वेरूळचे रामेश्वर लेणे २१ (Ellora Cave 21-Rameshawar Lene) – कालिदासाचे कुमारसंभव हे महाकाव्य आपल्याला शिल्परूपात कोरलेले आढळते ते २१  क्रमांकाच्या रामेश्वर लेण्यात .  वेरूळमधील पाहण्यासारखी जी हिंदू लेणी आहेत त्यातील हे एक उत्कृष्ट लेणे. या लेण्यात दोन उत्कृष्ट शिल्प पट आहेत त्यातील एक म्हणजे कालिदासाच्या कुमारसंभवम या महाकाव्यावरील शिव पार्वती विवाहाचा व दुसरा सप्त मातृकांचा.

कालिदासाच्या कुमारसंभव महाकाव्याचा शिल्प पट

कुमारसंभव हे कालिदासाचे शिवपार्वती विवाह व तारकासूर वधासाठी कुमार कार्तिकेयाचा जन्म या पुराणकथेवर आधारित महाकाव्य. वेरूळच्या क्र २१ च्या रामेश्वर लेण्यात हे काव्य शिल्प रुपात जिवंत करण्यात आले आहे.

दक्षाच्या यज्ञात आपल्या पतीचा, शंकरांचा अपमान झाला म्हणून दक्षकन्या सतीने उडी घेतल्यावर शंकर एकटेच उद्विग्न अवस्थेत भटकत होते. सतीने हिमालय व मेना या जोडप्याच्या पोटी पार्वती रूपाने पुन्हा जन्म घेतला. या समयी देव तारकासुराच्या त्रासामुळे त्रस्त झालेले होते व शिव पार्वतीचा पुत्र कार्तिकेयच तारकासुराला मारू शकेल हे विधिलिखित होते.

शंकराच्या प्राप्तीसाठी पार्वतीने तप सुरू केले. इंद्राच्या आज्ञेवरून कामदेव मदनाने शंकराला चेतविण्याचे ठरविले पण याचमुळे शंकराच्या क्रोधाग्नित तो भस्म झाला. (ही घटना “मदनदाह” शिल्पाने दाखविली जाते).

पार्वतीचे पंचाग्नी तप - वेरूळ रामेश्वर लेणे २१
४ अग्नीच्या मध्ये उभी पार्वती व डोक्यावर सूर्य असे पंचाग्नी तप, बटुरूपातील शिव, उजव्या कोपऱ्यात मगरीने पाय धरलेला शिव व स्व-रूपात प्रकटलेला शिव – वेरूळ रामेश्वर लेणे २१

यानंतर पार्वतीने आपले तप अजून कठोर केले. याला “पंचाग्नी तप” म्हणतात. चारी बाजूंनी अग्नी व डोक्यावर तळपता सूर्य अशा ५ अग्नीमधील हे तप वेरूळच्या क्र २१ च्या रामेश्वर लेण्यात दाखविले आहे. तिची परीक्षा घेण्यासाठी शंकर बटू वेषात आले व त्यांनी भिक्षान्न मागितले तेव्हा पार्वतीने त्यांना नदीवर स्नान करून या, तोवर जेवण तयार ठेवते असे सांगितले. तेव्हा शंकरांनी आपली माया दाखविली. नदीवर त्यांचा पाय मगरीने पकडला व तो सोडविण्यासाठी त्यांनी पार्वतीला आर्त साद घातली (हा भाग महाकाव्यात नाही ). पार्वती त्यांना खेचण्यासाठी हात पुढे करणार तोच आपण शंकराशिवाय इतर कोणत्याही पुरुषाला स्पर्श करणार नाही ही तिचीच प्रतिज्ञा तिला आठवली. तिची ती अवस्था शंकरांनी ओळखली, ते प्रसन्न झाले व स्वतःच्या मूळ रूपात प्रकट झाले.

सुज्ञ शिल्पकाराने एकाच शिल्पात हा संपूर्ण प्रसंग शिल्पबद्ध केलाय. डाव्या बाजूला ४ अग्नींच्या मधे उभी असणारी पार्वती दिसते. तिच्या डावीकडे एक बसलेली सेविका तर उजवीकडे उंच उभी सेविका हातात पेटीसदृश्य वस्तू घेऊन उभी आहे. पार्वतीच्या डावीकडे एक कमंडलूधारी यती/ बटू तिच्याकडे भिक्षा मागतो आहे तर शिल्पाच्या उजव्या कोपऱ्यात तोच बटू तळ्यात उतरलाय व त्याचा पाय मगरीने धरलाय असे दृश्य आहे. त्याच्यासमोर संभ्रमित पार्वती उभी आहे तर अगदी उजव्या कोपऱ्यात शंकर यति रूप सोडून आपल्या मूळ रूपात आले आहेत.
एवढ्या सगळ्या घटना एकाच शिल्पात दाखविण्याचे शिल्पकाराचे कसब वाखाणण्याजोगे आहे.

उत्तरेकडील याच भिंतीवर या शिल्पाच्या डावीकडे अजून दोन शिल्पपट आहेत ते म्हणजे

(१) पार्वतीचा पिता हिमालयाकडे पार्वतीची शंकरांसाठी  मागणी घालताना ब्रह्मदेव – यात आपल्याला ब्रह्मदेव व देवगुरु बृहस्पती हे दोघे, पार्वतीचा पिता हिमालय (हिमवान) याच्याकडे  शंकरासाठी त्याच्या कन्येला, पार्वतीला मागणी घालताना दिसतात. कालिदासाने मात्र अशी मागणी घालण्यासाठी सप्तर्षी हिमालयाला भेटले होते असे वर्णन केले आहे.

पार्वतीच्या पित्याकडे-हिमालयाकडे शिव पार्वती विवाहाचा प्रस्ताव ठेवताना ब्रह्मा व देवगुरु बृहस्पती - वेरूळ रामेश्वर लेणे २१
पार्वतीच्या पित्याकडे-हिमालयाकडे शिव पार्वती विवाहाचा प्रस्ताव ठेवताना ब्रह्मा व देवगुरु बृहस्पती – वेरूळ रामेश्वर लेणे २१

व (२) शिव पार्वती विवाहाचे चित्रण – दुसऱ्या शिल्पात शिव पार्वती विवाहाचे दृश्य आहे. यात कलशधारी हिमालय कन्यादानासाठी शिव पार्वतीच्या मध्ये उभा असून खाली ब्रह्मा अग्नी चेतवून लाजा होम करीत असल्याचे दर्शविले आहे. यात शिव पार्वतीचे दोन्ही पुत्र म्हणजे कार्तिकेय व गणेश यांची पण उपस्थिती दिसून येते. उजवीकडे निरखून पाहिले तर शंख घेऊन उभा असलेला विष्णू आपल्या लक्षात येतो. याच प्रकारच्या शिल्पाना कल्याणसुंदर शिल्प असे देखील म्हणतात व त्याचा वेगळा आढावा आपण वेगळी लेखातून घेऊ.

शिव पार्वती विवाह-वेरूळ रामेश्वर लेणे २१
शिव पार्वती विवाह-वेरूळ रामेश्वर लेणे २१

ही तीनही शिल्पे मिळून कालिदासाच्या कुमारसंभव या महाकाव्याची सर्वसाधारण कथा तयार होते. याला जोडूनच डावीकडे म्हणजे पश्चिम दिशेने कार्तिकेयाचे एक सुंदर शिल्प आहे. “कुमारसंभव” म्हणजेच या शिवपार्वती विवाहातून तारकासुराच्या वधासाठी जन्मलेला पुत्र कुमार कार्तिकेय. कुमार कार्तिकेयाचे हे मोठे शिल्प असून त्याच्या डाव्या हातात कोंबडा आहे आणि दोन्ही बाजूनी बकऱ्याचे डोके असलेले नैगमीष आहेत. कार्तिकेयाचे वाहन मयूर यात दाखविले असून या मोराचे डोके भंगलेले आहे. शिल्पाच्या वरील भागात आकाशातील विद्याधर असावेत.

(टीप : कालिदास विरचित कुमारसंभव महाकाव्याची कथा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा) 

कार्तिकेय-वेरूळ रामेश्वर लेणे २१
कार्तिकेय-वेरूळ रामेश्वर लेणे २१

रामेश्वर लेण्यातील इतर शिल्पे

या लेण्याच्या बाहेरच एक मोठा नंदी आहे व डावीकडे मगरावर आरूढ गंगा तर उजवीकडील कोपऱ्यात कासवावर आरूढ यमुना आपल्याला आढळून येते.

मकर वाहनावर उभी असलेली गंगा- रामेश्वर लेणे २१ , वेरूळ
मकर वाहनावर उभी असलेली गंगा– रामेश्वर लेणे २१ , वेरूळ
कासव वाहनावर उभी असलेली यमुना - रामेश्वर लेणे २१ , वेरूळ
कासव वाहनावर उभी असलेली यमुना – रामेश्वर लेणे २१ , वेरूळ

लेण्याच्या आत प्रवेश केल्यावर उजवीकडे (दक्षिण दिशेला) असलेल्या कक्षात

अशी शिल्पे आपल्याला आढळतात.

सप्तमातृका-डावीकडून उजवीकडे वीरभद्र, , ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा आणि गणपती
नृत्य शिव
नृत्य शिव
काल पुरुष

तर बाहेरील भागात

  • उजवीकडील  भिंतीवर  सारीपाट खेळणारे शिवपार्वती आणि
  • डावीकडील भिंतीवर रावणानुग्रहाचे म्हणजेच कैलास उचलणाऱ्या रावणाचे शिल्प आहे.
शिव पार्वती सारीपाट - वेरूळ रामेश्वर लेणे २१
शिव पार्वती सारीपाट – वेरूळ रामेश्वर लेणे २१
रावणानुग्रह - वेरूळ रामेश्वर लेणे २१
रावणानुग्रह – वेरूळ रामेश्वर लेणे २१

या दोन्ही शिल्पांची सविस्तर ओळख एका वेगळ्या लेखात असेल .

महिषासुरमर्दिनी - वेरूळ रामेश्वर लेणे २१
महिषासुरमर्दिनी – वेरूळ रामेश्वर लेणे २१

डावीकडे (उत्तर दिशेला) असलेल्या कक्षात आपल्याला महिषासुरमर्दिनीचे  उत्कृष्ट शिल्प आणि उत्तर भिंतीवर या आधी वर्णन केलेला कालिदासाच्या कुमारसंभव कथेचा संपूर्ण पट आढळतो.

एकंदरीतच हे लेणे एक उत्कृष्ट लेणे असून वेरूळ पाहायला जाणाऱ्यांनी चुकवू नये असेच आहे .


संदर्भ

  1. शिवमूर्तये नमः  – लेखक डॉ गो. बं. देगलूरकर
  2. Ellora – by M.K. Dhavlikar
  3. Video on सप्तमातृका by Dr. Rahul Deshpande (link in Article).