#NarmadaParikrama


Day 6-Bhedaghat आजच्या टप्प्यातला प्रवास फार दूरचा म्हणजे जवळपास ३७५ किमीचा होता. एवढा दीर्घ प्रवास केल्यावर आम्ही पोहोचलो ते भेडाघाटाच्या एका सुंदर मंदिरापाशी व ते म्हणजे ६४ योगिनी मंदिरापाशी. वर्तुळाकार आकाराच्या या मंदिराच्या सभोवतालच्या कोष्ठांमध्ये जवळपास ९० मूर्ती आढळून येतात. यात योगिनीमूर्ती तर आहेतच पण काही गणेशमूर्ती देखील आढळून येतात. या मंदिराच्या वर्तुळाकार प्रांगणात एक सुंदर शिवमंदिर आहे. नंदीवर बसलेल्या शंकर पार्वतीची मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य. असे शिवमंदिर इतर कुठेच आढळत नाही. यापैकी वर्तुळाकार मंदिराची निर्मिती इ स १००० च्या सुमारास कलिचुरी वंशीय राजांनी केली तर मधील शिवमंदिराची निर्मिती १२ व्या शतकातील गुजरात मधील राणी गोसलदेवीने केल्याची माहिती मिळते. या मंदिरातील शिवप्रतिमा उत्कृष्ट असली तरी भोवतालच्या योगिनी मात्र भग्नावस्थेत आहेत. भारतातील ६४ योगिनी मंदिरांपैकी हे सर्वात मोठे असल्याचे सांगण्यात येते. भारतीय संसद भवनाची (जुनी) इमारत याच वर्तुळाकार आकारावरून प्रेरित असल्याचे सांगितले जाते.
यानंतर आमची माता नर्मदेशी गाठभेट घडली ती भेडाघाटाच्या प्रवाहात. इथे आम्ही बोटीतून फेरफटका मारला व बोटचालकाकडून विविध संगमरवर प्रकारांची विनोदी पद्धतीने माहिती घेतली. या घाटातील संगमरावराने तयार होणारे विविध काल्पनिक आकार, गमतीशीर घटना इ या होडीवाल्याने मस्त यमक जुळवत सांगितले. येथील सर्वच बोट चालकांचे हे वैशिष्ट्य असल्याने हे मात्र अनुभवायलाच हवे.
आता अंधारू लागलं होतं पण अजून एक ठिकाण बाकी होतं ते म्हणजे धुवांधार धबधबा. हा अगदी मिनी (अथवा मायक्रो) नायगाराच जणू. त्यामुळे या प्रवाहाचे उडणारे तुषार आम्ही मनसोक्त अंगावर घेतले व तिथेच आमचे नर्मदापूजन करुन व नर्मदाष्टक म्हणत दिवस संपविला.
नर्मदाष्टक ५
अलक्षलक्ष किन्नरामरासुरादी पूजितं
सुलक्ष नीर तीर धीर पक्षीलक्ष कुजितम
वशिष्ठशिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे ॥५॥
भावार्थ – लक्षावधी देव, किन्नर, असूर तुझी पूजा करतात. तुझ्या तीरावरील असंख्य पक्षिगण कूजन करीत तुला भजतात. वसिष्ठ, पिप्पलादिकांचे कल्याण करणाऱ्या अशा हे देवी नर्मदे, तुझ्या चरणकमलाना मी वंदन करतो.

