Kashmir is not only a Tourist Hub but it was a major seat of Hindu and Buddhist Religions. This fact is evident from various Hindu Temples of Kashmir and some Buddist Sites.
काश्मीरचे सुप्रसिद्ध शंकराचार्य मंदिर – Shakaracharya Temple

श्रीनगर जवळ एका टेकडीवर सुप्रसिद्ध शिवमंदिर (जेष्ठेश्वर मंदिर) आहे. काश्मीरात येणारे हिंदू पर्यटक या शिवमंदिराला निश्चितच भेट देतात व त्यामुळे येथे भाविकांची फारच वर्दळ असते. सुमारे ८ व्या शतकातील हे मंदिर काश्मीरातील आद्य मंदिरांपैकी एक आहे. या स्थानावर आदि शंकराचार्यांनी वास्तव्य केले होते असे मानतात म्हणून हे शिवमंदिर शंकराचार्यांचे मंदिर म्हणूनच ओळखले जाते. येथील शिवपिंड भव्य आहे.
फ्रान्सिस यंगहाऊसबँड (Francis Younghousband) यांनी काश्मीर (१९११) या पुस्तकात या मंदिराचा उल्लेख केला आहे. हे इ स पूर्व २२० पूर्वीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे व ते गोपादित्याने (इ.स. २५३ ते ३२८) या टेकडीवर बांधले. हे मंदिर पूर्वी ज्येष्ठेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाई. आद्य शंकराचार्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे शिवमंदिर सध्या शंकराचार्य मंदिर म्हणून ओळखले जाते. अवघ्या ३२ वर्षाच्या छोट्याश्या कारकिर्दीत आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी बरेच मोठे काम करुन ठेवले आहे.
अवंतीश्वर(शिव), अवंतीस्वामी(विष्णु) मंदिरे
(Avantishwar and Avantiswami Temple)


अनंतनाग आणि श्रीनगर यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अवंतीपुरची दोन मंदिरे आहेत. कर्कोटक राजघराण्याचा पराभव करुन राज्यावर येणाऱ्या राजा अवंतीवर्मन (उत्पल राजघराणे) या राजाने अवंतीपूर शहर वसविले (९ वे शतक) व या २ मंदिरांचे निर्माण देखील केले. यातील अवंतीश्वर (शिवाला समर्पित) आणि अवंतीस्वामी (विष्णूला समर्पित) ही दोन मंदिरे एकमेकांच्या जवळ आहेत. दोन्ही मंदिरांची रचना आणि स्वरूप सारखेच आहे. या राजा अवंतीवर्मनाचे एक शिल्प देखील आपल्याला अवंतीस्वामी मंदिरात आढळते. अवंतीवर्मनच्या कारकिर्दीत या प्रदेशाची भरभराट झाली. अवंतीस्वामी मंदिर हे त्या काळातील काश्मीरच्या दगडी मंदिर वास्तुकलेचे उदाहरण आहे.


मार्तंड (सूर्य) मंदिर – मट्टन – Martand Sun Temple

पहलगाम पासून सुमारे ३० किमी अंतरावर असणाऱ्या मट्टन येथील मार्तंड सुर्य मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक. काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तपीड (७ वे शतक) याने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख कल्हणाच्या राजतरंगिणी या ग्रंथात येतो. आज या मंदिरात सूर्यमूर्ती नसली तरी मंदिराच्या भिंतींच्या एका बाजुला आपल्याला घोड्यावर स्वार असलेला आगळावेगळा सूर्य पाहायला मिळतो. खरं तर मट्टन हे गावाचे नाव देखील मार्तंड या नावावरून तयार झालेले काश्मिरी भाषेतील अपभ्रंशित रूप आहे.
मुस्लिमांच्या शिरकावापूर्वी काश्मीर हे बौद्ध तसेच शैव आणि हिंदू तत्त्वज्ञानाचे केंद्र आणि संस्कृत शिक्षण आणि साहित्याचे केंद्र होते. १४ व्या शतकापर्यंत मात्र काश्मीर मुस्लिमांच्या अधिपत्याखाली आले होते आणि १५ व्या शतकाच्या सुरूवातीस त्यातील बहुतेक मंदिरांचा विध्वंस करण्यात आला त्यात हे मार्तंड मंदिर देखील होते.
मुस्लीम शासक सिकंदर शाह मिरी जो स्वतःला बुत-शिकन म्हणजे मूर्तीभंजक म्हणवून घेई, याने १५ व्या शतकाच्या सुरुवातीस मार्तंड सूर्यमंदिराची तोडफोड करण्याचा आदेश दिला. हे काम सुमारे एक वर्ष चालले असे म्हणतात. यातच त्याने मंदिराच्या गाभाऱ्यात ओंडके टाकून पेटवून देण्याचा आदेश दिला. काश्मीर खोर्यातील हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा त्याचा प्रयत्न होता, जो मोठ्या प्रमाणावर हिंदूंचा छळ करून, हिंदू-बौद्ध संस्कृतीच्या प्रतिमा नष्ट करून आणि हिंदू आणि बौद्धांच्या मनात दहशत निर्माण करून यशस्वी झाला. त्याने मोठ्या प्रमाणात बौद्ध स्तूप देखील नष्ट केले.
मार्तंड सूर्य मंदिर दगडी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. यातील काही अवशेष श्रीनगरच्या श्री प्रताप सिंग संग्रहालयात धाडण्यात आले तर काही तेथेच विखुरलेले आहेत. उभ्या असलेल्या वास्तूवरील मूर्त्यांचे विद्रूपीकरण केले गेले तर उरल्यासुरल्या मूर्तीच्या भागांची झिज झाली आहे.
मार्तंड मंदिराचा हिंदी सिनेमातील वापर
पुरातन मार्तंड मंदिर परिसर अतिशय देखणा व निसर्गरम्य असल्याने हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्या काही गाण्यांच्या छायाचित्रणासाठी याचा उपयोग करून घेतलेला आपल्याला आढळतो. यात १९७० सालच्या मन की आँखे चित्रपटातील वहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेल्या “चला भी आ SSS आज रसिया ,ओ जानेवाले आजा तेरी याद सताये” या गाण्यातील पहिल्या कडव्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे तेव्हाचे भव्य मंदिर दिसते. त्यानंतरचे दुसरे गाणे आहे ते म्हणजे १९७४ सालच्या “आंधी” चित्रपटातील सुप्रसिद्ध “तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही” हे गाणे.

यातील गाण्यात तर एका ठिकाणी संजीव कुमार व सुचित्रा सेन यांच्या मध्ये या मंदिराच्या एका बाजूच्या भिंतीवर कोरलेली अश्वारूढ सूर्यमूर्तीदेखील स्पष्टपणे ओळखता येते.
या दोन्ही गाण्यातील एकेक कडवेच इथे चित्रित केले गेले होते व तरीदेखील या मंदिराचे भव्यपण आपल्या नजरेत भरण्यासारखे होते. मात्र २०१४ साली आलेल्या हैदर या चित्रपटातील “बिस्मिल, बिस्मिल” हे संपूर्ण गाणेच या मंदिराच्या आवारात चित्रित झाले, पण यात या मंदिराचे चित्रण सैतानाची गुफा असे केले गेल्याने व असा सैतानच प्रत्यक्ष या गाण्यातील कथानकाच्या अनुषंगाने दाखविला गेल्याने, हे गाणे तेव्हा विवादास्पद ठरले व या मंदिराचे नाव सर्वसामान्य हिंदूंना माहिती झाले. पण असे असले तरी काश्मीरला जाणारे सर्वच हिंदू पर्यटक या ठिकाणी येतातच असे नाही.
मार्तंड मंदिराची काही पुरातन छायाचित्रे

जॉन बर्क (१८४३-१९००) नावाचा एक आयरिश तरुण ब्रिटिश रॉयल इंजिनीअर्ससोबत फार्मासिस्ट म्हणून भारतात आला होता. त्याला छायाचित्रणात रुची असल्याने तो पेशावर येथील छायाचित्रकार विल्यम बेकर, जे निवृत्त सार्जंट होते त्यांचा सहाय्यक बनला. या द्वयीने १८६४ ते १८६८ या काळात काश्मीरचे बरेच छायाचित्रण केले यातील एक छायाचित्र मार्तंड मंदिराचे देखील होते. तेव्हा उजाड वाटणारा मंदिरा सभोवतालचा परिसर आता मात्र दाट वस्तीने भरून गेला आहे.
१८७० च्या सुमारासचे अजून एक रेखाचित्र / छायाचित्र

ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञ अलेक्झांडर कनिंगहॅम (१८१४-९३), एक तरुण ब्रिटिश आर्मी अभियंता म्हणून १८४५-४६ च्या पहिल्या शीख युद्धानंतर काश्मीरमध्ये तैनात होते. नोव्हेंबर १८४७ मध्ये, त्यांनी काश्मीरमध्ये अस्तित्वात असलेल्या बहुतेक प्राचीन वास्तूंचे मोजमाप आणि अभ्यास केला. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. ते आपल्या पुस्तकात म्हणतात
या मंदिराच्या निर्मितीच्या श्लोकांचा अर्थ बराच विवादित आहे – हे मंदिर स्वतः राणादित्यने बांधले होते, आणि अंतराळ, किंवा त्यापैकी किमान एक, त्याची राणी अमृताप्रभा यांनी बांधले होते. रणदित्यच्या कारकिर्दीची तारीख काहीशी अस्पष्ट आहे, परंतु तो इ स पाचव्या शतकाच्या पूर्वार्धात मरण पावला असे मानण्याला जागा आहे. याच कनिंगहॅम यांनी अजून एक मुद्दा प्रकाशात आणला आहे तो म्हणजे इ सनापूर्वी दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या टॉलेमी या ग्रीक ख-भूगोल अभ्यासकांचे मत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे कोणतेही प्रचंड मंदिर पांडवांनी बांधले असे म्हणण्याचा प्रघात आहे. याच प्रकारे काश्मिरातील मंदिरांनादेखील पांडव लारी अथवा पांडवांची घरं असे मानले गेले आहे. याच अनुषंगाने कनिंगहॅम याने टॉलेमीचे एक वाक्य उद्धृत केले आहे ते म्हणजे “पांडवांचे राज्य वितस्ता नदीवर असल्याचा”. दूर ग्रीक मध्ये कुठेतरी असणाऱ्या टोलेमीला देखील इ स पूर्व दुसऱ्या शतकात पांडवांच्या अथवा त्याच्या वंशजांच्या राज्याची व पर्यायाने महाभारताची कल्पना होती असे दिसते.

मंदिरात प्रवेशद्वाराच्या प्रत्येक बाजूला एक लहान अलिप्त खांब असलेली एक उंच मध्यवर्ती इमारत आहे, संपूर्ण मंदिर नक्षीकाम केलेल्या खांबांनी वेढलेल्या मोठ्या चौकोनात उभे आहे. मध्यभागी असलेल्या तिहेरी सोपानासह या मध्यवर्ती इमारतीची लांबी ६३ फूट, पूर्वेकडील बाजूस ३६ फूट रुंदी आणि पश्चिमेकडील किंवा प्रवेशद्वाराच्या टोकाला केवळ २७ फूट आहे. या मंदिराला सर्वसाधारण हिंदू मंदिरांप्रमाणे अर्ध मंडप, अंतराळ व गर्भ गृह आहे.

आजही मंदिर पाहताना या सर्व खुणा व मंदिराच्या सभोताली असलेली देवकोष्ठे आपल्याला दिसतात. त्यांची संख्या ६४ अथवा ८४ असावी. मंदिराचा जीर्णोद्धार सुरु असल्याने काही वर्षातच हे मंदिर पुन्हा आपल्याला त्याच्या गत वैभवात पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. मंदिराच्या सभोवताली फेरफटका मारताना आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या भागातील सौन्दर्याचे दर्शन होते. मंदिर परिसर जसा भव्य आहे तसेच हे मंदिर देखील. इतक्या विनाशानंतर व इतक्या वर्षांच्या पडझडीनंतर देखील आजही या मंदिराच्या अंतर्भागातील व बाहेरील भावावरील विविध भावमुर्ती त्याच्या गतवैभवाची साक्ष देत उभ्या आहेत. त्यामुळे हे मंदिर पाहायला जाण्यापूर्वी त्याच्या वैभवाचा हा इतिहास माहित करून घ्यायला हवा.
टीप : आमच्या या आगळ्यावेगळ्या “काश्मीर मंदिर” सहलीचे आयोजन पुण्याच्या मेघना बोकील यांनी केले होते व कोल्हापूरचे इंडोलॉजिस्ट श्री इंद्रनील बंकापूरे यांनी मंदिरांबाबत मार्गदर्शन केले.
