वेरूळला जाताय? मग हे वाचा Going to Ellora..Read This First
वेरूळची लेणी (Ellora Caves) हा भारतातील ३ धर्मांच्या लेणीशिल्पांचा एक आगळावेगळा संगम आहे. या ठिकाणी एकत्र आपल्याला बौद्ध, हिंदू व जैन या तीनही धर्मांची लेणी पाहायला मिळतात आणि यातील शिल्पकला आपापल्या धर्मक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट आहे असेच म्हणावे लागते. भारतातील विविध लेण्यांमध्ये दिसणाऱ्या या तीनही धर्माच्या देवतांची विविध रूपे आपल्याला या ठिकाणी एकत्रितपणे पाहायला मिळतात व ते देखील भव्य दिव्य स्वरूपात. युनेस्कोने १९८३ सालीचा या लेणींचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला आहे .
वेरूळ येथे खरे तर १०० हुन अधिक लेणी आहेत पण त्यातील केवळ ३४ लेणीच सर्वसामान्यांकरिता खुली आहेत. वेरूळची सर्व लेणी राष्ट्रकूट राजघराण्याच्या कालखंडामध्ये (इ स ७५३-९८२) बांधण्यात आली होती, त्यांनी हिंदू आणि बौद्ध लेण्यांचा भाग बांधला होता आणि त्यानंतर आलेल्या यादव राजवंशाने (इ.स. ११८७-१३१७), जैन लेणी खोदली होती. यातील कैलास लेणे हे हत्तींनी तोललेल्या एका उडत्या रथाच्या संकल्पनेत बांधले असून ते एका खडकात वरपासून खालपर्यंत खोदलेले आहेत. पण असे करणे कसे शक्य झाले? यातून काढलेला इतका प्रचंड खडक कुठे टाकला गेला? याला खोदण्याकरिता कोणत्या प्रकारची तंत्रे व साहित्य वापरले गेले? याला खोदण्यासाठी नक्की किती वर्षे लागले असावीत? अशा बऱ्याच गोष्टींबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही.

हि लेणी इतकी पुरातन असली तरी यांची रचना बरीच विचारपूर्वक करण्यात आली आहे. हा भाग पावसाचा आहे, यातील पाण्याचे धबधबे लेण्यांना हानी पोहोचवू शकतात त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केला पाहिजे याचा विचार करून यात पाणी वाहून नेणाऱ्या वाटा, भूमिगत प्रवाह व त्याच बरोबर काही भुयारे बनविली गेली आहेत. थोडे निरखून पाहिल्यावर आपल्याला यांच्या खाणाखुणा काही ठिकाणी दिसू शकतात.



वेरुळचे कैलास लेणे (क्र १६) विशेष प्रसिद्ध असले तरी इतर लेणीसमूहांपैकी क्र १४ (रावण की खाई), १५(दशावतार लेणे), २१ (रामेश्वर लेणे),२९ (दुमार लेणे) ही चार हिंदू लेणी देखील त्यातील काही महत्त्वाच्या शिल्पांसाठी उल्लेखनीय आहेत. यातील २९ क्रमांकाचे दुमार लेणे (हे सीता की न्हाणी म्हणूनही ओळखले जाते ) म्हणजे मुंबईजवळील घारापुरी बेटावर असलेल्या एलिफन्टाचीच सुधारित आवृत्ती आहे . ती पाहत असताना आपल्याला आपण एलिफन्टा लेणी पाहत असल्याचाच भास होतो एवढे त्यात साम्य आहे . या सर्व लेणीगुंफातून आपल्याला शिवपुराणातील काही महत्त्वाच्या गोष्टींची शिल्पे आपल्याला एकत्रितपणे वेरूळ मधे पाहायला मिळतात. ती म्हणजे त्रिपुरांतक शिव, यमांतक शिव (मार्कंडेय कथा), अंधकासुर वध, गजासूर वध, गंगाधर शिव, लिंगोद्भव शिव, भिक्षाटन शिव, कल्याणसुंदर शिव (शिव पार्वती विवाह), अर्धनारीश्वर शिव, नृत्य शिव, रावणानुग्रह, शिव पार्वती सारीपाट इत्यादी. आणि ही सर्व शिल्पे भव्य स्वरूपात आहेत. त्यातील बारकावे वाखाणण्याजोगे आहेत. याचबरोबर विष्णूची अनेक रूपे म्हणजे वराह अवतार, नृसिंह अवतार, कृष्णावतार, त्याचबरोबर रामायण आणि महाभारताचे शिल्प पट आपल्याला वेरुळच्या कैलास या १६ क्रमांकाच्या लेण्यात पाहता येतात.
वेरूळचे कैलास लेणे व कांचीपुरमचे कैलासनाथार मंदिर यांच्यातील साम्य
दक्षिणेत कांचीपुरम येथे असलेले कैलासनाथार मंदिर हे वेरूळच्या १६ क्रमांकाच्या लेण्याशी साधर्म्य असलेले मंदिर आहे. या मंदिराची रचना, त्याच्या सभोवताली असलेली ध्यानमंदिरे (जवळपास ५६ ध्यानधारणेसाठी बसण्याच्या जागा), त्यात असलेली शिल्पे हि सर्व, मुख्य मंदिराची रचना हे अगदी कैलास लेण्यासारखे नसले तरी त्याच्या बरेच जवळ जाणारे आहे व शिल्प देखील बरीच भव्य आहेत. त्यामुळेच कैलासनाथार मंदिर हे कैलास लेण्याची प्राथमिक आवृत्ती मानली जाते व याची बांधणी कैलास लेण्याच्या सुमारे ५० वर्षे आधीच (इ.स. ७०० च्या सुमारास) पूर्ण झाली होती असे मानण्यात येते.
वेरुळ कसे पाहाल ? How to see Ellora Caves?


वेरूळची लेणी छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) सुमारे ३०-३५ किमी वर आहेत. शहरातून तेथे वाहनाने पोहोचायला सुमारे १ तास लागतो. वाहनव्यवस्था आधीच करून ठेवावी लागेल. ६ वाजल्यापासून लेणी पर्यटकांसाठी खुली होतात. व तुम्ही खूप हौशी असाल व चांगले छायाचित्रण करायचे असेल तर ASI च्या वेबसाइट वर रु ३५/- प्रति व्यक्ती, अशी तिकीट आधीच काढून सकाळी लवकर तेथे पोहोचायचे. आत गेल्यावर प्रथम १६व्या क्रमांकाचे अगदी समोरच असलेले कैलास लेणे पाहून सुरुवात करायची. ९ वाजल्यानंतर तिकीट खिडकी उघडते व खिडकीवर तिकीट घेऊन लेणी पाहायला येणाऱ्या लोकांचा ओघ वाढतो व चांगले छायाचित्रण अवघड होऊन बसते. यानंतर तेथे उपलब्ध असलेल्या इ कार्ट वाहन सवलतीचा वापर करून प्रथम जैन (लेणी क्रमांक ३० ते ३४), नंतर हिंदू (लेणी क्रमांक २९ व इतर) व सर्वात शेवटी बौद्ध लेणी (लेणी क्रमांक १२ पासून उलट क्रमाने) पाहता येतील. जैन लेणी सुमारे १ किमी अंतरावर असल्याने चालत जाण्यापेक्षा ही रु ३० ची इ कार्ट सेवा वापरूनच पाहावीत.



वेरूळ पाहायचे तर ते वेळ देऊन व नीट आयोजन करून. यात क्रमांक १ ते १२ ही बौद्ध लेणी आहेत, क्रमांक १३ ते २९ ही हिंदू लेणी आहेत व क्रमांक ही ३० ते ३४ जैन लेणी आहेत. सर्वसाधारणपणे सर्व पर्यटक क्र १६ चे कैलास लेणे पाहतात व काही महत्त्वाची बौद्ध लेणी पाहतात (क्रमांक १०,११ व १२). पण वर सांगितलेली हिंदू लेणी देखिल तितकीच महत्त्वाची आहेत.
लेणे क्रमांक ३०-३४ व नंतर २९ पाहून झाल्यावर परतताना इ कार्ट लेणी क्रमांक २१ जवळ थांबवावी व हे लेणे पाहून घ्यावे व चालतच लेणे क्रमांक १६ कडे पोहोचावे २९ ते २१ च्या मधली लेणी व २१ ते १६ च्या मधली लेणी महत्त्वाची नाहीत. त्यानंतर थेट लेणे क्रमांक १४ पाहावे व त्यानंतर लेणे क्रमांक १५ साठी काही पायऱ्या चढून वर जावे.
आपण जर नवशिके असलो, पुराणकथा, शिल्पे यांची फारशी ओळख नसली तर ASI चा गाईड घेणे उत्तम. हे गाईड सर्व गोष्टी, शिल्पांची वैशिष्ट्ये, कोनाड्यात असणारी सहसा दृष्टीस न पडणारी शिल्पे, चित्रे, त्यांची वैशिष्ठे या सर्व गोष्टी आपल्याला सांगतात. आपण जर जास्त रस घेतला तर ते देखील उत्साहाने या गोष्टी दाखवतात. भारतभरातील विविध मंदिरांतील शिल्पांचे एकत्रीकरण आपल्याला यात पाहता येत असल्याने विविध पुराणांतील अनेक गोष्टी आपल्याला समजत जातात. अशाच काही निवडक कथा या वेबसाइटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
वेरूळ पाहण्यासाठी संदर्भ पुस्तके
- Ellora by M.K.Dhavalikar
- वेरूळ दर्शन – डॉ. गो. बं. देगलूरकर
- ASI Handbook
- शिवमूर्तये नमः – डॉ. गो. बं. देगलूरकर
