व्यवहार ज्ञानाची पेरणी करतो. जे मंगल आहे त्या व्यतिरिक्त इतर गोष्टींचा ऱ्हास व्हावा यासाठी देखील काव्य लिहिले जाणे आवश्यक आहे.
  10. या सर्व निर्मिती मागे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखे आहे ते म्हणजे काव्य तात्काळ आनंद देणारे असले पाहिजे तरच त्याचा प्रसार आणि प्रचार सर्व समाजात होऊन त्या मागचा हेतू सफल होईल.

महाकाव्याच्या लक्षणांमध्ये बसणारी पाच काव्य संस्कृतातील पंचमहाकाव्ये  मानली जातात. ही काव्यांच्या पंचप्राणा सारखीच आहेत. त्यांच्या रचनेचा काळ, त्यांचा कवी आणि त्यातील सर्व संख्या या पुढील तक्त्यामध्ये दाखवले आहेत.

पंचमहाकाव्ये - Pancha Mahakavya in Sanskrit
पंचमहाकाव्ये – Pancha Mahakavya in Sanskrit

पंचमहाकाव्यांच्या या यादीतील काव्यांची थोडक्यात माहिती आपण क्रमाक्रमाने पाहू.

१) कुमार संभव

(कुमारसंभव महाकाव्याच्या सर्व सर्गांची माहिती करून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा)

कुमारसंभवम या महाकाव्यात महाकवी कालिदासाने शिवपार्वतीच्या विवाहाची आणि त्यांच्या प्रथम पुत्र कार्तिकेयाच्या जन्माची कथा वर्णन केली आहे. तारकासुराचा वध हे कार्तिकेच्या जन्माचे प्रयोजन आहे. या काव्याचे एकूण १७ सर्ग उपलब्ध आहेत. पण यातील केवळ ८ सर्ग च कालिदासाने लिहिले असावेत असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मल्लिनाथ या सुप्रसिद्ध टीकाकाराने यातील केवळ ८ सर्गांवरच त्याची “संजीवनी” नामक टीका लिहिली आहे. पण कुमाराचा जन्मच दहाव्या सर्गात येतो. त्यामुळेच हे संपूर्ण काव्य कालिदासानेच लिहिले असावे असे देखील काही विद्वान मानतात. शृंगार रस हा यातील प्रधान रस आहे. या काव्याचे उपजिव्य म्हणजेच कथानकाचा उगम आपल्याला रामायणातील बालकांड, महाभारतातील अनुशासन पर्व या ठिकाणी आढळतो. शिवपुराण आणि कालिकापुराण यांच्यामध्येही याचे उल्लेख येतात जे कालिदासाने पुढे आपल्या प्रतिभेने एका महाकाव्यामध्ये फुलविले आहेत.

कुमारसंभवातील कथा सुरू होते ती पर्वतराज हिमालयाच्या वर्णनाने. याच पर्वतावर पार्वतीचा जन्म होतो. नगाधिराज हिमालय हा तिचा पिता आणि त्याची पत्नी मेना ही पार्वतीची माता. तिला मैनाक नावाचा एक बंधू देखील आहे. याच ठिकाणी पार्वतीच्या पूर्व जन्माचे वर्णन देखील येते. पूर्व जन्मात सती असलेली पार्वती, त्या जन्मातील पित्याच्या यज्ञात म्हणजे दक्षाच्या यज्ञात अग्नीत प्रवेश करत स्वतःला संपवते आणि हिमालयाच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेते.

याच कथेमध्ये तारकासुराची देखील कथा येते. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तारकासुर स्वर्गावर आक्रमण करतो आणि देवांनाही बंदी बनवतो. शिवपार्वतीचा पुत्र त्याचा वध करू शकेल, हे ब्रह्मदेवाने देवांना सांगितल्यावर, शिव आणि पार्वतीचा विवाह घडविण्यासाठी शिवाला पार्वतीच्या बंधनात अडकवण्याचे कार्य मदनावर सोपवले जाते. सतीच्या विरहाने वनात तप करणाऱ्या शिवाची पार्वती सेवा करते, ती त्याला पती म्हणून स्वीकारण्याच्या उद्देशाने. पण तिच्या सेवेने शिव विचलित होत नाही. त्याला विचलित करण्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी त्या वनात मदन आपली पत्नी रती आणि मित्र वसंत यांच्यासह प्रवेश करतो. आपला पंचसायक तो शिवावर सोडणार इतक्यात त्याच्यावर शिवाची दृष्टी पडते आणि त्याचा उद्देश लक्षात येऊन शिव संतापतो आणि आपल्या तृतीय नेत्राने मदनाला भस्मसात करतो. आपल्या डोळ्यासमोर आपल्या पतीचा नाश झालेला पाहून रती विलाप करते आणि ती देखील सती जायला  निघते. त्याचवेळी एक आकाशवाणी होऊन मदन पुन्हा जिवंत होईल अशी बातमी रतीला मिळते. त्या वेळपासून मदन मात्र अनंग अथवा अशारीरिक अवस्थेत आहे म्हणून त्याला मनोज म्हणजे मनात जन्म घेणारा असे देखील म्हटले जाते.

कुमारसंभवम मधील “रतीविलाप” जसा प्रसिद्ध आहे, तसाच रघुवंशम या कालिदासाच्या दुसऱ्या महाकाव्यातील राजा अजय याचा त्याची पत्नी इंदुमती तिचा मृत्यू झाल्यावर केलेला विलाप, “अजविलाप” या नावाने प्रसिद्ध आहे.

आपण आपल्या सौंदर्याच्या जोरावर शंकराला वश करू शकत नाही हे पार्वतीच्या लक्षात आले. म्हणून आता तिने शंकराला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप सुरू केले. याआधी ती झाडाची पडलेली पाने खाऊन जगत होती पण यानंतर मात्र ती ही पाने देखील खात नाही म्हणून ती अपर्णा या नावाने ओळखली जाते. तिचे तप, केवळ वायू भक्षण करून, कठोर ऊन-पावसात सुरूच राहते. ग्रीष्म ऋतुच्या तीव्रतापामध्ये अग्नी हातात घेऊन, सभोवताली अग्नी असताना केलेले हे तप पंचाग्नि तप म्हणून ओळखले जाते. ते पाहून शंकर प्रसन्न होतात पण ते अशावेळी पार्वतीची परीक्षा पाहण्याचे ठरवतात आणि बटुरूपात तिच्या भेटीला येतात. अतिथी म्हणून पार्वती ज्यांचा आदर सत्कार करते पण जेव्हा हा बटू शंकराचीच निंदा करणे सुरू करतो तेव्हा मात्र ती त्याच्यावर संतापते. तिचा हा दृढनिश्चय पाहून शंकर स्वतःच्या रूपात प्रकट होतात आणि आपण तिचे दास झालो आहोत याची कबुली देतात. पाचव्या सर्गातला हा प्रसिद्ध संवाद म्हणजे उमा-बटू संवाद.

यानंतरच्या भागात कालिदासाने शंकराने पार्वतीला सप्तर्षीद्वारे तिच्या पित्याकडे मागणी घातली याचे वर्णन आहे. पुढे एका सर्गात शिवपार्वती विवाहाचे संपूर्ण वर्णन येते. त्यात शिवाची वरात, त्या वरातीचे हिमालयाच्या औषधी नगरात होणारे स्वागत, तेथील ललनांचे शिवाला उत्सुकतेने पाहणे, पुढे हिमालयाचे कन्यादान हे सर्व झाल्यानंतर शिव काही दिवस हिमालयाच्या घरी राहून पार्वतीचा अनुनय करतो आणि एका महिन्यानंतर विविध ठिकाणी प्रवास करत कैलासावर पार्वतीसह पोहोचतो.

इतके झाले तरी पुत्र जन्माची वार्ता मिळत नसल्याने सर्व देव, देवकार्यासाठी अग्नीला कैलासावर पाठवतात. अग्नी कपोतरूपात त्यांच्या एकांतात प्रवेश करतो व ते पाहून पार्वती संतापते आणि त्याला शाप देते. पण शंकर मात्र देवांची निकड ओळखून आपले वीर्य अग्नीमध्ये टाकतात. पुढे अग्नी हे वीर्य भागीरथी नदीमध्ये विसर्जित करतो तेव्हा ६ कृतिका त्या नदीमध्ये स्नान करीत असतात. या वीर्याचा त्यांच्या शरीरात प्रवेश होऊन त्या गर्भधारण करतात. पण या गर्भाने आपणच अडचणीत येऊ हे लक्षात येतात त्या तो गर्भ एका कपोलवनात टाकतात जेथे त्याचे एकत्रीकरण होऊन कुमार कार्तिकेयाचा जन्म होतो.

या नवजात बालकाला मग गंगा धारण करते. काही कालाने शिवपार्वती विहार करत असताना पार्वतीचे लक्ष या बालका कडे जाते आणि हे बालक तिच्या मनाचा ठाव घेते. शंकर तिला हे बालक आपलेच असल्याचे सांगतात आणि पार्वती मग त्याला आपल्याकडेच घेऊन येते.

सहा दिवसातच हे बालक सर्व विद्या ग्रहण करते आणि तारकासुराशी  युद्ध करायला देखील सिद्ध होतो. देव कार्तिकेयाला आपला सेनापती बनवतात आणि त्याच्या अधिपत्याखाली तारकासुराशी युद्ध करून त्याचा पराभव करतात. अशा प्रकारे कार्तिकेयाचा जन्म आणि त्याचे तारकासुराशी  होणारे युद्ध कुमार संभव मध्ये वर्णन केले आहे. शिवपार्वतीचा शृंगार हा याचा प्रधान रस आहे. असे असले तरी शिव प्रसन्न होतात ते पार्वतीच्या सौंदर्याने नव्हे, तर तिने केलेल्या कठोर तपश्चर्येने हाच संदेश कालिदास या काव्या द्वारे तसेच त्याच्या इतर काव्यांद्वारे देखील देताना आपल्याला आढळतो.

२) रघुवंशम

इंदुमतीच्या मृत्यूमुळे राजा अज याचा विलाप,राजा रविवर्मा यांचे चित्र
इंदुमतीच्या मृत्यूमुळे राजा अज याचा विलाप, राजा रविवर्मा यांचे चित्र

कुमार संभव हे कालिदासाच्या काव्य लेखनाच्या सुरुवातीच्या काळातील काव्य तर रघुवंशम वाचल्यानंतर आपल्याला परिपक्व झालेला कालिदास पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कालिदासाने यात एका छोट्या नौकेतून महाकाव्याचा महासागर तरुन जाण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे.

रघुवंशम हे एक वंश काव्य आहे यात रघुकुलातील राजांचे सुमारे २८  पिढ्यांचे वर्णन येते. या काव्याचे नाव जरी रघुवंश असले तरी याची कथा राजा दिलीप आणि त्याची पत्नी सुलक्षणा यांच्यापासून सुरू होते. राजा दिलीप पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष आहे पण त्याला मूलबाळ नसल्यामुळे तो दुःखी आहे. आपल्या राजगुरूंचा/ वशिष्ठांचा सल्ला घेण्यासाठी राजा त्यांच्या आशीर्वाद जातो, तेव्हा ते राजाला तो अपत्यहीन असल्याचे कारण आणि त्यावरील उपाय सांगतात. वशिष्ठ राजाला सांगतात की तो युद्धावरून परत येत असताना त्याने आपल्या ऋतुमती असलेल्या राणीच्या ओढीने, त्याच्या वाटेत असलेल्या कामधेनूला साधा नमस्कार देखील केला नाही म्हणून तिने त्याला शाप दिला आहे. पण यावर उपाय म्हणजे त्या कामधेनूची किंवा तिच्या मुलीची नंदिनीची सेवा करणे हा होय.

वशिष्ठांचे म्हणणे मान्य करून राजा सपत्नीक तिथेच आश्रमात राहून नंदिनीचे सेवा करू लागतो. नंदिनीला रोज चरावयास घेऊन जाणे. नेहमी तिच्याबरोबर राहून तिला काय हवे नको ते पाहणे, यात राजा आणि त्याची पत्नी सुदक्षिणा यांचा वेळ जाऊ लागला. असे २१  दिवस झाल्यानंतर नंदिनीने राजाची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि ती चरायला एका ठिकाणी गेली असताना राजा सोबत असताना, एका सिंहाने तिच्यावर झडप घातली. ते पाहून राजा तिच्या संरक्षणार्थ धावला. सिंह कुणी साधासुधा सिंह नसून शंकराचा सेवक असलेला व त्या रानातील वृक्षांची राखण करणारा कुंभोधर नावाचा सिंह होता. राजाला पाहताच तो मनुष्यवाणीने बोलू लागला आणि त्याने ही गाय आपले भक्ष असल्याचे सांगितले. तिला सोडून देण्यासाठी राजाने त्याच्या विनवण्या केल्या पण तो काही तयार होत नव्हता. शेवटी राजाने स्वतःचे शरीर त्याला भक्ष म्हणून देऊ केले. ते पाहून राजाच्या सेवेने नंदिनी गाय राजावर प्रसन्न झाली आणि तिने आपले खरे स्वरूप आणि सिंह रुपी माया उघड केली, व राजाला पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला.

यानंतर राजा दिलीप आणि त्याची पत्नी सुदक्षिणा यांना रघु नावाचा पुत्र झाला. हा पुत्र फारच पराक्रमी होता. त्याने राजा दिलीप याला ९९  अश्वमेध यज्ञाचे दिग्विजय करून दिले. शंभराव्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी यज्ञाचा अश्व इंद्रानेच पळवला तेव्हा त्याने इंद्रावर स्वारी केली. त्याचा पराक्रम पाहून इंद्राने अश्व सोडून कोणताही वर माग असे त्याला सांगितले तेव्हा त्याने चतुराईने “आपल्या पित्याला १००  व्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभू दे” असा चतुर वर मागितला.

राजा रघुने स्वतः देखील खूप पराक्रम गाजवत पृथ्वी पादाक्रंत केली. त्याने विश्वजीत यज्ञ केला आणि या यज्ञात आपली सर्व संपत्ती दान केली. याचवेळी त्याच्याकडे वरतंतू ऋषींचा शिष्य कौत्स हा याचक म्हणून आला. आपल्या गुरूला गुरुदक्षिणा देण्यासाठी कौत्साला १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. पण राजा रघुने आपली सर्व संपत्ती दान केलेली पाहून तो रिक्त असते परत जाणार होता. हे पाहून रघुने  त्याला या सुवर्ण मुद्रा देण्याकरता प्रत्यक्ष कुबेरावरच आक्रमण करण्याची तयारी सुरू केली. हे कळताच कुबेराने रातोरात राजाच्या परसात असंख्य सुवर्णमुद्रांची वृष्टी केली. त्या सर्व सुवर्ण मुद्रा रघुने कौत्साला देऊ केल्या. ह पण त्याने त्यातील केवळ १४  कोटी सुवर्ण मुद्रा स्वीकारल्या व इतर सुवर्णमुद्रा रघुने आपल्या नागरिकांमध्ये वाटून टाकल्या.

रघुचे चरित्र असे पराक्रमाने व दानशूरतेने भरलेले तर त्याचा पुत्र अज हा पराक्रमी आणि देखणा. राजपुत्र अजाचा विवाह विदर्भाची राजकन्या इंदूमती हीच्याशी होतो. इंदूमतीच्या स्वयंवराचे वर्णन कालिदासाने अतिशय सुंदर प्रकारे केले आहे. हातात वरमाला घेऊन प्रत्येक राजांच्या समोरून जाणारी राजकन्या इंदूमती ही एखाद्या दीपशिखेप्रमाणे भासत होती अशा शब्दात कालिदासाने तिचे वर्णन केले आहे. अज आणि इंदुमती चा विवाह थाटामाटात पार पडला.

एकदा राजकन्या इंदूमती बागेत विहार करत असताना, आकाश मार्गाने जाणाऱ्या नारद मुनींच्या वीणेवरील पुष्प माला तिच्या वक्षस्थळावर पडून तिचा मृत्यू झाला. आपल्या प्रिय पत्नीचा असा मृत्यू झालेला पाहून अजाने प्रचंड विलाप केला. कुमारसंभव काव्यातील रतिविलापा प्रमाणेच रघुवंशांमधील अजविलाप देखील खूप प्रसिद्ध आहे.

या अजाचा पुत्र म्हणजे रामाचा पिता दशरथ. रामायणाद्वारे आपल्याला दशरथ आणि त्याच्या पत्नी कौसल्या, सुमित्रा, आणि कैकयी यांची ओळख असतेच. दशरथाने अजाणतेपणे श्वापद समजून तलावावर पाणी भरणाऱ्या श्रावण बाळाचा वध केला. त्यामुळे दुःखी झालेल्या त्याच्या मात्यापित्यांनी राजा दशरथाला तू देखील आमच्यासारखा पुत्रशोकाने मरशील असा शाप दिला. त्यावेळी पुत्रप्राप्ती न झालेल्या दशरथाने एका डोळ्यात दुःखाश्रू तर एका डोळ्यात आनंदाश्रू ने  तो श्राप स्वीकारला.

पुढे पुत्रकामेष्टी यज्ञाद्वारे दशरथाच्या तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली. रामाने विश्वामित्रांसोबत जाऊन राक्षसांचा संहार केला आणि त्यानंतर शिवधनुष्य तोडत जनक कन्या सीता हिला आपली पत्नी बनवले. दशरथाच्या आणि सर्व प्रजाजनांच्या संमतीने रामाचा राज्याभिषेक होण्याची वेळ जवळ आली असताना, राणी कैकेयीने राजा दशरथाला तिने त्याला दिलेल्या वरांची आठवण करून दिली आणि रामाला वनवासात पाठवून आपला पुत्र भरताला राजा बनविण्याची मागणी केली. या घटनेच्या दुःखानेच राजा दशरथाचा अंत झाला.

पुढील काव्यामध्ये कालिदासाने १० ते १५ व्या सर्गात रामायणातील घटनांचे वर्णन केले आहे. रामाच्या नंतर त्याचा पुत्र कुश, पुढे कुशाचा पुत्र अतिथी आणि त्याही पुढे रघुवंशातील इतर राजांची वर्णने येतात. या राजांची उत्कृष्ट व्यक्तिचित्रणे कालिदासाने रेखाटली आहेत. रघुवंशामध्ये या वंशातील एकूण २८  राजांचा उल्लेख येतो. यातील बरेचसे राजे पराक्रमी निघाले पण यातील शेवटचा राजा अग्नीवर्ण मात्र अगदीच नादान निघाला. त्यामुळे त्याच्या मंत्र्यांनी रोगजर्जर झालेल्या राजाला प्रजेच्या नकळतच अग्नी दिला, आणि या वंशाच्या पराक्रमाचे वर्णन कालिदासाने येथे संपविले.

यातील व्यक्ती वर्णनातून कालिदासाने आपल्या साहित्यात सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. एवढ्या राजांचे वर्णन येऊन देखील त्यात कुठे रटाळपणा व पुनरुक्ती नाही. एवढ्या मोठ्या वंशावळीद्वारे एका श्रेष्ठ राजवंशाचे चित्रण कालिदासाने आपल्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. रघुवंशाचे वर्णन करताना त्याने या राजांची गुणवैशिष्ट्ये उत्कृष्टपणे रेखाटली आहेत. तो म्हणतो की रघुवंशातील राजे कर्मफल दृष्टीस पडेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे होते. ते याचकांना तृप्त करणारे तर अपराध्यांना त्यांच्या अपराधानुसार शासन करणारे होते. ते प्रजेला पुत्रवत मानून शासन करणारे, आणि वृद्धापकाळ जवळ येताच आपल्या पुत्रावर राज्यकारभार सोपवून वानप्रस्थाश्रम स्वीकारणारे होते.  ईश्वराचे नामस्मरण करीत त्यांनी देहत्याग केला. हे राजे पराक्रमी होते पण त्यांना युद्धात शत्रूच्या हातून मरण आले नाही. अशा अनेक विशेषणांनी कालिदासाने या राजवंशावळीला गौरविले आहे.

रघुवंशातील राजे जरी शीलवान आणि पराक्रमी असले तरी प्रत्येक राजाच्या वेदनेचे वर्णन देखील कालिदासाने केले आहे. राजा दिलीप सारखा कुशल शासक असताना  निपुत्रिक  आहे त्याचे शल्य होते. राजा रघु इतका पराक्रमी निघाला की त्याने राजा दिलीप सारख्या शासकाचे नाव प्रजेला विसरायला लावले. त्याचा पुत्र अज देखील पराक्रमी आणि देखणा होता पण पत्नीच्या वियोगाचे प्रचंड दुःख त्याला भोगावे लागले. राजा दशरथाचे दुःख आणि राजारामाचे पत्नी वियोगाचे दुःख आपल्याला माहित आहेत. यानंतरच्या वर्णनात देखील राजांचे हे बारकावे रघुकार कालिदासाने सुंदरपणे वर्णन केले आहेत. एवढ्या सर्व राजांच्या पराक्रमाचे, औदार्याचे वर्णन करून झाल्यानंतर शेवटच्या राजाचे वर्णन करताना त्याचा विलासीपणा, लंपटपणा, बेफिकिरी आणि त्यामुळे तो रघुकुलाला कसा कलंक ठरला याचे वर्णन देखील कालिदास तेवढ्याच ताकदीने करतो.

३) भारवीचे किरातार्जुनीयम

(किरातार्जुनीयम च्या कथानकाविषयी विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा )

(किरात अर्जुन युद्ध व त्यानंतर अर्जुनाचे निवातकवच नावाच्या समुद्राखाली राहणाऱ्या राक्षस समूहाशी युद्ध हि कथा आपल्याला पट्टदकल येथी विरुपाक्ष मंदिरात आढळते .  त्याबद्दलची माहिती येथे मिळेल )

पंचमहाकाव्ये - Pancha Mahakavya in Sanskrit - किरातार्जुनीय
किरात वेशातील शंकर व अर्जुन यांचे युद्ध शिल्प – कैलासनाथार मंदिर, कांचीपुरम

किरातवेशातील शंकर आणि पांडव अर्जुन यांच्यातील द्वंद्व युद्धाची ही छोटीशी कथा भारवीने किरातार्जुनियम या महाकाव्यात रंगविली आहे. वीररस हा या महाकाव्याचा प्रधान रस आहे. भारवीच्या भाषेचे वर्णन मल्लिनाथाने नारीकेलपाक असे केले आहे. म्हणजेच ती नारळासारखे बाहेरून कठीण पण आत मृदू आहे. क्लिष्ट वाटणारी असली तरी ती रसपूर्ण आहे. याबद्दलचा एक श्लोक कोण्या एका माघाच्या प्रशंसकाने सांगितला आहे तो असा

उपमा कालिदासस्य, भारवे: ह अर्थगौरव ।
दण्डीन: पदलालित्यम, माघे संती त्रयोगुण:।।

भारवी ने वापरलेले बंध खूप कठीण आहेत त्यामुळे त्याचे काव्य अर्थ समजण्यासाठी कठीण वाटते पण त्यामुळे पांडित्य प्रदर्शन जास्त केल्यासारखे देखील वाटत राहते. त्याने या काव्यात गोमुत्रिका बंध, मुरजबंध, सर्वतोभद्र असे क्लिष्ट बंध वापरले आहेत. त्यामुळेच त्यातील माधूर्य व गोडी देखील चटकन समजत नाही. त्याच्या या काव्याच्या प्रथम तीन सर्गातील श्लोक अर्थ लावायला अतिशय कठीण आहेत म्हणून त्यांना पाषाणत्रयम म्हणून ओळखतात.

या महाकाव्याच्या कथेचे उपजीव्य हे महाभारतातील वन पर्वात आहे. पांडव द्वैत वनात असताना दुर्योधन हस्तिनापुरवर कसे राज्य करतो आहे याची बातमी हेरांद्वारे युधिष्ठिराला समजते. त्याच्या राज्यात प्रजा सुखी आहे हे ऐकून द्रौपदीला संतापली आणि तिने युधिष्ठिराला युद्धाची तयारी करण्यास सांगितले. यावर व्यासांनी युद्ध करण्यापूर्वी युद्धसज्ज होण्याचा सल्ला पांडवांना दिला आणि त्याचा एक भाग म्हणून अर्जुनाने शिवाचे पाशुपतास्त्र मिळवावे असे सांगितले.

ते मिळविण्यासाठी अर्जुन इंद्रकील पर्वतावर गेला. या पर्वतावर जात असताना त्याच्या दृष्टीस पडणारे सृष्टी सौंदर्य, ऋतूंची रमणीयता, गंधर्व आणि अप्सरांचे सौंदर्य, पुढे अर्जुनाची तपश्चर्या भंग करण्याकरता अप्सरांनी केलेले प्रयत्न, त्या कालावधीतील सूर्योदय-सूर्यास्त आणि चंद्रोदय-चंद्रास्त यांची वर्णने यातून भारवीने आपले पंडित्य प्रदर्शन केले आहे. तेथे जेव्हा त्याने  तपश्चर्या सुरू केली तेव्हा प्रथम इंद्र अर्जुनाचा तपोभंग करण्यासाठी साधूच्या वेशात येतो आणि त्याला तपाचरणापासून परावृत्त करायचा प्रयत्न करतो. येथे आपल्याला कालिदासाच्या कुमारसंभव काव्यातील पार्वती आणि बटू यांच्यातील संवादासारखाच एक संवाद पाहायला मिळतो. यात पण शेवटी त्याच्या दृढनिश्चयावर प्रसन्न होऊन इंद्र त्याला आशीर्वाद देत अंतर्धान पावतो.
यानंतर अर्जुन त्याचे तपाचरण अधिक कठोर करतो. त्यामुळे मग शिवाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि शंकर-पार्वती किरात वेषात त्या पर्वतावर आले. त्यांचे गण देखील भिल्ल वेशात आले व मूक नावाचा एक असुर वराह रूपात त्या पर्वतावर प्रकटला. अर्जुन शिकारीसाठी निघाला तेव्हा त्याने त्या वराहाला पाहिले आणि आपल्या गांडीव धनुष्यातून त्याच्या दिशेने बाण सोडला. तिथे त्या शिकारी जवळ जाताच त्यात दोन बाण असल्याचे निदर्शनास आले कारण किरातवेशातील शंकराने देखील आपल्या पिनाक धनुष्यातून त्याचवेळी बाण सोडला होता व ही शिकार आपलीच आहे हे सांगण्यासाठी ते देखील पुढे आले.

ही शिकार कोणाची यावर अर्जुन आणि किराताचे युद्ध सुरू झाले आणि त्यात अर्जुनाचे बाण व अस्त्रे संपल्यानंतर त्याने वृक्ष उन्मळून त्याने युद्ध सुरू केले. सरते शेवटी तर मुष्टीयुद्ध सुरू झाले आणि त्यावेळी अर्जुनाचा तो त्वेष आणि आवेश पाहून शंकराने त्याला विजय दिला आणि प्रसन्न होऊन आपले पाशुपातास्त्र देखील दिले.

भारवीचे अठरा सर्गांचे हे काव्य सुमारे १०४० श्लोकांचे आहे. यात जागोजाग आपल्याला विविध अलंकारांची आणि सुभाषितांची पेरणी केलेली आढळते. मोजक्या शब्दात अतिशय आशयघन श्लोक भारवींनी लिहिले असल्यामुळे कधी कधी त्याचा अर्थ लावणे त्यामुळेच कठीण होऊन बसते. त्यामुळेच संस्कृत साहित्यातील कृत्रिमता आणि क्लिष्टता आणि त्यामुळे होणारे पांडित्य प्रदर्शन भारवीपासूनच सुरू झाले असे आपल्याला मानता येऊ शकते. पुढे माघाने देखील भारवीचे अनुकरण केलेले आपल्याला दिसून येते.

४) माघाचे शिशुपालवधम

माघाने भारवीशी स्पर्धा करण्याकरताच जणू त्याचे हे २० सर्गांचे आणि १६५० श्लोकांचे महाकाव्य सातव्या शतकाच्या उत्तरार्धात रचले. याची कथा देखील महाभारतातील सभापर्वावर आधारित आहे. केलेल्या राजसूय यज्ञाच्या वेळी श्रीकृष्णाने त्याच्या अग्र पूजेला विरोध करणाऱ्या शिशुपालाचा वध केला या घटनेवर आधारलेले माघाचे हे महाकाव्य आहे. मात्र माघाने यात आपल्या आवश्यकतेनुसार कथा बदल केला आहे.

या काव्यातील वर्णने देखील भारवीच्या काव्याशी स्पर्धा करणारी आहेत. भारवीच्या काव्यात हिमालयातील इंद्रकील पर्वताचे व तेथील निसर्गसौंदर्याचे वर्णन येते तर या काव्यामध्ये रैवतक पर्वताचे वर्णन येते. भारवीने आपल्या काव्यात युधिष्ठिर, भीम आणि द्रौपदी यांच्यातील राजकारण चर्चा रंगविली आहे तर माघाने आपल्या काव्यात श्रीकृष्ण बलराम आणि उद्धव यांच्यातील चर्चा दर्शविली आहे. माघाच्या या चर्चेचे कारण आहे इंद्राकडून नारदाकरवीआलेला एक निरोप.

या निरोपानुसार चेदीराज शिशुपाल उन्मत्त झाला असून त्याच्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी श्रीकृष्णाने त्याचा वध करणे आवश्यक आहे. याची आवश्यकता सांगताना नारद श्रीकृष्णाला सांगतात की नृसिंह अवतारात त्याने हिरण्यकश्यपूचा वध केला होता, पुढे श्रीराम अवतारात त्याने रावणाचा वध केला होता तो हिरण्यकश्यपू व तो रावण म्हणजेच आत्ताचा शिशुपाल. त्यामुळे त्याचा वध श्रीकृष्णांच्या हस्ते होणे क्रमप्राप्त आहे.

नारदाचा हा निरोप श्रीकृष्णाला कोड्यात टाकतो कारण त्याचवेळी युधिष्ठिरकडून आलेले राजसूय यज्ञाचे निमंत्रण स्वीकारून श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाकडे प्रस्थान करणार होता. त्यामुळे आता काय करायचे याविषयी तो बलराम आणि उद्धव यांच्याशी चर्चा करतो. यावेळी बलराम आपल्या स्वभावानुसार त्याला चेदीराज यावर आक्रमण करून प्रथम शिशुपालला संपवण्याचा सल्ला देतात तर उद्धव मात्र संयमीत राहून, तर्कसंगत विचार करत आत्ताच शिशुपाल वधाची घाई न करण्याचा सल्ला श्रीकृष्णाला देतो.

उद्धवाचा सल्ला मानत श्रीकृष्ण द्वारकेतुन  ससैन्य आणि सपरिवार इंद्रप्रस्थाकडे जायला निघतो. येथेच आपल्याला माघाच्या शब्द भांडाराची, शैलीची, रमणीय अलंकार पद्धतीची कल्पना येते कारण या प्रवासातील निसर्ग सौंदर्याचे वर्णन माघाने अतिशय सुंदर शब्दात टिपले आहे. श्रीकृष्णसह यादव सेना इंद्रप्रस्थात पोहोचते आणि तेथे श्रीकृष्णाला पाहण्यासाठी सर्वांची झुंबड उडते.

पुढे युधिष्ठिरचा राजसूय यज्ञ सुरळीतपणे पार पडतो आणि त्या यज्ञ समाप्तीनंतर भीष्मांच्या सांगण्यावरून युधिष्ठिर अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला देतो. ते पाहून तेथे उपस्थित असलेल्या शिशुपालाचा जळफळाट होतो. तो आपल्या दूताकरवी श्रीकृष्णाला मानहानीकारक संदेश पाठवतो आणि श्रीकृष्णाची सेना व शिशुपालाची सेना यांच्यातील युद्धाला तोंड फुटते. सरते शेवटी शिशुपाल कृष्णाला युद्धाचे आव्हान देतो व तुम्ही रणकंदनानंतर श्रीकृष्ण आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध करतो.

महाभारताच्या मूळ कथानकामध्ये अशाप्रकारे दूताकरवी संदेश धाडणे, दोन सेना मधले युद्ध, वगैरे युद्धप्रसंग नाहीत जे माघाने आपल्या कथेच्या विस्ताराकरता वाढविले आहेत. माघ अनेक वर्णनातून, प्रसंगांतून भारवी वरताण करण्याचा प्रयत्न करतो असे बऱ्याच विद्वानांनी नमूद करून ठेवले आहे. हे करताना आपल्या पंडित्यप्रदर्शनासाठी तो शब्दांचे अनेक खेळ देखील करतो. एकच अक्षर घेऊन त्याच्या विविध रचनांमधून माघाला जे अर्थ ध्वनीत करायचे आहेत ते समजण्यासाठी आपल्याला मल्लिनाथाच्या टीकेचाच आधार घ्यावा लागतो, अन्यथा त्याची संगती लावणे कठीण होऊन बसते.

भारवी शिवभक्त आहे तर माघ विष्णू भक्त. त्यामुळे कृष्णचरित्राचा भाग असलेला शिशुपाल वध श्रीकृष्णाचे चारित्र्य उंचावण्याचा प्रयत्न करतो यात नवल नाही. पण असे करताना त्यात कृत्रिमता आल्याने हे काव्य संस्कृत साहित्याच्या ऱ्हासकाळातील एक काव्य मानले जाते.

५) श्रीहर्षाचे नैषधीयचरित्

नैषधीय चरित्र म्हणजे रघुवंशातीलच एका राजाचे चरित्र आहे. रामाचा पुत्र कुश, याचा पुत्र अतिथी व अतिथीचा पुत्र निषध याचा पुत्र म्हणजे नल. नल दमयंतीच्या विवाहाची कथा महाभारतातील वनपर्वातच नलोपाख्यान या नावाने येते. महाभारतातील अवघ्या १८६ लोकांच्या या कथेला श्रीहर्षाने २२ सर्गांचे व २८०४ श्लोकांचे महाकाव्य बनवले. यात इतर कवींप्रमाणेच श्रीहर्षाने देखील मूळ कथेत आपल्या काव्याच्या आवश्यकतेनुसार बदल घडवून आणले आहेत.

नलदमयंतीचे प्रेम प्रकरण आणि त्यातून होणारा दमयंती स्वयंवरानंतरचा त्यांचा विवाह, या साऱ्या वर्णनातून आपल्याला या काव्याचा प्रधान रस शृंगाररस असल्याचे सहज लक्षात येते. या काव्यात युद्धप्रसंग अथवा वीर रस जवळजवळ नाहीच. मात्र या स्वयंवरादरम्यान होणाऱ्या नलाच्या आणि दमयंतीच्या मानसिक ओढाताणीतून एका वेगळ्या मनस्थितीचे वर्णन करणारे काव्य श्रीहर्षाने सुंदर शब्दात रंगविले आहे.

आधीच्या महाकाव्यांच्या कवींच्या सापेक्ष श्रीहर्षाचा काळ बराच नंतरचा म्हणजे सुमारे १२ व्या शतकातील. तो राजा विजय चंद्र आणि जयंत चंद्र यांच्या राज्यसभेत कवी होता. या नैषधीयचरित्राच्या प्रत्येक सर्गाच्या शेवटी आणि ग्रंथ समाप्तीनंतर त्याने स्वतःच्या चरित्राबद्दलचे कथन केले आहे त्यातून आपल्याला श्रीहर्षाची माहिती उलगडत जाते. यात ऋतू अथवा निसर्गाची वर्णने नाहीत, युद्ध नाहीत त्यामुळे श्रीहर्ष आपल्याला माघ किंवा भारवी यांच्याशी स्वतःची तुलना करताना आढळत नाही. श्रीहर्षाचे काव्य एखाद्या कवट फळासारखे कठीण आहे. स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात त्याची भाषा कठीण होत जाते. ती केवळ विद्वानांसाठी औषधासारखी आहे, म्हणजेच क्लिष्ट कटू पण हमखास गुण देणारी अशा प्रकारची मानली जाते. पण त्याची अलंकारांची पखरण आणि भाषा प्रभुत्व वाखाणण्यासारखे आहे.

पंचमहाकाव्ये - नैषधीयचरितम - हंसदौत्य
नैषधीय चरितम – हंसदौत्य – राजा रवी वर्मा यांचे चित्र

दमयंतीच्या प्रेमात पडलेला नलराजा आणि त्याचवेळी नलराजाच्या प्रेमात पडलेली दमयंती यांची ही कथा. आपले निरोप ते एकमेकाला हंसाच्याद्वारे पोहोचवत. या काव्यातील हंसदौत्य प्रसिद्ध आहे. दमयंती रूपसुंदरी असल्याने तिचे स्वयंवर मांडल्यावर केवळ नळराजाच नाही तर इंद्र, अग्नी, यम आणि वरूण या देवतांना देखील तिचा मोह पडला व ते देखील या स्वयंवराला उपस्थित झाले. दमयंतीचा ओढा नलाकडेच आहे आणि ती कदाचित त्यालाच माळ घालेल याची खात्री पटल्याने देवतांनी वेगळीच चाल चालायचे ठरवले आणि त्यांनी नळालाच दमयंतीकडे आपला दूत म्हणून पाठवत त्यांच्यापैकी एकालाच वरण्याची विनंती केली.

एवढेच करून ते थांबले नाहीत तर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष स्वयंवरात त्या चारही देवतांनी नलाचे स्वरूप धारण केले. त्यामुळे या पाच जणांपैकी चार देवता कोणत्या आणि खरा नल कोणता असा संभ्रम दमयंतीला पडावा हा हेतू होता. पण चतुर दमयंतीने त्यांच्या काही खुणा ओळखत म्हणजे, जसे देवांची सावली पडत नाही किंवा त्यांचे पाय जमिनीला लागत नाहीत हे ओळखत खऱ्या नलराजाला वरले.

 


 

आभार – मैथिली संजीव पोतनीस – संस्कृत प्राध्यापिका – मुंबई विद्यापीठ , 

संदर्भ – अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास – डॉ .  मंजूषा गोखले ,  डॉ .  गौरी माहुलीकर ,  डॉ .  उमा वैद्य