The Shilabalikas or Madanikars carved at the Chennakeshav Temple of Belur are a marvel of art of Sculpture. Few of these Shilabalika are described here.
बेलूरच्या चेन्नकेशव मंदिरातील दर्पण सुंदरी

बेलूरच्या चेन्नकेशव मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराच्या डाव्या छताकडच्या बाजूची ही प्रथम सुंदरी. नखशिखांत नटलेली व स्वतःचा हा साज शृंगार परिपूर्ण आहे की नाही ते आरश्यात न्याहाळणारी. शिल्पकाराने ही मूर्ती घडविताना जीव ओतलाय व ती प्रमाणबद्ध व जिवंत केलीय. तिची केशभूषा, दाग दागिने यातील बारकावे न्याहाळत राहावे असे वाटते. बारीकसारीक नक्षीकाम केलेली शिरोभूषणे, कर्णभूषणे, रुळणाऱ्या माळा, बाजूबंद, बांगड्या, पादभूषणे, तिची आरसा पकडण्याची पद्धत, तिच्या सळाळणाऱ्या वस्त्रांचे रेखाटन सारेच कसे अप्रतिम. थोडंसं बारकाईनं झूम करून पाहिलं तर तिच्या हाताची वाढलेली नखं व तिच्या पायातील जोडवीदेखील स्पष्ट दिसतात. आणि तिच्या पाठीमागची प्रभावळ देखील अगदी भरगच्च आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव विरहाचे असल्याचे जाणवते. इतका साजशृंगार करूनदेखील अजून आपला पती आपल्या भेटीला न आल्याचा विरह व खिन्नता तिच्या चेहऱ्यावर दिसून येते.

तिच्याबरोबर असणारी तिच्या उजवीकडची सेविका एका मर्कटाला कडेवर घेऊन आहे व हातातील द्राक्षांचा घड केवळ दाखवीत आहे. ती द्राक्ष न मिळाल्याने ते मर्कट आपलीच बोटे तोंडात घालू पहात असल्याचे देखील शिल्पकाराने कुशलतेने दर्शविले आहे. या दर्पण सुंदरीच्या सळाळणाऱ्या वस्त्राचा काही भाग त्या मर्कटाच्या चेहऱ्यावर आल्याचा बारकावादेखील शिल्पकाराने चित्रित केला आहे.
बेलूर मंदिरावरील लेखांमध्ये व पुस्तकांमध्ये हे छायाचित्र हमखास आढळून येते . भारतात इतरत्र आढळणाऱ्या दर्पणसुंदऱ्यांपेक्षा ही मूर्ती बरीच वेगळी, सुबक आणि मोहक आहे.
शुकभाषिणी

वसंत सुंदरी

या शिलाबालिकेच्या उजव्या हातात पिचकारी असावी पण आता हा हात तुटलेला आहे. तिच्या डाव्या हातात विड्याची पाने आहेत व तिच्यासोबत असलेल्या दोन सख्यांपैकी एक तिला बादलीतील पाण्याने पिचकारी भरून देतेय तर दुसरी पाणी. या शिल्पावरून एक शंका येते कि पिचकारीच्या प्रकारातील पाण्याचा पम्प ही इतकी जुनी संकल्पना होती का ?

या सुंदरीच्या उजव्या हातावर एक शुक बसलेला आहे तर डाव्या हात विड्याची पाने आहेत. हीचे अजून एक वैशिष्टय म्हणजे हिच्या हातातील बांगड्या, ज्यातील आकाराने मोठ्या बांगड्या (कंकण) हाताच्या स्थितीनुसार उतरलेल्या दाखविल्या आहेत. तिच्या डाव्या हाताला असलेल्या दासीने तर आधुनिक वस्त्रेच परिधान केली आहेत असेच म्हणायला हवे. जी सध्याच्या बर्मुडा प्रकारात मोडतील अशी आहेत.

ही शिलाबालिका तिला सतावणाऱ्या मर्कटामुळे त्रस्त आहे. कारण तो मर्कट तिचे वस्त्र ओढायचा प्रयत्न करतो आहे. त्याला हाकलण्यासाठी तिने झाडाची एक फांदी तोडून त्याच्यावर उगारलेली आहे. आणि तो मर्कटही पहा. त्याच्या उघड्या तोंडातील दातदेखील शिल्पकाराने खुबीने दर्शविले आहेत.
