अर्धनारीश्वर शिव- Ardhanarishvara Shiv शिवशक्ती आणि नारीशक्तीचे एकत्रित रूप.

अर्धनारीश्वर शिव - घारापुरी लेणी
अर्धनारीश्वर शिव – घारापुरी लेणी

शिव आणि नारीशक्ती एकत्र येत शिवाचे एक रूप मानले गेलेल्या अर्धनारीश्वराचे रूप आकार घेते. या स्वरूपातील शिव म्हणजे उजवीकडील अर्ध्या बाजूला पुरुष व त्याच शरीराच्या अर्ध्या डाव्या बाजूला स्त्री असे हे आगळेवेगळे रूप आहे. या स्वरूपातील शिवमूर्ती आपल्याला काही मंदिरांमध्ये आढळून येतात. यालाच सांख्य तत्त्वज्ञानातील सृष्टीनिमिर्तीसाठीचे “पुरुष” आणि “प्रकृती”चे स्वरूप देखील मानले जाऊ शकते. अर्धनारीश्वर हे एक असे प्रतीक आहे की ज्याचा  स्त्री आणि पुरुष तत्त्वे अविभाज्य भाग आहेत. संमिश्र रूप विश्वातील विरुध्दार्थीचे ऐक्य व्यक्त करते. अर्धनारीश्वराचा पुरुष अर्धा म्हणजे सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष आणि अर्धी स्त्री म्हणजे प्रकृती.

शिवपुराणातील कथेनुसार विश्वनिर्मात्या ब्रह्मदेवाने सर्व नर प्राणी, प्रजापतींना निर्माण केले आणि त्यांना निर्मिती करण्यास सांगितले, पण त्यांना ते एकट्याने शक्य नव्हते. सृष्टीच्या निर्मितीप्रक्रियेत घट झाल्यामुळे ब्रह्मा गोंधळून गेला आणि मदतीसाठी शिवाचा विचार करू लागला. ब्रह्मदेवाला त्याच्या या अज्ञानाचे ज्ञान देण्यासाठी, शिव अर्धनारीश्वर म्हणून त्याच्यासमोर प्रकट झाला. ब्रह्मदेवाने शिवाच्या अर्ध्या नारीकडे सृष्टी चालू ठेवण्यासाठी एक स्त्री देण्याची प्रार्थना केली. देवीने सहमती दर्शविली आणि तिच्या शरीरातून विविध स्त्री शक्ती निर्माण केल्या, ज्यामुळे पुढे सृष्टीची निर्मिती अव्याहतपणे सुरु झाली.

अर्धनारीश्वर शिव - डोक्यावर गंगा - बृहदीश्वर मंदिर , तंजावर
अर्धनारीश्वर शिव – डोक्यावर गंगा – बृहदीश्वर मंदिर , तंजावर
अर्धनारीश्वर शिव - नंदीसह - बृहदीश्वर मंदिर , तंजावर
अर्धनारीश्वर शिव – नंदीसह – बृहदीश्वर मंदिर , तंजावर

अर्धनारीश्वराची अनेक शिल्पे आपल्याला बऱ्याच मंदिरांमध्ये आढळून येतात. अर्धनारीश्वराचे हे शिल्प घारापुरीच्या लेण्यात जसं आढळते तसेच ते तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरामध्ये देखील. वेरूळच्या लेण्यात देखील आपल्याला अर्धनारीश्वर पाहायला मिळतो. यातील मूर्ती बरेचदा त्रिभंग अवस्थेत म्हणजेच मान, व कंबर अशा २ ठिकाणी वळण आल्याने ३ भागात उभी असल्यासारखी भासते तर काहीवेळा ही समभाग स्थितीत म्हणजे दोनही पायांवर सारखाच भार देऊन सरळ उभी असते. बऱ्याचदा अर्धनारीश्वराचा उजवा अर्धा भाग पुरुष असतो आणि डावीकडे स्त्री असते. डावी बाजू हे हृदयाचे स्थान आहे म्हणजे अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलता यांसारख्या ‘स्त्री’ वैशिष्ट्यांशी संबंधित असलेलाल भाग, तर उजवीकडील भाग मेंदू आणि ‘पुरुष’ वैशिष्ट्यांशी संबंधित असलेला भाग- तर्कशास्त्र, शौर्य आणि पद्धतशीर विचार. अर्धनारीश्वर “मूळात शिव आहे, पार्वती नाही”. हे पौराणिक कथांमध्ये देखील दिसून येते. पार्वती शिवाचा एक भाग बनते व मूर्तिशास्त्रातही तसेच प्रतिबिंबित होते. यातील शिवाला अनेकदा दोन भुजा असतात आणि पार्वतीला मात्र एकच भुजा दाखविली जाते, आणि त्याचे वाहन नंदी या शिल्पांमध्ये असतो. म्हणजेच असे शिल्प हे त्रिभुज (२ शिवाच्या आणि १ पार्वतीची) असते.

अर्धनारीश्वर शिव - नंदीसह - वेरूळचे कैलास लेणे
अर्धनारीश्वर शिव – नंदीसह – वेरूळचे कैलास लेणे

बृहदीश्वर मंदिराच्या बाह्य भागावर अर्धनारीश्वराची २  वेगवेगळी शिल्पे आहेत त्यातील एका शिल्पात तर अर्धनारीश्वराच्याच शिल्पात शिवाच्या मस्तकी गंगा देखील दाखविलेली आहे. अशी शिल्पे दुर्मिळ असतात.